खामेनी गेले. पण त्यांच्या जाण्यानंतर इराणने अमेरिकी अर्थसंपन्नतेच्या पश्चिम आशियातील मजबूत खोडावर घाव घालून ऊर्जाबाजाराचा भडका उडवला…
इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला रूहल्ला खोमेनी हे १९८९ साली अल्लास प्यारे झाल्यानंतर इराणची सूत्रे अयातुल्ला खामेनी यांच्याकडे आली. खोमेनी यांची राजवट दशकभराची. ते १९७९ साली फ्रान्समधील विजनवास संपवून इराणात परतले ते शहा महंमद रझा पहलवी यांची अमेरिकाधार्जिणी राजवट त्यांच्या प्रेरणेने इस्लामप्रेमींनी उलथून पाडल्यानंतर. शहा यांना नंतर अमेरिकेत तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी आश्रय दिला. तेथेच ते गेले. त्यानंतर खोमेनी यांनी सातत्याने अमेरिकेचा राग-राग केला. त्यांच्याच काळात अमेरिकेच्या तेहरानमधील दूतावासावर हल्ला झाला आणि अध्यक्ष कार्टर यांचे नाक कापले जावे यासाठी त्यांचे अध्यक्षपदाचे स्पर्धक रिपब्लिकन रोनाल्ड रेगन यांनी खोमेनी यांच्याशी गुप्त करार करून या ओलिसांची सुटका अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीपर्यंत होणार नाही याची व्यवस्था केली. तसेच झाले. अमेरिकेत रेगन १९८१ सालच्या २० जानेवारीस अध्यक्षपदाची शपथ घेत असताना तिकडे तेहरानमध्ये अमेरिकी ओलिसांची सुटका झाली. त्यानंतरही रेगन-खोमेनी साटेलोटे सुरू होते. त्याच काळात १९८० साली खोमेनी यांनी शेजारील सद्दाम हुसेनच्या इराकवर हल्ला केला. या दशकभर चाललेल्या युद्धात अमेरिकेने सद्दाम आणि खोमेनी या दोहोंस शस्त्रपुरवठा केला आणि त्यांच्यातील मध्यस्थाचे काम इस्रायलने केले. या शस्त्रव्यवहारातून उभा राहिलेला पैसा रेगन यांनी निकाराग्वातील काँट्रा बंडखोरांसाठी वापरला. त्यातून ते संकटात आले. हे सर्व सोयीने सुरू होते तेव्हा खोमेनी हे अमेरिकेचे साथीदार होते. नंतर ते डोईजड झाले. पण तत्पूर्वी साम्यवादाच्या विरोधासाठी अमेरिकेने त्यांना पुरेपूर वापरले. साम्यवादाचा अंत होत असतानाच खोमेनी गेले आणि खामेनी आले. सुमारे तीन दशकांनंतर अमेरिकेस ते नकोसे झाले. म्हणून इस्रायलच्या रेट्यात सहभागी होत अमेरिकेने त्यांना ठार केले. त्यातून खामेनी यांचीच इच्छा खरे तर अमेरिकेने पूर्ण केली. खामेनी यांना शहीद व्हायचे होते. त्यांचे गुरू खोमेनी वयपरत्वे निवर्तले. पण खामेनी यांना सैतानाशी लढताना मरण हवे होते. ते अमेरिकेने दिले. नैसर्गिक मरणापेक्षा शहीद हा मरणानंतर अधिक जगतो. नेतान्याहूंच्या गारुडात मग्न अमेरिकेस ही जाणीव असणे अवघड. त्यामुळे खामेनी यांच्या हत्येचा अपेक्षित फायदा अमेरिकेस होताना दिसत नाही. खामेनींपश्चातचा इराण त्यांनी सांगितलेल्या मार्गानेच जाताना दिसतो.
आज ना उद्या आपली गाठ अमेरिकेशी आहे हे खामेनी जाणून होते. विशेषत: बराक ओबामा यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्याने हा संघर्ष अटळ आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. तसेच अशा थेट संघर्षात इराणचा निभाव लागू शकणार नाही, हेही ते जाणत होते. म्हणूनच जेव्हा केव्हा असा संघर्ष होईल तेव्हा अमेरिकाधार्जिण्या आसपासच्या खनिज तेल संपन्न प्रदेशावर हल्ला करून व्यापक अस्थिरता कशी निर्माण करता येईल याची योजना खामेनी यांनी आखलेली होती. अमेरिकेने त्यांना त्यांच्या दोन-तीन डझनभर ज्येष्ठ साथीदारांसमवेत संपवले खरे. पण तरीही जे कोणी उरले ते खामेनी यांनी घालून दिलेल्या मार्गानेच जाताना दिसतात. त्यातूनच सौदी अरेबिया, ओमान, कतार अशा अनेक देशांवर इराणी सैन्याने हल्ले सुरू केले. सौदीस तर रास तनुरा येथील जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना बंद करावा लागला आणि कतार या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायूसंपन्न देशास आपले उत्पादन थांबवावे लागले. इराणने युरोपातील सायप्रसपर्यंत जाऊन तेथील ब्रिटिश तळावरील हवाई व्यवस्था उद्ध्वस्त केली. अमेरिकी दूतावासांवर हल्ले झाले. खामेनी गेले. ते ८६ वर्षांचे होते. तसे पिकले पानच. पण या पिकल्या पानाने अमेरिकी अर्थसंपन्नतेच्या पश्चिम आशियातील मजबूत खोडावर घाव घातला. जगभरातील ऊर्जाबाजार भडकला. जे खनिज तेलाचे दर ६०-६५ डॉलर्स प्रतिबॅरलवर बराच काळ रेंगाळत होते ते ८५ डॉलर्सवर गेले. तरी अद्याप इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुरती बंद केलेली नाही. तसे काही झाले तर हे दर १०० डॉलर्सवर जातील, हा तज्ज्ञांचा कयास खराच. मग प्रश्न असा की खामेनी यांच्या हत्येने अमेरिकेने नेमके साधले काय? दुसरा मुद्दा इस्रायलच्या कथित पोलादी छत्रीचा. इस्रायलच्या आकाशाचे रक्षण करणार्या या अमेरिकानिर्मित छत्र्यांस किती छिद्रे आहेत हे अलीकडे अनेकदा दिसले. आताही इराणी क्षेपणास्त्रे ही छत्री भेदून इस्रायलच्या शहरांचा वेध सहज घेत होती. परिस्थिती इतकी बिकट की इस्रायलमधील अमेरिकी नागरिकांनी मायदेशी यावे असे आवाहन करण्याची वेळ खुद्द ट्रम्प प्रशासनास आली. म्हणजे अमेरिकेचे दुसरे घर असलेला इस्रायल हा इराणी हल्ल्यांनी इतका विदग्ध झाला. यानंतर वेडेपिसे झालेले इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू वाटेल तसे इराणी शहरांवर बॉम्बफेक करत सुटले. पण त्यात काही दम नाही. अब्रू जायची ती गेलीच.
ती आणखी काढली इंग्लंड, फ्रान्स, स्पेन यांच्यासारख्या मित्रदेशांनी आणि तीवर मीठ चोळले रशिया आणि चीन या स्पर्धक देशांनी. पश्चिम आशियातील गेल्या दोन युद्धांत अमेरिकेच्या कच्छपि लागून हात पोळून घेतलेल्या इंग्लंडने या वेळी मात्र ट्रम्प यांच्या युद्ध हाकेस प्रतिसाद दिला नाही. इतकेच नव्हे तर या युद्धात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला. ‘‘कोणत्याही देशात ‘असा’ सत्ताबदल आम्हाला मान्य नाही’’, असे ब्रिटन म्हणतो. हे आक्रीत म्हणायचे. अमेरिकी अध्यक्षाचा इतका अपमान कोणत्याही ब्रिटिश पंतप्रधानाने कधी केला नव्हता. तो ट्रम्प यांना इतका असह्य झाला की त्यांना पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्या नावे जाहीर खडे फोडावे लागले. अमेरिकेच्या लीबियावरील युद्धात फ्रान्सने मोठी भूमिका बजावली होती. त्यातून कर्नल मुअम्मर गडाफीचा नि:पात झाला. पण ‘आयसिस’सारख्या संघटनेस बळ मिळाले. त्यामुळेही असेल; पण या वेळी फ्रान्सनेही अमेरिकेची तळी उचलण्यास साफ नकार दिला. खरे कौतुक ते स्पेनसारख्या देशाचे. त्या देशाचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी अमेरिका, इस्रायल यांची या युद्धासाठी कडक निर्भर्त्सना केलीच; वर हे युद्ध म्हणजे इराणच्या स्वायत्ततेवर घाला असल्याचे विधान केले. रशियाचे युद्धमग्न अध्यक्ष पुतिन यांनी इराणच्या बाजूने सहानुभूती व्यक्त केली. पण चीनने मात्र इराणच्या स्वनिर्णयाच्या अधिकारावर अमेरिकी घाला असल्याचे सांगत त्या देशास पाठिंबा जाहीर केला. ही सारी अमेरिकी साम्राज्याचा सूर्य अस्तास निघाला असल्याचीच लक्षणे. असे होणे अटळ.
ज्या वेळी जगातील एकमेव महासत्ता आपले मोठेपण विसरून आर्थिक स्वार्थासाठी नरसंहारी नेतान्याहूसारख्या इसमाच्या मागे जाऊ लागते तेव्हा हे असे पतन अपरिहार्य ठरते. या इराणी युद्धामुळे खुद्द ट्रम्प यांच्या अमेरिकेत अस्वस्थता आहे. आधीच त्यांच्या आयात शुल्क धोरणामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेवर झाकोळ निर्माण झाला. त्यात हे धोरण सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी इराणवर हल्ले करावेत तर खनिज तेल, नैसर्गिक वायू यांच्या किमतींचा स्फोट होऊन मोठी आर्थिक अस्थिरता निर्माण होते. खेरीज मनुष्यहानीचा धोका आहेच. अमेरिकी नागरिक सर्व सहन करतात. पण आपल्या सैनिकांचा अकारण युद्धात जीव जाणे त्यांना सहन होत नाही. ज्यांच्यामुळे ही वेळ येते त्यांना ते माफ करत नाहीत. ट्रम्प यांना आता काळजी आहे ती ही. कारण आतापर्यंत दहा तरी अमेरिकी सैनिकांना या हल्ल्यात मरण आले आहे. तीन अमेरिकी विमाने पाडली गेली आहेत. पुढे आणखी काय होईल हे सांगता येत नाही. एक-दोन दिवसांत इराणला नाक घासायला लावण्याची वल्गना करणार्या ट्रम्प यांच्यावर ‘काही आठवड्यांच्या’ युद्धाची भाषा करायची वेळ आली आहे. बरे, इतके करून ज्यांच्यासाठी हे युद्ध ओढवून घेतले ते नेतान्याहू नामानिराळे. सर्व जग बोल लावणार ते ट्रम्प यांना. व्हिएतनाम युद्धाने ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे रिचर्ड निक्सन यांच्या आयुष्याची माती केली. हे इराण युद्ध ट्रम्प यांच्या विनाशकालाची विपरीत बुद्धी ठरेल.
(तिसरा भाग उद्याच्या अंकात)
