फेसबुक, ट्विटर, अॅमेझॉन या सगळ्यांस आपल्याप्रमाणे ‘देसी’ पर्याय शोधण्याचा प्रयत्न चीनमध्येही झाला आणि ती सर्व चिनी उत्पादने अत्यंत यशस्वी ठरली. खरे तर या घटनेचे कोणास आश्चर्य कसे वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते. देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या आदेशावरून लाखो, कोट्यवधींनी हे अॅप आपापल्या मोबाइलमधे डाऊनलोड करून घेतले. सर्वोच्च नेत्याच्या साजिंद्यांपाठोपाठ अन्य कोट्यवधी जल्पकांच्या आत्मनिर्भर गँग्सनी देशाच्या प्रतिष्ठेसाठी हातमिळवणी केली आणि हे अॅप वापरण्याचा निर्धार केला. कोण कोणते दीडदमडीचे ट्विटर! हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या, महासत्ता होऊ घातलेल्या, विश्वगुरूंची खाण असलेल्या या देशाच्या इभ्रतीचा अपमान करू धजते यामुळे ‘सव्वासो क्रोर’ भारतीयांना आलेल्या सात्त्विक संतापातून याचा जन्म झालेला. इस्लामधार्जिण्या, पुरोगामी हिंदू धर्म बुडव्यांना याद्वारे चोख उत्तर दिले जात होते. लोकशाहीची जननी असलेल्या प्रदेशाच्या उद्धारासाठी कार्यरत जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी, अनुयायांनी याचा स्वीकार केलेला! या पक्षाचे अधिकृत सदस्यच मुळी १० -१२ कोटी. तेव्हा गेला बाजार सर्वोच्च नेत्याच्या आदेशानुसार इतक्या साऱ्यांच्या मोबाइलमधे तरी याचे अस्तित्व असणार. आणि तरीही हे ‘कू’ नामे अॅप मृत होते हे आश्चर्य आणि त्याचे कोणासही काही वाटत नाही, राष्ट्रीय शोक व्यक्त होत नाही, निती आयोग ‘कू’च्या अवस्थेत लक्ष घालत नाही हे महद्आश्चर्य! ते व्यक्त करणे हे कर्तव्य ठरते. याचे कारण एकेकाळच्या ‘ट्विटर’ला आणि आताच्या ‘एक्स’ला पर्याय म्हणून साधारण पाच वर्षांपूर्वी या पुण्यभूमीत ‘कू’ या स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साइटचा घाट घातला गेला. सुरू झाल्या झाल्या केवढे कौतुक झाले या ‘कू’चे. दिल्लीतून साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून त्या पक्षाच्या राष्ट्र पुनरुत्थानासाठी भूतलावर अवतार घेतलेल्या गल्लीतील साध्या पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी या स्वदेशी भारतीय ट्विटरानुकरणाचा पुरस्कार केला. तथापि बुधवारी या ‘कू’च्या पक्षाने आकाशाकडे पाहात चोच उघडून प्राण सोडले. हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. वगैरे वगैरे. कारण काय? तर मागणी नाही आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे गुंतवणूकदार नाहीत. हे आश्चर्यावर आश्चर्य. खरे तर एका आत्मनिर्भर अभिव्यक्तीसाठी संभाव्य महासत्तेतून एकही गुंतवणूकदार ‘कू’त गुंतवणूक करण्यासाठी पुढे येऊ नये यास काय म्हणावे? यामागे खरे तर भारताची प्रगती पाहू न शकणाऱ्या पाश्चात्त्य शक्तींचा हात असणार! अन्यथा पंतप्रधानादींनी आशीर्वादलेल्या उपक्रमासाठी एकही मायेचा पूत या देशात उभा राहिला नाही, हे कसे? आणि लागून लागून अशी कितीशी रक्कम या ‘कू’पक्ष्यास लागणार होती? गेल्या काही वर्षांत ‘कू’ने ५.७ कोटी डॉलर्स उभे केलेले. गेल्या तीन वर्षांत मात्र इतकाही पैसा उभा राहू शकला नाही. अब्जावधींची कंत्राटे मिळवणाऱ्या ‘अ’घटित उद्याोगपतींसाठी ही इतकी रक्कम म्हणजे खरे गल्ल्यातली चिल्लर. यापेक्षा कित्येक पट विवाहपूर्व सोहळ्यांवर खर्च होते. किंवा शहराशहरांत कबुतरांस चारा घालण्यावर आपल्या देशात तो घालणाऱ्यांकडून अधिक रक्कम खर्च होत असेल. पण त्यातील काही दाणेही या ‘कू’पक्ष्याच्या वाट्यास येऊ नयेत? जवळपास सहा कोटी मोबाइलमध्ये हे अॅप होते एकेकाळी. ‘ट्विटर’ची डिट्टो प्रतिकृती असलेल्या या भारतीय अनुकरणाचे कौतुक फक्त भारतीयांनाच होते असे अजिबात नाही. रोनाल्डिनोसारखा फुटबॉलपटू, दलाई लामा यांच्यासारखे धर्मगुरू असे अनेकजण ‘कू’ वापरत. ‘ट्विटर’ पूर्णपणे एलॉन मस्क याच्या हाती गेल्यावर तर ब्राझीलमधे ‘कू’चे अनुयायी इतके वाढले की पाहता पाहता त्या देशातही ‘ट्विटर’ मागे पडले. अर्थात त्यामागे ‘कू’चे नाममाहात्म्य होते, हे दुर्लक्षता येणार नाही हे खरे. एकेकाळची पोर्तुगालची वसाहत असलेल्या ब्राझीलमधे पोर्तुगीज बोलणारे अधिक असणार हे उघड आहे. पोर्तुगीज भाषेत ‘कू’ म्हणजे मानवाचा पार्श्वभाग. या ‘वास्तवा’मुळे ‘कू’ त्या देशात समाजमाध्यमी कमालीचे लोकप्रिय ठरले. ब्राझीलमधील सर्वात मोठे ‘कू’ असा त्याचा उल्लेख होत असे. तरीही हा ‘कू’ पक्षी मृत झाला. त्याच्या प्रवर्तकांनी ‘कू’स मूठमाती देत असल्याची अधिकृत घोषणा केली. असे का झाले असावे? केवळ अभिनिवेश हेच भांडवल असेल तर काय होते, याचे हे जिवंत उदाहरण. आर्थिक पायाभूत सोयींचा अभाव असताना केवळ कोणास तरी धडा शिकवण्याच्या उद्देशाने हे ‘कू’ जन्मास घातले गेले. त्यात काही स्वतंत्र बुद्धिमत्ता होती म्हणावे तर त्याचा पूर्ण अभाव. अगदी पक्षाच्या बोधचिन्हासह ही तशीच्या तशी मूळ ट्विटरची प्रतिकृती होती. यशस्वी प्रारूपांच्या प्रतिकृती हे अर्थातच आपले वैशिष्ट्य! अॅमेझॉन यशस्वी ठरले? काढा फ्लिपकार्ट ! (तेही आपणास आपल्या हाती राखता आले नाही.) ‘उबर’ यशस्वी ठरली? लगेच भारतीय अनुकरण ‘ओला’ तयार. जगात ‘टेड टॉक’ गाजते आहे काय? लगेच त्याच्या बिनडोक मराठी अनुवादाचा उदय झालाच म्हणून समजा! वास्तविक उत्तम मूळ उत्पादन उपलब्ध असताना त्याच्या प्रतिकृतींस यशस्वी होणे फार अवघड असते हे सामान्यज्ञान. त्यातही मूळ उत्पादनापेक्षा अधिक काही मूल्यवर्धन, नावीन्यपूर्ण बदल असे काही असले तर प्रतिकृतीही टिकाव धरू शकते. तथापि आपल्या देशी ‘कू’मध्ये या सगळ्याचा ठार अभाव होता. भारतीय भाषांत ‘कू’ करायची सोय सोडल्यास यात ट्विटरपेक्षा अन्य काहीही वेगळे नव्हते. तसे ते नंतर करावयाचे तर कल्पनाशक्ती लागते आणि ती आहे असे गृहीत धरले तरी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पैसा लागतो. ‘कू’बाबत तीच अडचण आली आणि यात काही गुंतवणूक-योग्य न आढळल्याने निधीचा रोख आटला. परिस्थिती इतकी बिघडली की बंगलोर-स्थित ‘कू’वर कामगार कपातीची वेळ आली. पण एकट्या ‘कू’लाच या परिस्थितीसाठी बोल लावणे योग्य नाही. अंतिमत: हा एक नवउद्याोग (स्टार्टअप) होता. या बाबत आपण जगाची ‘स्टार्टअप’ राजधानी असे म्हणवून घेणे आपले आपल्यालाच आवडत असले तरी प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत ७,५९२ इतकी स्टार्टअप्स आपल्याकडे ‘कू’च्या वाटेने गेली, हे सत्य नाकारता येणारे नाही. यातील ५,८६८ इतकी स्टार्टअप्स एकट्या २०२२ या एकाच वर्षात बंद पडली. यातील अनेक वा काही ‘कू’प्रमाणेच केवळ अंत:प्रेरणा या एकाच भांडवलाच्या आधारे सुरू झाली असतीलही. परंतु त्यांना ग्राहक तसेच बाजारपेठ, गुंतवणूकदार यांचीही हवी तशी साथ मिळाली नाही, हे सत्य आहेच. या पार्श्वभूमीवर या पाश्चात्त्य यशोगाथांना चीनने शोधलेल्या यशस्वी प्रत्युत्तरांचा दाखला देणे योग्य ठरेल. फेसबुक, ट्विटर, अॅमेझॉन इत्यादींतून पाश्चात्त्य यशोगाथा तेवढी समोर येते. या सगळ्यास आपल्याप्रमाणे ‘देसी’ पर्याय शोधण्याचा प्रयत्न चीनमध्येही झाला. फरक इतकाच की सर्व चिनी उत्पादने अत्यंत यशस्वी ठरली. फेसबुकला सिना वेईबो, ट्विटरला वेईबो, अमेझॉनला अलीबाबा असे एकापेक्षा एक अत्यंत यशस्वी पर्याय चीनने दिले. आज भारतासह अनेक पाश्चात्त्य देशांत चीनच्या ‘बीवायडी’ नामे विजेवर चालणाऱ्या गाड्या धावू लागल्या असून अमेरिकी टेस्लाचे धाबे त्यामुळे दणाणलेले आहे. भारतात तर ‘बीवायडी’च्या टॅक्सी सर्रास दिसू लागल्या आहेत. म्हणून ‘कू’चे असे अकाली कैलासवासी होणे वेदनादायी आहे. भारतीय नवउद्यामी नामशेष करणारी ही ‘कू’प्रथा कधी तरी संपेल, ही आशा.