‘एनसीईआरटी’च्या बारावीपर्यंतच्या पुस्तकांतून ‘सकारात्मक नागरिक घडवणे’ हा उद्देश चांगलाच; पण अभ्यासक्रमातील तथ्ये वगळणे हा त्यावरचा उपाय कसा काय?

वर्तमानात इतिहास का शिकायचा? कारण, इतिहासात झालेल्या चुका भविष्यात होणार नाहीत, याची काळजी घेता येते म्हणून आणि ताजा – अगदी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचाही इतिहास शिकायचा, कारण कोणत्या आगळिका आपण कालपर्यंत करत होतो हे उमगावे म्हणून! त्यामुळेच इतिहासाचे पुनरावलोकन का करत राहायचे, हा पुढचा प्रश्न अधिक महत्त्वाचा. माहीत असलेल्या जुन्या माहितीबाबत नवीन तथ्ये सापडली, तर त्या माहितीत भर घालता येते आणि अगोदरच्या माहितीचे विश्लेषण अधिक चांगल्या आणि कधी कधी पूर्णपणे वेगळ्याही पद्धतीने करता येते, हा याचा फायदा. अर्थात, ही प्रक्रिया इतिहासकारांवर सोडून दिलेली बरी, कारण तेच उपलब्ध साधनांद्वारे त्याचे चांगले मूल्यमापन करू शकतात. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात ‘एनसीईआरटी’ने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात जे बदल केले, त्याबाबत असेच केले असते किंवा या ‘स्वायत्त’ संस्थेच्या संचालकांनी अशा काही आधारांवर स्पष्टीकरण दिले असते, तर बरे झाले असते. त्याऐवजी, ‘दंगलींचा इतिहास का शिकायचा,’ असा प्रतिप्रश्न करून ‘एनसीईआरटी’च्या संचालकांनी ‘संस्कारी’ भूमिका घेतली. त्यामुळे त्याची दखल घेणे क्रमप्राप्त.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial ncert changes in 12th political science book amy