scorecardresearch

अग्रलेख : गल्लीमधले वैश्विक..

मराठी भाषेच्या नशिबात दोन दिवसांच्या अंतराने असे जागतिक, विश्वव्यापी होणे आल्याचे बघून समस्त मराठी जनांना किती भरून आले आहे

अग्रलेख : गल्लीमधले वैश्विक..
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

‘मराठी तितुका मेळवावा’सारखी संमेलने साजरी करणे हे सरकारचे काम आहे का? असलेच, तर त्यातून मराठीचे काय भले होणार?

‘मराठी ही मुमूर्षु भाषा आहे का?’ हा इतिहासाचार्य राजवाडे यांनी १९२५ मध्ये विचारलेला प्रश्न; किंवा ‘नावापुरता राजभाषेचा दर्जा मिरवणारी मराठी मंत्रालयाच्या दारात राजमुकुट घालून परंतु अंगावर लक्तरे लेऊन उभी आहे’ हे  कविवर्य कुसुमाग्रज यांचे विधान चोळामोळा करून कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यावे अशी अभिमानास्पद स्थिती सध्याच्या काळी मराठी भाषेच्या वाटय़ाला आली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने चौपट फुगली आहे. आपले घर, आपली गल्ली, आपले शहर, आपले राज्य या संकुचित भूमिका मराठी माणसाने केव्हाच टाकून दिल्या असून तो आता थेट विश्वाचेच ‘आंगण’ खेळायला घेतो आहे. तेदेखील त्यास अपुरे पडत असल्याची माहिती हाती आली असून यापुढे तो आता शतसूर्यमालिकांच्या दीपावली प्रज्वलित करायला घेणार आहे, असेही समजते. या सगळय़ा माहितीमध्ये एका शब्दाचीही अतिशयोक्ती वाटत असल्यास जिज्ञासूंनी गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये अर्थातच मराठी वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांचे अवलोकन करावे, म्हणजे त्यांना अवघे जग मराठी भाषेच्या कह्यात आले असल्याचा आणि मराठी ही विश्वव्यापी भाषा झाली असल्याचा प्रत्यय येईल. अजूनही उमजत नाही म्हणता? साहजिकच आहे, आपली भाषा वैश्विक भराऱ्या घेत असताना ते कळून येत नसेल तर ते आपले पामरांचेच करंटेपण.

राजकारण्यांचे मात्र तसे नसते. काळाची पावले त्यांना अंमळ आधीच ऐकू येतात. त्यामुळेच ४ जानेवारी रोजी मुंबईत वरळी येथे विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन झाले तर शुक्रवारी (६ जानेवारी) पुण्यात िपपरी इथे १८ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन होत आहे. दोन दिवसांच्या फरकाने मराठी भाषेच्या अशा दोन दोन आणि गल्लीबोळातील नव्हे तर थेट जागतिक संमेलनांचे उद्घाटन होणे ही मराठी भाषेसाठी मोठी गोष्ट नव्हे काय? त्यासाठीची भाषाही तशीच आयोजकांचा पैस व्यापक असल्याचे दर्शवणारीच आहे. मराठीच्या विश्व संमेलनाचे आयोजन मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य व उद्योग विभाग यांच्या विद्यमाने होत असून मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा, त्यासाठी मराठी तितुका मेळवावा, असे त्याचे प्रयोजन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील हे संमेलन राज्य सरकारच्या खर्चाने होणारे असल्याने आमदार-खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनी तीनही दिवस उपस्थित राहावे, अशी विनंती थेट विधानसभाध्यक्षांनीच केली आहे, हे आणखी विशेष. तर जागतिक मराठी संमेलन हे जागतिक मराठी अकादमी आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ यांनी आयोजित केले असून ‘शोध मराठी मनाचा’ हे या संमेलनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जगभरातून अनेक मराठी मान्यवर सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी भाषेच्या नशिबात दोन दिवसांच्या अंतराने असे जागतिक, विश्वव्यापी होणे आल्याचे बघून समस्त मराठी जनांना किती भरून आले आहे, ते त्यांना शब्दांत सांगतादेखील येणे शक्य नाही. आपल्या स्वत:च्या राजधानीच्या शहरात घरातून बाहेर पडून रस्त्यावर गेल्यावर भाजीवाला आणि रिक्षावाल्यापासून ते दुकानदारापर्यंत कुणाशीही मराठीत बोलण्याची संधी त्याला आपल्याच शहरात दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालली आहे. एखाददुसरा अपवाद वगळता चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवा आणि अमुकतमुक पारितोषिक मिळवा अशी स्पर्धा लावली तर ते पारितोषिक कोणालाही मिळण्याची सुतराम शक्यता नाही. एवढेच नाही तर आपल्या पाल्याला आवर्जून मराठी शाळेत घालू इच्छिणाऱ्या मराठी पालकांच्या वाटय़ाला किती घनघोर निराशा येते, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. मराठी पुस्तकांच्या खरेदीविक्रीचे, गावोगावच्या मराठी वर्तमानपत्रांच्या खपाचे आकडे असेच निराशेकडे घेऊन जाणारे आहेत. शासन यंत्रणेला मराठी भाषेच्या संवर्धनात इतका रस आहे की दुकानांवरील पाटय़ा मराठी भाषेत असाव्यात या आपल्याच निर्णयाची तिला ठोस अंमलबजावणी करता आलेली नाही. पुस्तकाच्या मराठीतील अनुवादासाठी जाहीर केलेला पुरस्कार मागे घेण्याची नामुष्की ही तर अगदी अलीकडचीच घटना. समस्त मराठी जनांना ज्याची अपेक्षा आहे, तो अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळवून देणे अजूनही सरकार दरबारच्या आवाक्यात आलेले नाही. रोजच्या व्यवहारातच मराठी भाषेच्या बाबतीत इतक्या समस्या असताना त्यांच्या सोडवणुकीकडे लक्ष देण्याऐवजी विश्व मराठी संमेलने भरवत बसणे म्हणजे गल्ली क्रिकेट धड नीट खेळता येत नसताना थेट विश्वचषक स्पर्धामध्ये मैदान मारण्याची भाषा करण्यासारखेच.

आपल्याकडे तसेच केले जाते कारण दिखाऊपणा हा रचनात्मक कामापेक्षा नेहमीच अधिक सोपा असतो. विश्व मराठी संमेलन आयोजित करणे, भाषणे आणि इतर कार्यक्रम आयोजित करणे आणि चार लोकांच्या टाळय़ा मिळवणे याशिवाय अशा संमेलनांमधून काय साधले जाते? महात्मा फुले यांनी ‘घालमोडय़ा दादांचे संमेलन’ असे ज्याचे वर्णन फार पूर्वीच करून ठेवले आहे, त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अनुभवही यापेक्षा काय वेगळा आहे? जाता जाता सांगायचे म्हणजे ते संमेलनदेखील फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात वर्धा येथे होणारच आहे. मराठी भाषेची स्थिती सुधारण्यासाठी या संमेलनाचे योगदान काय याचे उत्तर शारदेचा वार्षिक उत्सव यापलीकडे कोणालाही देता येणार नाही.

विश्व मराठी संमेलन हादेखील नवा उत्सवच. सन १९८९ मध्ये कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’च्या अधिवेशनापासून अशी संमेलने अधूनमधून होतच असतात. उत्सव साजरा करणे हे खरे तर समृद्धीचे, संपन्नतेचे प्रतीक असते. मराठीपणाच्या बाबतीत अशी कोणती समृद्धी, संपन्नता सध्या आपल्याकडे आहे की जिचा उत्सव साजरा केला जावा? विश्व मराठी संमेलनाच्या जाहिरातीतच त्याचे वर्णन ‘महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन’ असे करण्यात आले आहे. अशी संमेलने साजरी करणे हे सरकारचे काम आहे का? आपापल्या सोसायटीच्या अंगणातील लाद्या ‘नगरसेवक निधीतून’ बसवून घेणारे लोक याविषयी काही बोलतील, अशी अपेक्षाच व्यर्थ. पण प्रश्न त्याहीपेक्षा मोठा आहे.

तो असा की, सरकारला मराठीबद्दल एवढी आस्था आहे तर मग ते मराठीच्या खऱ्या प्रश्नांकडे का लक्ष देत नाही? मराठी शाळा टिकवणे हा मराठी समाजासमोरचा अत्यंत निकडीचा प्रश्न. अल्प उत्पन्नधारक वर्गही परवडत नसताना मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालू पाहतो. परिणामी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा जितक्या वेगाने ओस पडत आहेत, तितक्याच वेगाने बंद पडत आहेत. मराठीतून कोणालाच शिकायचे नसेल तर उद्या अशी विश्व मराठी संमेलने भरवण्याइतकी आस्था तरी कुणाला भाषेविषयी असणार आहे का? मराठी शाळा टिकाव्यात, तेथील पटसंख्या वाढावी यासाठी सरकारच्या पातळीवरून काय केले जाते? आपण जर आपल्या शाळाच टिकवू शकणार नसू तर आपली भाषा आणि तिच्यासह अपरिहार्यपणे येणारी संस्कृती कशी टिकवणार? मराठी समाजामधला ग्रंथव्यवहार वाढावा, वाचनाची आवड वाढावी, यासाठी कुठल्याशा गावाला पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर करून टाकणे आणि मग तिकडे ढुंकूनही न बघणे म्हणजे जसे बिरबलाची खिचडी शिजवण्यासारखे तसेच या संमेलनांचे. आपल्या पायाखाली काय जळते आहे त्याची पर्वा न करता, आपल्या दारामधले, आपल्या गल्लीमधले वास्तव न बघता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वैश्विक वगैरे संमेलने भरवणे म्हणजे मिशीला फुकाचा पीळ देण्यासारखेच आहे. ते करायचे असेल तर आधी दंडात बेटकुळी हवी.

मराठीतील सर्व संपादकीय ( Editorial ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 05:17 IST

संबंधित बातम्या