…हे वास्तव फक्त अशा छटाकभर गुन्ह्यांपुरतेच मर्यादित राहते तरच नवल…
आपल्या प्राचीन इत्यादी संस्कृतीत मोठेपण फार म्हणजे फारच महत्त्वाचे. आपली प्राचीन महाकाव्ये पाहा. उदाहरणार्थ रामायण आणि महाभारत. तीर्थरूप दशरथांसाठी ज्येष्ठ पुत्र कोदंडधारी रामचंद्र वनवासात जातात हे कवतिक खरेच. पण त्यांच्याइतकाच त्याग करतात ते लक्ष्मण, भरत इतकेच काय पण उर्मिलाही. पण कवतिकाच्या काव्यगाथा युगानुयुगे लिहिल्या जात आहेत त्या प्रभू रामचंद्रासाठी. धाकटे लक्ष्मण वा भरत इतके बिचारे की त्यांचे गुणगौरव गाणारी एखादी तरी आरती लिहावी असे काही कोण्या कवीस वाटले नाही. अलीकडे स्त्रीमुक्ती आदी चळवळींतून आलेल्या जागृतीमुळे उर्मिलेच्या दु:खास तरी वाचा फुटली. अन्यथा तीही तशीच पती वा धाकट्या दिराप्रमाणे उपेक्षित राहिली असती. रामायणानंतर महर्षी व्यासांच्या महाभारतातही तसेच. सर्व इतिहास हा थोरल्यांचा. पांडवांत युधिष्ठिर थोरला. सर्व काही पणास लावतो आणि भिकेस लागतो. पण तरी त्याचा काही कोणी उद्धार करत नाही. वास्तविक त्याने केले ते धाकट्याने केले असते तर त्यास महर्षी व्यासांपासून ते स्वहर्षी कवीपर्यंत सर्व जण फोडून काढते. पण युधिष्ठिराबाबत ब्र देखील कोणी काढत नाही. उलट त्याचा गौरव. धर्म म्हणून. म्हणजे थोरल्याने काहीही कसेही केले की धर्म आणि धाकट्याने काहीही चांगले केले तरी ते कर्म. पलीकडील बाजूस असलेल्या कौरवांतही तसेच. सुष्टांतच फक्त थोरल्याचे गुणगान गाइले जाते असे नव्हे. तर दुष्टही तेच करतात. सर्व माप पदरात पडते ते दुर्योधनाच्या. दु:शासन धाकटा. अर्थात त्याचे नाव तरी अनेकांस ठावकी असते. पण त्याच्या पाठीवरील अन्य ९८ धाकट्यांचा नामोल्लेखही नाही. नुसतीच कौरवांत गणना. याचा अर्थ तीर्थरूप कर्तृत्ववान असोत वा नसोत. सुष्ट असोत वा दुष्ट. त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकही पुण्याईचा मोठा वाटा पडतो तो मोठ्याच्या ताटात. धाकला बिचारा आशेने पाहात राहातो. महत्त्व असते ते थोरल्याचे. थोरलेपणाचे.
समाजरचनेची उतरंड बांधून देणारे दुसरे मनु यापेक्षा वेगळे काय करतात? ते मानव समूहांचाही वेगळेपणा आखून देतात. ब्रह्म जाणू शकतात ते पहिले. म्हणजे थोरले. त्यांच्या पाठीवर व्यापार-उदिमाचे वैश्य कर्म करणारे. या दोहोंस विनासायास आपापली कर्मे पार पाडता यावीत, कर्तव्यांस जागता यावे यासाठी आपल्या बाहुबलाने सीमांचे रक्षण करणारे तिसरे आणि उर्वरित पडेल ती कामे करणारे चौथ्या क्रमांकावर. सर्व काही सामाजिक कौतुक हे थोरलेपण मिरवणाऱ्या पहिल्या क्रमांकावरील जनसमुदायाचे. त्या समुदायात जन्मास आलेला प्रत्यक्षात मूर्खशिरोमणी जरी असला तरीही तो बह्म जाणणारा आहे असे सर्वांनी मानावयाचे आणि त्याप्रमाणे त्या थोरल्याचे यथासांग मानपान करावयाचे हा नियम अगदी अलीकडेपर्यंत पाळला जात होता. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकरादी बंडखोरांनी ही उदात्त परंपरा खंडित केली नसती तर तो विनाखंड अजूनही पाळला गेला असता. या अशांमुळे या यमनियमांचे पाळणे कागदोपत्री का असेना बंद झाले. अर्थात उत्तरेतील देवभूमी प्रांतात ब्रह्म जाणणाऱ्यांचे थोरलेपण अजूनही मानले जाते, असे समाजाभ्यासक म्हणतात. असेलही. आणि ते तसे पाळले जाणे आणि त्या प्रदेशास देवभूमी असे संबोधले जाणे यांचा संबंध नसेलही. मुद्दा तो नाही. वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर थोरल्यास सर्व काही मान देण्याचा प्रघात समाजातही कसा रुजतो, हा मुद्दा आहे. हे वास्तव आहे.
ते दाखवून देणारा दुसरा घटक म्हणजे आपल्याकडे अलीकडेपर्यंत स्त्रियांचे जगणे. थोरलेपणा हा पुल्लिंगी. याचा अर्थ या पुल्लिंगांस जितका मान, तितका स्त्रीलिंगी थोरलीस नाही. म्हणजे तीर्थरूपांची परंपरा- उज्ज्वल असो वा दरिद्री- पुढे चालवण्याचा मान हा फक्त आणि फक्त पुल्लिंगी थोरल्याचाच. कुटुंबात थोरल्याच्या ऐवजी थोरली असेल तर तिला वगळून थोरलेपण हे तिच्यानंतरच्या धाकट्याकडे येते आणि हा पुल्लिंगी धाकटा मग थोरला मानला जाऊ लागतो. घरातही मान थोरल्याच्या पत्नीस. धाकट्याची अर्धांगी कितीही कर्तृत्ववान असो. कौतुकाच्या खणानारळाची ओटी भरली जाते ती थोरल्याच्या कुटुंबाची. हे झाले सामाजिक. आर्थिक आघाडीवरही तेच. वडिलांनी कायदेशीर/ बेकायदा मार्गांनी कमावलेला लक्ष्मीचा सिंहाचा वाटा थोरल्याकडे. वडिलांचे नाव लावणार थोरला. वडिलांचा भला/ बुरा वारसा पुढे नेण्याचा मान फक्त थोरल्याचा. या भूतलाचा निरोप घेण्याआधी त्यांनी अगदी कागदोपत्री वाटणी केलेली असली तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या वारशाचे नैतिक नाव चालवतो तो थोरला. हे असे जर प्रत्येक आघाडीवर असेल तर समाजाचे प्रतिबिंब असलेल्या राजकारणात तरी यापेक्षा वेगळे काय होणार? वडिलांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष यशस्वी असला तर चर्चेची गरजच नाही. त्यांच्या पश्चात या राजकीय पक्षाचे नेतृत्व करणार तो थोरला. कर्तृत्व गाजवण्याची, सिद्ध करण्याची संधी धाकट्यास मिळणे नाही. धाकटा कायम दुय्यम. हे दुय्यमत्व नाकारणारे मग घराबाहेर पडतात आणि दुसरा स्वत:चा वेगळा पक्ष काढतात. राजकीय पक्ष, त्याची मालमत्ता हे तर सर्व भौतिक. पण शारीर राजकारणात, उद्याोगांत जे आहे त्यापेक्षा वेगळे काही अशारीर आध्यात्मिकतेचा दावा करणाऱ्या धर्मात कसे बरे असेल? पाहा : कित्येक यशस्वी बाबा/ बापू यांची उदात्त परंपरा अलगदपणे त्यांचे थोरले चिरंजीव कशी पुढे नेतात; ते. या यशस्वी बाबा/ बापूंचा पट्टशिष्य भले कितीही उद्याचा बाबा/ बापू होण्याच्या क्षमतेचा असो. पण महाराजांचा वारसा चालवणार तो त्यांचा थोरला. धाकटा असलाच तर त्याला फार फार तर कार्यालयीन व्यवस्थापन, हिशेब तपासणी इत्यादी इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळेल. पण वारसा चालवण्याचा हक्क फक्त आणि फक्त थोरल्याकडेच.
कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकही आघाडीवर जे असते तेच या सर्वांचे नियमन करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतही अवतरते. त्यामुळे आपल्याकडे कायद्याचा दंडुका उगारला जाणार तो फक्त समाज उतरंडीतील धाकुट्यांवर. या वास्तवाची पडताळणी करावयाची असेल तर कोणत्याही शहरातील, कोणत्याही चौकात पाहा. कायद्याचे रक्षण करण्याच्या पहिल्या फळीतील शिलेदार, ज्यास पोलीस हवालदार असे संबोधले जाते, त्याचे वर्तन पाहावे. वाहतूक नियमाचा भंग त्याच्या नाकाखाली एखाद्या मर्सिडीजमार्गीय धनाढ्याने केला आणि तोच नियमभंग दुचाकीस्वाराने केला तर नियमाचा वरवंटा कानाखाली उमटतो तो सामाजिक उतरंडीतील धाकट्या दुचाकीस्वाराच्या. मर्सिडीजमार्गीय धनाढ्य आपल्या सामाजिक थोरलेपणाचा तोरा मिरवत सहज कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकतो. हे वास्तव फक्त अशा छटाकभर गुन्ह्यांपुरतेच मर्यादित राहते तरच नवल. कोठे चोरी झाली, डांबून टाका सामाजिक पातळीवर कायम धाकट्या राहिलेल्या पारधी समाजातील कोणास! मग त्याचा संबंध या गुन्ह्याशी असो वा नसो. त्यापेक्षा अधिक काही गंभीर गुन्हा घडला? बेड्या ठोका सामाजिक उतरंडीतील अन्य कोणा धाकट्या अल्पसंख्यीयास. असो. असे अन्य काही मुद्देही नमूद करता येतील. त्या सगळ्यांचा अर्थ एक आणि एकच :
नकुटे व्हावे; परी धाकुटे न व्हावे! (किंवा इतिहास हा थोरल्यांचा असतो. धाकट्यांनी फडताळावरील डबे-बरण्या काढण्याची कामे करावीत, हे बरे)
तळटिपेचा प्रश्न : वरील मजकुराचा संबंध काही आर्थिक/ राजकीय/ प्रशासकीय कारवाईशी जोडावा असे कोणा अल्पमतीस वाटले तर काय करावे? हा प्रश्न त्याने कोणा थोरल्यास पुसावा! थोरलेपणात सुरक्षितपणाची हमी असते हे याउप्परही सांगावे न लगे.
