बातम्यांचे केवळ ग्राहक (कन्झ्यूमर) असणारे लोक आज बातम्यांचे उत्पादकही (प्रोड्यूसर) होऊ लागले आणि आता ‘यांचे काय करायचे’ हा प्रश्न व्यवस्थेला पडला…

‘जंतर’ हा यंत्र या शब्दाचा अपभ्रंश आणि ‘मंतर’ म्हणजे मंत्र. गेल्या काही वर्षांत झालेल्या तंत्रप्रगतीमुळे, त्यातून निर्माण झालेल्या समाजमाध्यमांमुळे पत्रकारितेचे हे जंतर-मंतर सर्वसामान्य लोकांहाती आलेले आहे. आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे, की या जनपत्रकारितेचे काय करायचे, हेच विद्यमान व्यवस्थेला कळेनासे झालेले आहे.

आपण पत्रकार आहोत असा दावा जर सगळेच करू लागले, तर सारे अवघड होऊन जाईल, ही सर्वोच्च न्यायालयाची याबाबतची टिप्पणी. त्यातून या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात येते. हा मुद्दा आजच चर्चेस येण्यास कारणीभूत ठरले ते जंतर-मंतर आणि दिल्लीतील अन्य काही भागांत झालेले विद्यार्थी आंदोलन. त्या आंदोलनांत अनेक पत्रकारांना – त्यातही मुक्त पत्रकारांना आणि ‘सिटिझन जर्नालिस्ट’ या अर्थी जनपत्रकारांना – पोलिसांनी एखाद्या समाजकंटकाप्रमाणे ‘हाताळले’. त्या बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त वक्तव्य केले. असे असले, तरी हा प्रश्न केवळ ते आंदोलन, त्यातील ते मुक्त आणि जनपत्रकार, ते यूट्यूबर्स आणि प्रभावक यांच्यावरली पोलिसी हडेलहप्पी एवढ्यापुरताच मर्यादित नाही. यातून काही मूलभूत मुद्दे समोर आलेले आहेत. आगामी काळात ते अधिकाधिक तीव्र आणि व्यापक होत जाण्याची शक्यता असल्याने, त्याची चर्चा आवश्यक ठरते.

यातील पहिला मुद्दा आहे तो ‘पत्रकार’ म्हणजे कोण? सामान्यत: एखाद्या माध्यमसंस्थेत कार्यरत असणारे वा स्वत:ची माध्यमसंस्था असणारे वार्ताहर, प्रतिनिधी, संपादक ते पत्रकार. त्यातील काही जण नाना ‘उद्योग’ करतात, हा भाग वेगळा. मात्र सार्वजनिक महत्त्वाच्या घटना, घडामोडी, समस्या यांची माहिती गोळा करून, तिची सत्यता पडताळून, त्यातील विविध बाजू मांडून, विश्लेषण करून ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्राथमिक काम. नियतकालिके, अनियतकालिके, नभोवाणी, दूरचित्रवाणी आदी त्यासाठीची माध्यमे. त्यांद्वारे ते बातम्या देतात. बाकीचे लोक हे त्या बातम्यांचे ग्राहक. कालपर्यंत पत्रकारितेचा व्यवसाय हा असाच एकरेषीय होता.

आता तसे राहिलेले नाही. संगणकीय प्रगती, त्यातही ‘डेस्क टॉप पब्लिशिंग’ची सुलभ व स्वस्त उपलब्धता, त्यानंतर आलेली विविध प्रकारची समाजमाध्यमे, त्यातही विशेषत: व्हॉट्सॲप हा संदेशवहन मंच यांनी पत्रकारितेचे व्यावसायिक व्याकरण मोठ्या प्रमाणावर बदलले. सर्वसामान्यांच्या हातात आलेल्या मोबाइल दूरध्वनीने तर त्यात क्रांतीच केली. याला – भारतापुरते बोलावयाचे झाल्यास – जोड मिळाली ती माहिती अधिकार कायद्याची. सामान्य नागरिक आणि पत्रकार यांच्यातील एक फरक या कायद्याने अक्षरश: धुळीस मिळवला. जी शासकीय माहिती केवळ व्यावसायिक पत्रकारांनाच मिळू शकत होती ती आता सामान्यांनाही एका अर्जावर उपलब्ध होऊ लागली. या माहितीच्या आधारे सामान्य लोकही ‘बातम्या’ करू लागले.

आपल्या मोबाइलद्वारे सभोवती घडणार्‍या घटना-घडामोडी टिपू लागले. समाजमाध्यमांवरून त्या प्रसारित करू लागले. ऑल्विन टॉफ्लर म्हणतात ते ‘प्रोझ्यूमर’ म्हणजे हेच लोक. कालपर्यंत बातम्यांचे केवळ ग्राहक (कन्झ्यूमर) असणारे लोक आज बातम्यांचे उत्पादकही (प्रोड्यूसर) होऊ लागले.  यातून केवळ ‘यूट्यूबर्स’, ‘ब्लॉगर्स’, ‘पॉडकास्टर्स’, ‘रील मेकर्स’च उभे राहिले असे नाही, तर ‘अनंत काळचे सामान्य जन आणि क्षणाचे पत्रकार’ही दिसू लागले.

एखाद्या आडगावातील शाळकरी कन्या हातातील छत्रीचा ‘बूम’ करून, मोबाईलचा कॅमेरा वापरून रस्त्याच्या दुर्दशेची बातमी करते, तेव्हा ती क्षणाची पत्रकारच असते. एखादा मोबाईलधारक एखाद्या सरकारी कर्मचार्‍याचे गैरकृत्य चव्हाट्यावर आणतो, एखादा ‘प्रभावक’ कोण्या नेत्याच्या गाडीची ‘नंबरप्लेट’ कशी कायदेभंग करणारी आहे हे दाखवून देतो, एखादा मुक्त पत्रकार पोलिसी अत्याचाराची दृश्ये दाखवतो, तेव्हा ते राज्यघटनेने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क वापरून सत्तेला प्रश्न विचारण्याचे, कायद्याचे राज्य वाचवण्याचेच काम करीत असतात.

वास्तविक ही मुख्य प्रवाहातील माध्यमांची जबाबदारी. त्यात ती कच खात आहेत, प्रसंगी त्यातील बहुतांश माध्यमे सत्ताधार्‍यांची भाटगिरी करून आपल्या महसुलाच्या तुंबड्या भरण्याचे धंदे करीत आहेत, हे जसजसे लक्षात येत गेले, तसतशी ही जनपत्रकारिता जोर धरू लागली. यावर कोणी असे विचारू शकतो की, त्या माहितीची सत्यता, बातमीची योग्यायोग्यता यांच्या उत्तरदायित्वाचे काय? प्रश्न रास्तच आहे.

अर्धवट माहिती, प्रचारी बातम्या, आपणच न्यायनिवाडा करण्याची हौस असे अनेक दुर्गुण जनपत्रकारितेत दिसतात, हे खरे. पण त्यापासून मुख्य प्रवाहातील माध्यमे, त्यातही आजच्या राष्ट्रीय समजल्या जाणार्‍या वृत्तवाहिन्या दूर आहेत असे कोण म्हणू शकेल? याचा अर्थ जनपत्रकारांना मोकळे रान असावे असे नाही. याचा अर्थ एवढाच, की बहुतांश पत्रकारितेची विश्वासार्हतेची यत्ता उणे बालवाडी असताना केवळ जनपत्रकारांनाच त्याबाबत फासावर चढवणे योग्य नाही. अर्थात एकूणच हा चर्चेचा वेगळा मुद्दा.

त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा की,  जनपत्रकारांची संख्यावाढ हे एका अर्थी पत्रकारितेचे लोकशाहीकरण. या पत्रकारितेच्या तंत्ररूपामुळे त्यात ध्वनी आणि चित्रांस अधिक महत्त्व. त्यामुळेच आज दृक्श्राव्य जनपत्रकारिता वृत्तवाहिन्यांची प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे आलेली आहे. काही वृत्तसादरकर्ते त्यांच्या राष्ट्रीय कोलाहल-कार्यक्रमांतून यूट्यूबर पत्रकारांबद्दल ज्या स्वाभाविक तुच्छतेने बोलतात त्यातून दिसतो तो त्यांनी या जनपत्रकारांचा घेतलेला धसकाच. ‘‘आमच्या क्षेत्रात तुमच्यासारख्या ‘झुरळां’चे काय काम? तुम्ही आहात कोण?’’ हा त्यांचा छुपा सवाल असतो. तसाही ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हा एक राष्ट्रीय न्यूनगंडात्मक सवाल झालेला आहे.

तो या वृत्तसादरकर्त्यांनी आडूनआडून विचारावा यात नवल ते काय? आता तर त्याहीपुढे जाऊन ‘या समस्येवर कसा मार्ग काढावा’ असा विचार सुरू झाल्याचे दिसत आहे. त्याचा प्रारंभ या जनपत्रकारांना पत्रकार म्हणून संरक्षण कसे द्यावे या विचारणेतून झाला आहे. त्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे हवीतच, असे मत मांडण्यात येत आहे. या आवश्यकतेबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याच तत्त्वांचे जाचक निर्बंधात रूपांतर झाले तर मात्र काळजीचे कारण असेल. मुख्य प्रवाहातील माध्यमांचे अवकाश आकसत चालल्याचा हा काळ.

अशा काळाचा ‘स्वभाव’ हा असतो की, जोवर ‘ते’ आपल्या बाजूने बोलतात, तोवर लाडके. मग त्या समाजमाध्यमवीरांच्या बैठका घ्या. त्यातील ‘प्रभावकां’चा उदोउदो करा. सरकारी योजनांच्या, कामांच्या प्रचारासाठी त्यांना मोबदला द्या. पण त्यातलेच काही विरोधात बोलू लागले. सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार उघड करू लागले. अन्यायाविरोधात लोकांच्या बाजूने बोलू लागले, की ते दोडके होतात. अशांवर दांडके चालवण्यास मग मार्गदर्शक तत्त्वेच उपयोगी ठरू शकतात. या दिशेने आपण जाणार की काय हा खरा आजचा प्रश्न आहे.

त्यातही, समाजमाध्यमांवर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्यप्राय. चीनसारख्या सेन्सॉरसंपृक्त आणि पाळतशाही असलेल्या देशासही ते पुरेसे जमलेले नाही. पाळतशाहीने निर्माण झालेल्या ‘गारठ्याने’ – ‘चिलिंग इफेक्ट’ने – माणसे स्वत:स सेन्सॉर करू लागतात हे खरे. हे पत्रकारांबाबतही घडते. परंतु हा गारठा कायमस्वरूपी नसतो. अतिभय माणसास अनेकदा निर्भय बनवते. याचा प्रत्यय काही प्रमाणात आज येतो आहे. जनपत्रकारितेचे फोफावणे, त्या पत्रकारांनी व्यवस्थेला सवाल करणे हे घडताना दिसत आहे.

पुन्हा यातील सारेच पत्रकार विशिष्ट सत्ताधार्‍यांच्या वा पक्षांच्या विरोधात आहेत, असे समजणे हा बिनडोकपणा ठरेल. या पत्रकारांमध्ये सत्ताधार्‍यांची तळी उचलणारेही काही कमी नाहीत. ते कसेही असले, तरी त्या सर्वांच्याच अभिव्यक्तीला घटनेच्या मर्यादेत संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. जनपत्रकार झाले, तरी अखेर ते या लोकशाही देशाचे राज्यघटनेने संरक्षित केलेले नागरिक आहेत. पत्रकारितेचे हे जंतर-मंतरही लोकशाहीसाठी आवश्यक आहे.