आपण स्वयंभू, सर्वसिद्ध – पण अजिंक्य मात्र ठरत नाही; ही समस्याच.. हे मान्य करण्यासाठी लागणारा मोठेपणा विद्यमान भारतीय क्रिकेट व्यवस्था चालवणाऱ्यांमध्ये आहे?

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल ऑस्ट्रेलियासाठी एका अर्थी अपेक्षित आणि आपल्यासाठी अनेकार्थी अनपेक्षित म्हणावा लागेल. सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरीत दिमाखात दाखल झालेला भारतीय संघ विरुद्ध अडखळत्या सुरुवातीनंतर प्रत्येक सामन्यागणिक आपली कामगिरी उंचावत नेणारा ऑस्ट्रेलियन संघ यांच्यातील लढत एकतर्फी होईल असे अनेकांनी गृहीत धरले. दुर्दैवाने या अनेकांत आयुष्यात कोणत्याही खेळाशी आणि खिलाडूवृत्तीशी संबंध नसलेल्यांचेच प्राधान्य अधिक. त्यामुळे सामना सुरू होण्याआधीपासूनच या मंडळींनी वाजंत्रीवाल्यास ‘वाजवा रे वाजवा’ म्हणायचे तेवढे बाकी ठेवले होते. परंतु क्रीडा सामन्यांत सगळय़ाच बाबी अद्याप ‘मॅनेज’ करता येत नाहीत. त्यामुळे गुणवान ऑस्ट्रेलियाने संस्मरणीय विजय मिळवला. खरे तर आधीच्या सर्व विश्वचषक स्पर्धातील भारतीय संघांच्या तुलनेत आताचा आपला संघ सर्वोत्तम होता. तर याआधी विश्वचषक जिंकलेल्या सर्व ऑस्ट्रेलियन संघांच्या तुलनेत विद्यमान संघ नि:संशय कमकुवत होता. तरीही अंतिम फेरीत हा संघ सहजपणे खेळला आणि भारतीय संघ मात्र अडखळला. हे कसे? नशिबाचा फेरा एखादे दिवशी उलटा पडू शकतो असा बचाव काही जणांकडून सुरू आहे. पण नशिबाचा फेरा एखाद्या संघाला सहा-सहा विश्वविजेतेपदे देऊ शकत नाही आणि तोच नशिबाचा फेरा दुसऱ्या एका संघाच्या झोळीत सातत्याने मोक्याच्या सामन्यांमध्ये पराभव टाकत नाही. ‘हा तर खेळ, त्यात हार-जीत होणारच’ अशी शहाजोग मल्लिनाथीही काही करताना दिसतात. त्यात अर्थ नाही. कारण निकाल उलटा लागला असता तर देशभरातील विजयोत्सवात खेळापेक्षा राजकीय प्रदर्शनच अधिक दिसले असते. भारतीय संघ सर्वच्या सर्व सामने मोठय़ा फरकाने जिंकला; पण अंतिम फेरीत हरला. केवळ तेवढया मुळे भारतीय संघास कमी लेखता येणार नाही, असेही एक मत. त्यात काही प्रमाणात तथ्य निश्चित आहे. काही प्रमाणात म्हणायचे कारण महत्त्वाच्या अंतिम सामन्यातच आपले कर्तृत्व बसकण मारते; हे कसे? सध्याचे वातावरण करकरीत चिकित्सेचे नाही. त्याकडे दुर्लक्ष करून  काही बाबी स्पष्ट करणे आवश्यक.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>> अग्रलेख : हे राज्य पेटावे ही यांची इच्छा?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या २०१७ पासूनच्या स्पर्धाचा विचार करता भारतीय संघ चार अंतिम सामन्यांमध्ये पराभूत झाला. तेही एकतर्फी. हे सर्व सामने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील आहेत. ‘ट्वेन्टी-२०’ या प्रकारात आपण पहिलेवहिले विश्वविजेतेपद २००७ मध्ये पटकावले. नंतर २००८ पासून ‘आयपीएल’ पर्व सुरू झाले. ‘ट्वेन्टी-२०’ प्रकारातील ही सर्वाधिक श्रीमंत स्पर्धा. इतके असूनही ‘ट्वेन्टी-२०’ स्पर्धामध्ये अलीकडच्या काळातली स्थिती काय सांगते? २०१४ पासून आपण तीन ‘ट्वेन्टी-२०’ विश्वचषक स्पर्धाच्या अंतिम किंवा उपान्त्य सामन्यांत खेळलो आणि तिन्ही वेळा हरलो. एका स्पर्धेत तर तितकीही मजल मारता आली नाही. म्हणजे २०१३ मध्ये चॅम्पियन्स स्पर्धा जिंकल्यानंतर सात स्पर्धामध्ये आपण उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत जाऊन चषक मात्र जिंकू शकलो नाही. हे अपयशी सातत्य तिन्ही प्रकारांमध्ये दिसून येते. असे का होते? या समस्येची उकल करायची असेल तर प्रथम ‘समस्या आहे’ हे मान्य करणे आणि तिच्या निराकरणासाठी उपायप्रणाली निर्धारित करणे! भारतीय क्रिकेटच्या बाबतीत हे होताना दिसत नाही आणि नजीकच्या भविष्यात तसे काही होण्याची चिन्हे नाहीत. कारण आपण स्वयंभू, सर्वसिद्ध असल्यामुळे, प्रत्येक स्पर्धेत गाजावाजा करून उतरतो, पण अजिंक्य मात्र ठरत नाही. कोणी मान्य करो वा न करो, पण ही समस्याच! एखाद्या चिकट व्याधीसारखी ती वारंवार डोके काढते. हे मान्य करण्यासाठी लागणारा मोठेपणा विद्यमान भारतीय क्रिकेट व्यवस्था चालवणाऱ्यांमध्ये आहे, याचा पुरावा अद्याप तरी सापडलेला नाही.

येथे आणखी एक युक्तिवाद केला जातो, त्याचाही समाचार घेणे आवश्यक ठरते.  ‘‘आपण जिंकत नसूही; पण बहुतेकदा शिखरासमीप तर जातो ना! हे सातत्य नव्हे काय?’’ हा युक्तिवाद योग्य. सातत्य आहेच. पण कोणत्या परिप्रेक्ष्यात? क्रिकेट हा खेळ म्हणजे निखळ खेळांच्या दुनियेत जेमतेम दहा-वीस संघांचे टिकलीएवढे तळे. तो काही फुटबॉलसारखा दोनेकशे संघांचा महासागर नाही. या खेळातील ७० टक्के उत्पन्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडे येते. तितक्याच प्रमाणात जगातील एकूण प्रेक्षकवर्गही भारतीयच. त्याच प्रमाणात भारतीय खेळाडूंची संख्या. इतके प्रभावी अस्तित्व असलेल्या देशाच्या क्रिकेट संघाकडून प्रत्यक्ष मैदानात तशाच स्वरूपाच्या प्रभावी कामगिरीची अपेक्षा करणे गैर नाही. भारतीय क्रिकेट इतर प्रस्थापित संघांच्या तुलनेत थोडे उशिराने परिपक्व झाले, तेव्हा इतिहासाचे थोडे सोडून देऊ. पण अलीकडच्या काळाचे काय? उदंड पैसा, प्रेक्षक, सुविधा असलेल्या देशाने जिंकलेले चषक पाचसुद्धा नाहीत हे कसे? अलीकडे अनेक बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू भारताचे आधीचे विक्रम मोडीत काढत विक्रमी संख्येने पदके जिंकू लागले आहेत. ही कामगिरी म्हणजे नवोन्मेषी भारताचे प्रतीक असल्याचे पंतप्रधान सांगतात. ते रास्तच. एकीकडे क्रिकेटेतर खेळांमध्ये तितक्या प्रमाणात सुविधा व पाठबळ नसतानाही खेळाडू करीत असलेली कामगिरी देशासाठी अभिमानास्पद ठरते आणि प्रचंड पाठबळ, मनुष्यबळ, धनबळ असूनही भारतीय क्रिकेट संघाची सततची अपयशी कामगिरी क्लेशास्पद आणि प्रसंगी हास्यास्पद ठरते.

हेही वाचा >>> अग्रलेख : विक्रमी विराटचे वैश्विकत्व!

आता थोडे गुजरातमध्येच अंतिम सामना खेळवण्याविषयी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद एकल देशाकडे तब्बल ४० वर्षांनी चालून आले होते. भारतीय क्रिकेटची श्रीमंती आणि ताकद दाखवण्याची संधी देशातील क्रिकेट सत्ताधीशांना होती. अशा वेळी मुंबई, कोलकाता, चेन्नई या पारंपरिक क्रिकेट नगरींना डावलून अहमदाबाद या कोणतीही, कसलीही उज्ज्वल क्रिकेट वा खेळ परंपरा नसलेल्या शहरात अंतिम सामना खेळवण्यात आला. त्याचे कारण उघड आहेच. साखळी टप्प्यात चंडीगड आणि नागपूर या महत्त्वाच्या केंद्रांऐवजी धरमशाला आणि लखनऊ या नवथर केंद्रांना निवडले गेले. त्यामागील कारणही पुरेसे स्पष्ट आहे. अहमदाबाद या शहराला क्रिकेट आस्वादण्याची परंपरा नाही. तेथे क्रिकेट सामन्यांचे असे इव्हेंटीकरण झाले की जणू गरबा महोत्सवच! त्यात क्रिकेटच्या मैदानावर देशाची लष्करी ताकद दाखवण्यासाठी लढाऊ विमानांची उड्डाणे हा तर बावळटपणाचा कहरच. मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांचे मोठेपण प्रतिस्पर्धी संघांतील खेळाडूंना साक्षेपी आणि मुक्तकंठे दाद देणाऱ्या सुजाण प्रेक्षकांमध्ये आहे. त्या तुलनेत पाकिस्तानचा सामना असो वा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना असो, प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कौतुक करायचे असते याची जाणीव अहमदाबादेतील प्रेक्षकांस नव्हती. आणि असल्या आस्वादशून्य, गल्लाभरू, मद्दड प्रेक्षकांमुळे यजमान देशाचीही शोभा होते, हे संयोजकांच्या गावी नव्हते! अन्यत्रही आपल्या प्रेक्षकांच्या एका गटाचे वर्तन शिसारी आणणारे होते. खिलाडूवृत्तीशी जन्मोजन्मी संबंध न आल्याचे दाखवून देणारा उन्माद, देशातील तृतीयपर्णीय नटवे, सरकारी कृपाप्रसादाच्या प्रतीक्षेतील उद्योगपती यांचे विश्वचषक विजयाचे अकारण दावे आणि हे सगळे जणू आमच्यामुळेच घडते आहे असे दाखवत मिरवणारे राजकारणी इत्यादी आपण क्रीडासंस्कृती निर्मितीच्या किती पायथ्याशी आहोत हे दाखवतात. त्यात खेळाडूचा धर्म काढणे हा तर अक्षम्य अपराध! आपल्या या उन्मादी उच्छृंखलपणामुळे खेळाडूंवर अकारण दबाव येतो, मैदानावर उत्तम कामगिरी करणे हे(च) त्यांचे लक्ष्य असायला हवे आणि आपल्या देशप्रेमाच्या गरजा पुरवणे ही त्यांची जबाबदारी नाही याची जाणीवच नाही. ती या पराभवामुळे तरी होईल ही आशा. ती नसल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील निकाल हा पिचक्या वृत्तीच्या प्रेक्षकांचा पराभव ठरतो. खेळाडू दर्जेदार, सुविधा उत्तम म्हणून अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही, अजिंक्यपद गाठण्यात मात्र सातत्य उरते ते सांत्वनाचेच!

Story img Loader