विधिनिषेधशून्य कुरापती आणि धर्मांध धोरणांनी काय होते हे अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या झपाट्याने र्हासाकडे चाललेल्या संबंधांकडे पाहून कळावे…
‘परसात सापच पोसलेत तर ते दरवेळी शेजार्यांना दंश करतील ही अपेक्षा चुकीचीच’- अशा शेलक्या पण जळजळीत शब्दांत अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी २०११ मध्ये पाकिस्तानच्या शासकांना सुनावले होते. पाकिस्तानने अफगाणिस्तान अस्थिर करण्याचे राष्ट्रकार्य वर्षानुवर्षे केले. यासाठी तालिबान या अमेरिकानिर्मित संघटनेस स्वत:च्या स्वार्थासाठी मदत केली. आज तेच तालिबान आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे ‘आका’ पाकिस्तान परस्परांचे कट्टर दुश्मन बनले आहेत. तालिबानची एक उपशाखा पाकिस्तानला सातत्याने दंश करत आहे. तिचा नि:पात करण्यासाठी पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या हद्दीत हल्ले करावे लागत आहेत. तालिबानचे हल्लेखोर अफगाण-पाकिस्तान सीमेवर किंवा वेळ मिळेल तेव्हा पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करत आहेत. त्यांची मजल तेवढीच. या तालिबानी राजवटीखालील शस्त्रास्त्रदुर्बळ अफगाणिस्तानवर पाकिस्तानने त्यांच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनिशी हल्ले सुरू केले आहेत. काबूलमधील एका नशामुक्ती केंद्रावर अशाच एका हल्ल्यात ४००हून अधिकांना प्राण गमवावे लागले. पाकिस्तानच्या ‘सामथ्र्या’ची मजल तेवढीच. अफगाणिस्तानातील लोकनियुक्त सरकारांना सातत्याने अस्थिर आणि सत्ताच्युत करून अफगाणिस्तानवर राजवट स्थापण्यात तालिबान-पाकिस्तान दोस्तीचा मोठा वाटा होता. पण त्या संधिसाधू दोस्तीची मजलही तेवढीच. काबूल, कंदाहारसारख्या मोठ्या शहरांवर हल्ले करून तालिबानला नेस्तनाबूत करण्याचे स्वप्न पाकिस्तान पाहत असेल, तर इतिहासापासून ते काही शिकत नाहीत या गृहीतकावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होते. कारण महासत्तांसह सार्याच आक्रमकांच्या राक्षसी आकांक्षांचे कब्रस्तान ही अफगाणिस्तानची चिरपरिचित ओळख. ब्रिटन, रशिया, अमेरिका या देशांना याची अनुभूती पुरेशी आलेली आहे. आवाका नसतानाही पाकिस्तान वारंवार तेच करू पाहतो नि फसतो. काबूलमधील त्याचा ताजा हल्ला याच आकांक्षेतून झाला. अशा हल्ल्यांनी अफगाणिस्तान शरण येणार तर नाहीच, पण पाकिस्तान अंतर्गतरीत्या अधिक असुरक्षित बनेल. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष पश्चिम आशियात इराण वि. इस्रायल-अमेरिका संघर्षाकडे लागलेले असल्यामुळे इराणच्या शेजारील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांतील स्फोटक परिस्थितीविषयी जाणण्यास फारशी उसंत मिळत नाही. भारताला असे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. अफगाण-पाक संघर्षाची चिकित्सा त्यामुळे दखलपात्र ठरते.
सहकार्यपूर्ण आणि सहिष्णुतामय सहअस्तित्व हे तत्त्व पाकिस्तानच्या जनुकांतच अंतर्भूत नाही. अनैतिक हस्तक्षेप आणि खोडसाळ कुरापती हेच या देशाचे दशकानुदशके परराष्ट्र धोरण आणि वर्तन. स्वत:ला हवी तशी धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मिती झाल्यानंतर तरी ‘धर्मा’ला बाजूला ठेवून ‘राष्ट्र’उभारणीकडे लक्ष देण्याऐवजी त्या देशातील राज्यकर्ते काश्मीरचा घास घेऊन ‘हिंदू’ भारताला धडा शिकवण्याचे दिवास्वप्न जागवत राहिले. भारताने धर्मनिरपेक्ष राज्यपद्धती आग्रहाने अंगीकारून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली, महात्मा गांधींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेल्या घटनात्मक सर्वसमावेशक चौकटीत वाटचाल सुरू केली. या शेजार्याकडून पसाभर धर्मनिरपेक्षता आणि शहाणपण घेतले असते, तर पाकिस्तानातील लोकशाहीची वर्षानुवर्षे वाताहत होती ना. या दोन बाबींच्या अभावामुळेच पाकिस्तानला स्वत:चे असे राष्ट्रीय शील कधी गवसलेच नाही. यातून आणखी एक वाईट सवय त्याला जडली, बाहेरख्यालीपणाची!
पंडित नेहरूंनी रशिया, ब्रिटन, अमेरिका अशा तत्कालीन महासत्तांची मदत मर्यादित प्रमाणात आणि विधायक कामांसाठी घेतली. पाकिस्तानला सुरुवातीस ब्रिटन आणि अमेरिका नि पुढे चीनने लाडावून ठेवले. त्यांच्या कृपाशीर्वादाचा वापर या देशाने भारत आणि अफगाणिस्तानच्या कुरापती काढण्यासाठीच केला. एखादे चांगले धरण, एखादी चांगली शैक्षणिक संस्था, अंतराळ संशोधन संस्था, गणितविज्ञान संस्था उभारण्याऐवजी पाकिस्तान त्याही काळी सर्वाधिक आयात काय करायचा, तर शस्त्रास्त्रे! चीनने भारताचा विश्वासघात केल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक सहकारी मिळाला. आजही या चीनकडून पाकिस्तान सर्वाधिक आयात कशाची करतो, तर क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांची. वास्तविक चीन चिपनिर्मिती करतो, चीन उपग्रहनिर्मिती करतो आणि हाच चीन उत्खनन सामग्रीही बनवतो. पण पाकिस्तानला ते काही नको. कारण त्या देशात वर्षानुवर्षे अंमल राहिला तो लष्करशहांचाच. भारतात जनरल करिअप्पा, जनरल थिमय्या, जनरल माणेकशॉ असे एकाहूनही एक सरस सरसेनापती होऊन गेले. यांतील करिअप्पा आणि माणेकशॉ पुढे फील्ड मार्शल बनले. पण ते काही भारताची ओळख ठरले नाहीत. याउलट, अनेक आफ्रिकी देशांत असतात तसे पाकिस्तानात लष्करशहा आणि एकही लढाई न जिंकलेले आयुबखान किंवा आताचे असिम मुनीर यांसारखे स्वयंघोषित फील्ड मार्शलही आढळून येतात. तीच त्यांची ओळखही. इंदिरा गांधींच्या निर्धारी नेतृत्वाखाली बांगलादेशचा तुकडा पडल्यानंतर ‘सहस्र जखमांनी भारताचा रक्तपात’ करण्याच्या ठार वेडसर धोरणाने पाकिस्तानी शासक आणि लष्करशहांना पछाडले.
तशात १९८०च्या दशकात तेथे झिया उल हकसारख्या जिहादी जनरलचा उदय झाला. त्यांच्या मदतीने अमेरिकेने अफगाणिस्तानात सोव्हिएत फौजांना बेजार करण्यासाठी मुजाहिदीन पाठवले. सोव्हिएत फौजा बेजार होऊन अफगाणिस्तानातून निघून गेल्या नि हा देश निर्नायकी बनला. त्या वेळी मुजाहिदिनांच्या पाठोपाठ पाकिस्तान प्रशिक्षित तालिबान्यांना पाठवून अफगाणिस्तानवर ताबा घेण्याची महत्त्वाकांक्षा झिया, मुशर्रफ यांसारखे लष्करशहा बाळगू लागले. पण अफगाणी टोळ्यांनी स्वत:ची अफगाण ही ओळख कधीही मिटू दिली नाही. प्रथम १९९०च्या मध्यावर आणि आता चालू दशकाच्या सुरुवातीस अशा दोन वेळा तालिबान अफगाणिस्तानचे सत्ताधीश बनले. पहिल्या तालिबानी राजवटीला पाकिस्तानचे पूर्ण पाठबळ होते. दुसर्या राजवटीबद्दल तसे म्हणता येत नाही. तालिबानचे काही उपगट धर्मांधतेच्या बाबतीत पाकिस्तानातील जिहादी गटांपेक्षा अधिक कडवे आहेत. यांतील एक गट आहे तेहरीके तालिबान पाकिस्तान (टीटीपी). पाकिस्तानात गेली अनेक वर्षे हा गट दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. पेशावरमध्ये १२ वर्षांपूर्वी शाळेवर झालेला हल्लाही या टीटीपीचाच. या संघटनेमागे भारत असल्याचा आरोप पूर्वी पाकिस्तान करत असे. आता त्यांचे कर्ते-करविते अफगाण तालिबान आहेत असे पाकिस्तानला वाटते. हा संघर्ष गेल्या सहा महिन्यांत तीव्र झाला आणि यातूनच अफगाणिस्तानशी ‘खुले युद्ध’ जाहीर करण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली.
हे अशा वेळी घडत आहे, जेव्हा भारताने तालिबानशी मर्यादित संबंध वाढवायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या विध्वंसक हस्तक्षेपापेक्षा भारताची विधायक मदत अफगाण उभारणीसाठी आवश्यक आहे, इतपत शहाणपण तालिबानी नेत्यांच्या ठायी आले आहे. पण आता नेमके ते पाकिस्तानी हल्ल्यांचे लक्ष्य ठरू लागले आहेत. हे धोरण पाकिस्तानवर उलटू शकते. कारण खडे सैन्य ही तालिबानची ताकद नाही. असमतुल्य लढाई आणि छुपे हल्ले ही त्यांची ओळख. हे हल्ले ‘टीटीपी’मार्फत होतील किंवा तालिबानकडून होतील. त्यातून पाकिस्तानची सुटका नाही. आधीच हा देश बलुच बंडखोरांच्या हल्ल्यांना तोंड देताना बेजार झाला आहे. बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान अशा दोन आघाड्यांवर पाकिस्तानला लष्करी बंदोबस्त करावा लागत आहे. प्रचंड इंधन व धान्यटंचाई, कर्जबाजारीपणा अशी संकटे असतानाही पाकिस्तानची युद्धखोरी कमी होत नाही. ही युद्धखोरीच या देशाचे दुर्दैवी प्राक्तन आहे. परसातले साप मालकावरच चालून येत आहेत. ते ठेचावे तर शेजारी जावे की घरी थांबावे असा प्रश्न आहे.
विधिनिषेधशून्य कुरापती आणि धर्मांध धोरणांनी काय होते हे अभ्यासायचे असेल, तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या झपाट्याने र्हासाकडे चाललेल्या संबंधांकडे पाहावे. एके काळी गहिरा दोस्ताना असलेले हे दोन देश परस्परांचे कब्रस्तान करू पाहतात हे त्या प्रांतांचे दुर्दैव.
