इतिहासात रुजलेल्या धर्माधिष्ठित वैरभावना मनाच्या तळातून दूर व्हाव्यात यासाठी उभय धर्मीयांत एक समंजस, सुसंस्कारी प्रौढता असावी लागते…

इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारी नेतान्याहू यांना आपल्या सैनिकाच्या कृत्याबद्दल माफी मागावी लागली. या सैनिकाने लेबनॉनमधील कारवाईत येशू ख्रिस्ताचा पुतळा पाडला आणि फोडला. एखाद्याच्या पुतळ्याची भीती कोणास का वाटावी वा त्याचा संताप का वाटावा हा प्रश्न. वास्तविक पुतळा ज्याचा असतो त्याचा त्या उभारणीत काहीही वाटा नसतो. कोणीही सज्जन स्वत:च स्वत:चा पुतळा उभारत नाही. म्हणजे याही प्रकरणात ज्याचा पुतळा उभा केला गेला त्या येशूचा त्यात काहीही संबंध नाही. असे असताना तो पाडून, फोडण्यामागील कारण काय? जिवंत असतानाही येशूने हसत मरण स्वीकारले असे मानले जाते. तेव्हा त्याच्या पुतळ्याकडून तो फोडणार्‍यास विरोध होण्याची शक्यता शून्य. पुतळे, मूर्ती यात ईश्वरीय तत्त्व आहे/असते असे श्रद्धाळू मानत असले तरी म्हणून या मूर्ती, पुतळे नश्वर नसतात असे अजिबात नाही. इतिहास असा मूर्तिभंजकाच्या कृत्याने खच्चून भरलेला आहे. जे इतिहासात सर्रास झाले तेच कृत्य वर्तमानात इस्रायली सैनिकाने केले. या पुतळा-फोड्या इस्रायली सैनिकाचा धर्म कोणता होता हे प्रसिद्ध झालेले नाही. पण हे करणारा इस्रायली सैनिक होता हे लक्षात घेता तो यहुदी नसण्याची शक्यता फार कमी. त्याच्या या कृत्याचा समाजमाध्यमी बभ्रा झाल्यावर नरसंहारी पंतप्रधान नेतान्याहू यांना ही घटना मान्य करावी लागली आणि कॅमेर्‍यातच ती चित्रित झालेली असल्याने तीबद्दल ‘धक्का बसल्याची’ भावना व्यक्त करून दिलगिरी वगैरे त्यांना व्यक्त करावी लागली. या घटनेची वाच्यता अजिबात झाली नसती तर या नरसंहारी नेत्याने माफी मागितली असती काय, हा प्रश्न आता विचारणे अनुचित ठरेल. पंतप्रधान नरसंहारी आणि त्याच्या आज्ञा पाळणारे पुतळा-संहारी असेही जे झाले त्यावरून काहींस वाटेल. या वैयक्तिक भाव-भावनांकडे दुर्लक्ष करून जे झाले त्यामागील इतिहास लक्षात घेणे समयोचित ठरावे.

कारण कोणत्याही घटनेमागे हजारो वर्षांची सांस्कृतिक कारणे असतात. ही घटना त्यास अपवाद ठरू शकत नाही. इस्रायली सैनिकाकडून जे झाले त्याच्या मुळाशी येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वापासूनचा धर्मसंघर्ष आहे. ख्रिस्ती धर्मग्रंथ असलेल्या बायबलपर्यंत त्याचा संदर्भ आढळेल. आज अनेकांस माहीत नसावे; पण ख्रिस्ती धर्माची स्थापना करणारा ‘परमेश्वर-पुत्र’ येशू हाच मुळात धर्माने यहुदी मानला जातो. तत्कालीन रोमन सम्राटाचे आणि त्याचे मतभेद झाले. म्हणून अलीकडे आपल्या देशात कुख्यात झालेल्या ‘राजद्रोह’ (सेडिशन) या गुन्ह्यखाली रोमन सम्राटाने येशूस देहान्त प्रायश्चित्त ठोठावले. त्यानंतर यहुदींनीच त्यास रोमन अधिकार्‍याहाती सुपूर्द केले हा इतिहास. तेव्हापासून ख्रिश्चन धर्माभिमानी हे यहुदींकडे ख्रिस्ताचे मारेकरी या भावनेतून पाहतात. त्यामुळे ख्रिश्चन जगात इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यहुदींच्या विरोधात मोठमोठ्या मोहिमा चालवल्या गेल्या. ‘क्रुसेड्स’ या धर्मलांच्छित नावाने ओळखल्या जाणार्‍या इस्लामविरोधी मोहिमांत आणि त्यानंतर कित्येक वर्षांत यहुदींचे शिरकाण झाले ते यामुळेच. अत्यंत रक्तरंजित अशा या मोहिमा र्‍हाईनलँड (आताची जर्मनी), फ्रान्स इत्यादी युरोपीय देशांत चालवल्या गेल्या. त्यांत ‘परमेश्वरविरोधी’ ठरवून यहुदींचे नृशंस शिरकाण झाले. अशा प्रत्येक मोहिमांतून ख्रिश्चन आणि यहुदी यांच्यातील परस्परविरोधी भावना अधिकाधिक तीव्र होत गेली. अजूनही ती पूर्ण दूर झालेली आहे असे नव्हे. या काळात ख्रिश्चनांत येशूच्या हत्येसाठी सर्वच यहुदींस जबाबदार धरण्याची प्रवृत्ती इतकी वाढीस लागली की १९६०च्या दशकात ख्रिस्ती धर्मसंस्थेचे प्रमुख पोप यांना या संदर्भात आवाहन करावे लागले आणि सर्वच यहुदींस वैरी मानू नका, असे सांगावे लागले. हा इतिहास लक्षात घेतल्यास ही परस्परविरोधाची भावना सर्वच यहुदी आणि सर्वच ख्रिस्ती धर्मीयांच्या मनातून दूर झाली असे मानणे अगदीच भाबडेपणाचे ठरेल. या अशा वैरभावना मनाच्या तळातून दूर व्हाव्यात यासाठी उभय धर्मीयांत एक समंजस, सुसंस्कारी प्रौढता असावी लागते. असेल तर ती वर्तनातून दिसून यावी लागते. तसे झाल्यास परस्परांच्या मनांतील एकमेकांविषयीचे शत्रुत्व कमी होऊ शकते आणि कालांतराने ते कायमचे दूर होते.

फारच कमी यहुदी नेत्यांच्या ठायी असा प्रौढपणा असल्याचे इतिहास दर्शवतो. स्वत:स मुसलमानी आक्रमकांचे बळी ठरवत छाती पिटत आक्रोश करताना इतरांचा बळी घेत राहण्याचे आगळे कौशल्य इस्रायली धुरीणांनी नेहमीच दर्शवले. त्यामुळे धार्मिक सहिष्णुता असलेले इस्रायली नेते सापडणे अवघड आणि त्यामुळे ही सहिष्णुता समाजात आढळणे त्याहून अवघड. इस्रायलचे माजी पंतप्रधान यित्झॅक रॅबिन यांनी असा समंजसपणा दर्शवत सामंजस्याचे धोरण अवलंबिण्याचा प्रयत्न केला. पण महात्मा गांधी ज्याप्रमाणे मुसलमानांसाठी मवाळ ठरवून हिंदुत्ववाद्याकडून मारले गेले त्याप्रमाणे यित्झॅक रॅबिन यांचीही धर्मबांधवाकडून मायदेशातच हत्या झाली. कोणत्याही असंस्कृत, अप्रगत आणि म्हणून असहिष्णु समाजात प्रतिस्पर्धी धर्मांविषयी आगलावी विधाने करणारे, माथेफिरू लोकप्रिय होतात. इस्रायल हे त्याचे धगधगते उदाहरण. आताही गाझादी प्रांतांत बेधुंद नरसंहार सुरू आहे तो याच धर्मभावनेतून. इस्रायली सूडामागे इस्लामी अतिरेकी धर्मवाद्यांच्या हमास संघटनेने घडवलेले यहुदी हत्याकांड असल्याचे सांगितले जाते. पण हे केवळ निमित्त. ते नसते मिळाले तर अन्य कोणत्या ना कोणत्या कारणाने इस्रायलने गाझातील असहायांस संपवण्याची संधी शोधलीच असती. लेबनॉनमध्ये यहुदी सैनिकांनी ख्रिस्ती धर्मसंस्थापकांचा अपमान केला. इस्रायलचे माजी सर्वोच्च नेता एरियल शेरॉन यांनी जेरुसलेम येथील मशिदीत घुसून इस्लामचे प्रेषित महंमद यांचाही असाच अपमान केला होता, हा इतिहास फार जुना नाही. त्यानंतर दुसरा ‘इन्तिफादा’ उसळला आणि इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ल्यांची लाट आली.

सुदैवाने आता तसे काही होण्याची शक्यता नाही. एक तर इस्लामी धर्ममार्तंडांच्या तुलनेत ख्रिस्ती धर्मीय मवाळ आहेत आणि सांप्रत काळी खुद्द पोप लिओ हेच इराणविरोधातील अमेरिकी-इस्रायली युद्ध थांबवावे या मताचे आहेत. हे पोप अमेरिकेचे. पण तरी त्यांनी अमेरिकेचेच अध्यक्ष, स्वत:स ख्रिस्ती धर्मानुयायी मानणारे डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धखोरीसाठी खडसावण्यास कमी केलेले नाही. तथापि अशी प्रौढता यहुदी धर्मीय नेतृत्वाकडून अपेक्षित नाही. धर्माचे कारण पुढे करत सतत युद्धजन्य अवस्थेत राहणे हे इस्रायली नेतृत्वाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. हे इस्रायली नेते परधर्मीयांविरोधात नेहमीच ‘अँटी-सेमिटिझम’ची आवई उठवतात आणि स्वधर्माविरोधातील कपोलकल्पित संकटाचे निमित्त पुढे करत अन्य धर्मीयांचे शिरकाण करत राहतात. हे फक्त अन्य धर्मीयांबाबतच होते असे नाही. आपल्या देशातील जातिव्यवस्थेप्रमाणे इस्रायलमध्येही वेगळी वर्णव्यवस्था आहे. जगातील यहुदींना ‘पवित्र भूमी’त (द होली लँड) येऊन स्वतंत्र देश वसवण्याची हाक थिओडोर हर्झेल आदी प्रभृतींनी दिली खरी. पण त्या आवाहनास जागून जगभरातील यहुदी तेथे आल्यावर सर्व यहुदींसाठी सर्व काही समान होते वा आहे असे नव्हे. ऑ्ट्रिरयन, हंगेरीयन वा पोलिश यहुदींस मिळणारी वागणूक, त्यांचे समाजातील स्थान आणि आफ्रिकी वा आशियाई यहुदी यांत किती समानता आहे हे सर्व जाणतात.

तेव्हा जे काही झाले त्यामागे इतका दीर्घ इतिहास आहे. तो बदलायचा असेल तर युरोपातील जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, इंग्लंड आदी देशांनी ज्याप्रमाणे इस्रायलचा कांगावा ओळखून आपल्या धोरणात बदल केला, त्याप्रमाणे इतरांनाही- विशेषत: अमेरिकेस- इस्रायल हाताळणीत बदल करावाच लागेल. गावातील धनाढ्याच्या पोराच्या वाह्यत वर्तनाकडे किती दुर्लक्ष करायचे यालाही मर्यादा असतात. त्या देशांच्या वर्तनासही लागू होतात. यहुदींना यातना भोगाव्या लागल्या हे मान्य; पण यथार्थदर्शनाची वैचारिक परंपरा या यातनांनाही लागू करणे योग्य.