वेगळे पाहण्यासाठी जितके धाडस लागते, त्याच्या कित्येक पट धाडस ते सादर करण्यासाठी लागते. गोदार यांनी ते दाखवले, पण मिरवले नाही ही त्यांची महती!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्याँ-लुक गोदार या फ्रेंच दिग्दर्शकाचे मोठेपण सध्याच्या पिढीला फारसे माहीत असण्याचे तसे काही प्रयोजन नाही. कारण ‘ओटीटी’ प्रसारामुळे, गोदार यांनी सहा दशकांपूर्वी मांडले तसे प्रवाहापेक्षा वेगळे आणि कमीअधिक तऱ्हेवाईक, धक्कादायक सिनेमे बघण्यास ही पिढी पुरेशी सरावलेली आहे. हे सरावणे कल्पनेतही नव्हते त्या काळात, म्हणजे सिनेमाविश्वात ज्याला फ्रेंच नवप्रवाह किंवा न्यू वेव्ह असे मानले गेले, त्या चित्रक्रांतीच्या ऐन भरात ज्याँ-लुक गोदार यांनी एकाहून एक वेगळे, पूर्णपणे भिन्न धाटणी आणि हाताळणीचे सिनेमे सादर केले. १९६०चे ते दशक मुळातच प्रयोगशीलतेचे होते आणि कोणत्याही क्षेत्राप्रमाणे चित्रपटांच्या क्षेत्रातही प्रयोगशीलतेचे झालेले आद्यस्वागत गोदार यांच्याही वाटणीला आले. तरीही त्यांचा अवलिया किंवा क्रांतिकारक असा उल्लेख त्या प्रयोगपर्वानंतरही केला जातो, त्याचे कारण काय असावे? आपल्या सत्यजित राय यांच्यापासून ते पलीकडले मार्टिन स्कोर्सेसी, क्वेंटिन टॅरेंटिनो अशी अनेकविध पार्श्वभूमी असलेले दिग्दर्शक त्यांच्या चित्रकृतींनी प्रभावित कसे झाले? या प्रश्नांची उत्तरे गोदार यांच्या अनेक चित्रपटांसारखीच गुंतागुंतीची आहेत. दिग्दर्शकांचे एक वेळ सोडा. कारण गोदार यांच्यावर टीका करणाऱ्या प्रतिभावान दिग्दर्शकांची संख्याही खंडीभर आहे. परंतु रसास्वादक आणि चित्रपट महोत्सवी समुदायांपलीकडे असंख्यांनी त्यांच्या सिनेमांमधून ‘काही तरी वेगळे’ पाहायला मिळाल्याची कबुली अनेकदा दिली. वेगळे पाहण्यासाठी जितके धाडस लागते, त्याच्या कित्येक पट धाडस ते सादर करण्यासाठी लागते. गोदार यांनी ते दाखवले, पण मिरवले नाही ही त्यांची महती! सिनेमा या संकल्पनेचे त्यांच्यावर गारूड होते आणि त्यातूनच त्यांनी नेहमीच्या धाटणीपलीकडे सिनेमे बनवले आणि प्रस्थापित चौकटी मोडल्या. पण तरी चित्रपट व्यवसायाची मक्का मानल्या गेलेल्या हॉलीवूडची त्यांनी कधी निर्भर्त्सना केली नाही. उलट हॉलीवूडमधील चित्रपटांविषयी त्यांना प्रेमच होते. सिनेमानिर्मितीची परिभाषा त्यांनी क्रांती करण्याच्या उद्देशातून बदलली नाही, ते सहजप्रवृत्तीतून घडून आले. यापेक्षा वेगळय़ा पद्धतीने ते सिनेमे बनवूच शकले नसते, हे त्यांच्या सबंध कारकीर्दीचा अभ्यास करता आढळून येईल. त्यांच्या बहुतेक सर्व सिनेमांप्रमाणे गोदार यांची कारकीर्दही अद्भुत आणि धक्क्यांनी भरलेली आहे. त्या कारकीर्दीचा साक्षेपी धांडोळा घेण्याचा प्रस्तुत संपादकीयाचा उद्देश नाही. ज्याँ-लुक गोदार प्रत्येकाला कसे भावले वा आकळले हा सर्वस्वी व्यक्तिनिष्ठ मुद्दा ठरतो. सिनेमा बनवण्याचे, मांडण्याचे, दाखवण्याचे आणि आस्वादण्याचे साचे त्यांनी विशेषत: ६०च्या दशकात ज्या प्रकारे मोडून काढले ते मात्र नक्कीच उल्लेखनीय आणि अभ्यासनीय ठरते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on french director jean luc godard zws
First published on: 15-09-2022 at 03:31 IST