कमला हॅरिस यांची ईर्षा, ऊर्जा ट्रम्प यांच्याशी जाहीर चर्चेत दिसलीच; पण त्याहीपेक्षा लोभस ठरते ते अशा खुल्या वादसंवादांचे असणे..

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांची नुकतीच प्रसारित झालेली जाहीर चर्चा ज्यांनी पाहिली त्यांच्या लोकशाही जाणिवांचे पारणे फिटले असेल. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेची ही पहिली आणि कदाचित शेवटचीही फेरी. अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून जो बायडेन बाद झाल्यापासून त्यांचे आव्हानवीर डोनाल्ड ट्रम्प का अस्वस्थ आहेत या प्रश्नाचे उत्तर ही चर्चा पाहणाऱ्यांस मिळाले. अमेरिका ही लोकशाहीची जननी नसेलही. पण वाद- संवाद- प्रतिवाद या लोकशाहीच्या ‘बोलक्या’ मूल्यांचे जतन तेथे प्राणपणाने झाल्याचे दिसते. सर्वोच्च सत्ताधीशास जाहीर प्रश्न विचारता येणे, त्यानेही वाटेल त्या प्रश्नांस सामोरे जाण्याची हिंमत दाखवणे आणि आपल्या विरोधकास प्रतिप्रश्न करणे ही खरी निवडणूक पर्वणी! एरवी जनतेवर ‘जनार्दन’, ‘मतदार राजा’ वगैरे शब्दफुले वाहायची आणि त्याच वेळी त्या जनतेचे प्रश्न टाळत फक्त एकतर्फी संवाद साधायचा हे अमेरिकेत घडत नाही. त्यामुळे ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील चर्चाफेरीकडे जगभरातील लोकशाहीवाद्यांचे लक्ष होते. पुरुषी अहंकाराने ओतप्रोत भरलेल्या अत्यंत पोकळ; पण विषारी आणि विखारी नेत्याचा फडशा पाडत त्याचा अहं एखादी अभ्यासू स्त्री कसा धुळीस मिळवू शकते हे या चर्चेत दिसले.

loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
RSS chief Mohan Bhagwat remark on Manipur violence
अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…
Presvu Eye Drops
अग्रलेख : दावा, दवा, दुआ!
Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!
loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!
loksatta editorial marathi news
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे
Loksatta editorial Loksatta editorial on Israel Hamas war akshay shinde Encounter
अग्रलेख: बुल्स इन चायना शॉप्स!

हेही वाचा >>> अग्रलेख : विजेला धक्का

चर्चेच्या सुरुवातीलाच गर्वाने मुसमुसलेल्या कुर्रेबाज कोंबड्याच्या थाटात उभ्या ट्रम्प यांच्याकडे कमला स्वत:हून गेल्या आणि ‘मी कमला हॅरिस…’ अशी ओळख करून त्यांच्याशी हस्तांदोलन करत्या झाल्या. या ‘मुहब्बत की दुकान’ क्षणाने ट्रम्प गांगरले. ते सावरायच्या आत हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या फण्यावर हल्ला करताना नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ट्रम्प यांच्या प्रचार सभेस जावे असे आवाहन केले. ‘‘ट्रम्प किती कंटाळवाणे बोलतात आणि समोरील प्रेक्षक सभात्याग कसे करू लागतात, हे तुम्हास कळेल- ट्रम्प तुमच्याबद्दल बोलतच नाहीत, हेही समजेल…’’ या हॅरिस यांच्या अनोख्या प्रारंभाने ट्रम्प यांची गाडी सुरुवातीलाच घसरली. आत्मानंदी दंग असलेल्यांच्या दंभाचा फुगा फोडणे किती सहज असते ते हॅरिस यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. सशक्त लोकशाहीसाठी हा असा जाहीर दंभ-भंग अत्यावश्यक. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था, आरोग्य विमा, पर्यावरण संरक्षण अशा अनेक विषयांवर ही चर्चा झाली. तिचे सूत्रसंचालन केले ‘एबीसी’ या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी. या वाहिनीच्या साक्षीने चर्चा करण्यास ट्रम्प यांनी सुरुवातीस खळखळ केली. त्यांना ही चर्चा ‘फॉक्स’ वाहिनीच्या पत्रकारांनी घ्यावी असे वाटत होते. त्या वाहिनीचे पत्रकार ‘‘तुम्ही आंबे कसे खाता’’, ‘‘तुमच्या अफाट ऊर्जेचे गुपित काय’’ असे ‘रिपब्लिकी’ प्रश्न विचारतील याची ट्रम्प यांस खात्री असणार. पण ते झाले नाही. पण तरीही; बाकी काही असो- ट्रम्प यांनी पत्रकारांस सामोरे जाणे टाळले नाही. अध्यक्षपदी असतानाही आणि ते पद गेल्यानंतरही ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली असे कधी झाले नाही ही बाब खचितच कौतुकास्पद.

हेही वाचा >>> अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…

इंग्रजीत ‘गेटिंग अंडर द स्किन’ असा वाक्प्रचार आहे. अलीकडच्या मराठीत त्याचा अर्थ समोरच्यास उचकावणे असा असेल. हॅरिस यांनी या चर्चेत ट्रम्प यांना पदोपदी प्रक्षुब्ध केले. याआधी ट्रम्प आणि बायडेन यांच्यात चर्चेची पहिली फेरी झडली होती. त्यात बायडेनबाबा हे ट्रम्प यांच्या रेट्यासमोर अगदीच त-त-प-प करते झाले. ते इतके फाफलले की त्यांना अध्यक्षपदाच्या लढतीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे ट्रम्प यांचा ताज्या चर्चेतील प्रवेश ‘विजयी वीरा’च्या थाटात झाला. त्यांना हॅरिस यांनी लगेच जमिनीवर आणले. ‘‘तुम्ही बायडेन यांच्यासमोर नव्हे तर माझ्यासमोर बोलत आहात’’, या त्यांच्या विधानाने तर ट्रम्प शब्दश: चमकले आणि त्यांना वास्तवाची जाणीव झाली. हॅरिस यांनी ट्रम्प यांस खरा धक्का दिला तो त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसंदर्भात. ‘‘ट्रम्प यांस खुशमस्करे आवडतात. त्यामुळे जगभरातील हुकूमशाही प्रवृत्तीचे नेते फक्त ट्रम्प यांचे कौतुक करतात आणि त्यात ट्रम्प वाहून जातात. प्रत्यक्षात ट्रम्प हे जगभरात टिंगलीचा विषय झालेले आहेत’’, अशा अर्थाची हॅरिस यांची विधाने ट्रम्प यांच्या अब्रूस हात घालणारी होती. या अत्यंत अहंमन्य गृहस्थाच्या इतका वर्मी घाव अन्य कोणी आतापर्यंत घातलेला नसेल. तसेच; ‘‘जगभरातील हुकूमशाही वृत्तीचे नेते’’ आणि ट्रम्प यांच्यातील सौहार्दाच्या संबंधांमागील कारणे अमेरिकी नागरिकांस इतक्या थेटपणे कोणी सांगितली नसतील. गर्भपाताच्या मुद्द्यावरही हॅरिस यांनी ट्रम्प यांचा अध:पात दाखवून दिला. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष धर्मवादी आहे आणि प्रखर ख्रिाश्चन धर्मीयांप्रमाणे ते स्वत:स ‘जीवनवादी’- म्हणून गर्भपातविरोधी- मानतात. त्यामुळे स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर गदा येते हा विचारही या अल्पबुद्धींस शिवत नाही. त्यातूनच अमेरिकेत मध्यंतरी या मुद्द्यावरील न्यायालयीन प्रकरण गाजले. त्याचा हवाला देत हॅरिस यांनी आपल्यातील प्रामाणिक स्त्रीवादी भूमिका मांडली आणि स्त्रियांस गर्भपाताचा अधिकार देणाऱ्या निर्णयावर मी अध्यक्ष म्हणून अत्यंत अभिमानाने स्वाक्षरी करेन, असे ठामपणे सांगितले. या मुद्द्यावर ट्रम्प यांची भूमिका पुरोगामित्व झेपत नाही आणि प्रतिगामित्व दाखवणे आवडत नाही, अशा कात्रीत अडकलेली दिसली.

हेही वाचा >>> अग्रलेख: आणखी एक माघार…?

गृहपाठ, शास्त्रशुद्ध माहिती, योग्य आकडेवारी इत्यादी बुद्धिगम्य गुणांची वानवा ट्रम्प यांच्या ठायी आहे. जागतिक व्हॉट्सअॅप विद्यापीठाचे कुलपती निश्चित होतील इतकी त्यांची अर्हता. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या चर्चेतही ते ‘फेका-फेकी’ करू लागले. अमेरिकेतील स्थलांतरितांच्या मुद्द्यावर भाष्य करताना ‘‘हे परदेशी स्थलांतरित अमेरिकी स्थानिकांचे कुत्रे/ मांजरी, अन्य पाळीव प्राणी खाऊ लागले आहेत’’ असे कमालीचे खोटे विधान त्यांनी केले. आपण पत्रकारांसमोर आहोत याचेही भान त्यांना राहिले नाही. यावर ‘एबीसी’ वाहिनीच्या पत्रकारांनी ट्रम्प यांनी उल्लेख केलेल्या परिसरातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पाळीव प्राणी मारून खाल्ले जातात किंवा काय याची खातरजमा केली. ट्रम्प म्हणतात तसे काहीही आपल्या प्रांतात घडलेले नाही, असा निर्वाळा सदर अधिकाऱ्यांनी दिला आणि हा माजी अध्यक्ष थेट प्रसारणात उघडा पडला. पर्यावरण रक्षण, आर्थिक आव्हाने आदी मुद्द्यांवरही ट्रम्प यांस अशाच छाछूगिरीचा आधार घ्यावा लागला. कारण ‘अभ्यासोनी प्रकट व्हावे…’ हे तत्त्वच या गृहस्थास मान्य नाही. पर्यावरण आणि पृथ्वीच्या वाढत्या तपमानाचा उल्लेख मागे त्यांनी एकदा ‘थोतांड’ असा केला होता. त्यामुळे त्यांच्याकडे या चर्चेत बोलण्यासारखे, सादर करण्यासारखे भरीव असे काहीही नव्हते, काहीही नाही, हे उघड झाले. स्थानिक प्रथेप्रमाणे या चर्चा-फेरीत कोण जिंकले याच्या चाचण्या विविध वृत्तवाहिन्या, राजकीय अभ्यासक संघटना आदींनी लगेच घेतल्या. त्यातून जवळपास ७० टक्के सहभागींनी ट्रम्प यांचा या चर्चेत धुव्वा उडाल्याचे मत नोंदवले. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे समर्थक, हॅरिस यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक आणि तटस्थ अशा तीनही पातळींवर या मतचाचण्यांचा निकाल असाच आहे. अनेक राजकीय अभ्यासकांच्या मते या चर्चेने कुंपणावरील मतदार मोठ्या प्रमाणावर हॅरिस यांच्याकडे वळेल. या चर्चा परिणामाने प्रेरित हॅरिस यांनी पुढील महिन्यात आणखी एका चर्चा-फेरीचे आव्हान ट्रम्प यांस दिले. यावर ‘‘या चर्चेत पराभूत झाल्याने हॅरिस यांस आणखी एक फेरी हवी’’, अशी मल्लिनाथी ट्रम्प यांनी केली खरी. पण चर्चेचे आव्हान स्वीकारणे टाळले. ते साहजिक म्हणावे लागेल. कमला हॅरिस ज्या ईर्षा, ऊर्जा आणि त्वेषाने प्रतिवाद करत ट्रम्प यांस निष्प्रभ करत गेल्या ते पाहता या चर्चेचे वर्णन ‘वीज म्हणाली… दगडाला’ असे करणे अतिशयोक्ती ठरू नये.