भारतीय संघ गेल्या कित्येक दशकांमध्ये जसे आणि जितके वाईट कसोटी क्रिकेट खेळलेला नाही, तसे आणि तितके १२१४ महिन्यांत खेळला; ही बाब गंभीरच…
आपण सर्वगुणसंपन्न आणि सर्वज्ञानी असल्याची एकदा स्वत:ची खात्री पटली, की अशा व्यक्तींसाठी नव्याने काही शिकणे किंवा स्वयंसुधारणा या शक्यताच मावळून जातात. अशी व्यक्ती मग भीषण अपयश भोगावे लागले, तरी फुटकळ यशाच्या तुलनेत ते किती निस्तेज आहे याचेच दाखले देत बसते. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याचे सध्या असेच काहीसे सुरू आहे. गुवाहाटी क्रिकेट कसोटीत भारताचा विक्रमी दारुण पराभव झाल्यानंतर त्याने काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा परामर्श घेण्याआधी गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या अभूतपूर्व घसरणीचा आढावा आवश्यक.
याआधी २०१२ ते २०२४ या १२ वर्षांत भारताने घरच्या मैदानावर कसोटीमध्ये केवळ पाच पराभव पाहिले. तितकेच भारताला गेल्या १२ महिन्यांत पत्करावे लागले! आपल्यावर दोन वर्षांत दोन कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की तर तब्बल ४० वर्षांनी ओढवली. या काळात न्यूझीलंडविरुद्ध ०-३ आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ०-२ असे सपशेल पराभव, म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेत ‘व्हाइटवॉश’! न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध दारुण पराभव विशेष उल्लेखनीय. याचे कारण म्हणजे क्रिकेटच्या इवल्याशा जगातही भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बड्या तिघांचा अभिजनवाद अनिर्बंध असतो.
या वर्गरचनेत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या फळीतले. या दोन्ही देशांनी कसोटी क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद पटकावून या वर्गरचनेला आपल्या परीने प्रत्युत्तर दिले हा भाग वेगळा. या झाकोळासमोर गंभीर म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत भारतीय संघाकडून काय तेज तळपले… तर आशिया चषक टी-ट्वेण्टी अजिंक्यपद, चॅम्पियन्स करंडक अजिंक्यपद आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत २-२ बरोबरी. म्हणजे या यशासमोर ते अपयश दखल घ्यावे असे नाही. हे म्हणजे गणित आणि विज्ञानात भोपळा मिळाल्यानंतर समाजशास्त्रात ५० गुण नि संगीत, संगणक, स्वच्छतेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाल्याबद्दल स्वत:चेच कौतुक करण्यासारखे! कसोटी क्रिकेट हे आजही सर्वोच्च आहे असे आपले बहुतेक सर्व आजी-माजी कसोटी क्रिकेटपटू मानून चालतात.
ऑस्ट्रेलियासारख्या संघाने आजवर विक्रमी संख्येने जगज्जेतेपदे पटकावली, पण त्यांनाही कसोटी क्रिकेटचे माहात्म्य पटते. या प्रकारात घरच्याच मैदानावर १२ महिन्यांत दोन मालिका सपशेल गमावल्याचे उदाहरण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसरे आढळणार नाही. कदाचित, बलाढ्य म्हणवल्या जाणाऱ्या इतर संघांच्या बाबतीतही असे काहीसे घडल्याची नोंद नसावी. सबब, गेल्या १२ महिन्यांतील हे अपयश इतके अभूतपूर्व की गंभीरने प्रशिक्षकपदावरून स्वत:हून पायउतार होणे अपेक्षित होते. ते तो करणार नाही. ती जबाबदारी बीसीसीआयवर ढकलून तो मोकळा झाला. कदाचित बीसीसीआयदेखील त्याला अभय देईल, कारण टी-ट्वेण्टी विश्वचषक तोंडावर आहे.
पण मुद्दा तोही नाही. बंगळूरु, पुणे, मुंबई, कोलकाता, गुवाहाटी अशा पाच भिन्न मैदानांवर गेल्या १२-१४ महिन्यांत भारतीय संघ ज्या प्रकारचे कसोटी क्रिकेट खेळला, तसे आणि तितके वाईट हा संघ कित्येक दशकांमध्ये खेळलेला नाही. बंगळूरुमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाने सुरू झालेली ही मालिका आता इथून पुढे कुठे आणि कशी सरकेल याचा अंदाज बांधता येत नाही. प्रत्येक वेळी येथील क्रिकेटप्रेमींना वाटायचे, की यापेक्षा वाईट आपण खेळू शकत नाही. खेळणारही नाही. त्यांची अपेक्षा फोल ठरवण्याचा चंगच गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने बांधला होता. एका सामन्यात ४६ धावांमध्ये गारद झालेला हा संघ आता ४००हून अधिक धावांचा पराभव पाहीपर्यंत घसरला आहे. मागे कधी तरी, म्हणजे १९८३-८४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने पाच सामन्यांची मालिका ०-३ अशी गमावली, तर पुढच्याच वर्षी इंग्लंडविरुद्ध १-२ अशी हार पत्करावी लागली.
पण वर्षभराच्या अंतराने दोन मालिकांमध्ये सुपडा साफ होण्याचे प्रकार थेट पन्नासच्या दशकांतच घडायचे. त्या वेळच्या भारतीय संघात हौशे-नवशांच्या बरोबरीने राजे-महाराजे स्वत:ची वर्णी लावायचे. भारतीय मातीत भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी पराभव ही अशी दुर्मीळ बाब असायची. गौतम गंभीरने या पराभवांपासून स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी संक्रमणकाळाचा दाखला दिला. पण असे संक्रमण भारतासाठी नवे नाही. गावस्कर, वाडेकर, सरदेसाई, विश्वनाथ यांच्यापाठोपाठ वेंगसरकर, अमरनाथ, शास्त्री, अझरुद्दीन… मग सचिन, सौरव, राहुल, सेहवाग, लक्ष्मण युगानंतर युवराज, विराट, रोहित, रहाणे, पुजारा अशी संक्रमणे झालीच की. या काळात एक वा अनेक सामन्यांत किंवा मालिकांमध्ये पराभवही दिसले. पण ती कामगिरी आजच्याइतकी रसातळाला गेलेली नव्हती.
बेदी, प्रसन्ना, चंद्रा, वेंकट यांची पोकळी कधी दोशी, यादव, हिरवाणी, मणिंदर यांनी काही काळ भरून काढली. पुढे कुंबळे, हरभजन यांची जागा अश्विन, जडेजा यशस्वीरीत्या घेते झाले. आज परिस्थिती अशी आहे, की फिरकीच्या नंदनवनात यजमानांकडे ना चांगले फिरकी गोलंदाज तयार होतात ना इथल्या फलंदाजांना फिरकी खेळून काढता येते. दक्षिण आफ्रिकेच्या ज्या सायमन हार्मर नामे फिरकी गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली, त्याला कधी काळी याच भूमीत इथल्याच फलंदाजांनी इतके नामोहरम केले होते की हा गोलंदाज नंतर सात वर्षे अज्ञातवासात गेला. या वेळी याच हार्मरने जितके बळी घेतले, तितके आपल्या सगळ्या फिरकी गोलंदाजांना मिळूनही घेता येऊ शकले नाहीत.
गावस्कर युग, सचिन युग किंवा विराट युगाची सर आजच्या राहुल, जयस्वाल, वॉशिंग्टन, सुदर्शन, जुरेल, पंत या फळीकडे अजिबातच नाही हे कबूल. पण वॉशिंग्टन सुंदरसारख्यास तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवण्यामागे नेमकी काय कल्पकता? मोहम्मद शामी, सर्फराझ खान यांना अजिबातच संधी न देण्यामागे कोणती कल्पकता? नितीश रेड्डी नामक ना धड फलंदाजी ना धड गोलंदाजी करू शकणारा गडी कसोटी संघात येतोच कसा नि साई सुदर्शनसारखे सुमारसातत्य दाखवणारा टिकतोच कसा? तंदुरुस्ती आणि नेतृत्वगुण दाखवूनही अजिंक्य रहाणेसारख्यास सक्तीच्या निवृत्तीकडे ढकलण्यामागे नेमके काय आकलन? चार फिरकी गोलंदाज खेळवण्याचा ‘सत्तरयुगीन’ निर्णय आपल्यावरच उलटतो त्याबद्दल नेमके जबाबदार कुणास धरायचे? या प्रत्येक निर्णयाचा कर्ता-करविता गौतम गंभीर आहे.
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे मूळचे बुद्धिमान आणि धोरणी कर्णधार असतील तर एका मर्यादेपलीकडे प्रशिक्षकास फार पैसच राहात नाही. तो निर्माण व्हावा यासाठी विराट-रोहित आणि त्यांच्या बरोबरीने अजिंक्यसारख्या नैसर्गिक कर्णधारास जावे लागले हा योगायोग नाही. नवीन व्यवस्थेस रवी शास्त्रीसारखा रोखठोक प्रशिक्षक झेपणारा नाही तसेच राहुल द्रविडसारखा शिस्तशीर, वक्तशीर संतमाणूस मानवणारा नाही. अद्वातद्वा बोलणारा आणि प्रत्येक बाबतीत स्वत:चेच मत रेटणारा गंभीर मात्र त्यात चपखल बसतो. त्याचे कसोटी क्रिकेटविषयीचे आकलन सुमार आहे. त्याचा प्रत्यय तर वारंवार येतोच आहे.
अशा वेळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच सातत्य टिकवणे ही त्याच्यावरील अघोषित जबाबदारी. फ्रँचायझी क्रिकेटच्या युगात गंभीरचा खुंटा बळकट आहे, कारण त्याने कोलकाता नाइट रायडर्ससारख्या संघास आयपीएल चषक जिंकून दिला होता. विद्यामान क्रिकेट व्यवस्थेस एवढेच पुरेसे आहे. कसोटी संघाची कामगिरी हा या मंडळींच्या अजेंड्यावरचा विषयच नाही. आयपीएल, बीसीसीआय, आयसीसी ताब्यात असतील, तर बाकीच्या बाबी गौण ठरतात. तो कधी काळी भाजपचा खासदार होता याची आठवण देण्याची काही गरज नाही. राष्ट्रतेज, राष्ट्रवाद हे त्याच्या आवडीचे विषय आहेत हा मुद्दाही गौण. परंतु त्याच्या नेतृत्वाखाली सामान्य परदेशी संघानीही आपल्याला ‘घर में घुसके मारा’ हे विसरणे अवघड.
