लता मंगेशकर यांच्यासह एकाच आकाशात असणे ही मर्यादा सुमनताईंना कधीही जाणवली नाही; किंवा रसिकांनीही सुमनताईंकडे दुर्लक्ष केले नाही…
राजा कालस्य कारणम् म्हणजे राजा काळास आकार देतो. हे वचन आता कालबाह्य झाले असावे. अलीकडे राजे काळाप्रमाणे स्वत:स आकार देतात आणि काळाचे प्रतिनिधित्व करतात. हे सत्य कलाकारासही लागू पडते. कलाकार आपल्या अभिव्यक्तीतून काळाचे चित्र रंगवत असतात. ही अभिव्यक्ती शब्दांची असेल वा सुरांची. त्यामुळे जेव्हा काळ स्तब्ध होता, जेव्हा स्वत:स सिद्ध करण्यासाठी त्या काळातील जनसामान्यांस धावावे लागत नव्हते आणि जेव्हा सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती बेताची होती त्या काळात कवी अनिल ‘गगनी उगवला सायंतारा’ लिहीत होते आणि सुटाबुटातले गजाननराव वाटवे सुटाबुटांचे स्वप्न पाहणार्यांस ते ऐकवत होते. त्याच काळात बबनराव नावडीकर आकाशीच्या चंद्रास ‘…क्षणभर जा ना, मेघांच्या पडद्यात रे’ अशी आर्जवे करत होते; आणि ‘नवखी माझी राधाराणी, लाजे येथ मनात रे’ अशी कबुली देत होते. तर मालती पांडे यांस गदिमांच्या शब्दांत ‘कशी मी सांगू वडिलांपुढे’ असा प्रश्न पडत होता. तो काळ सरला. स्वातंत्र्यानंतरच्या दीडेक दशकानंतर नोकरशाहीच्या जन्मकळा सुरू झाल्या. आजच्या तुलनेत तो काळही मंदच. पण आधीच्या काळापेक्षा काहीसा गतिमान. जाहीरपणे ‘उघडले एक चंदनी दार’ असे म्हणण्यापर्यंत तो धिटावला. स्थिरावला. सुमन कल्याणपूर त्या काळाच्या प्रतिनिधी. स्पर्धा नव्हती. श्रीमंत होणे हे उद्दिष्ट नव्हते.
वर्षाला मिळणार्या वेतनवाढीत महागाई सामावून घ्यायची क्षमता होती. त्या काळाच्या स्वान्तसुखावर सुमनताईंच्या सुरांची मऊशार साय जमा होत गेली. तो काळ सरला. त्या काळाच्या निरागसतेचे प्रतिबिंब असलेल्या सुमनताईही वयपरत्वे आता आपल्यातून निघून गेल्या. गेली काही वर्षे त्यांच्या कलेचा सांधा वर्तमानकाळापासून तुटला होता. आता त्यांचेही अस्तित्व संपले. त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहताना त्या काळाचे आणि सुमनताईंच्या कलेचे स्मरणरंजन अपरिहार्य ठरते.
हा कला आणि काळाचा मुद्दा फार महत्त्वाचा. कारण जेव्हा पौगंडावस्थेतील शरीरसंबंधांस कशी मान्यता द्यावी असा प्रश्न व्यवस्थेला पडावा इतका पुढारलेला (?) काळ वर्तमानात असताना सुमनताई गाऊन गेल्या त्याप्रमाणे ‘नकळत सारे घडले…’ अशी कबुली देणार कोण? आणि दिली तरी ती खरी वाटणार कोणास? ज्या काळात स्वर्गस्थ शक्तीही ‘मॅनेज’ होऊ शकतात त्या काळात सुमनताईंच्या ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ या विश्वासावर कोण विश्वास ठेवणार, हाही प्रश्न. सुमनताई ऐन भरात होत्या त्यावेळच्या काळास एक ठहराव होता. माणसे उगाच ऊर फुटेपर्यंत धावत नव्हती. शब्दांना किंमत होती. सुमनताईंची गाणी त्या काळाच्या आठवणी आहेत. ‘आली बघ गाई गाई’ ही अंगाई वा ‘उठा उठा चिऊताई’, ‘एक होता चिमणा’ ही बालगीते, ‘कशी करू स्वागता’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘प्रियाविण उदास वाटे रात’, ‘तुला ते आठवेल का सारे’ इत्यादी विरहिण्या, भावगीते किती उदाहरणे द्यावीत.
नादमाधुर्य, शब्दमाधुर्य आणि स्वरमाधुर्य या त्रिवेणी संगमाची ही उत्कृष्ट संगीतशिल्पे. तालाचे महत्त्व होतेच तेव्हाही; पण त्यात लयीचा तोल सांभाळला जात होता. त्याकडे अधिक लक्ष दिले जात असे. तालाची दौड कोणालाही आकर्षक वाटू शकते. पण त्यास लयीचे कोंदण नसेल तर त्यातून नुसतीच गती निर्माण होते. हे भान त्या वेळी होते. त्यामुळे त्या काळची गाणी पाहा. अरुण दाते-सुधा मल्होत्रांचे ‘शुक्र तारा मंद वारा’ असो किंवा सुमनताईंचे ‘रे क्षणांच्या संगतीने’सारखी अनेक भावगीते असोत. अवघ्या सात मात्रांच्या रूपकात गाणे होत असे आणि ऐकणारे आनंदाने ठेका धरत असत. इंग्रजीतील म्युझिक ग्रीकपासून उर्दूपर्यंतच्या ‘मौसिकी’ म्हणून समोर येते. या मौसिकीत शब्दांची सुगम्यता आणि संगीताची सुरेलता दोन्हीही अपेक्षित आहे. त्या काळात ते तसे समोर येत असे. आपल्या स्वरांतून अष्टसा्त्विवकतेचे भाव जागे करणार्या सुमनताई या त्या सुरेल काळाच्या प्रतिनिधी. अर्थात तेव्हाचे सगळेच उत्तम आणि आताचे हिणकस असा अर्थ येथे अजिबात अपेक्षित नाही. त्या काळीही ‘ईचक दाना, बीछक दाना’ लिहिणारे आणि त्यावर माना डोलावणारे होतेच. पण त्यास तितके मानमहत्त्व नसे. त्यामुळे सुमनताईंसारख्या कलाकार त्यात टिकू शकल्या.
तथापि बिशनसिंग बेदी जोमात असताना पद्माकर शिवलकर यांचे असणे जितके आव्हानात्मक असते तितकेच लता मंगेशकर ऐन भरात असताना सुमन कल्याणपूर यांचे असणे अवघड असते. या दोघी समकालीन असणे याकडे त्या काळाचे भाग्य म्हणूनही पाहता येईल किंवा एकाच वेळी दोघी होऊन गेल्या म्हणून हळहळही व्यक्त करता येईल. हे दोन्ही करणारे आपल्याकडे उदंड. कलाकाराच्या कलेचा दैवी आनंद घ्यावयाच्या ऐवजी त्या कलाकाराच्या कलाबाह्य बाबी चघळणारेच आपल्याकडे जास्त. हे वास्तव असूनही सुमनताईंनी या अशा मुद्द्यांच्या शोधात असलेल्यांना एकही मुद्दा कधीही दिला नाही. लताबाईंमुळे सुमनताईंवर ‘अन्याय’ झाला किंवा कोणी तरी कोणाचा पत्ता कापला अशा बिनडोक चर्चांत वेळ दवडणार्यांना सुमनताईंकडून कधीच काही मिळाले नाही.
वास्तविक हे असे पत्तेबित्ते कापण्याच्या खेळात रमणे हा दुय्यमांच्या दुनियेतल्या बहुतेकांचा छंद. खरे तर प्रत्यक्षात प्रत्येक अस्सलाच्या पदरात त्याचे माप पडतेच. आज की उद्या इतकाच काय तो प्रश्न. त्यामुळे लता मंगेशकर यांच्यासह एकाच आकाशात असणे ही मर्यादा सुमनताईंना कधीही जाणवली नाही. खरे तर आकाशाची वाटणी करताच येत नाही. त्यामुळे लता मंगेशकर – सुमन कल्याणपूर यांच्याबाबतही ती होता नये. लता मंगेशकर आहेत म्हणून रसिकांनी सुमनताईंच्या गाण्याकडे दुर्लक्ष केले असे कधीही घडले नाही. सुमनताईंनीही त्यांच्याकडील स्वरश्रीमंतीचे माप रसिकांच्या पदरात भरभरून घातले आणि रसिकांनीही त्याची तितकीच प्रेमळ परतफेड केली. लताबाई आणि सुमनताई एकाच काळी असण्याचा उलट फायदा असा की एखाद्याचा कान किती तयार आहे हे मोजण्याचा मापदंड या काळात तयार झाला. लताबाई आणि सुमनताई यांच्या आवाजातील अदृश्य सीमारेषा ओळखता येणे हे कानसेनपदाच्या मार्गावरील महत्त्वाचे पाऊल मानले गेले.
मराठी भावगीतांच्या जोडीने सुमन कल्याणपूर हा आवाज हिंदीतही गुंजला. रुजलाही. अगदी चित्रगुप्त यांच्यापासून ते शंकर जयकिशन यांच्यापर्यंत अनेक संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांच्याकडून हिंदी गीते गाऊन घेतली. त्यातही लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे सुमनताईंच्या एकल गाण्यांपेक्षाही अधिक लोकप्रिय झाली ती त्यांची सहगाणी. उदाहरणार्थ मुकेश यांच्याबरोबरचे ‘मेरा प्यार भी तू है’ किंवा ‘ये मौसम रंगीन समा’, महंमद रफीसमवेत गायलेले ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ किंवा ‘ठहरिये होशमे आ लू’, हेमंतकुमार यांच्याही आवाजात गायले गेलेले ‘न तुम हमे जानो’ अशी अनेक उदाहरणे. सगळ्यांतून सुमन कल्याणपूर या नावातील माधुर्य तेवढे झिरपते. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या द्वैतामागील अद्वैताचे स्मरण करावयाचे तर ‘रहे ना रहे हम’ हे उत्तम उदाहरण. हे गाणे लताबाईंच्या आवाजात आहे. लोकप्रियही आहे. ते एकल. पण तेच गाणे महमंद रफी यांच्यासमवेत सुमन कल्याणपूर यांनीही गायलेले आहे आणि तेही तितकेच लोकप्रिय आहे. अनेकांस ते माहीत नसते इतकेच. दोन्हींचे शब्द वेगळे. सूर वेगळे. पण माधुर्य तेच. तेव्हा सुमन कल्याणपूर आपल्यात असतील. किंवा नसतील. त्यांचा तो अमीट स्वर आपल्यात कायम असेल. या स्वर्गीय माधुर्यास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.
