प्रश्न केवळ कोणा पक्षाच्या कार्यालयात लावणी सादर झाली एवढाच नसून राजकीय पक्षांमधील स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा आहे…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या नागपूर येथील नव्याने सुशोभीकरण केलेल्या कार्यालयात दीपावली मीलन या कार्यक्रमानिमित्त ‘सामाजिक योद्ध्यां’चा सन्मान केल्यानंतर कार्यकर्त्यांचे वैयक्तिक कलागुण सादर करण्याच्या मिषाने जी काही बहार उडवून दिली गेली आहे, तिला तोड नाही. त्या कार्यक्रमात म्हणे आपापले कलागुण सादर करण्याचे आवाहन केले गेले, तसे कार्यकर्त्यांपैकी कुणी गाणे म्हटले, कुणी पोवाडा म्हटला, तर पक्षसदस्य म्हणून दाखल झालेल्या लावणी कलावंताने ‘वाजले की बारा’ ही लावणी सादर केली. त्या सादरीकरणाची चित्रफीत समाजमाध्यमांवरून फिरू लागली आणि नेमके कुणाचे बारा वाजले आणि कुणी घरी जायला हवे याची चर्चा सुरू झाली.
आता पक्ष कार्यालयात सगळे पक्षाचेच लोक असताना ही चित्रफीत कशी काय बाहेर आली आणि समाजमाध्यमांवर फिरली हा वेगळाच मुद्दा. पण त्या नृत्याची चर्चा झाली आणि संबंधितांना पक्षाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल सात दिवसांत लेखी खुलासा देण्यास सांगण्यात आले. आता तो खुलासा काय यायचा तो येईल आणि त्याचे काय करायचे हा त्या पक्षाचा प्रश्न. पण राजकीय पक्ष हे समाजमानसावर परिणाम करत असल्यामुळे पक्ष, त्याचे कार्यकर्ते, लावणीचे औचित्य या सगळ्याबद्दलची चर्चा आपल्यासाठी महत्त्वाची.
त्यात त्या नृत्यकलावतीने पत्रकार परिषद घेऊन दिवाळीनिमित्त आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात सगळे जमलेले असताना, ज्यांना गाणे म्हणता येते, ते गायले, मी नृत्यांगना आहे, मला नृत्य करता येते, ते मी सादर केले, असा दावा केला. त्यानंतर पक्षकार्यालयात लावणी वगैरे सादर करणे चूकच इथपासून चार जण मनोरजंनासाठी जमलेले असताना गाणे, नृत्य झाले तर काय बिघडले असे मुद्दे समाजमाध्यमातील चर्चेतून पुढे आलेले दिसले.
१७-१८ व्या शतकात सरदार, सैनिकांच्या विरंगुळ्यासाठी विकसित झालेल्या लावणी या नृत्यकलेबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. ती महाराष्ट्राची लोकनृत्यकलाच नाही, तर महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळखही आहे. तमाशाच्या फडावर लावणी सादर होताना पाहणे हा निश्चितच एक कलानंद आहे. लावणी कलावतीचा पेहराव, तिचा नृत्याचा ठसका, तिला साथ देणारे इतर कलाकार या सगळ्यातून एक वातावरणनिर्मिती होत असते. मात्र मुळात घरापासून दूर असणाऱ्या सैनिकांना म्हणजेच पुरुषांना रिझवण्यासाठी विकसित झालेली मुख्यत: शृंगाररसासाठीच प्रसिद्ध असलेली एखादी नृत्यकला एखाद्या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात, त्या पक्षाच्याच कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर सादर केली जाते, तेव्हा ती मागणी करणारेही चुकलेले असतात आणि त्या मागणीपुढे मान झुकवणारेही. कारण इथे प्रश्न औचित्याचा असतो. लावणी ही नृत्यकला वाईट नाही, पण कोणती गोष्ट कुठे करायची याचे तारतम्य सुटणे वाईट.
यातल्या तारतम्याबरोबरच त्याच्या आडून येणारा मुद्दा मात्र अधिक गंभीर आहे. तो आहे, राजकीय पक्षांमधील स्त्रियांच्या सहभागाचा आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा. मुळात स्त्रियांनी राजकारणात जाण्याचे प्रमाण कमी. गेल्याच तर त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान नसते. जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी यांच्यासारखे सणसणीत अपवाद वगळता राजकारणात वरच्या पातळीवर स्त्रिया येतात, त्या पिता वा पती यांचे बोट धरूनच. निवडणुकीच्या राजकारणाची त्यांची वाट आपोआपच सुकर होते.
पण बाकी तळागाळातून कार्यकर्त्या म्हणून सुरुवात करणाऱ्या स्त्रियांची परिस्थिती काय असते, ते निवडणुकांचा मोसम आला आणि तिकीटवाटपाचा गोंधळ सुरू झाला की समजते. मुळात राजकीय कार्यकर्त्या म्हणून काम करणाऱ्या स्त्रियादेखील फारशी राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन येत नाहीत. आणि आल्या आणि त्यांनी कितीही जीव तोडून काम केले तरी, नेत्यांसाठी हारतुरे आणा, त्यांना ते घाला, महत्त्वाच्या समारंभांमध्ये नेत्यांना ओवाळा, खानपान व्यवस्था बघा यासाठीच त्यांना गृहीत धरले जाते. एखाद्या तडफदार कार्यकर्त्याला पुढे जाण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी कदाचित मार्ग मिळू शकतो, पण स्त्री कार्यकर्तीसाठी ती वाट बिकटच असते.
अगदी आजच्या घडीलादेखील महाराष्ट्रातल्या प्रमुख आणि त्यांच्या उपप्रमुख पक्षांमधल्या माध्यमांसमोर येऊन बोलणाऱ्या स्त्रिया साताऱ्यासारख्या गंभीर प्रश्नावर ‘स्त्रियांचे राजकारण’ करणे अपेक्षित असताना, पक्षाला म्हणजेच पर्यायाने पुरुषांना हवे तेच राजकारण करताना दिसतात. कारण त्यांनी तिला स्त्री कार्यकर्ती म्हणून नाही, तर फक्त आपण सांगू तसेच वागणारी स्त्री म्हणूनच गृहीत धरलेले असते. घरात जशी तिने इतरांसाठी तडजोड करावी अशी अपेक्षा असते, तशीच इथेही ठेवली जाते. सत्ता ही फक्त आपलीच, त्यात तिने वाटेकरी होऊ नये, यासाठी विधानसभा आणि लोकसभेतील स्त्रियांच्या ३३ टक्के आरक्षणामध्ये किती अडथळे आणले गेले, ते सर्वश्रुत आहे.
स्त्रियांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन इतरत्रही तसाच दिसतो. प्रचंड दरारा असलेल्या एका प्रसिद्ध शास्त्रीय गायिकेला एका मुलाखतीदरम्यान ‘चार ओळी गुणगुणून दाखवा’ असे सुचवण्यात आले तेव्हा त्या विदुषी ‘मी गुणगुणत नाही, मी गाते’, एवढेच सांगून थांबल्या नाहीत, तर ‘मी नर्तकी असते तर तुम्ही मला नाचून दाखवायला सांगितले असते का’, या शब्दांत त्यांनी मुलाखत घेणाऱ्यांना फटकारले होते. पुरुष असो वा स्त्री, एखाद्या वेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या गायक वा नृत्य कलावंतांना चार ओळी गाऊन दाखवा, नाचून दाखवा असे सर्रास सांगणे हा किती मोठा औचित्यभंग आणि अपमान आहे, हे संबंधितांना समजत नाही, हा त्यांचा मूर्खपणाच.
त्यांनी त्यांची कला योग्य त्या व्यासपीठावर, योग्य त्या पद्धतीने सादर केलेली असते, त्यांचे ते व्यावसायिक कसब सिद्ध झालेले असते, म्हणूनच तुम्ही त्यांना बोलावलेले असते ना? आपल्या स्थानाची योग्य जाणीव असलेले कलाकार अशा गोष्टींपासून फटकून राहतात. पण लोकप्रियतेच्या आहारी जाणाऱ्यांना तसे जमतेच असे नाही. त्यात अशा सादरीकरणाचे मूर्ख आग्रह पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या वाट्याला अंमळ जास्तच येतात, असे एक निरीक्षण आहे. त्यामागे मात्र समोरची स्त्री आपल्याला हवी तशी आहे की नाही, हे पडताळून पाहण्याचा खास पुरुषप्रधान दृष्टिकोनच असतो. अगदी मुलगी बघायला जाणेनामक भोंगळ प्रकारातही पूर्वी मुलीला गाणे म्हणून दाखव, चालून दाखव असे सांगितले जात असे.
त्यात तिला नीट बोलता येते का, नीट चालता येते का हे तपासायचे असे म्हणे. पण हेच निकष तिला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचे आहे, त्या ‘नररत्ना’साठी मात्र लागू नसत. एवढेच कशाला, कार्यालयीन वा इतर कोणत्याही गोष्टीनिमित्त चार जण एकत्र जमले तर आजही त्या गोतावळ्यातील स्त्रियांना ‘तुला येतो तो अमकातमका पदार्थ करून आमच्यासाठी आण ना कधीतरी’ किंवा ‘कधीतरी तो खायला बोलाव ना घरी’ असे हमखास सांगितले जाते. म्हणजे ती त्यांच्या बरोबरीने त्या कार्यालयात काम करत असली तरी तिचे महत्त्व ती स्वयंपाकात काय बरेवाईट करते यावरच.
यातली वैयक्तिक संबंध आणि गृहीत धरणे यातली सीमारेषा खरेच पुसट आहे. काही काळापूर्वी एका प्रसिद्ध वृत्तनिवेदकाने एक मोठी आणि महत्त्वाची स्पर्धा जिंकल्यानंतर सानिया मिर्झाला आता तू सेटल कधी होणार, म्हणजे लग्न कधी करणार, मूल वगैरे कधी होऊ देणार असा प्रश्न विचारला होता. सानियाने हा प्रश्न ती टेनिसचा बॉल उडवून लावते त्याच पद्धतीने उडवून लावला ही गोष्ट वेगळी, पण औचित्याचा विचार न करता स्त्रियांना गायला, नाचायला सांगणे आणि असे प्रश्न विचारणे हे तारतम्याचे बारा वाजल्याचेच लक्षण. आपल्याकडे ते कायमचेच वाजलेले आहेत, हे खरे दुर्दैव.
