प्रत्येक सुनीलबरोबर गुंडप्पा विश्वनाथ असतो. प्रत्येक सचिन-राहुलबरोबर सौरव-लक्ष्मण असतो नि प्रत्येक विराटसह एक रोहितही असतो. नव्हे, असावाच!
क्रिकेटप्रेमाइतकीच व्यक्तिपूजाही मुरलेल्या या देशात सुनील गावस्कर युगानंतर सचिन तेंडुलकर युग अवतरले. ‘आमची दखल त्यांनी घेतली तर…?’ असे वाटण्याची सवय तोपर्यंत लागलेल्या भारतीयांना त्यातून दिलासा मिळाला. सचिन तेंडुलकर युग संपले, त्या वेळी विराट कोहली युग अवतरले. ‘चला आमचीही दखल त्यांनी घेतली तर…!’ अशी भावना सचिनमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची झालेली होती. विराट युगाने ही सभ्य अपेक्षा खुंटीला टांगली. ‘आमची दखल त्यांनी घेतलीच पाहिजे. कारण पर्याय कुठे आहे?’ अशी गर्जना विराट कोहलीने मैदानात आणि मैदानाबाहेर केली आणि तिचे प्रतिध्वनी जगभर उमटत राहिले. यांतील ‘ते, त्यांनी’ म्हणजे अर्थातच या खेळाचे निर्माते ब्रिटिश आणि त्यांना वरचढ ठरलेले ऑस्ट्रेलियन हे गोरे. त्यांच्याच ‘नस्ल’चे म्हणून अधूनमधून मिरवणारे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडही. भारतीयांना अजूनही बहुतेक क्षेत्रांमध्ये गोऱ्यांचे प्रमाणपत्र लागते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गोऱ्यांच्या देशात अधूनमधून सामने जिंकू लागला. विराटचा संघ या देशांमध्ये मालिका जिंकू लागला. ऑस्ट्रेलियासारख्या कालातीत बलाढ्य देशाविरुद्ध त्यांच्याच भूमीत भारताला, कसोटी क्रिकेट खेळू लागल्यानंतर जवळपास साडेआठ दशकांनी पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकता आली, तेव्हा त्या संघाचा कर्णधार विराट कोहली होता हा योगायोग नाही. कोविडने मध्येच थांबवलेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेतही विराट संघ विजयपथावर होता. एखाद-दुसरा सामना नव्हे, मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड-ऑस्ट्रेलियात खेळू लागला. एरवी या संघाची बोळवण तीन कसोटींच्या मालिकेवर केली जायची. आज पाच-पाच कसोटी सामने खेळवले जातात नि सगळे निव्वळ तिकीटबारीवर यशस्वी होतात. भारतीय संघाचा कसोटी दौरा म्हणजे दोन वर्षांचा तोटा भरून पुढील दोन वर्षे नफा निवांत हे समीकरण बीसीसीआय वगळता इतर प्रमुख क्रिकेट मंडळांसाठी ठरलेले असते. अनिवासी भारतीय जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात चालणाऱ्या क्रिकेट सामन्यांना गर्दी करतात हे एक कारण. पण त्यांना आणि जवळपास तितक्याच गोऱ्यांना मैदानाकडे खेचून आणणारा कलाकार असतो किंवा होता विराट कोहलीच. सुनील, सचिन, विराट या तिघांची इतकी सवय तीन-चार पिढ्यांना झालेली आहे, की ‘यांच्यानंतर कोण’ याचे उत्तर शोधण्याची वेळ अखेर येऊन ठेपली. किंवा, ‘यांच्याशिवाय क्रिकेट?’ हे वास्तव स्वीकारायचे तरी कसे, असे प्रश्न अस्वस्थ करणारे ठरतात खरे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन क्रिकेटपटूंनी गेल्या काही दिवसांमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी-ट्वेण्टी प्रकारातून दोघे यापूर्वीच निवृत्त झाले आहेत. आता केवळ ५० षटकांच्या मर्यादित क्रिकेटमध्येच त्यांचे भारतीय संघातील अस्तित्व शिल्लक राहिले आहे. कसोटी क्रिकेट या सर्वाधिक खडतर प्रारूपामध्ये दोघांकडून अलीकडच्या काळात फारशा धावा होत नव्हत्याच. तरीदेखील धावांपेक्षा त्यांच्या एकत्रित अनुभवाची शिदोरी भारतासाठी सध्या मोलाची होती. कसोटी क्रिकेटमधून दोघांनी निवृत्ती पत्करली, तिचे स्वरूप वेगवेगळे तरी पार्श्वभूमी सारखीच. रोहितला निवृत्त होण्याविषयी ‘सुचवले’ गेले. विराटला निवृत्तीचा विचार स्थगित करण्याविषयी ‘विनवले’ गेले. विराट ३६ वर्षांचा आहे, रोहित ३८ वर्षांचा. चाळिशीपार गेल्यानंतरही स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल या दर्जाची तंदुरुस्ती विराटने कमावली आहे. रोहितबाबत तसे नक्कीच म्हणता येणार नाही. तरीदेखील रोहितची, नकोसे झाल्याच्या जाणिवेतून जाहीर झालेली निवृत्तीही तितकीच खंतावणारी ठरते. फलंदाजीपेक्षाही त्याचे कर्णधार म्हणून योगदान इंग्लंड दौऱ्यात उपयुक्त ठरू शकले असते. विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीने बसलेला धक्का अधिक व्यापक असणे बरेचसे अपेक्षित. कारण त्याच्या कर्तृत्वाचा आवाका आणि खोली; तसेच त्याची देशातीत लोकप्रियता आणि आदर सचिन तेंडुलकर युगाची आठवण करून देणारा होता. विराट हा सर्वंकष आणि संपूर्ण फलंदाज तसेच क्रिकेटपटू होता. रोहितच्या मर्यादा होत्या. तरीदेखील, हृदयाऐवजी बुद्धीचा कौल घेतल्यास रोहित कितीसा ‘रोहित’ राहिला होता नि विराट खरोखरच ‘विराट’ म्हणून खेळत होता का, या प्रश्नांची उत्तरे उत्साहवर्धक नाहीत. याची चाहूल लागल्यामुळेच कदाचित विराटने आद्या विक्रमवीर सुनील गावस्करांनी त्यांच्या निवृत्तीच्या वेळी दिलेला तो सुप्रसिद्ध दाखला कृतीत उतरवला असावा. ‘कधी?’ असा प्रश्न विचारला जाण्याआधीच बस्तान बांधावे नि ‘का?’ या अधिक गौरवास्पद प्रश्नाचे उत्तर देण्यास सिद्ध व्हावे. असे प्रश्न विचारले जावेत अशी खूणगाठ विराटने बांधलेली असेलच.
रोहित शर्मा हा कित्येक बाबींमध्ये विराट कोहलीचा ‘आल्टर इगो’ ठरतो. तंदुरुस्ती हा प्रांत विराटचा. त्याबाबत आग्रही असणे रोहितला मानवले नसेल. विराटप्रमाणे रोहित आत्मदक्ष नाही. प्रचंड ऊर्जा आणि एकलक्ष्यनिष्ठा हा विराटचा स्थायिभाव. रोहित मैदानावर केवळ क्रिकेट खेळण्याच्या उद्देशाने उतरतो. अस्सल मुंबईकर. क्वचितच भावनोत्कट होतो. विराटला कॅमेऱ्याचा झोत आवश्यक असतो. असा झोत आपल्यावर पडलाय याची फिकीरच रोहितने कधी केली नाही. त्याची फलंदाजी म्हणजे कविताच. ‘रोहितची फलंदाजी सुरू झाली की टीव्हीसमोर बैठक सोडवतच नाही’ अशी दाद त्याला दस्तुरखुद्द झहीर अब्बास यांनीच दिली होती. फलंदाजी आणि नजाकत अशी भट्टी साधलेल्या मोजक्या फलंदाजांपैकी झहीर अब्बास एक. क्रिकेट आस्वादक संस्कृतीचा असे फलंदाज हा अविभाज्य घटक असतात. त्यामुळेच प्रत्येक सुनीलबरोबर गुंडप्पा विश्वनाथ असतो. प्रत्येक सचिन-राहुलबरोबर सौरव-लक्ष्मण असतो नि प्रत्येक विराटबरोबर एक रोहितही असतो. नव्हे, असावाच! दोघांमुळेच क्रिकेट परिपूर्ण ठरते. विराट हा परिपूर्णतेचे प्रतीक होता. त्याची फलंदाजी, त्याची एकाग्रता, त्याची तंदुरुस्ती, त्याची जिगीषा, जिंकण्यासाठीची विनातडजोड वृत्ती हे सगळे गुण कमीअधिक प्रमाणात रोहित शर्मामध्येही दिसतात. पण रोहितच्या व्यक्तिमत्त्वातून ते प्रकटत नाही. विराटच्या व्यक्तिमत्त्वातून हे गुण ठायीठायी सांडत राहतात. त्या गुणांचा भार अलीकडे त्यालाच सोसवेनासा झाला. कधी मानसिक तणाव, कधी अध्यात्माचा आधार या चक्रात तो त्यामुळेच वारंवार सापडू लागला. धावा होत नाहीत म्हणून रोहितप्रमाणे विराटने स्वत:लाच एखाद्या कसोटीतून कधीही वगळले नसते. अपयश हीदेखील आयुष्याची एक बाजू असते आणि सतत यशाचा पाठलाग करणे ही एक प्रकारे मानसिक गुलामगिरी असते, हे विराटला खूप उशिरा उमगले.
२०१४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटमध्ये विराटपर्व सुरू झाले. ते जवळपास २०२२-२३ पर्यंत चालले. त्याच्या उच्चतम कामगिरीच्या या काळातही भारतीय संघ कुठेही, कोणत्याच प्रकारात एकही स्पर्धा जिंकू शकला नाही. याउलट मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराटच्या आधी महेंद्रसिंग धोनीने दोन वेळा आणि विराटच्या नंतर रोहित शर्मानेही दोन वेळा भारताला आयसीसी स्पर्धा जिंकून दिल्या. हे विराटचे अपयश मानावे, मर्यादा मानावी की निव्वळ दुर्दैवी योगायोग? की हे विराटच्या व्यक्तिकेंद्री नेतृत्वाचे अपयश आणि रोहितच्या बाबतीत व्यक्तिनिरपेक्ष नेतृत्वाचे यश मानावे? दोघांना प्रतिस्पर्धी ठरवण्याचा प्रयत्न झालाच. दोघांची परस्परांशी घनिष्ठ मैत्री होती अशातलाही भाग नाही. पण दोघांनाही परस्परांचे महत्त्व कळत होते. रोहितच्या दोन्ही अजिंक्यपदांमध्ये विराटचा निस्सीम सहभाग होता. विराटसाठी ट्रॉफ्या जिंकण्यास रोहितनेही जीवतोड प्रयत्न केलाच. आता हे दोघेही क्रिकेटच्या एकेका प्रकारातून अस्तंगत होत चालले आहेत. कदाचित आणखी काही वर्षे ते आयपीएलच्या अवकाशात चमकत राहतील. विराटची उणीव रोहितच्या अनुपस्थितीने अधिक गहिरी होईल. एकाने जिंकण्याची आस लावली, दुसऱ्याने जिंकायचे कसे हे दाखवून दिले. दोन परस्परभिन्न प्रकृतीचे, जणू दोन ध्रुवांवर दोघे असे हे क्रिकेटपटू. त्यांच्या निवृत्तीपश्चात पडलेला काळोख भारतीय क्रिकेटला आणखी काही काळ ग्रासत राहील हे नक्की.