देशाभिमान ठीक, संस्कृतीचा अभिमान तर छानच; पण तो अन्य देशांत किती- कसा आणि कुठे दाखवावा, ‘आत्मीयता’ किती ठेवावी याचे सुटले भान, तर?
आपण विश्वगुरू आहोत, याबद्दल अनेकांच्या मनात कोणतीही शंका नाही. त्याशिवाय जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन)नुसार आपण जगातली सहाव्या क्रयशक्ती समानतेनुसार जगातली तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोतच. साहजिकच महासत्ता बनण्यापासून फार दूर नाही… ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमांतून आपण कोणत्याही शत्रुदेशाला कशी सहज धूळ चारतो हे सगळ्या जगाने नुकतेच आ वासून बघितले आहे. शिवाय देशातल्या अर्बन- रुरल नक्षल्यांचा, फालतू डाव्यांचा, बिनडोक समाजवाद्यांचा आणि मूर्ख काँग्रेसवाल्यांचा जवळपास नायनाट करण्यात आला आहे. जगभर जाल तिकडे भारतीयच भारतीय दिसताहेत.
अनेक देशांमध्ये त्यांनी राजकीय सत्तापदे मिळवली आहेत. मोठमोठ्या अमेरिकी कंपन्यांची प्रमुखपदे हस्तगत करून त्यांनी भारतीय संस्कृतीचा डंका पिटला आहे. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न ‘वसुधैव कुटुम्बकम’मध्ये परावर्तित झाले आहे. आता हे विश्वचि माझे घर… अशा वेळी आपले परके असे काही उरतच नाही. ‘हे विश्वाचे अंगण आम्हां दिले आहे आंदण’ या भावनेने आपली म्हणजे भारतीय माणसे जगभर वावरताना दिसतात.
एके काळी साप, गारुडी, वाघ, हत्ती रस्त्यावर फिरतात, अशा देशातले लोक या नजरेने ज्यांच्याकडे बघितले गेले होते, त्या देशातले लोक इतक्या आत्मविश्वासाने दुनिया फिरतात, हे ज्यांना बघवत नाही, भारताच्या या सगळ्या प्रगतीबद्दल ज्यांना असूया वाटते, असे लोकच या विश्वगुरू असलेल्या देशातल्या लोकांच्या सगळ्याच गोष्टींवर सतत टीका करत राहतात… या नतद्रष्ट लोकांनी गेल्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांच्या वागण्याला नावे ठेवणे सुरू केले आहे…
आता आपल्याला हवे तिथे जाऊन, हवे तसे मनमौजी वागून, सुट्टी मस्त घालवून निघण्याच्या आनंदात काही भारतीयांनी घेतला एखाद्या विमानतळाच्या धावपट्टीवर मनमुरादपणे त्यांच्या पारंपरिक नृत्याचा आनंद तर कुठे आणि काय बिघडले? कुणा नतद्रष्टाने त्याचे चित्रीकरण करून समाजमाध्यमांवर नेताच, ‘यांनी तर धावपट्टीजवळच गरबा खेळून कशी देशाची लाज घालवली,’ वगैरे चोची मारणारेही लगेच पुढे आले. पण व्हिएतनामसारख्या देशात जाऊन विमानतळावरच नाही, तर त्याच्या धावपट्टीजवळ असेल, पण आपल्या नृत्यसंस्कृतीचे दर्शन घडवणे म्हणजे लाज घालवणे कसे बरे? तिथल्या धावपट्टीवरच्या कर्मचारी वर्गाला तरी यामुळे कळले असेलच ना भारतीय संस्कृती किती महान आहे आणि भारतीय लोक किती आनंदी आहेत ते. शिवाय धावपट्टीजवळ त्यांची रोजची काहीही कामे चालोत.
आम्ही थोडेच रोज तिथे जातो? यांचे-त्यांचे नियम आम्ही पाळत बसलो, यांचा-त्यांचा विचार करत बसलो, तर आम्ही आमच्या सुट्टीचा आनंद कधी घेणार? तो तर प्रत्येक ठिकाणाहून शक्य तितका घ्यायला हवा. परदेशात फिरायला जाताना आम्हाला समजते की आंतरराष्ट्रीय विमानसेवेत विनामूल्य मद्य मिळते. मग ते पुन्हा पुन्हा मागून हवे तेवढे घेतले तर काय बिघडले? पण लागले लगेच इतरांच्या पोटात दुखायला. हवाई सुंदर्या या प्रवाशांच्या सेवेसाठी नेमलेल्या अधिकृत कर्मचारी. त्यांना चारदोन वेळा बेल वाजवून पुन्हा पुन्हा बोलावून घेतले तर त्यात काय चुकले? झाला लगेच ‘भारतीय लोक कसे चुकीचे वागतात’चा गजर सुरू. अलीकडेच शिकागोहून निघालेेले एअर इंडियाचे एक विमान अर्ध्या वाटेतून परत फिरले म्हणे. कारण काय तर त्या विमानात खूप मोठ्या प्रमाणात भारतीय प्रवासी होते आणि त्यांनी विमानाच्या शौचालयात फ्लश करताना कपडे, प्लास्टिक पिशव्या, डायपर टाकल्यामुळे विमानातील १२ पैकी आठ शौचालये बंद पडली. या कारणासाठी विमान परत फिरवले असे म्हणणे जरा अतिच. बरेच भारतीय प्रवासी होते, म्हणजे त्यांनीच केले असे थोडेच आहे? भारतीय प्रवाशांना बदनाम करायचा हा कटच असणार; दुसरे काही नाही!
भारतीय लोक आजकाल मोठ्या संख्येने देशाबाहेर फिरायला बाहेर पडू लागले आहेत. ते उत्साहाने पर्यटनाचा आनंद घेत फिरतात आणि त्यांचा हा आनंद न बघवणारे सगळे जग भारतीय लोक कसे मोठमोठ्याने बोलतात, सगळीकडचे नियम मोडतात, गोंधळ घालतात असे म्हणत बोटे मोडते. स्वित्झर्लंडमधील एका महागड्या हॉटेलात म्हणे ‘भारतीय पर्यटक पाहुण्यांसाठी’ असे शीर्षक असलेल्या एका फलकावर ‘बाल्कनीत, पॅसेजमध्ये हळू बोला, शांतता पाळा, न्याहारीच्या बुफेमधील पदार्थ हॉटेलच्या रूममध्ये नेऊ नका, तसे केल्यास स्वतंत्र आकार पडेल’ असे लिहिले होते.
म्हणजे पुन्हा तेच. ‘वसुधैव कुटुम्बकम’ हा संदेश जगाला देणार्या भारतीयांनी काय आपल्याच कुटुंबातही मनासारखे वागायचे नाही? आम्ही काय यांचे नियम पाळायला तिथे जातो की काय? ज्यांना शांतता हवी असते, त्यांना मजा करायची नसते, ज्यांना आमचे बोलणे बडबड वाटते, त्यांनाच त्यांच्या घरीच बसायला सांगा ना मग… काही महिन्यांपूर्वी बालीमधल्या एका हॉटेलमध्ये म्हणे एका भारतीय पर्यटक कुटुंबाच्या सामानातून हॉटेल कर्मचार्यांनी आरसे, शोभेच्या वस्तू, हँगर्स अशा वस्तू काढून घेत त्यांच्यावर चोरीचा आरोप केला होता. पण आवडली एखादी वस्तू, टाकली बॅगेत आत्मीयतेने, तर म्हणून लगेच कुणाला चोरासारखे वागवायचे? आम्ही आमच्याकडे येणार्या पर्यटकांना ‘अतिथी देवो भव’ म्हणतो आणि आम्ही तुमच्याकडे आल्यावर तुम्ही काय म्हणणार, तर आम्ही गोंधळ घालतो?
थायलंडमध्ये पट्टायाच्या समुद्रकिनारी आम्ही जरा मोकळेपणाने वागलो की म्हणे भारतीय पर्यटक असभ्यपणे वागतात. पण रोजच्या जगण्याला कंटाळलेले पर्यटक समुद्रकिनारी जाऊन मोकळेपणाने पहुडले, त्या वातावरणाचा आनंद घेताना झाल्या चारदोन गोष्टी, पडली चिप्सची वगैरे पाकिटे इथेतिथे, तर त्याचे काय एवढे? चारदोन माणसे कामाला लावून घ्या की स्वच्छ करून… गेलाबाजार शाळकरी मुलांसाठी एखादी स्वच्छता मोहीम राबवून समुद्रकिनारा साफसूफ करून घ्यायचा. पर्यटक म्हणून पैसे खर्च करून आम्ही तिथे जायचे आणि आम्हीच तिथल्या स्वच्छतेची काळजी करायची, हा कुठला न्याय? आमच्याकडे नसते असे काही. शिवाय त्या पट्टायाच्या समुद्रकिनारी नैसर्गिक विधींसाठी केवढे पैसे मोजावे लागतात. ‘होल वावर इज अवर’ असताना त्यासाठी पैसे कशाला द्यायचे? आणि थायलंडचे काय सांगता? पर्यटकांच्या म्हणजे आमच्या पैशांवर चालणारा हा देश.
आता म्हणे पर्यटकांच्या गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी त्याने ९३ देशांमधील पर्यटकांवर बंधने घातली आहेत. पण त्यात महान भारताचाही समावेश करायचा? पुण्याहून मुंबईला जावे तसे आपले लोक बँकॉक, पट्टायाला जात असताना आपल्यासाठीची ६० दिवसांची व्हिसामुक्त सवलत नेमकी मे महिन्याआधीच थायलंडने रद्द करून १५ दिवसांवर आणायची? शिवाय आता यापुढच्या काळात थायलंडला जायचे तर ई व्हिसा घेऊन त्यासाठी एका वेळचे अडीच हजार रुपये भरायचे? असे असेल तर थायलंडला काय सोने लागले आहे की काय? इतर ठिकाणी जाऊ. तर हे सारे असे आहे. आपण वेगाने प्रगती केली आहे. आपला खूप विकास झाला आहे. त्यामुळेच २०१४ च्या आधीच्या काळाच्या तुलनेत आता भारतीय लोकांकडे खूप पैसा आला आहे. ते खूप मोठ्या संख्येने परदेशी फिरू लागले आहेत. जगात वावरण्याचा आधी कधीच नव्हता इतका आत्मविश्वास त्यांच्याठायी निर्माण झाला आहे. त्याचे दर्शन ते जिथे जातात, तिथे त्यांच्या वागण्यातून होत राहते. अनोळखी ठिकाणी जाऊन आपल्याला हवे तसे वागणे हे सोपे नाहीच मुळी. भारतीयांचा हा आत्मविश्वास जगाला झेपत नाही… म्हणून तर भारतीय पर्यटकांच्या बेशिस्तीबद्दल वटवट वाढते… याला अपवाद असतीलच, त्यांना वाटेल हे सारे अनाठायी… पण परदेशांतले ‘आत्म’दर्शन तेवढ्याने थोडेच थांबेल!
