अमेरिकेचे हसे झालेले आहेच, शिवाय यापुढे आखाती शेजार्यांवर केवळ अमेरिकी मित्रदेश म्हणून हल्ले किती काळ करायचे याचा विचार इराणनेही करण्याची ही वेळ आहे…
आपल्याकडे महाभारतात ‘विचित्रवीर्य’ असे व्यक्तिमत्त्व होऊन गेले. कौरव आणि पांडव यांचे ते आजोबा. या विचित्रवीर्यास बालपणीच हस्तिनापूरच्या गादीवर बसावे लागले. म्हणजे राजा होऊनही तो बालच राहिला. सद्य:स्थितीत जागतिक महाभारतात हे विचित्रवीर्याचे पात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हुबेहूब रंगवू शकतात. महाभारतातील विचित्रवीर्य तरुणपणीच निवर्तला आणि त्याच्या दोन पत्नींस तो होता तोपर्यंत अपत्य होऊ शकले नाही. हे वगळल्यास डोनाल्ड ट्रम्प हे विचित्रवीर्य म्हणून हुबेहूब शोभतात खरे. मनाला आले म्हणून एका देशाच्या प्रमुखास मध्यरात्री उचलून आणतात काय, दुसर्या देशाच्या प्रमुखास मारून काय टाकतात, एकतर्फी युद्ध काय सुरू करतात आणि समाजमाध्यमांत प्रसिद्धिपत्रकाद्वारे ते थांबवल्याची घोषणा काय करतात! सगळेच अद्भुत आणि चमत्कारिक. इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारक नेतान्याहू यांच्या आग्रहास्तव इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धात एकतर्फी पाच दिवसांचा विराम पाळण्याची त्यांची घोषणा ही अशी चक्रावून टाकणारी आहे. त्याचे मुख्य कारण तात्पुरत्या युद्धविरामासाठी ज्या देशाशी चर्चा झाली असे ते सांगतात त्या देशाने अशी कोणतीही चर्चा मुळात सुरूच झालेली नसल्याचे स्पष्ट केले. म्हणजे या एकतर्फी घोषणेने महासत्तेच्या या प्रमुखाने स्वत:चेच हसे करून घेतले. एरवी ट्रम्प यांच्या या विदूषकी चाळ्यांकडे लक्ष देण्याची गरज लागती ना. परंतु या सार्याची दखल घेण्यामागील प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे आपल्यासह संपूर्ण जगाचे यात गुंतलेले आर्थिक हितसंबंध. आणि दुसरे म्हणजे आपला कट्टर वैरी शेजारी पाकिस्तानाचे या युद्धात प्रकटणे. ही दुसरी बाब पहिल्या मुद्द्यातील आर्थिक तणावापेक्षा अधिक वेदनादायक. म्हणून या सार्याचा एकत्रित समाचार आवश्यक.
इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही, त्यामुळे ट्रम्प यांना या देशास नमवणे वाटते तितके सोपे जाणार नाही, हे ‘लोकसत्ता’ युद्ध सुरू व्हायच्या आधीपासून सातत्याने सांगत आलेला आहे. त्यामुळे इराणला चुटकीसरशी नमवण्याचा आणि अवघ्या काही दिवसांत नांगी टेकावयास लावण्याचा ट्रम्प यांचा इरादा सफल होणार नाही, हे स्पष्ट होते. तसेच झाले. इस्रायलचे नरसंहारक नेतान्याहू यांच्या कच्छपी लागून ट्रम्प हे पश्चिम आशियातील युद्धाच्या चक्रव्यूहात घुसले खरे. पण बाहेर पडण्याचा मार्ग सापडेनासा झाल्याने आणि इराणही अपेक्षेप्रमाणे माघार घेत नसल्याने अमेरिकी अध्यक्ष नाकातोंडात वाळवंटातील वाळू गेल्यासारखे घाबरेघुबरे झाले. त्यात मायदेशातील अवघ्या सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मध्यावधी निवडणुकांवर या युद्धाचा काय परिणाम होईल या प्रश्नाने त्यांची झोप उडाली असणार. कारणे काहीही असोत. पण इराणला चारी मुंड्या चीत करण्याचे आपले स्वप्न सध्या तरी पूर्ण होणे अवघड याची जाणीव झाल्यावर ट्रम्प महाशयांनी आपला सूर बदलला आणि ‘‘त्यांना तोडगा हवा आहे, मला तोडगा हवा आहे… उगाच बॉम्बफेक कशाला करा’’, असे म्हणत इराणवर पुढील पाच दिवस हल्ले न करण्याची घोषणा त्यांनी केली. ‘‘आमच्यातील चर्चा अत्यंत सकारात्मक सुरू आहे’’, असे हे अध्यक्ष म्हणाले. पण इराणकडून चर्चा कोण करते आहे हे काही त्यांना सांगता आले नाही. साहजिकच इराणी राज्यकर्ते आणि इराणी माध्यमांनी जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुखाची जाहीर टिंगल सुरू केली. वर इराणने शस्त्रसंधी नाकारला आणि युद्ध सुरूच राहणार असल्याचेही संकेत दिले. अमेरिकी अध्यक्षाने समेटाची भाषा केली ती अमेरिकी भांडवली बाजाराचा दिवस सुरू होण्यास काही अवधी असताना. युद्ध थांबवण्याच्या त्यांच्या घोषणेने बाजारात उत्साह संचारला. निर्देशांक झपझप वर गेले आणि खनिज तेलाचे दरही खाली आले.
पण हा आनंद औटघटकेचा ठरला. कारण इराणने अध्यक्ष ट्रम्प यांस अक्षरश: कोलवले. तसे करताना इराणी राजकारण्यांनी ट्रम्प यांची टिंगल केली वगैरे ठीक. त्यांनी शस्त्रसंधीची ही संधी धुडकावण्यात अजिबात शहाणपण नाही. सर्वोच्च सत्ताधीशाच्या हत्येनंतरही अजिबात न खचता अमेरिकी-इस्रायली संयुक्त फौजा आग ओकत असताना ताठ मानेने उभे राहून त्यांना उलट आव्हान देणे, शेजारील अमेरिकी मित्रदेशांस लक्ष्य करून अमेरिकेचे तोंड उघडण्यासाठी मित्रदेशांचे नाक दाबणे इत्यादी चलाख उद्योगांनी इराणने असेही ट्रम्प यांस पुरते खजील केलेले आहेच. अजस्र सामर्थ्य असलेली अमेरिका एका दरिद्री देशास पराभूत करू शकली नाही, हे सत्य जगासमोर आल्याने अमेरिकेचे हसे झालेले आहेच. असे असताना तो देश जर शस्त्रसंधीसाठी हात पुढे करत असेल तर तो झिडकारणे इराणसाठी नुकसानकारक ठरेल. अमेरिका आणि इस्रायलच्या अभ्रद युतीसंदर्भात जे काही भाष्य इराण करू पाहत होता ते करून झालेले आहे. इस्रायलवरील बॉम्बवर्षावात त्या देशाचेही मोठे नुकसान करून यहुदी अभेद्यतेचा दावा किती फुसका आहे हे सिद्ध करण्याची इराणी इच्छाही पूर्ण झालेली आहे. इस्रायली आकाशातील पोलादी छत्री आपण फाडू शकतो हेही इराणने दाखवून दिले. असे असताना आपल्याच देशातील नागरिकांचे अधिक हाल होऊ नयेत यासाठी तरी अमेरिकेकडून चालत आलेली समेटाची संधी इराणने स्वीकारणे सर्वार्थाने शहाणपणाचे ठरेल. अमेरिकेविषयी कितीही संताप व्यक्त केला तरी त्या देशाच्या आर्थिक आणि लष्करी ताकदीशी बरोबरी करता येणे इराणच काय; समस्त सर्व देशांनाही सध्या अशक्यप्राय. आणि दुसरे असे की अमेरिकेचे नाक कापण्यासाठी त्या देशाच्या आखाती शेजार्यावर हल्ले करणे हे इराणसाठी धोरण म्हणून योग्य असेल. पण किती काळ? हे देश इराणी मारा किती काळ सहन करणार? त्यांच्या सहनशक्तीस मर्यादा आहेत आणि त्या ओळखल्या नाहीत तर इराणविरोधात या देशांची नवी आघाडी उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब मानाने होत असेल तर इराणने शस्त्रसंधी स्वीकारणे इष्ट.
तथापि तसा तो झालाच तर ती घटना आपल्यासाठीही तितकी मानाची असेल किंवा कसे; हा प्रश्न. तो पडण्याचे कारण म्हणजे या संघर्षात अचानकपणे झालेला पाकिस्तानचा प्रवेश. या संदर्भातील प्राथमिक वृत्तांनुसार इराण आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी संधान बांधल्याचे दिसते. त्यांस साहाय्य आहे ते अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचे जावई जेराड कुशनेर यांचे. या जेराड कुशनेर आणि खुद्द ट्रम्प यांच्या चरणी पाकिस्तानने लक्षणीय गुंतवणूक केल्याचे उघड झाले त्यास बराच काळ लोटला. म्हणजे ट्रम्प आणि त्यांच्या जामातास पाकिस्तानने दिलेली ‘दक्षिणा’ या महत्त्वाच्या क्षणी निर्णायक ठरत असेल तर त्यात धक्कादायक काही नाही. त्यात बहारीन, संयुक्त अरब अमिराती आदींचे अमीरही सहभागी असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार संबंधितांत पाकिस्तानी भूमीत शस्त्रसंधीची चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांचे लांगूलचालन करण्यात पाकिस्तान आपल्यापेक्षा किती तरी पुढे आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तेव्हा अन्य कोणापेक्षा ट्रम्प हे पाकिस्तानच्या मध्यस्थीस सकारात्मक प्रतिसाद देत असतील तर त्यातही काही आश्चर्य नाही.
पण हे सर्व अपेक्षेप्रमाणे झाले आणि युद्ध अखेर थांबले म्हणून नि:श्वास सोडावा तर ते थांबताना आपल्या शत्रुदेशाचे हात त्यातून बळकट होण्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष कसे करणार? खेरीज तसे होणे हे आपल्या मुत्सद्देगिरीचे अपयश मानले जाईल, हा धोका वेगळाच. तेव्हा युद्ध सुरू राहणे आणि ते पाक-मध्यस्थीने थांबणे हे आपल्यासाठी दुहेरी धर्मसंकट असेल.
