नारी शक्ती वंदन’च्या सध्याच्या माहोलात वैशाली, दिव्यासारख्या असंख्य महिला देशात आहेत, त्यांना दान नको, मान हवा; त्यासाठी व्यापक भान हवे…

भारताची पहिली बुद्धिबळ विश्वविजेती बनण्यापासून रमेशबाबू वैशाली आता केवळ एक पाऊल दूर आहे. हे आव्हान खडतर असेल. ‘केवळ एक पाऊल’ अशा मोजक्या शब्दांत व्यक्त करण्याइतके सोपे तर अजिबातच नाही. कारण समोरील चिनी प्रतिस्पर्धी जू वेनजून गेली काही वर्षे त्या स्थानावर दिमाखात टिकून आहे. बुद्धिबळात जगज्जेता किंवा जगज्जेती बनणे जितके कठीण, त्यापेक्षाही आव्हानात्मक असते कष्टाने प्राप्त केलेले जेतेपद राखणे. भारताचा विद्यमान बुद्धिबळ जगज्जेता दोमाराजू गुकेश सध्या हेच अनुभवतोय. त्याच्या खेळाचा आलेख ऐतिहासिक जगज्जेतेपद पटकावल्यानंतर घसरलेला दिसतो. तसे पाहता कँडिडेट्स स्पर्धा जिंकल्यामुळे वैशाली सध्या विद्यमान विश्वविजेतीसमोर निव्वळ आव्हानवीर ठरते. तरी बुद्धिबळात इथवरचा प्रवासही कमी खडतर नसतो आणि म्हणून महत्त्वाचा मानला जातो. कारण बुद्धिबळात जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरवण्यासाठी घेतली जाणारी कँडिडेट्स स्पर्धा अत्यंत अवघड मानली जाते. त्याचे कारण म्हणजे एकाहून एक सरस खेळाडू मोठ्या संख्येने यात उतरतात. एकल प्रतिस्पध्र्यासमोर जगज्जेतेपदाच्या लढतीतील डावपेच निराळे असते नि या स्पर्धेतील डावपेच निराळे. यंदा या स्पर्धेत वैशालीबरोबर दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पी यादेखील सहभागी होणार होत्या. परंतु पश्चिम आशियातील अस्थैर्यामुळे आणि स्पर्धास्थळ युद्धग्रस्त टापूजवळील सायप्रस या देशात असल्यामुळे असुरक्षित वाटून हम्पीने माघार घेतली. त्यामुळे वैशाली आणि दिव्या यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. एकूण आठ बुद्धिबळपटूंमध्ये दोघींचे मानांकन सर्वांत खालचे होते. त्यातही वैशाली तर तळाला होती. तरीदेखील आपल्या अधिक मातब्बर बुद्धिबळपटूंना दोघींनी तोडीस तोड टक्कर दिली. वैशालीने तर मोक्याच्या क्षणी विचलित न होता खेळ उंचावून एकाहून एक सरस प्रतिस्पध्र्याला हरवले. शेवटच्या डावात जिंकणे आवश्यक होते, त्यावेळीही वैशाली निर्धाराने खेळली. तिचा खेळ परिपूर्ण आणि निर्दोष होता अशातला भाग नाही. तसा तो अशा उच्च गुणवत्ता स्पर्धेमध्ये कोणाचाच होत नाही. कारण दडपण हा महत्त्वाचा घटक असतो. याशिवाय प्रतिस्पध्र्याची तयारी, छुपे डावपेच, अपरिचित चाली खेळून गोंधळात टाकण्याची क्षमता इत्यादी बाबीही प्रभावी ठरतात. जगज्जेते बनलेले किंवा तिथवर पोहोचलेल्या बहुतेक सर्व बुद्धिबळपटूंमधील समान सूत्र हे मानसिक कणखरपणाचे असते.

या कणखरपणाचा पुरावा प्रस्तुत स्पर्धेत वैशालीच्या बाबतीत मांडणे आवश्यक. तिचे पहिले चारही डाव बरोबरीत सुटले. पाचव्या डावात चीनची झू जिनर हिच्याशी ती पराभूत झाली. झू जिनर अग्रमानांकित. स्पर्धा जिंकण्याची तिची दावेदारी सर्वाधिक प्रबळ. तरीदेखील वैशाली न डगमगता खेळत राहिली. एकामागोमाग एक डाव जिंकून आघाडीवरही गेली. पुन्हा जिनर हिच्याशी मुकाबला नि पुन्हा पराभव. यानंतर दोघी समान गुणांवर आल्या होत्या. नंतरच्या दोन डावांमध्ये किमान पराभूत होणार नाही याची खबरदारी तिने घेतलीच. शेवटचा डाव जिंकूनही दाखवला आणि दिमाखात अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत तान झोंग्यी ही चीनची आणखी एक मातब्बर खेळाडू सहभागी झाली होती. ती माजी जगज्जेती, पण तिच्या एका घोडचुकीचा फायदा घेऊन वैशालीने पहिल्या टप्प्यात सनसनाटी विजय मिळवला. झू जिनर आणि वैशालीने या स्पर्धेत प्रत्येकी पाच डाव जिंकले, पण जिथे जिनरने चार डाव गमावले तेथे वैशाली केवळ दोनच डावांत पराभूत झाली. स्पर्धेत शेवटच्या टप्प्यापर्यंत तिचा पाठलाग करणार्‍या कझाकस्तानच्या बिबिसारा असौबायेवा आणि वैशालीने स्पर्धेत सर्वांत कमी प्रत्येकी दोन डाव गमावले. पण बिबिसाराने चारच डाव जिंकले, तिथे वैशालीचे पाच विजय निर्णायक ठरले. प्रत्येक फेरीत, प्रत्येक टप्प्यावर चढ-उतार अनुभव असतानाही वैशाली निश्चल राहिली. भारताची आणखी एक उदयोन्मुख बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्यासमोर ती पहिल्या टप्प्यात हरता-हरता कशीबशी बचावली. दुसर्‍या टप्प्यात तिने दिव्याला हरवले. दिव्या विश्वचषक विजेती आहे नि वैशालीपेक्षा अजून लहान आहे. भविष्यात तिच्यातही कँडिडेट्स जिंकून आव्हानवीर बनण्याची आणि त्याही पुढे जाण्याची क्षमता पुरेपूर आहे.

पण वैशालीच्या या प्रवासाची कथा बुद्धिबळाच्या पटावर काय घडले याविषयी तपशिलापेक्षाही दीर्घ आणि प्रेरक ठरते. तिचा सख्खा धाकटा भाऊ रमेशबाबू प्रज्ञानंद हा अलीकडे अतिशय प्रतिभावान बुद्धिबळपटू. त्याची प्रतिभा तो १२ वर्षे वयाचा असल्यापासूनच दिसू लागली होती. सुरुवातीस प्रज्ञानंद आणि नंतर गुकेश दोघेही षोडशवर्षीय होण्याआधापीसूनच बुद्धिबळविश्वात धुमाकूळ घालू लागले. त्या वेळेपासून पुढे काही  काळ वैशालीची ओळख ‘प्रज्ञानंदची बहीण’ अशीच बनू लागली. हे तिच्यासाठी विलक्षण अन्यायकारक होते. कारण वैशालीची प्रगती आणि प्रतिभा स्वयंप्रकाशी होती. पण प्रज्ञानंदच्या सावलीतून तिला बाहेर काढायला चाहते, विश्लेषक आणि काही प्रमाणात माध्यमे (‘लोकसत्ता’ नव्हे) तयार नव्हती. तो अन्याय दूर करायचा, तर स्वत: अधिक तेजाने तळपणे हाच मार्ग होता. वैशालीने तो स्वीकारला. तिची वाटचाल स्वतंत्रपणे सुरू झाली. अनेक टप्पे येत गेले. बुद्धिबळातील सर्वोच्च असा ग्रँडमास्टर किताब तिने डिसेंबर २०२३मध्ये मिळवून दाखवला. त्यावेळी ती देशातली एकूण ८४वी ग्रँडमास्टर, तरी कोनेरु हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्यानंतर तिसरीच भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली होती. वैशाली-प्रज्ञानंद ही ग्रँडमास्टर किताब मिळवणारी जगातली पहिलीच बहीण-भाऊ जोडीदेखील ठरली होती. ‘लोकसत्ता’ने ‘ग्रँडमास्टर भावंडांत थोरली’ या ‘अन्वयार्थ’मधून (१६ डिसेंबर २०२३) तिच्या कामगिरीची दखल घेतली होती. प्रज्ञानंदच्या कौतुकामुळे सुरुवातीस आपल्याला अस्वस्थ वाटे आणि त्यावेळची आपली वागणूक आदर्श नव्हती, असे तिने एका मुलाखतीत प्रांजळपणे कबूल केले होते. माजी जगज्जेता आणि सध्याचा सर्वांत प्रतिभावान बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला प्रज्ञानंदने मध्यंतरी सातत्याने हरवले; पण तशी कामगिरी वैशालीने प्रज्ञानंदच्या कितीतरी आधी चेन्नईतील एका प्रदर्शनीय डावात करून दाखवली होती. त्या वेळी विश्वनाथन आनंदविरुद्ध जगज्जेतेपदाची लढत खेळण्यासाठी आलेल्या कार्लसनशी काही द्वंद्व करण्याची संधी काही उदयोन्मुख बुद्धिबळपटूंसह वैशालीला मिळाली. तो डाव अर्थातच प्रदर्शनीय स्वरूपाचा असला तरी कार्लसन सहसा पटावर कधीही विरंगुळा म्हणून मोहरी हलवत नाही. प्रज्ञानंदच्या कौतुकात या वास्तवाकडे दुर्लक्ष झाले होते. निव्वळ ग्रँडमास्टर बनणे हे वैशालीचे ध्येय नाही. कोणत्याही महत्त्वाकांक्षी बुद्धिबळपटूप्रमाणे जगज्जेतेपद हे तिचेही ध्येय आहे. त्या शीर्षस्थ लढतीपर्यंत जाण्यासाठीही अनेक टप्पे, स्पर्धा, पात्रता फेर्‍या असतात. वैशाली दोन वर्षांपूर्वीच अशाच कँडिडेट्स स्पर्धेत दुसर्‍या स्थानापर्यंत पोहोचली होती. यावेळी तिने आणखी पुढची मजल मारली.

तशी अपेक्षा यावेळी प्रज्ञानंदकडून बाळगली जात होती. पण ‘वैशालीचा भाऊ’ ती पूर्ण करू शकला नाही. आता त्याला आणखी किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. कोनेरु हम्पी, द्रोणवल्ली हरिकापाठोपाठ आता वैशाली, दिव्या देशमुख या बुद्धिबळपटू स्वप्रतिभेने तळपत आहेत, महत्त्वाकांक्षेने स्वत:ला घडवत आहेत. भारताच्या पुरुष बुद्धिबळपटूंच्या बरोबरीने लखलखती कामगिरी करून दाखवत आहेत. दिव्याने अलीकडेच प्राधान्याने महिलांसाठीच्या स्पर्धांऐवजी खुल्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. जगातली पहिली महिला ग्रँडमास्टर ज्युडीथ पोल्गारने तिचे याबद्दल मनापासून कौतुक केले. ‘नारी शक्ती वंदन’च्या सध्याच्या माहोलात वैशाली, दिव्यासारख्या असंख्य महिला देशात आहेत, ज्यांना दान नको आहे, मान हवा आहे. आणि याबाबत व्यापक भान हवे आहे. नको आहे ते लाभार्थीपण आणि कृपाभिलाषी अस्तित्व. सौभाग्याकांक्षेपेक्षा महत्त्वाकांक्षा आणि वैशाली-दिव्याच्या बाबतीत विश्वविजयाकांक्षा हे ईप्सित आहे. ते साध्य करताना कुणी वंदन करते वा निंदा करते वा कृपेचा आभास निर्माण करते त्याची दखल घेणे यांच्या खिजगणतीतही नाही.