वर्तमानाच्या मानगुटीवर भूतकाळ बसला तर भविष्याची १०० शकले व्हायला वेळ लागत नाही… याला क्रिकेट तरी अपवाद कसे असेल?

‘रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या ख्यातनाम क्रिकेटपटूंसाठी उद्यापासून सुरू होत असलेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ही भारताला जागतिक पातळीवरील जेतेपद मिळवून देण्याची अखेरची संधी आहे.’ गेल्या दोन दिवसांपासून क्रिकेट वर्तुळातील सगळी चर्चा याच बातमीभोवती फिरते आहे. आता खरे तर भारतीय संघात हे दोघे सोडून इतरही खेळाडू आहेतच की. आणि, क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याने केवळ हे दोघेच संघाला जिंकून देऊ शकतील, असे म्हणण्यात काय अर्थ? पण भारतीयांना कोणत्याही क्षेत्रात नायक लागतात. त्या नायकावर आपण कळत-नकळत आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याचे ओझे टाकतो. उदाहरणार्थ, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर खेळला तरच भारत जिंकेल, असे काही दशकांपूर्वी आपण ठरवूनच टाकले होते. तेंडुलकर बाद झाला की टीव्ही बंद वगैरे. आता तेंडुलकर खेळाडू म्हणून महानच होता, पण म्हणून सगळ्या मैदानभर तोच पळून धावा अडवील, तोच सगळ्या खेळाडूंना बाद करील आणि सगळ्या धावाही तोच काढील, असे कसे होणार? तरीही त्याला डोक्यावर बसवले गेले. त्याच्याकडून दर वेळी काही तरी चमकदार होण्याची अपेक्षा धरली गेली. त्याआधी सुनील गावस्कर यांच्याबाबत असेच व्हायचे. गावस्कर, कपिलदेव, तेंडुलकरसारख्या खेळाडूंना साथ देणारे आणि पर्यायाने संघाला जिंकून देणारे उपयुक्त खेळाडू संघात असतील, तरच आपण जिंकू शकू, हे मान्य करायला आपण फार वेळ घेतला. त्याचे परिणाम भारतीय क्रिकेट अजून भोगते आहे. त्यामुळेच मग क्रिकेटची शैली बदलली, छोट्या छोट्या उपयुक्त खेळ्या खेळणाऱ्या खेळाडूंचे महत्त्व अधोरेखित झाले, तरीही आपण अजून नायकच शोधतो आहोत आणि टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू होतानाही संपूर्ण भारतीय संघाची चर्चा न करता केवळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीभोवती घुटमळतो आहोत.

हेही वाचा >>> अग्रलेख : बालिश आणि बिनडोक!

एखादा खेळाडू असतो अधिक गुणवान आणि त्याची कामगिरी असते खरेच महान, पण खेळ सांघिक असेल आणि त्याची वैयक्तिक कामगिरी कितीही उत्तम होऊनही ती संघाला जिंकवत नसेल, तर त्याचा काय उपयोग? आता हे म्हणताना कोणत्याही उत्कृष्ट खेळाडूचे कौशल्य नाकारण्याचा मुद्दाच नाही. मुद्दा आहे, तो संघ जिंकण्याचा. त्यामुळे त्या महान खेळाडूची संघातील भूमिका काय आणि कुठपर्यंत असेल, याचीच अधिक चर्चा व्हायला हवी. सध्याच्या टी-२० च्या जमान्यात साडेतीन तासांत ४० षटकांत एका संघातील ११ जणांना आपापली भूमिका चोख पार पाडायची असते. अशा वेळी आधीची ‘उज्ज्वल कारकीर्द’ वगैरेवर विसंबून चालत नाही. उपलब्ध साडेतीन तासांत आपल्याला संघासाठी नेमके काय करायचे आहे, हे जो शिकला, तो टिकला एवढे साधे हे समीकरण आहे. महेंद्रसिंह धोनीला याचे भान फार लवकर म्हणजे २००७ मध्येच आले. त्यामुळेच त्या वर्षीच्या पहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील महत्त्वाचे अंतिम षटक त्याने अशा जोगिंदर शर्माला दिले, जो सध्या क्रिकेट खेळतो तरी का, हेही शोधावे लागेल. जोगिंदर शर्माकडून जे आणि जेवढे हवे होते, ते धोनीने काढून दिले आणि जेतेपद मिळवले. त्याची ही खेळी त्या वेळी फसलीही असतीच, पण त्याने ‘उज्ज्वल कारकीर्द’ वगैरे असलेल्या उत्तम गोलंदाजाला षटक देण्याची ‘परंपरा’ मोडून त्या वेळी उपयुक्त कोण ठरेल, याचा विचार केला आणि आपला डाव खेळला, हे त्याचे बदललेला खेळ जोखण्याचे चाणाक्षपण उरतेच. वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या ‘उज्ज्वल कारकीर्द’ असलेल्या फलंदाजांबाबतही धोनीचा हा चाणाक्ष उपयुक्ततावादी दृष्टिकोन वाखाणण्यासारखा होता, जरी त्या वेळी त्याच्यावर टीका झाली होती. हे दोघे क्षेत्ररक्षणात चपळ राहिले नसल्याने त्यांना संघात स्थान देणे उचित नाही, असे त्याचे म्हणणे होते. क्रिकेटच्या बदललेल्या स्वरूपात संघ जिंकवायचा असेल, तर खेळाडूला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबींत नेमून दिलेली उपयुक्त कामगिरी करावीच लागेल, हेच तो मांडू पाहत होता.

मुद्दा असा आहे, की जग बदलले, तसे क्रिकेटही बदलणारच. क्रिकेटही कसोटीकडून ‘वन-डे’मार्गे ‘टी-२०’कडे आले आहे. ‘टी-२०’ हा उण्यापुऱ्या साडेतीन तासांचा खेळ. इतकेच कशाला, क्रिकेटची जन्मभूमी समजल्या जाणाऱ्या आणि अभिजाततेचा कमाल आग्रह वगैरे धरणाऱ्या इंग्लंडच्याच संघाने कसोटीत ‘बॅझबॉल’ हा प्रकार आणला आहे. नजाकतीपेक्षा ताकद आणि वर्चस्व महत्त्वाचे, असे मानणारी ही पद्धत कसोटीचेही स्वरूप बदलू पाहत आहे. त्यामुळे आता कसोटीतही ‘टी-२०’मधला उपयुक्ततावाद उंबरठ्यावर आहेच. तरीही, कसोटी सामन्यांनी क्रिकेटमधील अभिजातता टिकवावी, असा आग्रह स्मरणरंजनात रमलेल्यांकडून होताना दिसतो. पण अभिजाततेचा आग्रह धरणे म्हणजे जुन्याला कुरवाळून नव्या शक्यतांकडे दुर्लक्ष करणे नाही. वर्तमानाच्या मानगुटीवर भूतकाळ बसला तर भविष्याची १०० शकले व्हायला वेळ लागत नाही.

हेही वाचा >>> अग्रलेख : अमरावतीतील तुघलक!

म्हणूनच मग विराट कोहली आणि रोहित शर्मा आताच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत हवेत की नाहीत, याची चर्चा त्यांच्या नायकत्वाला साजेसा निरोप वगैरेवर न घुटमळता आत्ता त्यांची प्रत्येक सामन्यात किती उपयुक्तता आहे, यावरच व्हायला हवी. नुकत्याच संपलेल्या ‘आयपीएल’मध्ये विराटने खोऱ्याने धावा काढल्याचे कौतुक झाले खरे, पण या स्पर्धेच्या सुरुवातीला त्याचा ‘स्ट्राइक रेट’, म्हणजे किती चेंडूंत किती धावा काढल्या, याचे समीकरण टी-२० खेळाला फारसे साजेसे नव्हतेच. त्यावर टीका झाल्यावर विराटच्या चाहत्यांनी टीकाकारांना ‘ट्रोल’ केले. पण सुनील गावस्कर यांनीच त्यावर उत्तर दिल्याप्रमाणे, भाष्यकार म्हणून समोर दिसणाऱ्या वास्तवावर बोलायचे नाही, असे करून कसे चालेल? रोहितचाही खेळ ‘आयपीएल’मध्ये फार बहरलेला नाही आणि काही सामन्यांत तर तो ‘प्रभावी खेळाडू’ नियमामुळे केवळ फलंदाजीसाठी आला आहे, त्याने क्षेत्ररक्षण केलेलेच नाही. या सगळ्याचा अर्थ असा, की ३५ वर्षांच्या विराटला किंवा ३७ वर्षांच्या रोहितला संघात खेळवताना त्यांच्या ‘उज्ज्वल कारकीर्दी’पेक्षा त्यांच्या आत्ताच्या उपयुक्ततेवरच चर्चा व्हायला हवी. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ याबाबत पुरता व्यावसायिक. ऑस्ट्रेलियाला २०१५ चा विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार मायकेल क्लार्कने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच निवृत्ती जाहीर करून टाकल्याचे अनेकांना स्मरत असेल. त्या वेळी तो ३३ वर्षांचा होता, बहरात होता, लोकप्रिय होता. पण त्याच्या उपयुक्ततेची मर्यादा संपल्याची त्याला जाणीव झाल्यावर त्यानेच आपण होऊन निवृत्ती घेतली. याचा अर्थ इतकाच, की जेत्याला साजेशी कामगिरी हवी असेल, तर संघाला नायकांची फौज नाही, तर उपयुक्त कामगिरी करणाऱ्यांची कुमक हवी असते.

क्षेत्र कोणतेही असो. अशा उपयुक्त खेळाडूंची कुमक तयार करण्यावर खरा भर हवा. ते राहिले बाजूला. आपला सगळा भर एखादा कोणी नायक शोधायचा आणि तो आता आपले कसे भले करून देईल याची वाट पाहात हातावर हात ठेवून बघत बसायचे. मुद्दा भ्रष्टाचारमुक्तीचा असो किंवा राजकारणाचा. जे काही करायचे ते ‘त्यांनी’. म्हणजे नायकांनी. एकदा का एखादा नायक सापडला की आपण त्याला देव्हाऱ्यात डांबण्यासाठी अधीर होणार आणि पुन्हा आपली निष्क्रियता आहेच येरे माझ्या मागल्या म्हणत. नायकांनाही हे आवडू लागते मग. तेही स्वत:ला तारणहार वगैरे मानतात. मग एक वेळ येते अशी की हे नायकही नकोसे वाटू लागतात. नायकत्व संपते कधी आणि नकोसे होणे सुरू होते कधी हे लक्षात घेणे महत्त्वाचे. नाही तर आहेच रवानगी मार्गदर्शक मंडळात!