झेमिन यांच्या काळातही पाश्चिमात्य नेते चीनकडे संशयाने पाहात, पण बाजारकेंद्री अर्थव्यवस्था सरकारी नियंत्रणातही फुलवता येते हे झेमिन यांनी दाखवून दिले.

चीनचे अध्यक्षपद प्रदीर्घकाळ भूषवलेल्या जियांग झेमिन यांचे नुकतेच ९६ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी सोव्हिएत महासंघाचे माजी अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह निवर्तले, ९० व्या वर्षी. निव्वळ वयाचा विचार केल्यास दोघांचेही मृत्यू म्हणजे युगसमाप्तीच. परंतु दोघांचीही कारकीर्द अधिक लक्षात राहील, ती युगपरिवर्तनाचे साक्षीदार आणि सहभागीदार म्हणून. दोघेही सर्वगुणसंपन्न अजिबातच नव्हते. परंतु परिवर्तनाची आवश्यकता का असते आणि तसे घडू देण्यातच वैयक्तिक, संकुचित स्वार्थापलीकडे वैश्विक प्रतलातले सामूहिक हित कसे साधले जाऊ शकते, नव्हे, ते साधले गेलेच पाहिजे याचे किमान भान या दोघांकडे होते. दोघांना मिळालेले यश सारखे नव्हते. गोर्बाचेव्ह यांच्या पश्चातला रशिया अधिक विस्कटण्याच्या मार्गावर आहे. झेमिन यांच्या पश्चातला चीन तुलनेने अधिक समृद्ध, स्थिर बनला. परंतु आज या दोन्ही देशांचे सत्ताधीश जगाला अधिक अस्थिर, असुरक्षित बनवायला निघाले आहेत. व्लादिमिर पुतिन आणि क्षी जिनपिंग यांच्यामुळे सध्याच्या जगाला जितका धोका आहे, तितका तो बहुधा करोनासारख्या महासाथी आणि वातावरण बदलामुळेही उद्भवत नसेल! रशिया खरे तर पृथ्वीतलावरील मोजक्या खनिजसंपन्न देशांपैकी एक. परंतु गोर्बाचेव्ह यांच्यासारख्याकडून मिळालेला लोकशाहीचा आणि नैसर्गिक समृद्धीचा वारसा जपण्याची परिपक्वता पुतिन यांच्यात अजिबात दिसत नाही. चीनला जागतिक व्यापारप्रवाहाशी जोडले झेमिन यांनी. यातूनच चीन हे उत्पादन आणि संपत्तीनिर्मितीचे मोठे केंद्र बनले. परंतु झेमिन यांचा हा वैश्विक दृष्टिकोन जिनपिंग यांच्या ठायी नसावा, हा संशय आता खरा ठरू लागलेला दिसतो. भ्रष्ट साम्यवाद झुगारून देणारा लोकशाही पाया गोर्बाचेव्ह यांच्या परिवर्तन आणि खुलेपणाच्या धोरणांनी रचला. पुतिन यांनी त्याच्या गाभ्यालाच धक्का पोहोचवला. स्पर्धाभिमुख व्यापारी धोरणाच्या प्रवाहात झेमिन यांनी चीनला आणले. जिनपिंग यांचा चीन हा बाजार अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यात अधिक भांडखोर, बचाववादी आणि संकुचित बनलेला दिसून येतो. थोडक्यात दोघांनीही वारशातून मिळालेली चौकट उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधलेला दिसतो. पण यातून निर्माण झालेली गुंतागुंत सोडवण्याची क्षमता दोन्ही नेत्यांमध्ये नाही, कारण दृष्टिकोनाचा अभाव! या अभावाचा उद्भव आत्मकेंद्री वृत्तीत आणि तारणहार मानसिकतेत असतो.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
serious allegations against boeing
अन्वयार्थ : बडयांवर बडग्याची बाजारकेंद्री ‘संस्कृती’
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

१९८९ मध्ये बीजिंगमधील थीआनंमेन चौकातले लोकशाहीवादी आंदोलन दडपल्यानंतर लगेचच तत्कालीन सर्वोच्च नेते डंग क्षीयाओ पिंग यांनी झेमिन यांना कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमले. चीनच्या अध्यक्षपदाच्या दिशेने त्यांची ही पहिली पायरी. खरे म्हणजे त्या वेळच्या कम्युनिस्ट नेत्यांच्या मांदियाळीत जियांग झेमिन म्हणजे तुलनेने विजोड व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कुटुंबातील कुणीही राजकीय वा सामाजिक क्षेत्रात सक्रिय नव्हते. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान झेमिन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बनले. पुढे मॉस्कोत एका मोटार कारखान्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि नंतर रुमेनियाच्या दूतावासात काम केल्यानंतर ते परतले. त्यांची उच्चशिक्षणाची पार्श्वभूमी पाहून तत्कालीन कम्युनिस्ट सरकारने त्यांना इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे मंत्री केले. नंतर शांघायमध्ये कम्युनिस्ट पक्षाची धुरा सांभाळताना ते महापौरही बनले. त्यांचा कम्युनिस्ट नेतृत्ववृंदामध्ये प्रवेश होण्यास थीआनंमेन  आंदोलन कारणीभूत ठरले. विद्यार्थ्यांच्या रोषाचा बंदोबस्त कसा करायचा, असा प्रश्न डंग क्षीयाओ पिंग यांना पडला होता. त्या वेळी त्यांच्या नजरेसमोर जियांग झेमिन हेच नाव आले. झेमिन यांनी शांघायमध्ये विद्यार्थ्यांचे एक आंदोलन हाताळले होते. विरोध करणाऱ्यांना त्यांनी सांगितले होते, लोकशाही आणि मानवी हक्क या सापेक्ष संकल्पना असून, त्या अनिर्बंध आणि सरसकट असत नाहीत! बीजिंगमधील त्या काळाच्या कम्युनिस्ट नेत्यांपेक्षा डंग क्षीयाओ पिंग  यांना झेमिन हे आपले उत्तराधिकारी म्हणून योग्य वाटले असतील किंवा झेमिन यांची थेट संवादाची शैली त्यांना भावली असेल. विद्यार्थ्यांशी प्रसंगी इंग्रजीतून संवाद साधणाऱ्या या नेत्याला डंग क्षीयाओ पिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस नेमले. पुढे १९९३ मध्ये झेमिन चीनचे अध्यक्ष बनले, त्याच्या थोडे आधी चीनच्या लष्करी मंडळाचे अध्यक्ष.

ही पार्श्वभूमी मांडावी लागते, याचे कारण चीनमध्ये सध्या तेथील राजवटीविरुद्ध, विशेषत: जवळपास जुलमी ठरलेल्या कोविड टाळेबंदीविरुद्ध विविध शहरांमध्ये जी आंदोलने सुरू आहेत, त्यातून झेमिन युगाचा उल्लेख सुवर्णयुग असा होत असून, त्यामुळे ते कोणी लोकशाहीवादी, लोकशाहीप्रेमी कम्युनिस्ट नेते वगैरे होते, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. तसे ते नव्हते. त्यांच्या प्रदीर्घ अध्यक्षीय कारकीर्दीत (१९९३ ते २००३) चीन पाश्चिमात्य देश आणि जागतिक बाजार व्यवस्थेशी जोडला गेला. परंतु या बाजारस्नेही सुधारणा मुळात डंग क्षीयाओ पिंग यांनी चीनमध्ये जन्माला घातल्या. जियांग झेमिन यांनी त्या रुजवल्या, इतकेच. मग झेमिन यांची लोकप्रियता, विशेषत: आजच्या चीनमधील अनेक आंदोलक शहरांमध्ये वाढीस लागण्याचे कारण काय? विशेषत: तरुण वर्गात, ज्यांच्यापैकी बहुतेक १९८९ च्या आसपास जन्मलेही नव्हते, त्यांना का भावले झेमिन आजोबा? याचे उत्तर कदाचित त्यांच्या सध्याच्या मानसिक स्थितीत मिळू शकते. झेमिन यांचा चीन आणि जिनपिंग यांचा चीन यांच्यात कॅलेंडरवर फरक जेमतेम दहाएक वर्षांचा असेल. पण देशांतर्गत स्थितीमध्ये ही तफावत अधिक भासणारी आहे. जिनपिंग यांच्यासमोर आदर्श माओ त्सेतुंग यांचा. चीनला जुने वैभव मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध. जुने वैभव प्राप्त करणे म्हणजे चीनला अधिक बंदिस्त, युद्धखोर बनवणे असा जिनपिंग यांचा समज असावा. जियांग झेमिन यांच्या काळातही पाश्चिमात्य नेते चीनकडे संशयाने पाहातच होते की. पण बाजारकेंद्री अर्थव्यवस्था सरकारी नियंत्रणातही फुलवता येते हे झेमिन यांनी दाखवून दिले. चीनने जागतिक व्यापार संघटनेशी करार केला, तो त्यांच्याच कार्यकाळात. कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य म्हणून उद्योजक आणि उद्योगपतींना कवाडे खुली झाली, तीदेखील त्यांच्याच कार्यकाळात. बिल क्लिंटन, जॉर्ज बुश धाकटे यांच्याशी त्यांनी वैयक्तिक मैत्रीबंध प्रस्थापित केले. हाँगकाँगचा ताबा घेताना त्यांनी ब्रिटिश प्रतिनिधींसमोर चिनी वर्चस्ववाद उगाळला नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी दहशतवादविरोधी आघाडीत अमेरिकेची साथ देत असल्याचे घोषित केले. यात आपला फायदा आहे का हे पाहून, आणि तो नसल्यास निराळी भूमिका घेण्याचा कोडगेपणा त्यांच्या ठायी नव्हता. तरीही सर्वसामान्यांमध्ये ते लोकप्रिय होण्याची आणखीही कारणे होती. हल्लीच्या चिनी नेतृत्वाप्रमाणे ते कर्तव्यकर्कश नव्हते. मैत्रीचा ओलावा त्यांच्या ठायी होता. साहित्य आणि संगीत या व्यक्तिमत्त्व पुलकित करणाऱ्या बाबी आहेत. प्रत्येकाने त्या आस्वादल्याच पाहिजेत, असे जाहीरपणे सांगणाऱ्या दुर्मीळ चिनी नेत्यांपैकी ते एक. मोठमोठय़ा परिषदांमध्ये एल्विसची गाणी म्हणण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. पुन्हा हे सगळे सुरू असताना त्यांच्या कार्यकाळाच्या उत्तरार्धात आणि नंतरही काही काळ चिनी अर्थव्यवस्था दुहेरी अंकवाढीने दौडत होती. आज ती कुंथलेली दिसते. तेथील उद्यमशीलता आचके देते आहे. बहुतेक प्रमुख देशांशी त्यांचे संबंध ताणलेले आहेत. सर्वशक्तिमान नेत्याला अणूभर विषाणूने जर्जर केले आहे. त्यामुळे देशाबाहेर पाठिंबा नाही आणि देशांतर्गत प्रेम नाही अशी स्थिती. चीनची कवाडे उघडणारे झेमिन, चीनचा कोंडवाडा करून सोडलेल्या जिनपिंग यांच्यापेक्षा मरणोप्रांतही तेथील जनतेला देवदूतासमान वाटू लागतात, यात नवल ते काय?