आजच्या महाराष्ट्रासमोरची सर्वात गंभीर समस्या कोणती? अर्थव्यवस्थेची स्थिती आणि वाढती कर्जे, कायदा-सुव्यवस्थेचा अभाव, अन्य राज्यांकडून वाढती स्पर्धा, खेळासकट अन्य अनेक क्षेत्रांत होणारी महाराष्ट्राची पीछेहाट, शहरांचे बकालीकरण… हे सर्व वा आणखी काही मुद्दे समस्या ठरत नाहीत; असे नाही. या समस्या आहेतच. पण या सर्व समस्यांचे मूळ आहे ते महाराष्ट्राचे अत्यंत वेगाने होणारे अंतर्गत विलगीकरण. या राज्याचे झपाट्याने होत चाललेले कप्पे. हे कप्पे आर्थिक तर आहेतच. पण आर्थिक कप्पे कायम असतातच आणि काही अंशी असणारच. पण आजच्या महाराष्ट्रासमोरचे खरे आव्हान आहे ते वाढता सामाजिक दुभंग; हे. कसे; ते समजून घेणे आवश्यक आहे.
या दुभंग विश्लेषणाचे वरवरचे लक्षण म्हणजे विजयादशमीच्या मुहूर्तावर वाढू लागलेले विविध मेळावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपुरात १४ ऑक्टोबरला बौद्ध धर्म स्वीकारला. त्या दिवशी विजयादशमी होती. ते सर्वार्थी सीमोल्लंघन होते. त्यामुळे विजयादशमीदिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांचे हजारो अनुयायी या सीमोल्लंघनाच्या स्मरणार्थ जमतात. त्याच्या आधी सुमारे चार दशके याच दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यामुळे विजयादशमीस संघ समर्थक रेशीमबागेत वर्धापन दिन साजरा करतात. हे दोन्ही नागपुरात एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर. विजयादशमीदिनी या दोन मेळाव्यांची ऐतिहासिक परंपरा महाराष्ट्राला आहे. यावर्षी सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी आपल्या भाषणातून ‘रेशीमबाग’ ते ‘दीक्षाभूमी’ हे अंतर कमी करायचा प्रयत्न केला. ‘दलित म्हणावा आपुला’ हा त्यांच्या भाषणाचा सारांश. संघ विचाराने चालणाऱ्या भाजपची ती सध्याची राजकीय निकड होतीच. ती पूर्ण झाली. ते ठीक.
याखेरीज साठच्या दशकापासून महाराष्ट्रात लक्षणीय ठरत गेला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईत शिवाजी पार्कात भरणारा विजयादशमी मेळा. ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी’ सेना नेते, कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदानात ऊर्फ शिवतीर्थावर या दिवशी जमत. त्यातील वैचारिक मौक्तिकांच्या मूल्याबाबत मतभेद असू शकतात. बाकी काही मिळो वा न मिळो, शिवसेनाप्रमुखांच्या भाषणांतून दोन गोष्टी अवश्य मिळत. मनोरंजन आणि शिवसेनेच्या पुढील वाटचालीबाबतची दिशा. हा पक्ष आगामी काळात कोणत्या दिशेने जाऊ इच्छितो याचा काही प्रमाणात अंदाज या मेळाव्यातून मिळत असे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे याच्या पक्षत्यागाने या एका मेळाव्याचे दोन मेळावे झाले. शिवसेनेस पाठिंबा देणाऱ्या मराठी माणसाचा दुभंग दोन मेळाव्यांतून अधोरेखित झाला. त्यात न्यायालय तसेच निवडणूक आयोगादी यंत्रणांचे सौजन्य आणि सत्ताधारी भाजपची गरज यांमुळे अधिकृत शिवसेनेचा दर्जा शिंदे यांच्या सेनेस मिळाला. त्यामुळे त्यांचा मेळावादेखील सेनेचा अधिकृत मेळावा ठरला. शिंदे यांच्याआधी बाळासाहेबांचे पुतणे राज यांनी शिवसेनेकडे पाठ फिरवून स्वत:ची सेना स्थापन केली. बाळासाहेबांच्या उद्धव शिवसेनेची विजयादशमी म्हणून मग राज यांच्या सेनेचा गुढीपाडवा अशी ही विभागणी. यावर्षी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राज यांनी विजयादशमीदेखील आभासी वास्तवात पाळली. तेवढेच सीमोल्लंघन! विजयादशमीस विदर्भात रा. स्व. संघ, बौद्ध मेळावे, मुंबईत बाळासाहेब ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे-चलित सेना यांचे मेळावे असताना मराठवाड्यातही अशी मेळावे परंपरा झाली. विदर्भ आणि मुंबई या ठिकाणच्या प्रत्येकी दोन मेळाव्यांस ज्याप्रमाणे एक सामाजिक किनार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातील या नव्या मेळाव्यांसही एक सामाजिक चेहरा आहे.
गोपीनाथ मुंडे हे भाजपचे एक ज्येष्ठ नेते. ‘सोशल इंजिनीअरिंग’ हा शब्दही जेव्हा जन्माला आलेला नव्हता तेव्हा संघातील वसंतराव भागवत यांच्या मुशीतून घडलेले मुंडे हे राज्यातील सर्वात प्रबळ ‘ओबीसी’ चेहरा होते. त्यांच्या निधनाने भाजपपेक्षाही अधिक नुकसान ‘ओबीसी’ समाजाचे झाले. मुंडे आणि दुसरे प्रबळ ‘ओबीसी’ नेते छगन भुजबळ यांच्यात एक ‘सामाजिक’ सख्य होते. पक्ष भिन्न. पण समाजाच्या बंधाने हे दोन्हीही नेते बांधलेले होते आणि शक्यता ही की मुंडे हयात असते तर या उभयतांची एक आघाडी जन्मास येती. मुंडे गेले आणि ते राहिले. त्यात त्यांचा पुतण्या धनंजय यानेही काका हयात असतानाच त्यांचा हात सोडला आणि कन्या पंकजा यांना भाजपत फटके बसल्यानंतर वडिलांच्या सामाजिक वारशाची आठवण झाली. ‘सांगे वडिलांची कीर्ती’ त्यांस नव्या भाजपत पुरेशी ठरली नाही. तेव्हा त्यांनी वडिलांच्या सामाजिक वारशास हात घातला आणि स्वत:चा वेगळा विजयादशमी मेळा भरवणे सुरू केले. अन्य कोणत्याही अशा मेळाव्यांप्रमाणे शक्तिप्रदर्शन हाच त्याच्या मेळाव्याचाही हेतू होता. त्यात गैर काही नाही. तथापि त्यांच्या यंदाच्या मेळाव्यास ताज्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या भळभळत्या जखमेची पार्श्वभूमी होती. हा पराभव अन्य कोणत्याही पराजयाप्रमाणे सरळ नव्हता. त्यास सामाजिक किनार होती. ‘ओबीसी’ गोपीनाथरावांनी आपल्या हयातीत मराठा कार्ड उत्तम जोपासले. त्याचमुळे शेजारील मतदारसंघातील काँग्रेसी मराठा विलासराव देशमुख आणि भाजपीय ‘ओबीसी’ मुंडे हे परस्परपूरक साथीदार होते.
गेल्या चार वर्षांतील मराठा आंदोलनामुळे हा बंध सुटला आणि तुटलेल्या मराठा समाजाने पंकजा मुंडे यांस दणदणीत हरवले. त्यात गेली दोन वर्षे गरीब आणि सत्तासमीकरणाबाहेरच्या मराठा समाजास मनोज जरांगे यांच्या रूपाने एक नवे आणि आक्रमक नेतृत्व मिळालेले आहे. राज्यात विद्यामान युती सत्तारूढ होईपर्यंत संपूर्ण जालना जिल्ह्यासही ठाऊक नसलेले जरांगे हे मराठ्यांचा एकदम राज्यस्तरीय चेहरा कसे बनले याच्या सुरस कथा चर्चिण्याचे हे स्थळ नव्हे. तसेच राज्य सरकारातील कोणत्या ‘अदृश्य शक्ती’चे नाव या संदर्भात घेतले जाते यावर येथे काथ्याकूट करणेही अयोग्य. तथापि जरांगे यांचा उदय, त्यातून ‘ओबीसी’ आणि मराठा समाजात वाढलेली तेढ आणि पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव यांचा थेट संबंध आहे यात तिळमात्रही शंका नाही. ही तेढ अद्यापही मिटलेली नाही. तिच्या मुळाशी आहे ‘ओबीसी’ कोट्यातूनच मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे, हा जरांगे यांचा हट्ट. त्या हट्टाचे मूळ आणि कूळ हे न शोधतादेखील त्याच्या अंमलबजावणीतील अडचणी तसेच आव्हाने समोर येतात. त्यावर कोण आणि कशी मात करणार आणि मुळात तशी मात करता येणार का हाही प्रश्नच. पंकजा मुंडे, पक्ष भटकून परत त्यांना येऊन मिळालेले त्यांचे बंधू धनंजय यांनी यंदाच्या विजयादशमी मेळाव्याला मोठा गाजावाजा केला तो या पार्श्वभूमीवर. त्यांच्या बडेजावापेक्षा कित्येक पटींनी आकार होता तो जरांगे यांनीही याच मुहूर्तावर आयोजित केलेल्या आपल्या मेळाव्याचा.
म्हणजे या विजयादशमीस शिवसेनेचे दोन, पंकजा-धनंजय मुंडे यांचा एक, जरांगे यांचा एक, रा.स्व. संघ आणि दीक्षाभूमीतील परंपरागत प्रत्येकी एक, राज ठाकरे यांचा अर्धा (कारण तो फक्त समाजमाध्यमी होता म्हणून) असे साडेसहा मेळावे पार पडले. खेरीज दोन राजकीय ध्रुवांभोवती फिरणारे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, बच्चू कडू आदींचे मेळावे नाहीत; पण वेगळ्या सामाजिक चुली आहेतच. यातून रेशीमबाग आणि दीक्षाभूमी यांस वगळले तरी सामाजिक दुभंग दिसतोच. महाराष्ट्रातील असा सामाजिक दुभंग दिल्लीकरांस नेहमीच हवाहवासा. या विजयादशमीने दिल्लीकरांस नक्कीच अधिक समाधान दिले असणार. दिल्लीस आपल्यामुळे मिळणाऱ्या या दुभंगानंदाची जाणीव मराठी जनांस आहे का, इतकाच काय तो प्रश्न.