श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्यासारखे लेखक उत्कटतेसाठी किंमत मोजणारे. ते केवळ भाषेचे किंवा शैलीचे नव्हे, जगण्याच्या ऊर्मींचे पालनपोषण करत असतात…
सगळे जाणार असतातच. पण त्यातल्या काही जणांच्या जाण्याने काही तरी संपलेच असे वाटत राहते. ते काही तरी आता उरलेल्यांनी जपायचे ही जाणीवही होते. अशांपैकी श्रीनिवास विनायक कुलकर्णी. ते परवा गेले. म्हणजे आता त्यांचे अवघे चार लेखसंग्रह गोठून राहणार, वाचकांची वाट पाहत. चाळीसपन्नास लेख. काही अप्रकाशित, असल्यास. थोडीफार भाषणे. बर्याच असंकलित कविता. तेही करतील कुणी प्रकाशित- आणखी दहाच वर्षांनी जन्मशताब्दी होईल त्यांची. पण त्यांच्या साहित्याने जे सत्त्व दिले, त्याचे काय होईल? साधेपणातले सौंदर्य शोधण्याचे निमंत्रण देणारा डोह कोरडाठाक होईल का आता? त्या सौंदर्याच्या पलीकडे काही तरी आहे- ते भव्योदात्त असेल पण भीतीदायकसुद्धा असू शकेल, विचारी मनाला चकवा देणारे असेल… म्हणून ते जे काही आहे ते अनाकलनीय असलेलेच बरे असे सळसळून सांगणारा पिंपळ नाहीसा होईल का? नाही होणार तसे काही, असा दिलासा श्रीनिवास विनायक कुलकर्णी वाचल्यावर मिळेल. त्यांच्या लेखांमधून माधुरी पुरंदरेंना ‘उशिरा उठणारे फुलपाखरू’ गवसले. मग या फुलपाखराचे मुलांसाठी पुस्तक झाले. हे असे फार कमी जणांना गवसेल. पण निकोपपणे वाचणार्यांनाही मिळेलच काही तरी. एवढे प्रत्येकाला काही तरी देणारे काय आहे या कुलकण्र्यांच्या पुस्तकांत? याचे थोडक्यात उत्तर असे की, ते जगण्यातून लिहिण्याकडे होणार्या प्रवासाचे संचित आहे. पण म्हणजे काय आहे? यासाठी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या जडणघडणीकडे आणि त्यांच्या साहित्याकडे पाहावे लागेल.
श्रीनिवास विनायक कुलकर्णी सांगलीत कोरडी भिक्षा मागत होते तेव्हा बालकवी, गोविंदाग्रज असे कवी स्मृतिशेष झाले होते. मराठीत नवकाव्याची पहाट होत होती. मुंबईत मर्ढेकरांचा ‘शिशिरागम’ होऊन गेला होता. ते महायुद्ध काळातल्या कविता लिहीत होते. बेंबीचा अर्थ जगाला विचारत होते. नाशकातून पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत लिहिणार्या कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ क्षितिजाच्या पलीकडे उभे असलेले दिवसाचे दूत पाहत होती. बोरकरांच्या गोव्याच्या भूमीत कवितेचे चांदणे माहेराला आलेले होते.
विदर्भातले अनिल आता ‘शाहीर आहे मी तेजस्वी गाणे गाणारा प्रीतीच्या आशावादाचे’ अशा मुक्तछंदात व्यक्त होऊ लागले होते. औदुंबराचा डोह, त्यातला तो सिद्धमठ, देवाची बाग, सळसळणारे वड-पिंपळ आणि त्यातही दत्ताच्या दारातला नदीकाठचाच सोन्याचा पिंपळ… या निसर्गाचा परिसर तर ‘श्रीविं’च्या मनातच राहायला आला होता. पण मनातला दुसरा परिसर कवितेचा. मग तेही कविता करू लागले. कुणासारख्या असे काही नाही. दोन्ही परिसरांचा गंध आणि रंग असलेल्या कविता. त्यांची वाट नवकवितेचीच. मुंबईतल्या एकेकाळच्या मौज साप्ताहिकाशी, सत्यकथा मासिकाशी तिचा अनुबंध तेव्हापासूनचा. ते वाचत, टिपत, वाचलेल्याबद्दल व्यक्त होत.
आधी ओगलेवाडीला, मग कोल्हापुरात, मग कराडात असे ते नोकरीनिमित्त राहिले, तेव्हाचे हे दिवस. सत्यकथेचे संपादक श्री. पु. भागवतांना त्यांनी पाठवलेल्या सविस्तर पत्रांमधून श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्यातला संपादक श्रीपुंना दिसला. ‘मौज’ वार्षिक झाले आणि त्याचे संपादन पुढे या ‘श्रीविं’कडे आले. मौज दिवाळी अंक. त्यातले गद्यलेखक बहुतेक सारे नेहमीचेच. पण कवितांच्या विभागात नवेपणा. यापुढे ज्यांच्याकडे आशेने पाहावे असा नवा कवी कोण हे या विभागातून कळावे, इतका वाचकांचाही विश्वास. त्याच्या जपणुकीचे श्रेय ‘श्रीविं’चे.
कवितेची जपणूक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी फक्त वाचन- संपादनापुरती नाही केली. त्यांनी कवितेला गद्यात आणले. तेही साधे वाटावे अशा अनलंकृत गद्य लिखाणात. ‘‘गळलेल्या प्रत्येक नाजुक फुलाला वार्याने हलकासा स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तर्हा निराळी. एक फूल आपली केशरी देठाची नळी वरती करून, दुर्बिणीतून पाहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वत:च्या दोन पाकळ्यांवर रेलून दुसर्या फुलाशी बोले…’’ यासारखी, पारिजातकाच्या सड्याच्या वर्णनामागची निरीक्षणशक्ती कवीची की दृश्यकलावंताची, असा प्रश्न वाचकाला पडेल.
पण याच परिच्छेदाअखेर, ‘‘प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक-एक निराळी अवस्था निर्माण करून गेलेल्या वार्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहात राही.’’- ही न कळलेल्या वाटेकडे पाहत राहणारी दृष्टी मात्र अभिजात कवीची. काही वाटा अतर्क्यच. त्यांच्याकडे पाहताना मूक साक्षीदार इतकीच आपली भूमिका. तरीही पाहायचे. अनुभवाची चिकित्सा राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय अशा शास्त्रकाट्यांनी न करताही मानव्य जपायचे. चिकित्सेपेक्षा आत्मचिंतन करायचे. तर्काच्या पसार्यातून मतांतरे वाढतात, त्याऐवजी लेखन आणि वाचक यांच्यातले अंतर मिटवायचे. लौकिकाच्या वर्णनातून अलौकिकाकडे नेता आले, तर ठीक. नाही तर लौकिकाचा अस्सलपणा तरी हाती यावा, इतके मनापासून लिहायचे.
यासाठी उत्कटता हवी. तिच्यासाठी काही तोट्यांचीही किंमत प्रामाणिकपणे मोजावी लागते. ती श्रीनिवास विनायक कुलकर्णी मोजतात. उदाहरणार्थ भिलवडी रेल्वे स्थानकात ‘‘सिग्नल्सचे हिरवे तांबडे दिवे. काळोखात तरंगत असल्यासारखे.’’ त्यांना दिसतात, तेव्हा प्रतिमेच्या अंगाने तरी ‘न्हालेल्या जणु गर्भवतीच्या सोज्ज्वळ मोहकतेने बंदर’ मर्ढेकरांना मुंबापुरीत दिसल्याचे वाचकाला आठवल्यास ठीक. पण भिलवडी स्थानकाचे वर्णन त्यावेळचे हे लक्षात घेतल्यास मर्ढेकरांचाच ‘फलाटदादा’ वाचकाला आठवतो. त्यावरले किती तरी पाय, हरेक गार्डाची न्यारी शिट्टी आणि अखेर या फलाटालाच टेकणारी कुरूप काळी पाठ आठवते… समाजवर्णन, व्यक्तिचित्रण हाच श्रीनिवास विनायक कुलकण्र्यांच्या लेखनाचा हेतू असता, तर त्यांनी केवढे तरी लिहिले असते असेही ‘वाल्मिकी कोळी’सारखा कथावजा लेख किंवा ‘पंडित दादा’सारखे (कवी सुधांशु यांचे) व्यक्तिचित्र वाचताना वाटत राहते.
‘उदासीनदास’ हेदेखील एक प्रकारचे व्यक्तिचित्रणच. त्यात समाजदर्शनही आहेच. त्याहीपेक्षा तपश्चर्या, धर्माभिमान, ‘देवदेव करणे’ याकडे आरपार पाहणारी भाष्यकाराची नजर आहे. पण भाष्यकार व्हावे असे श्रीनिवास विनायक कुलकर्णींना तसे कधी वाटले नसणार. किंवा भाष्यकार आपणच कसे काय, लोक कसे नाहीत- त्यांनाही आहेत संवेदना, त्या वापरल्या की त्यांचीही नजर काम करणारच, असेही वाटत असणार. काहीही असो. त्यांना फलाट आणि सिग्नल पाहायचे नव्हते. काळोखात तरंगून पाहायचे होते. तसे केले की मग उजेडातही तरंगता येते. ईदसाठी केलेल्या रोषणाईचे हिरवे दिवे राघूंच्या थव्यासारखे वरखाली झेपावताहेत, हे लहान मुलापर्यंत भिडवता येते. असे लेखक भाषेचे किंवा शैलीचे नव्हे, जगण्याच्या ऊर्मींचे पालनपोषण करत असतात.
अशा साहित्यिकांवर रूपवादी असा शिक्का मारून त्यांना बाद ठरवण्याची पद्धत मराठीत रुळली. ‘वाल्मिकी कोळी’सारख्या लिखाणात जरी जातवैविध्यातूनही उरणार्या आध्यात्मिक जाणिवांचा ठाव घेतला, तरी कुलकर्णींचे आडनावच पाहिले गेले. भूमिका न घेणार्या साहित्यिकांवर झोड उठवली गेली. यातूनही काही साहित्यिक सच्चेपणाने एकटे राहिले. समाज, प्राणीपक्ष्यांसकट निसर्ग, संस्कृ़ती आणि जगण्याच्या संकल्पना यांच्याशी स्वत:चे नाते स्वत:शी प्रामाणिक राहून शोधत राहिले. भूमिका घ्यायची ती बदल घडवण्यासाठी, असेच असेल तर इंदिरा संत यांनी अ. भा. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत उतरूनही ‘मतांचा जोगवा मागणार नाही’ म्हणून स्वत:चा साहित्यिक एकटेपणा जपला; पण त्यातून पुढे संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलली, हेही आठवून पाहावे.
साहित्यिकाच्या सत्त्वाला ओळखून आपण बदलायचे की नाही, हा अखेर लोकांच्या वैचारिक स्वातंत्र्याचा प्रश्न असतो. तो भूमिका घेणार्यांच्याही हातात नसतो. समाजाच्या गाभ्याशी असलेल्या लोकस्वातंत्र्याचे निर्भेळ दर्शन श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या लिखाणातून पुढल्या पिढ्यांनाही घडतच राहील. ‘बालकवींच्या प्रतिभेचे गद्यलेखन’ अशी दाद कबीर, मीरादेखील आकळून घेणार्या मंगेश पाडगावकरांनी दिली आहे. ती मान्य. यातून बालकवींचा औदुंबर आठवणे साहजिक. डोहाकाठचा औदुंबर. स्थितप्रज्ञतेने पाहणारा. डोहात पाय सोडले तरी स्वतंत्र. पण इसाया बर्लिन ज्याला नकारस्वातंत्र्य म्हणतो किंवा शशांक ओक ‘अमुकचे ‘स्वातंत्र्य’’ म्हणतात तेही श्रीनिवास विनायक कुलकण्र्यांनी जपले. कराड-सांगलीचा परिसर सोडायचा नाही, यशवंतराव चव्हाणांसारखे मित्र असूनही राजकीय लाभ घ्यायचे नाहीत, हे या औदुंबराचे स्वातंत्र्य. त्यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.
