वैचारिकतेच्या आणि कृतिशीलतेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांच्यातील साम्यवादी नेहमीच जागा राहिला; परंतु आपले साम्यवादी असणे त्यांनी कधी समोरच्यावर लादले नाही….

‘‘मी वेद वाचलेले आहेत. पुराणे वाचलेली आहेत. विविध धर्मशास्त्रे वाचलेली आहेत आणि म्हणूनच मी साम्यवादी झालेलो आहे’’, असे ठासून सांगण्यासाठी आवश्यक बौद्धिक उंची आणि खोली असलेल्या सीताराम येचुरी यांच्या जाण्याने आपण नक्की काय गमावले हे कळण्यासाठीदेखील किमान गुणवत्ता हवी. एरवी ‘एक नेता गेला’ इतकाच त्याचा अर्थ. अलीकडे एका राज्यात जन्मास येऊन अन्य भाषक समूहांत, देशभर सर्वदूर प्रभाव निर्माण करणारे नेते दुर्मीळच. बहुतांश नेतागणांची धाव फार फार तर एका राज्यापुरतीच. हे वास्तव लक्षात घेतल्यास सीताराम येचुरी यांच्यासारख्या मोजक्यांचे महत्त्व ध्यानात येईल. जन्म तेलुगू ब्राह्मण कुटुंबात पण शिक्षण तमिळनाडूत, केंद्रीय शालान्त मंडळाच्या परीक्षेत देशात सर्वप्रथम येण्याइतकी बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण दिल्लीत, कार्यक्षेत्र पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा, इंग्रजी फर्डे पण त्याच वेळी हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली या भाषांवरही तितकेच उत्तम प्रभुत्व आणि या सर्व भाषांत सहज वक्तृत्व. फक्त या इतक्या गुणांसाठीही सीताराम येचुरी मोठे ठरले असते. याचे कारण इतके सारे गुण एका राजकीय व्यक्तीत आढळणे राहिले दूर, सध्या आपले बरेचसे नेतृत्व निव्वळ भरताड आणि यातील एकही गुण अंगी नसलेले असते. या मुद्द्यावर सीताराम येचुरी यांची तुलना जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी होऊ शकेल. जन्म कारवारचा, कार्यक्षेत्र बिहार, राजकीय भूमी मुंबई आणि प्रभावक्षेत्र देश असलेले फर्नांडिस आणि येचुरी यांच्यात बरेच साम्य आढळेल. असे खऱ्या अर्थाने भारतीय असलेले नेते आताशा निपजत नाहीत याबद्दल शोक व्यक्त करून येचुरी यांचे मोठेपण समजून सांगणे आवश्यक.

हेही वाचा >>> अग्रलेख : दावा, दवा, दुआ!

याचे कारण ते केवळ डावे होते, इतकेच नाही. तसे वा त्यांच्यापेक्षाही कडवे डावे अन्यही काही आढळतील. डावे असोत वा उजवे. यातील बहुतांशांनी आपल्या-आपल्याच विचारधारेचा अभ्यास केलेला असतो. खरे तर त्यास अभ्यास म्हणणेही अयोग्य ठरेल इतपत पोपटपंची हे सर्वसामान्य डावे वा उजवे करत असतात. पण अन्य विचारधारा समजून घेऊन, त्या विचारधारांचा सम्यक अभ्यास करून स्वत:ची बैठक बनवणारे फार थोडे. सीताराम येचुरी या अशा मोजक्यांतील मेरुमणी. त्यामुळेच मार्क्सवाद्यांत सर्रास आढळणारा तुच्छतावाद त्यांच्या ठायी अजिबात नव्हता. आपले बरेच डावे हे आताआतापर्यंत मॉस्को अथवा बीजिंगकडे पाहून बोलत. येचुरी यांनी असे परदेशी पाहणे फारच लवकर सोडले. म्हणूनच डावे असूनही त्यांनी स्वत:स नक्षलवादी चळवळीपासून चार हात दूर ठेवले आणि मार्क्सवादाच्या पलीकडे जात देशी वर्गविग्रह समजून घेतला. त्यांची राजकीय भूमिका वेगळी ठरते ती यामुळे. आपल्या राजकीय इतिहासात पोथीनिष्ठ डावे आणि राममनोहर लोहियांचे समाजवादी अनुयायी इतके वैचारिक आंधळे होते की त्यांनी काँग्रेसला विरोध करण्यासाठी प्रसंगी भाजपशी हातमिळवणी करण्याइतकी वैचारिक बदफैलीगिरी केली. हरकिशन सुरजित यांच्यापासून डाव्यांच्या एका गटास भान यायला सुरुवात झाली. सीताराम येचुरी हे सुरजित यांचे पट्टशिष्य. त्याचमुळे नरसिंह राव यांच्या पराभवानंतर एच. डी. देवेगौडा, इंदरकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदी बसवण्यास आवश्यक राजकीय आघाड्या स्थापण्याची लवचीकता त्यांनी दाखवली. त्या वेळी पडद्यामागील सूत्रधारांत येचुरींची भूमिका मोठी होती. त्याआधी विश्वनाथ प्रताप सिंग यांना भाजपबरोबरीने पाठिंबा देऊन काय होते हे देशाने अनुभवले होते. त्यामुळे वैचारिक मध्यबिंदूच्या डावीकडील सर्वांस एकत्र कसे बांधता येईल असा सुरजित यांचा प्रयत्न असे. तीच भूमिका येचुरी यांनी पुढे नेली.

म्हणूनच २००४ साली वाजपेयी सरकारचा पाडाव करून बनलेल्या काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा द्यावा यासाठी येचुरी यांनी प्रयत्न केले. ते यशस्वी झालेही. पण पक्षातील कर्मठ प्रकाश करात आणि अन्यांपुढे त्यांना अणुकराराच्या मुद्द्यावर हार पत्करावी लागली. अमेरिकेशी अणुकरार करण्यात डाव्यांचा तात्त्विक विरोध होता. ते ठीक. पण म्हणून आपण या मुद्द्यावर सरकारचा पाठिंबा काढून घेऊ नये, जनतेत या मुद्द्याविषयी ममत्व नाही; त्यापेक्षा आर्थिक मुद्दे, विषमता आदी जनतेचे विषय घेऊन सरकारातून बाहेर पडावे असे शहाणे मत येचुरी यांचे होते. ते अस्वीकार झाले आणि विचारधारेच्या पोकळ कारणांखाली डाव्यांनी काँग्रेसच्या सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पण तरी सरकार पडले नाही. येचुरी यांना भीती होती तसेच झाले आणि डाव्यांचे हसे झाले. तेव्हापासून डाव्यांची सातत्याने घसरत चाललेली राजकीय पत सावरण्याची चिन्हे अद्याप तरी नाहीत. त्या वेळी २००८ साली येचुरी यांच्या मताविरोधात डाव्यांनी मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढल्यानंतरही त्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव जेव्हा मंजूर झाला तेव्हा प्रणब मुखर्जी यांस भेटावयास एकच व्यक्ती आवर्जून गेली. सीताराम येचुरी. त्याआधी त्यांच्या पक्षाचे ज्योती बसू यांस पंतप्रधानपदाची आलेली संधी अशाच कर्मठ नेत्यांमुळे हुकली. ही ‘ऐतिहासिक घोडचूक’ होती हे मान्य करण्याचा मोकळेपणा येचुरी यांच्या ठायी होता. येचुरी हे बसू यांचे अत्यंत लाडके. संसदेतील त्यांची भाषणे ही राजकीय/ सामाजिक अभ्यासकांसाठी वस्तुपाठ ठरतील आणि इतरांसही ती मनोरंजक वाटतील. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी तर डाव्यांस न शोभणारी. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी एकदा त्यांचा उल्लेख ‘सीताराम ऑबिच्युअरी’ (मृत्युलेख) असा केला त्यास त्यांनी लगेच ‘जयराम मॉर्च्युरी’ (प्रेतगृह) असे प्रत्युत्तर दिले. संसदेत भाजपस उद्देशून ‘सर्व राम आमच्याकडे (विरोधकांत) कसे आहेत आणि तुमच्याकडे ‘राम’ औषधालाही नाही’ असे त्यांनी इतक्या रसदारपणे सुनावले की भाजप नेत्यांनाही हसत हे मान्य करण्याखेरीज पर्याय राहिला नाही.

हेही वाचा >>> अग्रलेख : वीज म्हणाली

खरे तर हा वैचारिक मोकळेपणा, सहिष्णुता हे येचुरी यांचे मोठेपण. कडवे डावे आणि उजवे यांच्या चेहऱ्यावर बारा महिने चौदा काळ सतत एक जबाबदारीच्या जाणिवेचा जाडसर तवंग पसरलेला असतो. डाव्यांना मानवतेची चिंता तर उजव्यांना संस्कृतिरक्षणार्थ आणखी काय काय करावे लागेल हा प्रश्न. ही अशी माणसे दांभिक असतात आणि कंटाळवाणीही. येचुरी असे अजिबात नव्हते. वैचारिकतेच्या आणि कृतिशीलतेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांच्यातील साम्यवादी जागा नाही असे कधी झाले नाही. परंतु म्हणून आपले साम्यवादी असणे त्यांनी कधी समोरच्यावर लादले नाही. समोरच्याचे मत, मग ते कितीही भिन्न का असेना, येचुरी ऐकून घेत. डाव्या-उजव्यांच्या पल्याडच्या अनेक घटनांत त्यांना रस होता. फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटताना आपणास कोणी बूर्ज्वा म्हणेल याची फिकीर त्यांना नसायची आणि वैचारिकता कलासक्ततेच्या आड यायची नाही. या मनाच्या मोकळेपणामुळेच त्यांचे सर्वपक्षीय संबंध होते. भाजप आणि नरेंद्र मोदी हे खरे तर डाव्यांसाठी अस्पर्शच. अपवाद फक्त येचुरी. एकेकाळी काँग्रेसला डाव्यांनी प्राणपणाने विरोध केला. त्याच डाव्यांतील सीताराम येचुरी हे अलीकडच्या काळात काँग्रेसचे—त्यातही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे— समर्थक/सल्लागार होते. इतके की काँग्रेसच्या गोटात येचुरी यांचे वर्णन ‘आमचे सरचिटणीस’ असे केले जात असे. हे सर्व येचुरी करू शकले कारण ते पढतमूर्ख आणि गुहेत राहणारे ग्रंथजीवी नव्हते म्हणून. जातीयवादी, धर्मवादी शक्ती हे जर डाव्यांपुढील खरे आव्हान असेल तर काँग्रेसशी हातमिळवणी करण्याखेरीज पर्याय नाही, असे ठामपणे मानण्याइतका त्यांचा राजकीय विवेक शाबूत होता. डावे असोत वा उजवे. विचारधारेचे पिंडीवरच्या विंचवाप्रमाणे रक्षण करणाऱ्यांस उदारमतवादी नेहमीच नको असतात. अटलबिहारी वाजपेयी यांचे कडवे टीकाकार हे परिवारातीलच होते आणि येचुरी यांचे खरे विरोधकही कॉम्रेड म्हणवणारेच होते. तेव्हा उभय पक्षांना अशी मनाने मोकळी माणसे नको असणे यात आश्चर्य ते काय! अशा व्यक्तींमुळे त्यांच्या त्यांच्या पक्षांचे भले होत असेल/नसेल; पण राजकारणाचे आणि म्हणून देशाचे भले होत असते. तेव्हा अशा माणसांचे जाणे हे त्यांच्या पक्षापेक्षा देशाचे अधिक नुकसान करणारे असते. सीताराम येचुरी यांचे निधन हे असे नुकसानकारी आहे. व्यासंग, वक्तृत्व, उदारमतवाद, सहवेदनेची क्षमता अशा अनेक बाबींवर कित्येक पटींनी उजव्या असलेल्या या जिंदादिल नेत्यास ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.