ज्या नागर समाजासाठी आपण पर्यावरण ऱ्हासाचे धोके दाखवून देत आहोत त्यास त्याची काहीही चाड नाही याचे दु:ख त्यांना असेल काय? त्यांचा स्वभाव पाहता ते झाले असले तरी त्यांनी ते व्यक्त केले नसते. जनरीत अशीच असते, असेच ते म्हणाले असते.
आयुष्यात समाधान मिळवायचे असेल तर तुमच्या आवडीचा छंद हाच तुमचा व्यवसाय बनवा, हा जीवशास्त्रज्ञ ज्युलियन हक्स्ले यांचा सल्ला माधवराव गाडगीळ यांनी आयुष्यभर तंतोतंत पाळला. आयुष्याचे श्रेयस हेच प्रेयसही बनावे असे भाग्य फार थोड्यांच्या वाट्यास येते. माधवराव गाडगीळ हे अशा मोजक्यांतील एक. आपण असे भाग्यवान ठरलो कारण आपले वडील विख्यात अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, असे ते सांगत. धनंजयराव कट्टर निसर्गप्रेमी होते. आपल्या भटकंतीत छोट्या माधवास ते समवेत घेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, गिरीवनात, समुद्रकिनारी अशा धनंजयरावांच्या सर्व ‘अर्थ’पूर्ण सफरीत माधवरावांस वनांकडून बरेच काही शिकावयास मिळाले. ‘‘ही बिनभिंतींची शाळा माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा बनली’’ असे माधवराव म्हणत. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया घालणाऱ्या धनंजयरावांच्या हयातीतच महाराष्ट्राच्या शास्त्रशुद्ध निसर्गाभ्यासकास पर्यावरणप्रेमाची डोळस दीक्षा मिळाली. वडिलांच्या समवेत एका वीज प्रकल्पस्थळी भेट देत असता तेथे होणारी जंगलतोड पाहून धनंजयरावांनी आपल्या लेकाच्या मनात ‘विकासाची किंमत’ ही कल्पना पहिल्यांदा रुजवली. आपल्यासारख्या देशास वीज प्रकल्प तर हवाच, पण इतक्या अमानुष जंगलतोडीची किंमत आपण मोजावी काय, हा त्यांचा प्रश्न होता. हा प्रश्न त्यांच्या आयुष्याचे ध्येय होता. त्याचे उत्तर शोधण्याच्या झटापटीने त्यांचे आयुष्य समृद्ध केले. आज ते निसर्गप्रेमी आयुष्य निसर्गात विलीन झाले. त्यांना योग्य वेळी मरण आले. बरे झाले… गाडगीळ गेले.
विकास की पर्यावरण, विकासाचे मोल पर्यावरणाने किती द्यायचे असले प्रश्न माधवरावांस भिडले नाहीत. याचे कारण आपल्याकडे जे सुरू आहे त्याचे नाते विकासाशी नाही. ते कंत्राटदारांशी आहे. त्या अर्थाने आपण कंत्राटदारशाहीचा सुवर्णकाळ अनुभवत आहोत. गाडगीळ यांनी या कंत्राटदारशाहीची तमा न बाळगता मानव आणि निसर्ग यांच्यातील करार अधिक महत्त्वाचा मानला आणि आयुष्यभर त्याचा अभ्यास केला. ‘पश्चिम घाट बचाव मोहीम’ आणि त्याबाबतचा त्यांचा अहवाल हा या अभ्यासाचा निदर्शक. हा पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यातील जैवविविधता जपावी अशी आहे. म्हणून त्या परिसरात ‘विकासा’चा रेटा जपून हवा, असे ते सांगत. मांडायचे ते शास्त्राच्या आधारे. म्हणून आपली निरीक्षणे तर्कशुद्धरीत्या तपशिलासह नमूद करता यावीत यासाठी गाडगीळांनी हा संपूर्ण परिसर पायाखाली घातला. अनेकदा. आपल्या पाहणीतील प्रत्येक पर्यावरणीय घटकाची नोंद केली. ही जबाबदारी त्यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण खात्याने दिली होती यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात यावे. त्यांच्या पाहणीवरील अहवाल २०११ साली आला. पण अंतिमत: कोणत्याही चांगल्या अहवालाची गत जशी होते तसेच या अहवालाचेही झाले. सरकारला ज्या तज्ज्ञाविषयी आदर होता असे सांगितले जात होते त्याच तज्ज्ञाचा अहवाल सरकारने प्रामाणिक शब्द वापरावयाचा तर ‘सडवला’. परंतु सरकारचे- आणि त्याहीपेक्षा आपले- दुर्दैव असे की केरळ ते अलिबाग या पट्ट्यात दरड खचून हजारोंचे प्राण गेले आणि मग सर्वांना या अहवालाची आठवण झाली. आपण इशारा दिलेला असूनही इतक्या जणांचे प्राण जाताना पाहून गाडगीळांस काय वाटले असेल, याची चिंता आता करण्याचे कारण नाही. येथून पुढे त्या अहवालावर आता तर एक अवाक्षरही कोणी काढणार नाही. बरे झाले… गाडगीळ गेले.
पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील आधी नाणार आणि नंतर बारसू येथे तेल शुद्धीकरण कारखाना काढण्यासंदर्भात जेव्हा वाद-विवाद सुरू झाले तेव्हाही या अहवालाचा संदर्भ आला. या संदर्भात युक्तिवाद करताना त्यांनी शासनाची लबाडी अभ्यासूपणे उघडकीस आणली. राज्य शासनाने १९९५ साली उद्योग आणि त्यांस सुयोग्य स्थान निश्चित करता यावे यासाठी ‘झोनिंग आराखडा’ तयार केला आहे. गाडगीळ यांनी नाणार आणि बारसूबाबत मत व्यक्त करण्याआधी सरकारकडे हा आराखडा मागितला. सरकारने अर्थातच टाळाटाळ केली आणि नेहमीचेच ‘असा काही आराखडाच नाही’ येथपासून ‘तो गहाळ झाला’ असे अनेक बहाणे सांगितले. परंतु गाडगीळ यांनी हा आराखडा मिळवला आणि मग त्याआधारे आपली भूमिका मांडली. ती अर्थातच सरकारला अडचणीची होती. अहवालही सरकारचा. गाडगीळांचे मतही त्याच सरकारने मागवलेले. पण ते मत सरकारला हवे होते तसे नव्हते. तेव्हा त्याबाबतही काही घडले नाही. आणि आता तर भविष्यातही घडणार नाही. याचा अंदाज गाडगीळांस असणार म्हणून त्यांनी सरकार दडवू पाहात असलेला अहवाल सर्वांसाठी खुला केला. विज्ञान ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’ या तत्त्वावर चालते. पर्यावरणाचे श्राद्ध घातले जात असताना त्याबाबतचे सर्व ‘बाप’मुद्दे गाडगीळ यांनी सर्वांस अभ्यासासाठी खुले करून दिले. यामागे त्यांचा कोणताही अभिनिवेश नव्हता. पश्चिम घाट असो वा विदर्भातील जंगल, गाडगीळ यांचा या सगळ्याबाबतचा दृष्टिकोन विधायक आणि तरीही पर्यावरण रक्षण हा राहिलेला आहे. विदर्भाच्या जंगलात स्थानिक आदिवासींना हाताशी धरून त्यांनी केलेला झाडे-झुडपे-ऑर्किड आदींच्या नोंदीचा प्रयोग तर ऐतिहासिक म्हणावा असा. त्यातूनच साध्या, निसर्गशिक्षित आदिवासींची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यामुळे एरवी जो तपशील, महत्त्वाच्या नोंदी इत्यादी काळाच्या पडद्याआड गेल्या असत्या त्या सर्व टिकून राहिल्या. अर्थात असे असले तरी विदर्भातील जंगलात, व्याघ्र प्रकल्पांच्या मार्गिेकेत खाणींची कंत्राटे रोखली गेली असे काही झाले नाही. ज्या नागर समाजासाठी आपण पर्यावरण ऱ्हासाचे धोके दाखवून देत आहोत त्या मध्यमवर्गीय इत्यादी, ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’’स ठेका धरणाऱ्या नागरिकांस याची काहीही चाड नाही याचे दु:ख त्यांना असेल काय? त्यांचा स्वभाव पाहता ते झाले असले तरी त्यांनी ते व्यक्त केले नसते. जनरीत अशीच, असेच ते म्हणाले असते. आपला अभ्यास व्यर्थ गेला असेही त्यांना वाटले नसते. पण तरी बरे झाले… गाडगीळ गेले.
एरवी पर्यावरणवादी असतात तसे माधवराव आक्रमक नव्हते. अंतिम सत्य आपल्यालाच गवसलेले आहे असा त्यांचा आविर्भाव अजिबात नसे. संस्कृत वाङ्मय, साहित्य, संगीत यांवरही त्यांचे तितकेच प्रेम होते. ‘‘रघुवंशात शृंगाररसराज कालिदास पश्चिम घाटाला, अथवा सह्यचलाला एका लावण्यवती युवतीची उपमा देतो. अगस्त्यमला हे तिचे मस्तक, नीलगिरी आणि आणेमलय तिचे चंदनाचा लेप दिलेले उरोज, कारवार-गोवा-सिंधुदुर्ग तिचा समुद्राला भिडलेला कटि-नितंब प्रदेश, महाराष्ट्रातला सह्याद्री म्हणजे या युवतीचे चरण’’, असे सहजपणे ते लिहून जात. वास्तविक कालिदास वगैरेवर प्रेम असणे आणि ते सद्याकाली व्यक्त करणे म्हणजे पुरोगाम्यांस हेटाळणी करण्याची संधी देणे. गाडगीळांचा गोडवा असा की ते पुरोगामी, तसेच पुरोगामी या शब्दाचा उच्चार शिवीसदृश करणारे…अशा दोघांनाही तितकेच प्रिय. जेव्हा कशाचेच काही करायचे नसते तेव्हा प्रेम करून वेळ मारून नेता येते. गाडगीळांबाबत असे झाले. त्यांच्यावर प्रेम भले दोन्ही बाजूंनी केले गेले असेल वा आहे असे दाखवले गेले असेल. पण उभयतांनी त्यांच्या अभ्यासावर आधारित काही केले मात्र नाही. याबाबत दोन्ही गटांनी गाडगीळांस समान वागणूक दिली. आता ते त्याच्या पल्याड गेले. पुढील पर्यावरण ऱ्हास त्यांना पाहावा लागणार नाही. म्हणून बरे झाले… गाडगीळ गेले.
मराठी जनांनी गाडगीळांचे अधिक ऋणी राहायला हवे कारण हा आंतरराष्ट्रीय गौरवांकित तज्ज्ञ अतिशय रसाळ, सुलभ मराठीत लिहीत असे. तज्ज्ञ म्हणजे काही जडजंबाळ मानले जाण्याच्या काळात गाडगीळांचे गोड मराठी लिखाण वाळवंटातील सावलीच जणू. ‘लोकसत्ता’चे ते हक्काचे लेखक. गेल्या जवळपास दीड दशकाचा त्यांचा ‘लोकसत्ता’शी ऋणानुबंध होता. सदर लिहिण्यापासून ते विविध उपक्रमांतील सहभागापर्यंत गाडगीळ ‘लोकसत्ता’ परिवाराचा भाग होते. त्यांना २०२४ सालच्या डिसेंबरात संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागाने ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने सन्मानित केले तेव्हा ‘लोकसत्ता’ने अभिनंदनपर संपादकीयात त्यांचे वर्णन ‘ड्युरेबल ऑप्टिमिस्ट’ असे केले. कारण ते कमालीचे आशावादी होते. त्यांचा गोव्यातील पर्यावरणवादी मित्र अचानक ‘नाहीसा’ झाला आणि नदीत माशांनी खाल्लेले त्याचे प्रेत मिळाले हे ते सांगत. पण तरीही ते या अशा गोष्टींनी हताश होत नसत. ‘‘शाळेत असताना जातककथांच्या प्रस्तावनेतली बुद्धाची शिकवण माझ्या मनावर बिंबली होती: केव्हाही हताश होऊ नये, आयुष्याच्या समाधानरथाला उत्साहाचे घोडे जोडून, विवेकाचा चाबूक वापरत मार्गक्रमण करत राहावे,’’ हे त्यांचेच ‘लोकसत्ता’तील शब्द. आता त्या मार्गक्रमणाची गरज त्यांना लागणार नाही. ते सगळ्याच्या पलीकडे गेले. आपल्या आशावादाची कसोटी त्यांना द्यावी लागणार नाही. बरे झाले… गाडगीळ गेले!
या कृतिशील विद्वानास ‘लोकसत्ता’ परिवाराची मन:पूर्वक श्रद्धांजली.
