संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला त्यांच्या जयंतीच्या आदल्या रात्रीच लागलेल्या आगीकडे केवळ दैवदुर्विलास म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही…

कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत केवळ कोल्हापूरचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा जळून भस्मसात झाला. या नाट्यगृहाच्या फक्त भिंती आता उरल्या आहेत. वास्तुरचनेचा अप्रतिम नमुना असलेल्या या नाट्यगृहाशी रंगमंचावर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे अत्यंत हृद्या नाते होते. नाट्यगृहातल्या रंगमंचावर उभे राहिले, की समोर दिसणारे प्रेक्षागृह आणि त्याच्या मागच्या भिंतीवर असलेल्या दिग्गज कलाकारांच्या तसबिरी यामुळे कलाकारालाही आपण या दिग्गजांच्या साक्षीने कला सादर करत आहोत, अशी नम्र भावना मनात निर्माण होत असणार. या भावनेचे मोल किती मोठे आहे, याचे शब्दांत वर्णन करणे अशक्य. साहजिकच प्रेक्षकांनाही या नाट्यगृहात मिळणारा कलानुभव दाद देण्याचे भान देणारा. राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या पुढाकारातून हे रंगमंदिर शतकभरापूर्वी उभे राहिले. पॅलेस थिएटर नावाने त्या वेळी उभ्या राहिलेल्या नाट्यगृहाचे नाव १९५७ मध्ये केशवराव भोसले नाट्यगृह असे केले गेले. १९८४ मध्ये त्याचे नूतनीकरण झाले, तर नंतर २०१४ मध्ये फेरनूतनीकरण केले गेले. मात्र, गेली चार दशके या नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीवर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. ध्वनिव्यवस्थेतील त्रुटींपासून इतर काही समस्यांकडे लक्ष वेधूनही त्यावर काम झाले नाही. परवाच्या गुरुवारी रात्री लागलेली आग तर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लागल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर शहर, जिल्हा नागरिक कृती समितीने केला आहे. नाट्यगृह जळाल्यानंतर आता त्याच्या फेरउभारणीची खंडीभर आश्वासने दिली जात आहेत. मात्र, मुळात हे ऐतिहासिक नाट्यगृह जीव तोडून आपल्या जखमांवर इलाज करण्याचा टाहो फोडत होते, तेव्हा हे आश्वासनवीर कुठे होते, हा प्रश्न उरतोच. या आगीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या या प्रसिद्ध नाट्यगृहाच्या समस्यांची उजळणी होत असताना, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सांगली, कराड किंवा अन्य ज्या ज्या शहरांत असा सांस्कृतिक ठेवा आहे, त्याचीही आठवण या आश्वासनवीरांनी काढली तर बरी. प्रशासकीय अनास्थेचे दर्शन तेथेही निरंतर घडतेच आहे. त्यामुळे कोल्हापुरातील घटना ही केवळ एका नाट्यगृहाला लागलेली आग एवढ्याच मर्यादित चष्म्यातून बघून चालणार नाही. राज्यभरातच सुरू असलेल्या सांस्कृतिक ऱ्हासपर्वातील ती एक दुर्दैवी घटना ठरली आहे, हे समजून घ्यायला हवे. कारण, कलाकार-प्रेक्षकांचे भावनिक नाते असलेली वास्तू आगीत जळून भस्मसात होते, तेव्हा केवळ इमारत खाक होत नाही, तर मोठे सांस्कृतिक संचित बेचिराख होत असते. अर्थात, नाट्यगृह हे संस्कृतीचे केंद्र आहे याची जाणीव त्यासाठी असायला हवी.

loksatta editorial Attack of the Ukrainian army inside the territory of Russia
अग्रलेख: ‘घर में घुसके’…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!
Lokstta editorial Simon Biles Simon Biles Paris Olympics 2024
अग्रलेख:जुगाडांच्या पलीकडे…
Loksatta editorial Election commission declare assembly poll in Jammu Kashmir and Haryana
अग्रलेख: ‘नायब’ निवृत्तीचा निर्णय
sebi bans anil ambani from securities market
अग्रलेख : ‘अ’ ते ‘नी’!
Loksatta editorial on badlapur protest against school girl sexual abuse case
अग्रलेख: आत्ताच्या आत्ता…
Loksatta editorial National space day India Becomes 4th Country landed Successfully on Moon
अग्रलेख: नभाच्या पल्याडचे…

हेही वाचा >>> केशवराव भोसले नाट्यगृह आग: कारणे दाखवा नोटीस मिळालेले अधिकारी करणार आगीची चौकशी

तशी ती आहे, याची खात्री देणे सद्या काळात कठीण आणि नाट्यगृहांचा आब राखला जात नसल्याची उदाहरणे मुबलक. नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृहाची सध्या दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे तीन दशके सुरू असलेला वसंतराव देशपांडे संगीत महोत्सव यंदा रद्द करावा लागला. बरे, ही अशी दुरुस्ती वर्षानुवर्षे केली जाते. पण तसे करूनही प्रश्न कायम राहतात, ही खरी रड आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल तर अनेक कलाकार सातत्याने व्यक्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाची नाट्यगृहे खासगी नाट्यगृहांच्या तुलनेत स्वस्त असतात, त्याचे मुख्य कारण समाजाची सांस्कृतिक भूक भागवणे हे असते. ती भागवताना नाट्यगृहातील व्यवस्थांच्या पालन-पोषणाकडेही तितकेच लक्ष पुरविणे आवश्यक. यंत्रणा नेमूनही ते होत नाही, याचा सरळ अर्थ असा, की नाट्यगृहांच्या देखभाल-दुरुस्तीकडे नीट लक्ष देण्याची आस्थाच कोणत्याही पातळीवर नाही. मुंबई, ठाण्यातील नाट्यगृहे, सांगली, कराड, साताऱ्यातील रंगमंदिरे येथेही महापालिका किंवा नगरपालिका प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या रंगमंदिरांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच. अस्वच्छ स्वच्छतागृहे, रंगभूषेसाठी असलेल्या खोल्यांतले फुटलेले, अपारदर्शक आरसे, वेशभूषेसाठीच्या खोल्यांचीच मोडलेली दारे किंवा खिळखिळ्या झालेल्या कड्या, प्रेक्षागृहातील मोडक्या खुर्च्या, कायम ‘अंशत:’च सुरू असणारी वातानुकूलन यंत्रणा, नाट्यानुभव घेता घेता अचानक प्रेक्षकांच्या पायावर घरंगळणारे उंदीर हे महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचे सार्वत्रिक चित्र.

हेही वाचा >>> के. भो. नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मदत – हसन मुश्रीफ

कलाकारांच्या अभिव्यक्तीला योग्य स्थान आणि आश्रय देणारे द्रष्टे नेतृत्व महाराष्ट्रात एके काळी होते. सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची नाटके, संगीत कार्यक्रमांना हे नेते स्वत: हजेरी लावायचे. आता ते दिवस सरले. आता बरेचसे नेते डीजे लावलेल्या मिरवणुका आणि नाचांचे आश्रयदाते असतात. यावर कडी म्हणजे नाट्यगृहांचा राजकीय कार्यक्रमांसाठी होणारा वापर. हा तर एक गंभीरच विषय होत चालला आहे. राजकीय नेते-कार्यकर्त्यांची शिरजोरी अशी, की बराच काळ आधी रंगमंदिर आरक्षित केलेल्या एखाद्या संस्थेला, ते ‘आपल्या’ राजकीय कार्यक्रमासाठी आयत्या वेळी त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची ‘गळ’ घालू शकतात. ही ‘गळ’ म्हणजे कलाकारांसाठी ‘फास’ असतो, याबाबत आता ‘गळे’ काढले, तरी उपयोग होत नाही, अशी सद्या:स्थिती. यात कशी जोपासली जाणार संस्कृती? प्रशासन, राजकारण यांच्याकडे अंगुलिनिर्देश करताना जोडीने प्रेक्षक म्हणून समाजाची आणि कला-संस्कृतीला दिशा देणाऱ्या कलाकारांची जबाबदारीही विसरून चालणार नाही. प्रेक्षकांकडे मनोरंजनाचे बहुपडदा पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात त्याला नाट्यगृहाकडे खेचून आणणारा पर्याय देण्याचे मोठे आव्हान कलाकारांसमोर आहे. पुण्या-मुंबईत नाटकासारख्या कलाविष्कारात अनेक प्रयोग होतात, त्यासाठी त्यांना स्थान देणारी वेगवेगळी छोटी खासगी नाट्यगृहेही तयार झाली आहेत. मात्र, ते सर्वसमावेशक मंच आहेत का, हा प्रश्न. या दोन्ही शहरांत होणाऱ्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा पूरक वातावरणासाठी निश्चित उपयोगी असल्या, तरी त्यातून पुढे आलेले कलाकार या मंचांचा चित्रपट, मालिकांमध्ये पाऊल ठेवण्याची पायरी म्हणूनच उपयोग करतात का, हेही विचार करण्याजोगे. असे छोटे मंच प्रोत्साहनास पूरक असले, तरी त्यांची स्वतंत्र सांस्कृतिक बेटे निर्माण होण्याची शक्यता सर्वसमावेशकतेला आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या सांस्कृतिक उन्नयनाला पुरेशी पडत नाही, हे वास्तव आहे. इथे येणारा विशिष्ट वर्गातील प्रेक्षक इतर लोककलांकडे तुच्छतेने पाहत असेल, तर ती सांस्कृतिक वर्गवादाचीच खूण आहे. मुद्दा असा आहे, की छोट्या-मोठ्या कार्यशाळांपासून महोत्सवांपर्यंत कलाकार घडविण्याचे, त्यांना मंच देण्याचे भूत सगळ्यांवर इतके स्वार आहे, की रसिक घडविण्याची जबाबदारीच घ्यायला कुणी तयार नाही. अमुक एक नाटक, चित्र, शिल्प, गाणे यात काय चांगले, सकस आहे, याची प्रेक्षकांनाही किमान तोंडओळख व्हावी लागते. विनोदाने विसंगती न दाखविण्याचे गांभीर्य संपवले की त्या कृतीचे हसे होते, हे न समजणारा प्रेक्षक कोणत्याही ‘हवे’बरोबर वाहतो आणि अंतिमत: वाहवत जातो. आपली गत सध्या तशीच आहे. ढाकचिक ठेक्यांचे कर्णकर्कश संगीत कार्यक्रम ‘टीआरपीफुल’ आणि अमुकतमुक प्रस्तुत मनोरंजनाची ‘गॅरंटी’ देणारे ‘सांस्कृतिक महोत्सव’ही ‘हाउसफुल’. सांस्कृतिक महोत्सवांना एखाद्या ‘कन्झ्युमर ड्युरेबल’ वस्तूसारखी ‘गॅरंटी’ देण्यापर्यंत येणे हे कोणत्या रसिकतेचे लक्षण आहे? म्हणूनच संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या रात्री त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहाला लागलेली आग केवळ दैवदुर्विलास म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. ज्या संगीतसूर्याने मराठी संगीत नाटक आणि मराठी मने समृद्ध केली, त्याच्या नावाने असलेले रंगमंदिर आगीत खाक होते, तेव्हा तो व्यवस्थेचे अध:पतन झाल्याचा सांगावा असतो. तो कळला नाही, तर त्यातून भस्मसात होते ती सामाजिक सुसंस्कृतता.