scorecardresearch

अग्रलेख : यात्रेनंतरच्या यातना!

स्वत:चे प्रतिमा परिवर्तन तुलनेने सोपे असते. त्या मानाने पक्षाचे प्रतिमा परिवर्तन खडतर. ते राहुल गांधी करू शकणार का, ही पुढली परीक्षा..

loksatta editorial rahul gandhi led bharat jodo yatra
राहुल गांधी छायाचित्र

स्वत:चे प्रतिमा परिवर्तन तुलनेने सोपे असते. त्या मानाने पक्षाचे प्रतिमा परिवर्तन खडतर. ते राहुल गांधी करू शकणार का, ही पुढली परीक्षा..

अचानक झालेल्या हवामान बदलात सोमवारी श्रीनगर परिसरात हवा कुंद होती आणि बर्फ पडले. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सांगता जम्मू-काश्मीरच्या राजधानीत होत असताना वातावरण बर्फाळलेले असणे तसे सूचक. त्या वातावरणातील कुंदपणा देशातील सामाजिक-राजकीय वातावरणापेक्षा काँग्रेसच्या अवस्थेशी जास्त जवळचा म्हणता येईल. त्यावर भाष्य करण्याआधी राहुल गांधी यांनी नक्की काय केले याचा एकदा आढावा घ्यायला हवा.

भारत जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी विचारांतून राहुल गांधी यांनी दक्षिणोत्तर पदयात्रा काढण्याचा घाट घातला आणि कन्याकुमारीपासून त्यांनी त्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी ७ सप्टेंबरास त्यांनी देशाच्या दक्षिण टोकाकडून उत्तरेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. म्हणजे ७ सप्टेंबर ते ३० जानेवारी इतका प्रदीर्घ काळ ते चालत होते. या चलयात्रेत त्यांनी तब्बल १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश चालत ओलांडले. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही दक्षिणी राज्ये, मध्य प्रांतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि काही अंशी राजस्थान, उत्तरेकडील दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांतून चालत राहुल जम्मू-काश्मीपर्यंत गेले. हे सर्व अंतर ४०८० कि.मी. इतके प्रचंड आहे. या अंतरात त्यांनी १२ जाहीर सभा घेतल्या, १०० चौकसभा म्हणता येतील अशा लहान-लहान ठिकाणी भाषणे केली, १३ पत्रकार परिषदांतून पत्रकारांच्या आडव्या-तिडव्या प्रश्नांस उत्तरे दिली आणि चालता चालता किमान २७५ जणांशी नियोजनपूर्व संवाद साधला. या काळात जेवताना वा न्याहारीप्रसंगी झालेल्या संवादांची संख्या १०० हून अधिक आहे. केवळ शारीरदृष्टय़ा विचार केला तरी ही संख्या छाती दडपवणारी आहे यात शंका नाही. या काळात पाऊस झाला, कडाक्याचे ऊन झाले आणि थंडीतील कुडकुडणेही त्यांनी अनुभवले. पण या सततच्या वातावरण बदलात पडसे झाले वा ज्वराने ग्रासले, घसा खराब झाला इत्यादी कारणांनी राहुल यांस आजारपणाची सुट्टी घ्यावी लागली नाही, ही निश्चितच कौतुकाची बाब. यात्रेत सर्वच निर्दोष झाले असे म्हणता येणार नाही. कोणताही नेता कितीही कार्यक्षम असला तरी तो कायम अचूक असूच शकत नाही. आपला नेता कधीच चुकत नाही असे ज्यांस वाटते त्यांस भक्त असे संबोधले जाते. तेव्हा कोणताही नेता असतो तितक्याच मर्त्यपणे राहुल गांधी यांच्या हातूनही प्रमाद घडले. उदाहरणार्थ महाराष्ट्रात वि. दा. सावरकर यांच्यावरील अकारण टीकेने निष्कारण ओढवून घेतलेला वाद वा रा. स्व. संघाविषयी विनाकारण केल्या गेलेल्या काही टिप्पण्या. हे टाळता आले असते तर यात्रा अधिक निर्दोष झाली असती. तितकी बौद्धिक खबरदारी राहुल गांधी यांना दाखवावी लागेल. 

याचे कारण असे की अशा विनाकारण सैल भाष्याने ते आपल्या हाताने आपल्या काही संभाव्य मतांस दूर लोटण्याचा धोका आहे. आज परिस्थिती अशी की भाजपचे वैचारिक कुल असलेल्या रा. स्व. संघातील अनेक धुरीणांसदेखील सशक्त विरोधी पक्षाची उणीव कधी नव्हे ते जाणवू लागलेली आहे. संघ फक्त भाजपच्या मागेच उभा राहतो आणि काँग्रेसला अजिबात साथ देत नाही, असे समजणे म्हणजे राजकारणाचे सुलभीकरण. ते टाळून या प्रसंगी राहुल यांनी हिंदूत्ववादी कळपातीलही सहिष्णुवाद्यांस आपल्याकडे अधिकाधिक कसे खेचता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी सैल बोलणे टाळावे. त्याकामी नाना पटोले वा दिग्विजय सिंग इत्यादी हुकुमी गडी तयार आहेतच. आपल्या हलक्या साजिंद्यांची ही सलकी कामे राहुल गांधी यांनी आता तरी सोडायला हवीत. त्यांच्या पक्षाकडे अजूनही किमान १८-२० टक्के मतदार कायम आहेत. यात जसे अन्य धर्मीय आहेत तसे हिंदूही आहेतच आहेत. सर्व हिंदू आमचे आणि आमच्या मागे असे दाखवण्याचा प्रयत्न जरी काहींचा असला तरी सत्य तसे नाही, हे ‘ते’ही जाणतात. त्याचमुळे अजूनही काँग्रेस हा केंद्रीय सत्ताधारी पक्षाच्या सुखेनैव संचारातील महत्त्वाचा अडसर आहे, हे नाकारता येणारे नाही.

या यात्रेचे मूल्यमापन दोन स्तरांवर करावे लागेल. एक म्हणजे या यात्रेने राहुल गांधी यांस काय मिळाले आणि काँग्रेस पक्षाच्या वाटय़ास त्यातील काय येणार. यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे आणि दुसऱ्याचे काँग्रेसने अवघड केले आहे. या यात्रेमुळे राहुल गांधी यांच्या प्रतिमेने कात टाकली. त्यांना यापुढे तितक्या सहजपणे कमी लेखून चालणारे नाही. तथापि एखादी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या परीक्षांबाबत अधिक अपेक्षा निर्माण होतात. आणि जितक्या अपेक्षा अधिक तितका अपेक्षाभंगाचा धोका मोठा. तो टाळणे हे राहुल गांधी यांच्यासमोरील यापुढचे मोठे आव्हान. म्हणजे त्यांना आता शस्त्रे उतरवून ठेवून मधेच गायब होता येणार नाही. सध्याचे राजकारण ही वर्षांचे ३६५ दिवस २४ तास करावयाची गोष्ट आहे. ज्या शारीर उत्साहात राहुल गांधी यांनी समर्थपणे यात्रा तडीस नेली तितक्याच प्रमाणात राजकारणासाठी बौद्धिक आणि मानसिक उत्साह आपल्याकडे आहे हे त्यांना यापुढे सतत दाखवावे लागेल. तरच पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात दडलेले दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस पक्षास मिळेल. ते अधिक महत्त्वाचे आहे. कारण राहुल गांधी यांच्या राजकीय यशापयशात काँग्रेस पक्षाचे यशापयश गुंतलेले आहे. स्वत:चे प्रतिमा परिवर्तन तुलनेने सोपे असते. त्यासाठीचे कष्ट वैयक्तिक. त्या मानाने पक्षाचे प्रतिमा परिवर्तन हे खडतर. यासाठी जे काही करावयाचे आहे ते आता त्यांना आणि पक्षास करावयाचे आहे. म्हणून नेतृत्वसातत्य हवे. या अशा प्रतिमा परिवर्तनासाठी स्वत: घ्यावयाच्या कष्टांस वातावरणीय अनुकूलतेची साथ गरजेची.

ती कधी नव्हे इतकी सध्या मिळू शकते. जवळपास १० वर्षे सत्ता अनुभवल्यानंतर येणारा शिळेपणा आणि सत्ताधाऱ्यांचा अंदाज बांधता येणे, खुंटलेली आर्थिक प्रगती आदी कारणांमुळे विरोधकांस वातावरण अनुकूल ठरू शकते. या शक्यतेचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी लागतो तो राजकीय पोक्तपणा अन्य विरोधी पक्षीय आणि काँग्रेसचे धुरीण या नात्याने राहुल गांधी दाखवतात का, हा यातील खरा प्रश्न. अशा पोक्तपणाचे उदाहरण राहुल गांधी यांस त्यांच्या आजीच्या आणीबाण्योत्तर पराभवात आढळेल. त्या वेळी जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षीयांची मोट बांधली आणि सर्वास घोडय़ावर बसवले. आपला नेता कोण, हे नंतर पाहू – आधी इंदिरा गांधी यांच्याविरोधात एकजुटीने उभे राहू, ही जयप्रकाश नारायण यांची समंजस भूमिका होती. त्यामुळे राजकीय इतिहास घडला. अर्थात विरोधकांची ही मोट फारशी चालली नाही, हे खरे. पण म्हणून तसा प्रयत्नच न करणे योग्य नाही. बदल हा जितका राजकीय पक्षांस हवा असतो त्यापेक्षाही अधिक त्याची गरज जनतेच्या मनात तयार व्हावी लागते.

तशी ती झाली असेल तर राहुल गांधी आणि विरोधकांच्या प्रयत्नांस यश येईल. पण त्यासाठी आधी प्रयत्न तर सुरू व्हायला हवेत. भारत जोडो यात्रेपेक्षाही अधिक खडतर यातना राहुल गांधी यांस या प्रयत्नांत सहन कराव्या लागतील. ते या यातना किती सहन करू शकतात यावर या यात्रेचे यश पक्षासाठी किती उपयोगी हे ठरेल.

मराठीतील सर्व संपादकीय ( Editorial ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 03:37 IST