घातक रसायने, जिवाणू आपल्या मसाल्यांत असल्याचे परदेशी यंत्रणांकडून आपणास कळत असेल तर आपले अन्न प्रशासन नक्की करते काय?

मसाल्याचे पदार्थ ही खास भारताची जगास देणगी. येथील लवंग, तमालपत्र, काळी मिरी, वेलची इत्यादी घटकांनी जगभरातील अनेकांच्या भोजनास स्वाद दिलेला आहे. ख्रिास्तपूर्व कालापासून भारतातून मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होत होती… आशिया खंडातील इंडोनेशियादी देश भारतातून मसाले घेऊन जात. भूमध्य समुद्रमार्गे हे मसाले युरोप खंडात पोहोचत. या मार्गावर मसाल्यांची त्या वेळी इतकी गजबज होती की त्याचे नावच त्यामुळे ‘इन्सेन्स रूट’ असे पडले. भारतातील या मसाल्यांचे अत्यंत प्रगत व्यापार केंद्र म्हणजे केरळातील कालिकत. मलबार प्रदेशातील हे शहर- आताचे कोझिकोड- त्या वेळी जागतिक व्यापार मार्गावर होते. तथापि एके काळी जगभरातील नागरिकांच्या अन्नाची चव वाढवणाऱ्या या भारतीय मसाल्यांचा लौकिक मातीस मिळण्याचा धोका आहे. अन्न दर्जाबाबत अत्यंत जागरूक असलेल्या विकसित देशांतील अनेकांनी भारतीय मसाल्यांतील भेसळ दाखवून दिली असून महासत्ता होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील अन्न सुरक्षा यंत्रणांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आधी सिंगापूर, मग हाँगकाँग आणि आता अमेरिकेसारख्या देशाने भारतीय मसाल्यांत किती घातक पदार्थ असतात हे दाखवून दिले आहे. अमेरिकेने तर गेल्या काही महिन्यांत भारतातून त्या देशात निर्यात झालेल्यांतील जवळपास एकतृतीयांश मसालासाठा खाण्यास अयोग्य म्हणून परत पाठवला. अमेरिकेने आपल्या मसाल्यांस त्यांच्या देशात पाऊलही टाकू दिले नाही. या काळात भारतीय मसाले घेऊन गेलेल्या जवळपास ११ बोटींस अमेरिकेने प्रवेश नाकारला. या मसाल्यांत ‘साल्मोनेला’ या जिवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळला. त्याआधी सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनीही भारतीय मसालेसाठे परत पाठवले. त्यात कर्करोगास आमंत्रण देणारे घातक रसायन आढळले. जे झाले ते कशामुळे याची चिकित्सा यानिमित्ताने व्हायला हवी.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial spices board bans some indian brand products from singapore and hong kong amy
First published on: 30-04-2024 at 03:09 IST