मराठी सारस्वताच्या अंगणात जयंत नारळीकर यांचे आगमन झाले तेव्हा आपले साहित्य विश्व हे गद्या-पद्या, कथा-लघुकथा, समीक्षा- रूपवादी समीक्षा इत्यादींत रममाण होते. आपल्या साहित्यविश्वापासून विज्ञान तसे दूर. विज्ञान, अर्थादी विषयांस ललित क्षेत्राने गावकुसाबाहेर रोखलेले. वास्तविक केरूनाना छत्रे यांच्यापासून ‘इंडियाज एडिसन’ असे गौरवले गेलेले शंकर आबाजी थत्ते ते विमानउड्डाणाचे स्वप्न पाहणारे तळपदे इत्यादी अनेक मराठीच. परंतु मराठी जनांच्या रक्तात विज्ञानवृत्तीचा अभाव असावा. अन्यथा ‘वैदिक गणित’ या संकल्पनेस हात घालणारे, रामायण-महाभारताचा काळ शोधू पाहणारे बळवंतराव ‘गीतारहस्या’साठीच अधिक ओळखले जाते ना. या अशा विज्ञानांधारी वातावरणात जयंत नारळीकर यांचे येणे हा प्रकाशमान सूर्योदय होता. घरातून मिळालेल्या विज्ञान वारशाचा ध्वज जयंतरावांनी केवळ फडकतच ठेवला असे नाही; तर स्वकष्टाने अधिक उंचीवर नेला. पाश्चात्त्य विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी विष्णु नारळीकर आणि त्याचे सुपुत्र जयंत अशा दोघांस टाटा समूहाची शिष्यवृत्ती आपापल्या पिढीत मिळाली. या अशा परंपरेचे हे आगळे उदाहरण. विष्णु नारळीकरांपेक्षा जयंतराव एक पाऊल पुढे गेले आणि साहित्यकृतीतून जनसामान्यांस अधिक जवळचे झाले. ते लिहिते झाले तेव्हा मराठीत विज्ञानकथा हा प्रकार नवीन होता. त्यात जयंतराव सच्चे वैज्ञानिक. आपल्याकडे भाभा अणुकेंद्रांतील कारकुनाचा परिचयही वैज्ञानिक असा करून दिला जात असताना खराखुऱ्या वैज्ञानिक जयंतरावांचे असणे तसे अप्रूपच. ते आता संपले.
‘कृष्णविवर’ ही पहिली कथा जयंतरावांनी १९७४ मध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या ‘विज्ञान कथा स्पर्धे’साठी पाठवली, त्याअर्थी तोवर मराठीत विज्ञानकथा लिहू पाहणारे अनेक जण होते. पण या विज्ञानकथांचा बाज परग्रहावरून पृथ्वीवर आक्रमण किंवा तत्सम प्रकारचा असे. ‘कृष्णविवर’ ही कथा जयंतरावांनी आपल्या नावाचा दबाव कुणावर येऊ नये म्हणून टोपण नावाने- आणि आपले अक्षरही कळू नये म्हणून सहचरी मंगला नारळीकर यांच्या हस्ताक्षरात- पाठवली, तरीही तीच अव्वल ठरणे साहजिक होते. पण एखाद्या बक्षिसापेक्षा अव्वल काम त्या कथेने केले. वैज्ञानिक सिद्धान्तांशी निष्ठा राखणाऱ्या आणि अशा सिद्धान्तांचा प्रचार करण्यासाठी कल्पनेचा आधार घेणाऱ्या नव्या मराठी विज्ञानकथेची सुरुवात ‘कृष्णविवर’मुळे झाली. वास्तविक कृष्णविवरांचा बोलबाला विज्ञानातही नव्हता तेव्हा १९६४ साली मांडला गेलेल्या ‘हॉएल- नारळीकर सिद्धान्ता’ने ‘आकुंचन पावलेल्या ताऱ्यात वा तारकापुंजात दीर्घकाळात गुरुत्वीय बल कमीजास्त होऊ शकते’ असेही निरीक्षण नोंदवले होते. पण गुरुत्वाकर्षण अत्यधिक असलेल्या कृष्णविवरातला ‘काळ’ कसा असेल, त्याच्याशी पृथ्वीवरचा काळ आणि कालगणना यांचे प्रमाण कसे असेल, याचे संशोधन डॉ. नारळीकर आणि त्यांचे मार्गदर्शक फ्रेड हॉएल यांच्या त्या वेळच्या विषयाबाहेरचे होते. कृष्णविवरात काळ गोठतो- म्हणजे त्याची गती कमी होते- म्हणजेच त्यात माणूस शिरल्यास त्याचे वयही गोठते- ही कल्पना जयंतरावांची, त्यातून ‘कृष्णविवर’ लिहिली गेली. पण जयंतरावांच्या एकंदर विज्ञानकथा लेखनातली ‘कल्पना’ म्हणजे काय?
मराठीतल्या भावगीतांनी रुळवलेल्या कल्पनांसारखी ही विज्ञानकथांतली कल्पना स्वैर नव्हती. सोप्या मराठीत विज्ञानाबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न जयंतराव एरवीही करतच असत, मग ‘कल्पना’ आणि कथा कशासाठी? याचे उत्तर जयंतरावांच्या सोप्या मराठीतूनच मिळते. ‘अभ्युपगम’ अर्थात इंग्रजीतल्या ‘हायपोथिसिस’ या शब्दाऐवजी ‘विज्ञानात अशी एक कल्पना आहे’ असे ते म्हणत. इथे कल्पना म्हणजे, प्रयोग आणि निरीक्षणांतून सिद्ध न झालेला वैज्ञानिक विचार. उपलब्ध आणि प्रयोगसिद्ध वैज्ञानिक सिद्धान्तांच्याही पुढे जाऊ पाहणारे कुतूहल. उदाहरणार्थ ‘मोबियस स्ट्रिप’ ही उलट्याचे सुलटे किंवा सुलट्याचे उलटे करणारी पट्टी निश्चितपणे एक गणिती सिद्धान्त मांडते. पण ही पट्टी किंवा तिच्यामागचा सिद्धान्त जर गणितातून प्रत्यक्षात आला आणि माणसे किंवा वस्तू त्यात जाऊन उलट/सुलट होऊ लागल्या तर उजव्या हाताने लिहिणारा माणूस डावखुरा होईल का? डाव्या सोंडेचा गणपती उजव्या सोंडेचा होईल का? या प्रश्नांमागे जो ‘तर काय होईल’ हा विचार आहे, ती कल्पना. या कल्पनेतून ‘उजव्या सोंडेचा गणपती’सारखी कथा लिहिली गेली. त्यानिमित्ताने मराठीत मोबियस पट्टीची चर्चा झाली. अशा कैक वैज्ञानिक सिद्धान्तांना कल्पनेची जोड देऊन नारळीकरांच्या विज्ञानकथांनी मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी वाचकांचेही कुतूहल शमवले आणि जागवले.
आपल्याकडे ललित साहित्य हे निर्हेतुक असावे, अशा आग्रहाचा सुकाळ. त्यामुळे विज्ञानप्रसाराच्या हेतूसाठी कथा, कादंबरिका लिहिणाऱ्या जयंतरावांना अनेकांनी अव्वल मानले नाही. वास्तविक सहेतुक साहित्य ही प्रत्येक समाजाची गरज असतेच आणि त्यासाठी हेतू उदात्त असावा लागतो. प्रचार हाच हेतू असून चालत नाही. हे तारतम्य सुटण्याइतपत कलावादाचा पगडा आपल्याकडे होता त्यामुळे सुरुवातीला जयंतरावांच्या प्रयत्नांतली उदात्तता कुणाला उमजलीच नाही. तशी उमज वाढण्यासाठी दुर्गाबाई भागवतांनी कराड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नारळीकरांच्या कथांचे केलेले कौतुकही फारसे कामी आल्याचे दिसले नाही. पुन्हा मराठीत काही चांगले लिहिले जाते आहे त्याअर्थी ते परभृतच- पक्षी इंग्रजीतून चोरलेलेच- असणार, असा आपल्याकडच्या समीक्षकांचा खाक्या. त्या खाक्यातले दंडुके नारळीकरांवरही फिरले. केवळ ‘एक ऑक्टोबर’ ही तारीख इंग्रजी कथेतली, म्हणून अख्खी कथाच ‘बेतलेली’ आहे असा शेरा एका समीक्षकाने ठोकून दिला. सर आर्थर कॉनन डॉयल यांची गाजलेली पात्रे- शेरलॉक होम्स आणि वॉटसन- स्वत:च्या कथेत आणताना नारळीकरांनी विनयशीलपणे म्हणा किंवा गंमत म्हणून, अख्ख्या कथेत मराठीचा बाज भाषांतरासारखा ठेवला- तोही, त्या काळात भा. रा. भागवत यांनी केलेली शेरलॉक होम्स-मालेची भाषांतरे आठवतील, असा! या लेखकीय क्लृप्तीला दाद देण्याऐवजी ‘ही कथा मूळच्या इंग्रजी अमुकतमुक कथेचे भाषांतर आहे’ असे विधान करून कुणा समीक्षकाने स्वत:च्याच अकलेचे दिवाळे दाखवले.
हे दिवाळे कुणा एकाचे असू शकत नाही. ते सार्वत्रिक आणि अनेकरूपी असते आणि आहे. जे उत्तम ते सारे परकीयच असणार, इतिहासात आपणच तर प्रगत होतो, परकीय राज्यकर्ते आले आणि आपला शक्तिपात झाला… या धारणांमधला परस्परविरोधही अनेकांच्या लक्षात येणार नाही, इतके हे दिवाळे लांबरुंद. याउलट, विज्ञानाच्या प्रांतात प्रत्येक धारणेला, प्रत्येक पायरीवर तपासून पाहिले जाणारच- आपल्या देशाची धरती ‘सोना उगले’ म्हणून धारणांना मोकळे रान द्यायचे, हे विज्ञानात चालत नाही. पण आपल्या अनेक धारणा या आपल्या अस्मितेलाही खतपाणी घालत असताना त्यांवर प्रहार करून काही परिणाम होत नाही. हेही जयंतरावांना नेमके माहीत होते. त्यामुळे त्यांच्या कथा केवळ वैज्ञानिक सिद्धान्तांचा प्रसार करून थांबल्या नाहीत. अस्मिता, संस्कृती यांच्या अवैज्ञानिक अंगाचे दर्शनही त्यांनी ‘पुत्रवती भव’, ‘धूमकेतू’ यांसारख्या अनेक कथांतून घडवले. पण हेही पुरेसे नाही, याची जाणीव जयंतरावांना असावी. त्यामुळेच, ‘धूमकेतू’चा मार्ग महत्प्रयासाने बदलणाऱ्या जागतिक वैज्ञानिकांच्या यशस्वी पथकातल्या भारतीय संशोधकाची पत्नी ‘मी घरात यज्ञयाग केल्यामुळेच हे झाले’ असे म्हणून पतीचे तोंड रसगुल्ला देऊन बंद करते!
विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना जयंतरावांचे जाणे अधिक क्लेशकारक. विज्ञानवृत्ती, तर्कवाद आदी बौद्धिकतेस सामूहिक तिलांजली दिली जात असताना आणि या विज्ञान-श्राद्धविधीस राजमान्यता मिळत असताना जयंत नारळीकर यांचे जाणे खिन्नता निर्माण करते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून जयंतरावांनी दिलेल्या भाषणाचे वर्णन ‘लोकसत्ता’ संपादकीयाने (६ डिसेंबर २०२१) ‘वामन परत यावा’ असे केले होते. आज हा विज्ञान ‘वामन परतोनि गेला’ असे म्हणावे लागेल. या विज्ञानव्रतीस ‘लोकसत्ता’ परिवाराची विनम्र आदरांजली.