काय दशा केली आहे आपण शिक्षणाची. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची ‘नीट’ वाट लावल्यानंतर आता प्राध्यापकीसाठी आवश्यक ‘नेट’चे दशावतार चव्हाट्यावर येताना दिसतात. परत महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या साध्या लिपिक पदासाठीच्या परीक्षेतही गोंधळ. ‘लोकसत्ता’ने गेल्याच आठवड्यात ‘‘नीट’नेटके का नाही?’ या शीर्षकाच्या संपादकीयातून ‘नीट’ परीक्षा आणि त्या परीक्षा घेणारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) या यंत्रणेच्या कारभाराबाबत भाष्य केले. त्या संपादकीयात अशा परीक्षांसंदर्भातील चीनच्या अनुभवाचाही दाखला देण्यात आला. आपल्याकडील ‘नीट’ परीक्षेस २४ लाख विद्यार्थी बसतात आणि गोंधळ होतो. चीनमध्ये आपल्यापेक्षा कोटभर अधिक विद्यार्थी एकाच वेळी परीक्षा देतात आणि तरीही गोंधळ होत नाही. ही चीनशी तुलना अनेकांस रुचली नाही. त्यातील काहींनी चीनची राजवट शैली इत्यादी मुद्दे उपस्थित केले. काहींनी आपला भौगोलिक आकार, प्रचंड विद्यार्थी संख्या इत्यादींचा दाखला दिला. हे दोन्हीही मुद्दे गैरलागू ठरतात. याचे कारण चीनही आपल्याइतकाच आकाराने अवाढव्य आहे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणे हे जर अडचणींचे कारण असेल तर मग लहान परिसरांतील छोट्या परीक्षादेखील आपण विनागोंधळ का करू शकत नाही? महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी फक्त १३ हजार विद्यार्थी होते आणि ही परीक्षाही मुंबईलगतचे कल्याण, संभाजीनगर इत्यादी मोजक्याच ठिकाणी घेतली जाणार होती. त्या परीक्षेच्या आयोजनाचीही माती झाली. हे असे का होते यावर भाष्य करण्याआधी जे काही झाले त्याविषयी.

त्यात पुन्हा ‘एनटीए’ची ‘नीट’नंतर उरलीसुरली लाज निघाली. त्याला कारण घडले ‘एनटीए’तर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एनईटी – नेट) या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतील तीन विषयांतील गंभीर चुकांमुळे तीनही विषयांची फेरपरीक्षा जाहीर करावी लागण्याचे. देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांत सहायक प्राध्यापक म्हणून भरती होण्याची पात्रता मिळवण्यासाठी ‘नेट’ परीक्षेत पात्र ठरणे आवश्यक आहे. याशिवाय ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) आणि पीएचडीच्या पात्रतेसाठीही ‘नेट’ची पात्रता ग्राह्य धरली जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी संपादन केलेला उमेदवार ‘नेट’ला बसू शकतो. वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळी स्वतंत्र परीक्षा होते. दर वर्षी दोनदा होणार्‍या या परीक्षेसाठी दर सत्राला सर्व विषयांना मिळून ७ लाख ते ९ लाख विद्यार्थी बसतात. गेल्या २२ जून ते ३० जून या कालावधीत तब्बल ८७ विषयांची प्रत्येकी ३०० गुणांची संगणकाधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असलेली ‘नेट’ परीक्षा घेतली गेली. या ८७ पैकी इंग्रजी, वाणिज्य आणि समाजविज्ञान या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांत चुका होत्या. चूक एखाद-दुसरी असती, तर ठीक. त्यांची संख्या त्यापेक्षा फार मोठी भरली. त्यात मुद्रणाच्या, स्पेलिंगच्या, नावांच्या, व्याकरणाच्या, भाषांतराच्या आणि शिवाय काही तथ्यांच्या, अशा भारंभार चुका होत्या. हे कमी म्हणून की काय, अनेक प्रश्न २०२४ च्या प्रश्नपत्रिकेत होते तसेच्या तसे आले होते. उदाहरणार्थ, इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत १५० पैकी ६७ प्रश्न २०२४ मधीलच होते!

या तिन्ही विषयांचे पेपर झाल्यावर ‘एनटीए’कडे बर्‍याच तक्रारी आल्या होत्या. त्यांचा अभ्यास करण्यासाठी ‘एनटीए’ने तज्ज्ञांची एक समितीही नेमली होती. समिती तक्रारींच्या खोलात गेली, तेव्हा समितीला आढळले की मुद्रण, भाषांतर वगैरेच्या चुका आहेतच. शिवाय, काही प्रश्नांमध्ये त्या त्या विषयातील काही प्रतिष्ठित ज्ञानवंतांची नावे, पुस्तकांची नावे चुकली आहेत, वाक्यरचनेत चुका आहेत, विरामचिन्हे चुकीची पडली आहेत आणि अगदी लिंगवाचक, संख्यावाचक शब्दांमध्येही घोळ झाले आहेत. इतके प्रमाद असतील, तर परीक्षा पुन्हा घेण्यावाचून गत्यंतर नाही, या निष्कर्षापर्यंत समिती आली आणि समितीने ‘एनटीए’ला तशी शिफारसही केली. ‘एनटीए’लाही हे कळून चुकले की चुकीचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांचे गुण देऊ, असे करून भागणार नाही. पारदर्शकता आणि चूकविरहित परीक्षेचे उद्दिष्ट याने साध्य होणार नाही. परिणामी, ‘एनटीए’ने या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करून टाकले. आता ती ९ आणि १० सप्टेंबरला होईल. ज्या तीन विषयांची फेरपरीक्षा होणार आहे, त्याला बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ‘नीट’ वगैरेसारख्या परीक्षांइतकी नक्कीच नाही. त्याहून खूप कमी आहे. पण, म्हणून औचित्यभंग झालेला झाकला जात नाही. ‘नीट’ची प्रश्नपत्रिका फुटून त्याची फेरपरीक्षा घ्यायचा निर्णय झाल्यावर अनेक दिवसांनी ‘नेट’ची परीक्षा झाली आहे. म्हणजे, ‘नीट’च्या अपयशानंतर पुढच्या परीक्षेतील चुका टाळण्यासाठी ‘एनटीए’ला वेळ नव्हता असे नाही. बरे, चुकांचे प्रकार पाहिले तर ते इतके ढोबळ आहेत की, त्यांच्या दुरुस्त्या उपलब्ध वेळेत अशक्य नव्हत्या. पण तरी ते झाले नाही. हा यंत्रणेच्या हलगर्जीचा नमुना ठरतो. आता फेरपरीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून पुन्हा सर्व करावे लागणार आहे. यात ‘एनटीए’चा आणि उमेदवारांचाही वेळ, पैसा खर्च होणार; शिवाय उमेदवारांना मनस्ताप आहे, तो वेगळाच. हीच ‘नेट’ परीक्षा २०२४ मध्ये रद्द करून नंतर पुन्हा घ्यावी लागली होती, हा इतिहासही ताजा आहे. त्या वर्षी ‘नेट’ची प्रश्नपत्रिका फुटल्याची शक्यता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनलिसिस युनिटने वर्तविल्याने परीक्षा झाल्याच्या दुसर्‍या दिवशी परीक्षा रद्द केली गेली. ही प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारे संदेश बनावट होते, असे पुढे ‘सीबीआय’च्या तपासात आढळले. मात्र, तोवर आधीची परीक्षा रद्द होऊन फेरपरीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झालेल्या असल्याने उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावीच लागली. ‘नेट’ची तयारी करणारे उमेदवार, शिक्षक पात्रतेसाठी घेतल्या जाणार्‍या केंद्रीय पातळीवरील ‘सीटीईटी’ वा राज्य पातळीवरील ‘टीईटी’ अशाही परीक्षांची तयारी करत असतात. अशा वेळी या उमेदवारांना त्यांची काहीच चूक नसताना, दिलेल्याच परीक्षांची तयारी पुन्हा करायला लावणे, त्यासाठी काही ठिकाणी मूळ गावापासून शेकडो किलोमीटरवर असलेल्या परीक्षा केंद्रांवर प्रवास करायला लावणे कितपत योग्य, असा सवाल आता उमेदवार उपस्थित करत असतील, तर तो गैरलागू अजिबात नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणीतही रविवारी तांत्रिक समस्या आल्याने परीक्षा देणारे उमेदवार हवालदिल झाले. छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण येथील परीक्षा केंद्रांवर ही समस्या मोठ्या प्रमाणावर आल्याचे उमेदवारांचे म्हणणे. परीक्षा टंकलेखनाची आणि ती ज्यावर द्यायची, त्या संगणकाचा कळफलकच चालत नाही, अशी स्थिती होती, असे उमेदवार म्हणतात. ज्या कौशल्याची परीक्षा घ्यायची, ते वापरण्यात परीक्षेतच असे अडथळे असतील, तर उमेदवारांनी नेमके करायचे काय? दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण होणार कशी? त्यावरून छत्रपती संभाजीनगर आणि कल्याणमध्ये आंदोलनेही झाली. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेही छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनात उतरले. ही परीक्षा पुन्हा घ्या, या मागणीने आता जोर धरला आहे.

याचा अर्थ प्रश्न ना आकाराचा आहे ना संख्येचा. प्रश्न आहे नेकी या एकमेव मुद्द्याचा.  सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ती नेक आहे किंवा कसे. मुळात ही नेकी नसेल तर कितीही ‘नीट’ करा, ‘नेट’ करा… अंतिम उत्तर नन्नाच येणार. आपले ‘नेट’ही नीट नाही, त्यामागे हा नेकीचा अभाव हे कारण आहे.