जगातील सर्वाधिक संगणक-सेवकांचे उत्पादन आपल्या देशात होते. ‘एआय’च्या अतिवेगवान प्रसारामुळे या हातांचे काम सरण्याची भीती प्रत्यक्षात येताना दिसते आहे…
आपल्याकडे ‘संकट म्हणजे संधी’ वगैरे पोपटपंची करणार्यांची अजिबात कमतरता नाही. उलट अशांचेच पीक अधिक. हे असे सल्ला देणारे आणि ‘खचून जाऊ नका’, ‘स्वत:वर विश्वास ठेवा’ आदी निरर्थक मार्गदर्शन करणारे तथाकथित ‘सेल्फ हेल्प गुरू’ दोघेही तितकेच निरुपयोगी. जेव्हा संकट आ वासून समोर असते, नोकरी-धंद्यात टिकून राहण्याचा, जगण्या-मरण्याचा प्रश्न असतो तेव्हा नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून हातपाय ज्याचे त्यालाच मारावे लागतात. त्या प्रयत्नांमुळे काही तरतात. काही बुडतात. संकट सरले की त्यात तरलेल्यांचा उदोउदो होतो. त्यातले काही आत्मस्तुतीत रमतातही. पण ते खरे नाही.
दुसरे असे की संकटाचे संधीत रूपांतर करायचे म्हणजे नक्की काय आणि हे करायचे कसे याचे काही ठोस समीकरण कधीच नसते. संकटाचे स्वरूप आणि व्यक्तीनुसार ते बदलत जाते. पण तरी ‘सब घोडे बारा टके’ रीतीने हे सल्लागार, सेल्फ हेल्प गुरू असे सल्ले देत राहतात आणि त्यांची दुकानदारी अव्याहत सुरू राहते. ‘कृत्रिम प्रज्ञा’ म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऊर्फ ‘एआय’ हे या अशा सल्लागारांस मिळालेले नवे निमित्त. ‘एआय’च्या प्रगतीस संधी समजा, ‘एआय’ हे संकट नसून ही तर संधी इत्यादी इत्यादी सल्ले देणार्या महाभागांचे पेव गल्लोगल्ली फुटलेले दिसते आहे ते यामुळे. अलीकडेपर्यंत विविध अर्थतज्ज्ञ, संगणक क्षेत्रातील महानुभाव हेदेखील अशा सल्ल्यांची पारायणे करत. तथापि गेल्या आठवड्यात ‘ओरॅकल’ या बलाढ्य माहिती तंत्रज्ञान कंपनीने जे केले त्यामुळे ‘संकट-संधी सल्लागार’ वर्गास आपल्या शहाणपणाचा फेरविचार करावा लागेल.
‘ओरॅकल’ने एका दिवसात १२ हजार सुशिक्षित भारतीय संगणक-सेवकांना कामावरून कमी केले इतकेच यामागील कारण नाही. तर या सर्वांस ‘ओरॅकल’च्या ‘एआय’ विस्तारामुळे जावे लागले ही बाब महत्त्वाची. याचा अर्थ ‘ओरॅकल’ यापुढे अधिकाधिक ‘एआय’चा वापर करणार असल्यामुळे मोठे मनुष्यबळ निरुपयोगी ठरणार म्हणून त्यातील काहींस नारळ दिला गेला. त्या काहींस गेल्या आठवड्यात रामप्रहरी सकाळी सहा वाजता कंपनीच्या अमेरिकी मुख्यालयातून साधा ईमेल आला आणि ‘‘आज तुमचा कामाचा अखेरचा दिवस’’, अशी सुवार्ता दिली गेली. इतकेच. या कंपनीच्या सहभागाने गेल्या काही दिवसांत गटांगळ्या अनुभवल्या असून कंपनीच्या तब्बल १६ लाख कोटी रुपये बाजारमूल्याची धूप झालेली आहे.
हे सर्व ‘एआय’मुळे. जगभरातील अत्यंत मोठ्या कंपन्यांचे समग्र संगणकीकरण, त्यांचे जाळे, त्यातील ऐवज साठवून देणारी यंत्रणा इत्यादी क्षेत्रे ही ‘ओरॅकल’ची जणू मक्तेदारी. पण ‘एआय’ प्रसाराची सुरुवात झाली आणि ही सारी कामे माणसांकडून घेण्याची पद्धत कालबाह्य ठरत गेली. अखेर ‘ओरॅकल’लाही ‘एआय’ मार्ग स्वीकारण्याखेरीज पर्याय राहिला नाही. हा मार्ग स्वीकारायचा म्हणजे कर्मचार्यांचे ओझे कमी करायचे. तेच ‘ओरॅकल’ने केले. यातील अधिक दु:खदायक बाब म्हणजे या कंपनीने सर्वात प्रथम भारतीय/ भारत-स्थित संगणक-सेवकांस घरी पाठवले. गेल्याच महिन्यात ‘आंथ्रोपिक’ या अमेरिकी कंपनीने असाच दणका दिला.
संगणक-सेवक हे आतापर्यंत फार कुशल काम मानले जात होते. ते होतेही तसे. एखादी नवी सेवा सुरू करणे, ॲप डिझाइन करणे, त्यानुसार ग्राहक ते पुरवठादार साखळी बांधून देणे, त्यांच्या खरेदी-विक्रीनुसार पैशाची देवाण-घेवाण यंत्रणा उपलब्ध करून देणे इत्यादी गुंतागुंतीची कामे करणे ही सुप्रशिक्षित संगणक-सेवकांची मक्तेदारी होती. तथापि ‘आंथ्रोपिक’ची ‘एआय’ सेवा आली आणि हीच आणि आणखीही सर्व कामे संगणक स्वत:हून करू लागला. परिणामी सुप्रशिक्षित संगणक-सेवक सर्वथा निरुपयोगी ठरले. या ‘आंथ्रोपिक’ची बातमी आली आणि जगभरातल्या संगणक कंपन्यांचे समभाग गडगडले. त्यानंतर आता हे ‘ओरॅकल’ संकट.
पण ते तितकेच नाही. गेल्या वर्षभरात संगणक-सेवकांस कामावरून कमी करण्याचे किती प्रकार घडले त्यावर सहज नजर जरी टाकली तरी संकटाचे गहिरेपण लक्षात यावे. ‘मायक्रोसॉफ्ट’मधून ९००० जणांस डच्चू दिला गेला. तर ‘इंटेल’मधून २१ हजार, ‘ॲक्सेन्चर’मधून ११ हजार, ‘ॲमेझॉन’मधून १६ हजार कर्मचार्यांस, आपल्या ‘टीसीएस’मधून १२ हजारांस आणि ‘ओरॅकल’मधून एकूण ३० हजार संगणक सेवकांस अवघ्या गेल्या काही महिन्यांतच कमी करण्यात आले.
जगभरातल्या अशा बलाढ्य कंपन्यांनी २०२५ या वर्षभरात एकूण २,४५,९५३ संगणक-सेवकांस कमी केले. वर्षाचे दिवस लक्षात घेता सरासरी दररोज ७८३ संगणक-सेवकांनी आपल्या नोकर्या गमावल्या. आणि हे सर्व केव्हा? तर ‘एआय’चा सुळसुळाट इतका झालेला नव्हता तेव्हा. आता परिस्थिती तशी नाही. ‘एआय’ने अनेक क्षेत्रांत हात-पाय पसरले असून त्यामुळे यंदाचे वर्ष कर्मचारी कपातीच्या मुद्द्यावर गेल्या वर्षावर मात करेल असे दिसते. प्राथमिक आकडेवारीवरून दिसते ते असे की चालू २०२६ या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच बड्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीच्या तब्बल २०८ घटना घडल्या असून त्यातून ८५,१५६ संगणक-सेवकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. याचा साधा अर्थ असा की या तीन महिन्यांत आतापर्यंत सरासरी दररोज ९३६ जणांनी रोजगार गमावले. या सर्व काळात या बड्या संगणक कंपन्यांच्या महसुलात सातत्याने घट होत असून त्यातील अनेकांवर व्यवसायाच्या प्रारूपात आमूलाग्र बदल करण्याची वेळ आल्याचे दिसते.
हे सर्व मुद्दे आपल्यासाठी देश म्हणून अत्यंत चिंताजनक ठरतात. याचे कारण गेली जवळपास दोन-तीन दशके आपल्याकडे संगणक शिक्षणावर भर दिला जात असून जगातील सर्वाधिक संगणक-सेवकांचे उत्पादन आपल्या देशात होते. म्हणून जगातील सर्व बलाढ्य संगणक कंपन्या चालवणारे हात भारतीयांचे आहेत. पण ‘एआय’च्या अतिवेगवान प्रसारामुळे या हातांचे काम सरण्याची भीती प्रत्यक्षात येताना दिसत असून परिणामी आपल्यालाही शिक्षणव्यवस्थेची समग्र फेररचना करावी लागेल. परंतु हा असा बदल प्रत्यक्ष होणे दूर; आपण निदान त्या दिशेने विचार तरी करू लागलो आहोत किंवा काय, हा प्रश्न. त्याचे उत्तर नकारार्थी असण्याचीच शक्यता अधिक. हे बदलते वास्तव विचारात घेऊन त्यानुसार शिक्षणात बदल घडवून आणले नाहीत तर आपल्यासमोर दुहेरी संकट उभे ठाकेल.
एका बाजूने पारंपरिक अभियांत्रिकी क्षेत्राच्या विस्तार/ विकासाकडे झालेले दुर्लक्ष आणि त्याच वेळी ‘न्यू इकॉनॉमी’ म्हणून ज्यास डोक्यावर घेतले त्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने टाकलेली कात हे ते दुहेरी संकट. आपल्याकडे ‘एआय’साठी ‘डेटा सेंटर्स’ वगैरे निर्मितीची भाषा अलीकडे वारंवार कानावर पडते. पण विकसित देशांत या ‘डेटा सेंटर्स’विरोधात मोठी मोहीम सुरू असून अशा सेंटर्सची वीज आणि पाणी यांची प्रचंड आणि वाढती भूक हे त्यामागील कारण आहे. असे असताना ज्या देशातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे त्या देशाने पावसाचे पाणी ‘डेटा सेंटर्स’साठी किती वळवावे याचा विचार आपणास करावाच लागेल. आज की उद्या इतकाच काय तो प्रश्न. जितक्या लवकर या प्रश्नास आपण प्रामाणिकपणे सामोरे जाऊ तितके बरे. सक्षम अर्थव्यवस्थेसाठी मर्यादित; पण मजबूत असे काही असण्याऐवजी संख्येने मुबलक; पण मुडदुसे काय कामाचे? जर बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक तयारी नसेल तर अशा व्यक्ती आणि समाज यांच्यासाठी वाढत्या संधी हेच संकट असते. सबब ‘संकट म्हणजे संधी’ वगैरे बडबड हे शुद्ध थोतांड.
