देशात क्रीडासंस्कृती शास्त्रशुद्धरीत्या रुजलेली नाही आणि क्रीडा व्यवस्थापन व प्रशासनात त्रुटी आहेत, या परिप्रेक्ष्यात खेळाडूंच्या कामगिरीकडे पाहिले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिश साम्राज्यमुगुटातील अनमोल रत्न असा भारताचा उल्लेख वसाहतकाळात (ब्रिटिशांकडूनच) व्हायचा. त्याला ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी दर्पाबरोबरच देशातील गुलामगिरीची दु:खद, वेदनामयी किनार होती. राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ हे त्या ब्रिटिश वसाहतवर्तुळाचेच आधुनिक रूप. याच दृष्टिकोनातून राष्ट्रकुल समूह किंवा राष्ट्रकुल खेळांना ‘वसाहतकालीन नकोसा व कालबाह्य वारसा’ म्हणून हिणवण्याचा कल अलीकडे वाढलेला दिसतो. वास्तविक राष्ट्रकुल संकल्पनेविषयीच्या तीव्र भावना खेळांच्या मैदानावर आणण्याचे तसे काहीच प्रयोजन नाही. अनपेक्षित, अद्भुत, रोमांचकारी असे काही घडण्याचे आणि ते आस्वादण्याचे खेळांव्यतिरिक्त दुसरे क्षेत्र नाही. मानसिक आणि शारीरिक कस जेथे पराकोटीचा लागतो आणि रक्ताचा थेंबही न सांडता राष्ट्रध्वज जेथे अभिमानाने फडकू शकतो, असे हे क्षेत्र. खेळांची राजकारणाशी गल्लत घातल्याने संबंधित देशांचे, राजकारण्यांचे वा खेळाडूंचे कधीही भले झाले नाही हा इतिहास आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सहभागी काही देश हे ऑलिम्पिक स्तरावरही क्रीडा महासत्ता म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, जमैकासारखे कॅरेबियन देश, आफ्रिकी देश, आग्नेय आशियाई देश हे एक किंवा अनेक खेळांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतही हुनर दाखवतात. त्यांच्यासमोर सहभागी होणे आणि जिंकणे हे भारतीयांची क्षमता आणि जिद्दीची परमावधी पाहणारेच ठरते. या पार्श्वभूमीवर बर्मिगहॅम येथे अलीकडेच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे मूल्यमापन करावे लागेल. ते करताना जे चित्र उभे राहते, ते आशादायी असेच.

यावेळी भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला. ही कामगिरी गेल्या वेळच्या ग्लासगो स्पर्धेच्या तुलनेत काहीशी फिकी ठरते. यंदा आपण २२ सुवर्णपदकांसह ६१ पदकांची कमाई केली. गेल्या खेपेस गोल्ड कोस्ट येथील कामगिरीपेक्षा (२६ सुवर्णपदकांसह ६६ पदके) ती कमीच. किंबहुना, नवीन सहस्रकात ग्लासगो २०१४चा अपवाद वगळता प्रत्येक स्पर्धेत आपण २२ किंवा अधिक सुवर्णपदकेच जिंकली. तरीदेखील बर्मिगहॅम २०२२ स्पर्धेत भारताने आजवरची सर्वात उजवी कामगिरी करून दाखवली, असे विश्लेषक सांगतात ते का? दिल्लीतल्या २०१० मधील स्पर्धेत आपण तब्बल ३८ सुवर्णपदके पटकावली आणि १०१ पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलो. त्या वेळी अर्थात यजमान देश आणि स्थानिक समर्थकांचा जोरदार पािठबा हे दोन ठळक घटक होते. परंतु बर्मिगहॅम २०२२ आणि उपरोल्लेखित स्पर्धामधील महत्त्वाचा फरक म्हणजे, या स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नव्हता! हा बदल समजून घेण्यासाठी काही आकडेवारी आणि इतिहासावलोकन अस्थानी ठरणार नाही. ग्लासगोचा अपवाद वगळता नवीन सहस्रकातील प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजीमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके मिळाली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताला मिळालेल्या एकूण २०३ सुवर्णपदकांपैकी ६३ या खेळाने मिळवून दिली. एकूण ५६४ पदकांपैकी १३५ नेमबाजीत मिळालेली आहेत. अशा या खेळाचा समावेशच यंदा नव्हता हे भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. २२ सुवर्णपदके आणि एकूण ६१ पदकांचे मूल्यमापन या पार्श्वभूमीवर करावे लागेल. तरीही इथवर मजल मारताना भारतीय खेळाडूंनी नवी क्षितिजे धुंडाळली, इतर काही खेळांमध्ये प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढली किंवा तसा प्रयत्न केला.

या मक्तेदारी भंजनात अग्रणी ठरला, आपल्या बीडचा अविनाश साबळे. ३ हजार मीटर्स अडथळय़ांची किंवा स्टीपलचेस स्पर्धा हे केनियाच्या धावपटूंचे हक्काचे कुरण. १९९८ पासूनच्या प्रत्येक स्पर्धेत पुरुष विभागात आजवर तिन्ही पदके केनियाला मिळत होती. त्याचीच पुनरावृत्ती बर्मिगहॅममध्ये होऊ घातली होती. परंतु तीन केनियन धावपटूंच्या परस्परसहकार्याचा परीघ भेदून अविनाशने रौप्यपदक जिंकून दिले. अ‍ॅथलेटिक्समध्ये यंदा भारतीयांनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना एका सुवर्णपदकासह आठ पदके मिळवली. कुणी काय जिंकले, याचा तपशील बातम्यांमध्ये येऊन गेल्यामुळे त्याची उजळणी करण्याचे कारण नाही. परंतु नेमबाजी, कुस्ती या खेळांकडून आपण इतर खेळांकडे वळू लागलो आहोत आणि जिंकू लागलो आहोत ही जाणीव सुखावणारी खरीच. ४० वर्षीय शरथ कमलने टेबल टेनिसमध्ये जिंकलेले वैयक्तिक सुवर्णपदक उतारवयातही दिमाखात झळकत राहिलेल्या सचिन-आनंद-लिअँडर त्रिकुटाची आठवण जागवणारे ठरले. बॅडिमटनमध्ये शेवटच्या दिवशी तीन सुवर्णपदके जिंकून राष्ट्रकुलमध्ये मलेशियाची वर्षांनुवर्षांची सद्दी मोडून काढल्याचे, तसेच भारतीय बॅडिमटनची यशोगाथा सायना-सिंधूपुरती मर्यादित नसल्याचे आपण खणखणीत जाहीर केले. लॉन बॉलसारख्या पूर्णतया अपरिचित खेळातही आपण इंग्लंड, न्यूझीलंडसारख्या प्रस्थापितांना धक्का दिला.

अशा क्रीडा स्पर्धामध्ये मैदानावरील कामगिरीपेक्षाही स्फूर्तिदायी असतात खेळाडूंच्या वैयक्तिक कहाण्या. सांगलीचा संकेत सरगर चार वर्षांपूर्वी वडिलांच्या छोटय़ा दुकानात पानविक्री करत होता. तो राष्ट्रकुलसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याच प्रकारात सुवर्णपदक जिंकलेला अचिंता शेओली कधी काळी शिवणकामात आईला मदत करून चरितार्थ चालवायचा. मीराबाई चानू, निकहत झरीन, महिला हॉकी संघातील अनेक खेळाडू आर्थिक परिस्थिती, लिंगभेद भाव, प्रशासकीय सुस्तपणा असे अनेक अडथळे ओलांडून मैदानात उतरतात. भारतासारख्या देशात क्रीडासंस्कृती शास्त्रशुद्धरीत्या रुजलेली नाही आणि क्रीडा व्यवस्थापन व प्रशासनातील त्रुटी अजूनही मोठय़ा प्रमाणात आहेत, या परिप्रेक्ष्यात खेळाडूंच्या कामगिरीकडे पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑलिम्पिक, एशियाड किंवा राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताची कामगिरी सातत्याने उंचावत आहे. या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्यांना आर्थिक, कॉर्पोरेट किंवा राजकीय वा इतर स्वरूपाचा पािठबा मिळो वा न मिळो, पण वैयक्तिक पातळीवर जिंकण्याची ईर्षां आणि बलाढय़ प्रतिस्पर्ध्याविरुद्धही विचलित न होण्याची प्रवृत्ती यांचा वाटा मोठा आहे. परंतु पदकांची संख्या आणखी वाढवायची असल्यास, सर्वागीण आणि समतुल्य कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. पुढील स्पर्धेत नेमबाजीबरोबरच कुस्तीही नसेल. तेव्हा पदके आणायची कुठून याविषयी पद्धतशीर नियोजन करावे लागेल. समतुल्य कार्यक्रम सुरू करणे महत्त्वाचे आहे. ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक निधी गुजरातकडे गेला असून, दुसऱ्या क्रमांकावरील लाभार्थी राज्य उत्तर प्रदेश आहे! सप्टेंबर महिन्यात गुजरातमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होताहेत. इतक्या वर्षांत त्या तेथे झाल्या नाहीत, कारण त्या राज्यात क्रीडासंस्कृती रुजलीच नाही. तरीदेखील सर्वात मोठे क्रिकेट संकुल आणि क्रीडा संकुलही गुजरातमध्येच उभारण्याचा अट्टहास अनाकलनीय आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातून हल्ली पदकविजेते कुस्तीगीर आणि बॅडिमटनपटू तयार होत नाहीत. केरळमधून दर्जेदार धावपटू मिळेनासे झाले आहेत. ओदिशा हे हॉकीचे केंद्र असले, तरी तेथून माफक संख्येनेच हॉकीपटू घडवले जातात. पंजाबमधून अ‍ॅथलिट मिळणे जवळपास थांबले आहे. ही राज्ये, तसेच मणिपूर, मिझोराम, हरयाणा या राज्यांमध्ये विशिष्ट आणि विविध खेळांसाठीची परंपरा आणि पायाभूत सुविधा होत्या. यांतील हरयाणा आणि मणिपूर वगळता इतर राज्यांकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे. ओढूनताणून तिसऱ्याच राज्यांमध्ये निव्वळ सुविधांची निर्मिती झाली तरी नैसर्गिक गुणवत्तेच्या अभावी पदकविजेते तयार होऊ शकतीलच असे नाही. राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सातत्याने पहिल्या पाचात येणारे आपण, योग्य नियोजन केल्यास पहिल्या तीनातही सातत्याने येऊ शकतो. या वर्गात एके काळी मागच्या बाकावर बसून इतरांच्या यशाने आणि स्वत:च्या अपयशाने ओशाळणारे आपण. ‘पहिल्या नंबर’चा नाही, तरी हुशार विद्यार्थी म्हणून गणले जाऊ लागलो हेही नसे थोडके!  त्यासाठी या राष्ट्रकुलवंतांचे कौतुक..

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on indian players performance in commonwealth game zws
First published on: 11-08-2022 at 05:31 IST