उद्धव ठाकरे यांचे सहा वा ममता बॅनर्जी यांचे २० खासदार भाजपत जात असतील तर ते नैसर्गिकच म्हणायचे. पाणी आपली पातळी गाठतेच गाठते…
‘तलवारीवर जगणार्यांचा अंत तलवारीने होतो’ या इंग्रजी वचनाचे राजकीय रूपांतर ‘पक्षांतर करणार्यांचा शेवट पक्षांतराने होतो’ असे होऊ शकेल. विधान परिषद निवडणुकांत नाशिक मतदारसंघात भाजपने साथी एकनाथ शिंदे यांना जो कात्रजचा घाट दाखवला त्यातून या वचनाची कालातीतता लक्षात यावी. या मतदारसंघात भाजप-शिंदे सेना युतीचे दणदणीत बहुमत होते. युतीचा उमेदवार हरण्याची शक्यता दूरान्वयानेही नव्हती. तरीही भाजपने शिंदे सेनाविरोधकांस बळ दिले. तसे होणार याचा अंदाज आल्यावर शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि वरिष्ठांनीही थयथयाट केला आणि भाजपनेही त्यांना विजयाचे आश्वासन दिले.
शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे भाजपचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्यात त्यांच्यासमवेत असताना, शिंदे सेना हीच खरी शिवसेना असे प्रमाणपत्र भारतीय राजकारणाचे सध्याचे भाग्यविधाते अमित शहा यांच्याकडून दिले जात असताना या ‘खर्या आणि एकमेव’ सेनेशी शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने गद्दारी केली आणि आपल्याच मित्रपक्षाचा उमेदवार पाडला. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांना गद्दार म्हणून हिणवते त्या शिंदे सेनेशी त्यांचा सूत्रधार असलेल्या भाजपनेच गद्दारी केल्याने उद्भवलेली परिस्थिती गद्दार म्हणून हिणवले जाणारा पक्ष कशी हाताळतो ते पाहण्यास महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा आतुर आहे. खरे तर या इटुकल्या निवडणुकीची दखल येथे घेण्याचे कारण नाही. तथापि सांप्रति महाराष्ट्रात विकास- इच्छुकांची दुसरी लाट आलेली असल्याने त्या पार्श्वभूमीवर कुंभ-नगरीतील कुभांड दखलपात्र ठरते.
या विकासेच्छुकांच्या दुसर्या लाटेत उद्धव ठाकरे सेनेचे सहा खासदार शिंदे सेनेत जाऊन पोहोचले. यातील दोघांनी आपली विकास-कामना दाबून न ठेवता उघड बोलून दाखवली. ‘काय करणार… मतदारसंघाच्या विकासासाठी पक्षांतर करावे लागते’, अशी कबुली दिली. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कवतिक करावे तितके थोडेच. माननीय अजितदादा पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, नारायण राणे, हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि कंपू अशा अनेकांस आपल्यातील विकास ऊर्मी दाबून ठेवणे शक्य झाले नाही. बरे विकास नाही त्यामुळे विकासाशी पाट लागलेल्या लक्ष्मीचेही दर्शन नाही. तिचे दर्शन दुरापास्त झाल्याने या सर्वांचे प्राण कंठाशी आले आणि अखेर त्यांनी लक्ष्मीचे सध्याचे माहेरघर असलेल्या भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला.
विकासेच्छूंचा एक गट हा असा. तर रात्रीची झोप हराम झाल्याने निद्रानाशाकडे तांबारलेल्या डोळ्यांनी पाहत राहणार्या हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्यांचा दुसरा. त्यांचे हाल तर कुत्राही खाईना. विकास नाही, लक्ष्मीदर्शन नाही आणि ती नाही तर नाही पण रात्रीची झोपही नाही. ती नाही तर रात्री जागे राहून करायचे तरी काय, हा प्रश्न. त्याचे उत्तर सापडेनासे झाल्यावर तेही भाजपत गेले आणि आपल्या हर्षाचे वर्धन करवते झाले. ही विकासेच्छूंची पहिली लाट. न्यायालय, निवडणूक आयोग वगैरेंच्या कृपेमुळे ती सहज पचवली गेली.
या विकासावर महाराष्ट्रातील काय पण देशातील जनताही फिदा झालेली असल्याने मतदार म्हणवून घेणार्यांनीही ती गोड मानून घेतली. या विकासामुळेच हिंदुत्वाचे भले होणार असल्याची खात्री मतदारांना असल्याने त्यांनीही या एकापेक्षा एक तगड्या विकासेच्छूंचे आपल्या कळपात मोठ्या प्रेमाने मौंजीबंधन करवले. अगदी हत्तीवरून भिक्षावळ सोहळ्यासहित. आता विकासेच्छूंचे जगातील सर्वात मोठ्या पक्षात इतके उत्साहाने स्वागत होते आहे आणि त्या मुहूर्तास न्यायपालिकादी यंत्रणा मंगलाष्टके म्हणत आहेत हे पाहिल्यावर उर्वरित विकासेच्छुकांसही आपण भगवी उपरणी ल्यावी असे वाटल्यास गैर ते काय?
आणि दुसरे असे की आसामातील हेमंत बिस्व सर्मा वा पश्चिम बंगालातील सुवेंदु अधिकारी वा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे वा जितीन प्रसाद वा जगदंबिका पाल आदी अनेक विकासेच्छूंची विकास-कामना भाजपत गेल्यावरच तर पूर्ण झाली. अशी अनेक देदीप्यमान उदाहरणे समोर असल्याने अन्य पक्षीय विकासगमनी मनांस भाजपची ओढ लागली नाही तरच नवल. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे सहा वा ममता बॅनर्जी यांचे २० खासदार भाजपत जात असतील तर ते नैसर्गिकच म्हणायचे. पाणी आपली पातळी गाठतेच गाठते. त्यास थांबवता येणे अशक्य. तद्वत विकासेच्छू नेत्यांस विरोधी पक्षात थांबून राहणे दुष्प्राप्यच वाटणार. हा विकास फार महत्त्वाचा. तो साधायचा तर कंत्राटे देण्याचे अधिकार हवेत. धाग्याशिवाय हार जसा अशक्य, तसेच कंत्राटांशिवाय विकासही अशक्यच. म्हणून ती देण्याचे अधिकार हवेत. ते हवे असतील तर सत्ता हवी.
विरोधी पक्षात राहून थोडीच कंत्राटे देता येणार? म्हणजे सत्ताधारी पक्षात जाणे अटळ. ही विकासाची कंत्राट-गंगा एकदा का दुथडी भरून वाहू लागली की त्या विकासगंगेतून लक्ष्मी आलीच. मुंबई, पुणे, नागपूर आदी आपल्या शहरांवर नजर टाकल्यास हा विकास कसा सगळीकडे भरून राहिलेला आहे याचे दर्शन होईल. ठाणे वा मुंबई महानगर परिसरात तर या विकासाचा जोर जरा जास्तच. इतका की या विकासवार्यांपासून जीव वाचवण्यासाठी नागरिकांवर जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आलेली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरावर तर विकासाचा जास्तच लोभ. या विकासगंगेच्या प्रवाहाने ठाणेकरांस नुसते सळो की पळो करून सोडलेले आहे. ही ‘प्रगती’ पाहून अन्य नेत्यांसही शिंदे वा अजितदादा आणि त्यांच्या पश्चात कुटुंबीयांच्या पावलावर पाऊल टाकावेसे वाटणे अनैसर्गिक अजिबात नाही. त्यामुळे उद्धव सेनेच्या सहा खासदारांनी शिंदे सेनेत सहभागी व्हायचा निर्णय घेतला असणार. शिवाय या सहा जणांच्या मनात आपापल्या मतदारसंघाच्या प्रगतीची घोर काळजीही असेल. आपण विरोधी पक्षाचे कुंपण ओलांडून सत्ताधार्यांच्या कळपात शिरलो नाही तर आपला विकास तर होणारच नाही; पण आपल्या मतदारसंघातील नागरिकांसही विकासापासून वंचित राहावे लागेल या चिंतेनेही हे जागरूक लोकप्रतिनिधी अस्वस्थ झाले असणार. आता शिंदे आणि कंपूप्रमाणे या नव्या सहा विकासेच्छूंनाही गद्दार म्हणून संबोधले जाईल.
हा या कथित गद्दारांच्या मतदारसंघातील नागरिकांचा अपमान. या विकासेच्छूंनी पक्षांतर केले नाही, ते विरोधी पक्षातच खितपत राहिले तर केवळ त्यांच्याच नव्हे तर त्यांना मते देणार्यांच्या विकासाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. या विकासेच्छूंना स्वत:ची तितकी फिकीर नाही. त्यांचा पुरेसा विकास झालेला आहेच. त्यांना चिंता आहे ती सामान्य नागरिकांची. त्याच्याच चिंतेतून त्यांनी पक्षत्यागाचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वत:च्या छातीवर दगड ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. ती त्यांनी सहन केली. तेव्हा विकास हवा असेल तर सत्ताधारी पक्ष हवा, हा यातील संदेश. तो लक्षात घेऊन आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एक बदल करावा.
सत्ताधारी पक्षाचे वगळता अन्य कोणालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरूच देऊ नये. फक्त सत्ताधारी पक्षाच्याच उमेदवारांनाच निवडणूक लढवू देण्याचे अनेक फायदे आहेत. खर्च वाचेल, मतदानाची टक्केवारी वाढून १०० टक्के होईल आणि त्यापेक्षाही अन्य कोणी निवडून येणारच नसल्याने त्यांच्या आगामी पक्षांतरासाठी द्यावयाच्या ‘खोक्यां’ची बचत होईल. ही खोकी मग अन्य विकासकामी येतील. तेव्हा निवडणूक आयोगाने ही सुधारणा जरूर करावी. राजकीय नेत्यांस विकासातुरता अशी दाबून ठेवावी लागणे योग्य नाही. त्यातून आरोग्यावर दुष्परिणाम संभवतात. पूर्वी कामातुराणां न भयं न लज्जा असे म्हणण्याचा प्रघात होता. आता कामातुरांची जागा विकासातुरांनी घेतलेली आहे हे लक्षात घ्यायला हवे. देश बदल रहा है म्हणतात ते हेच बहुधा.
