‘सोनी’ आणि ‘झी’च्या विलीनीकरणाचे जे भजे झाले त्यात सरकारचा थेट हात नाही; पण याचे खरे लाभार्थी कोण असू शकतात याचा अंदाज नवख्यांनाही बांधता येईल…

झी एन्टरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स या कंपन्यांतील विलीनीकरण बोंबलले त्या वेळी ‘झी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत गोएंका हे अयोध्येत रामलल्ला विराजमान होताना पाहत होते. हा क्षण स्मृतिकोषात जतन करण्यासाठी आणि या सोहळ्याच्या कर्त्या-करवित्यांच्या स्मृतीत आपली उपस्थिती नोंदली जावी यासाठी अनेक चित्रपट तारेतारका आणि उद्याोगपतींनी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेरी लावली. पुनीत हे त्यातील एक. ते अयोध्येत असताना ‘सोनी’ व्यवहार फिसकटल्याची बातमी आली. त्यावर हा ‘परमेश्वरी संकेत’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भारतीय उद्याोगजगताचे एक परमेश्वर मुकेश अंबानी हेही त्या वेळी अयोध्येत होते. पुनीत गोएंका यांची प्रतिक्रिया ही त्यांस उद्देशून होती किंवा काय हे ठाऊक नाही. परंतु ‘सोनी’ या बलाढ्य आंतरराष्ट्रीय माध्यम कंपनीने ‘झी’स विलीन करून घेणे अखेर नाकारल्यानंतर सुभाष चंद्र प्रणीत ‘झी’ आता अंबानी यांच्या साम्राज्याचा हिस्सा होणार किंवा काय; याबाबत चर्चा सुरू झाली. ‘झी’ आणि ‘सोनी’ यांचे फाटणे हा विषय केवळ या दोन कंपन्यांपुरता मर्यादित नाही. त्यास अनेक आयाम आहेत. भारतीय माध्यम जगताचा महाप्रचंड आकार आणि या बाजारपेठेसाठीची स्पर्धा लक्षात घेता हा विषय समजून घेणे आवश्यक ठरते. विशेषत: आधुनिक समाजमन घडवण्यात माध्यमांची भूमिका किती निर्णायक ठरते हे लक्षात घेतल्यास ‘झी’ आणि ‘सोनी’ यांच्यातील व्यवहार आणि त्याचे फसणे यामागील अन्वयार्थ जाणून घ्यायला हवा.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती

सोनी आणि झी यांच्यातील ही तब्बल एक हजार कोटी डॉलर्स गुंतवणुकीची विलीनीकरण चर्चा २०२१ च्या डिसेंबरपासून सुरू आहे. तेव्हापासून आजतागायत अनेक कारणांनी ही चर्चा फिसकटते की काय असे अनेकदा वाटले आणि अनेक कायदेशीर मुद्द्यांनीही यात अडचणी निर्माण होत गेल्या. त्यावर मात करून हे विलीनीकरण रेटले जाईल, असा निर्धार उभय बाजूंनी व्यक्त केला जात होता. पण अखेर ‘सोनी’चा धीर सुटला आणि हा विलीनीकरण करार रद्द करत असल्याचे या कंपनीने जाहीर केले. अटी पाळण्याबाबत ‘झी’कडून चालढकल होत असल्याने हा करार रद्द करत असल्याचे सोनीचे म्हणणे. या करारातील अटीचा वादग्रस्त मुद्दा म्हणजे पुनीत गोएंका यांचे पद. ‘सोनी’तील विलीनीकरणानंतर ‘झी’चा संभाव्य एकत्रित कंपनीतील वाटा जेमतेम चार टक्के इतका राहिला असता. पण तरीही या नव्या संभाव्य संमीलित कंपनीचे प्रमुखपद गोएंका यांच्या हाती असावे, असा ‘झी’चा आग्रह. याचा अर्थ असा की विलीनीकरणानंतर ‘झी’ समूह आणि प्रवर्तक सुभाष चंद्र नव्या कंपनीतील आपले आर्थिक स्वामित्व गमावणार पण तरीही या नव्या कंपनीचे प्रमुखपद ‘आपल्या माणसा’हाती राहील याची खबरदारी घेत या कंपनीचे नियंत्रण स्वत:हाती ठेवणार. ‘सोनी’ समूहास हे मंजूर होणे अशक्य. पैसेही घालायचे, आर्थिकदृष्ट्या संकटातील वाहिनीची जबाबदारी घ्यायची आणि तरीही नियंत्रण मात्र आपल्या हाती नाही, असा हा प्रकार. कोणत्याही गुंतवणूकदारास हे मंजूर होणे अशक्यच. ‘सोनी’ने हे विलीनीकरण रद्द करण्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही. पण ते गोएंका यांचे प्रमुख पद राखण्याचा आग्रह हे आहे, असेच मानले जाते. तथापि नंतर गोएंका हा पदाचा आग्रह सोडण्यास तयार होते, पण आता ‘सोनी’च तोंड फिरवतो अशा प्रकारची तक्रार ‘झी’कडून सुरू आहे. तीत काही तथ्य नाही. ‘झी’ आता ‘सोनी’वर दावा ठोकण्याचीही भाषा करते. ती तर त्याहूनही तथ्यहीन. झाले ते इतकेच. पण प्रश्न या दोन कंपन्यांचा नाही.

तर जवळपास २.१ लाख कोटी रुपयांच्या भारतीय माध्यम बाजारपेठेचा आहे. त्यातील महत्त्वाचे खेळाडू कोण? सध्याचा सगळ्यात आघाडीचा समूह म्हणजे रिलायन्स. दुनियेप्रमाणे या समूहाने माध्यमेही कधीच मुठीत घेतलेली आहेत. डिस्ने-स्टार हा डिजिटल क्षेत्रातील सगळ्यात मोठा खेळाडू. तो आता रिलायन्सच्या दावणीला बांधला जाईल. यामुळे डिस्ने-हॉटस्टारच्या जोडीने जवळपास ७० वाहिन्या रिलायन्सच्या मालकीच्या होतील. यात ‘नेटवर्क १८’च्या ५८ दूरचित्रवाणी वाहिन्या. म्हणजे सीएनबीसी, मनीकंट्रोल, कलर्स इत्यादी. यात हूट, जिओसिनेमा इत्यादींची भर घातल्यास भारताचे मनोरंजन विश्व संपूर्णपणे बड्या भाईच्या हाती आहे. अंबानी समूहाच्या गणपत्युत्सवास, दिवाळीस चित्रपट क्षेत्रातील तारेतारका, आपले क्रिकेट भारतरत्न इत्यादी हजेरी का लावतात याचे कारण या मालकीत आहे. डिजिटल, दूरचित्रवाणी वाहिन्या इत्यादी सर्व मोजदाद केल्यास एकट्या रिलायन्स समूहाची प्रेक्षकसंख्या तब्बल ३० कोटींहून अधिक भरते. इतके दिवस अन्य उपकंपनीच्या माध्यमातून ‘एनडीटीव्ही’ या त्यातल्या त्यात बातमीदारी करू पाहणाऱ्या वृत्तवाहिनीची मालकीही रिलायन्सच्या हाती होती. ती अलीकडे अलगदपणे अदानी समूहाकडे गेली. याचा अर्थ भारतीय वृत्तमाध्यमांवर या दोन उद्याोगसमूहांची सरळ सरळ मालकी आहे. माध्यमांवर मालकी म्हणजे ‘बातम्यां’वर मालकी हे ओघाने आलेच. या पार्श्वभूमीवर ‘झी’ आणि ‘सोनी’ यांच्या विलीनीकरणाचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. आजमितीस ‘रिलायन्स’ समूहाच्या नियंत्रणाखालील डिस्ने-स्टारकडे दूरचित्रवाणी बाजारपेठेचा साधारण २२ टक्के वाटा आहे. तर ‘सोनी’ आणि ‘झी’ यांचे विलीनीकरण यशस्वीपणे झाले असते तर या दोन वाहिन्यांनी भाषिक, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील वाहिन्यांद्वारे बाजारपेठेचा २४ टक्के वाटा स्वत:कडे राखला असता. ते आता होणार नाही. तेव्हा या फसलेल्या विलीनीकरणाचे खरे लाभार्थी कोण असू शकतात याचा अंदाज बांधण्यास बाजारपेठ अभ्यासक असण्याचीही गरज नाही.

आपल्याकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवण्याचा इतिहास फार मोठा. एन्रॉनपासून आताच्या सोनीपर्यंत अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात हात पोळून घेतले. आताही ‘झी’चे जे काही झाले ते पाहून आणि ‘सोनी’स दोन वर्षांनंतरही हाती काहीच लागले नाही हे लक्षात घेऊन कोणीही परदेशी गुंतवणूदार या क्षेत्रात पडण्यास धजावणार नाही. याचा अर्थ असा की दूरसंचार असो की बंदरे – वीज असो वा मनोरंजन. भारतीय बाजारपेठ आता काही फक्त मूठभरांच्या हातीच राहणार. हे असे पारदर्शी आणि प्रामाणिक स्पर्धेअंती राहिले असते तर त्यात काही तक्रार करण्याचे कारण नव्हते. याआधी भारतीय मुद्रित माध्यमांत परदेशी गुंतवणूक करू देण्यावरून असाच संघर्ष झाला होता. परदेशी कंपन्यांस भारतीय वृत्तपत्रांत भांडवली गुंतवणूक करू दिली जाऊ नये, अशी भूमिका देशातील मक्तेदारी वर्तमानपत्र समूह आणि काही स्वदेशीवाद्यांनी घेतली होती. वरवर पाहता हा मुद्दा स्वदेशीचा इत्यादी होता. पण खरे कारण परदेशी वृत्तसमूह ‘आपले’ नियंत्रण झुगारून देतील ही सत्ताधीशांची भीती त्यामागे होती. ‘सोनी’ आणि ‘झी’चे विलीनीकरणाचे जे काही भजे झाले त्यात सरकारचा प्रत्यक्ष हात नाही, हे खरे. पण असे अनेक मुद्दे प्रत्यक्षापेक्षा अप्रत्यक्षपणेच रेटले जातात हेदेखील खरे.

अशा तऱ्हेने अनेक क्षेत्रांत भारतीय बाजारपेठ अल्पसत्ताकांच्या (म्हणजे ऑलिगार्क) हाती जाण्याचा असलेला धोका मनोरंजन, दूरचित्रवाणी वाहिन्या या क्षेत्रांतही संभवतो. म्हणून ‘झी’ वाहिनीही उद्या अंबानी वा अदानी यांच्यापैकी कोणा घरची झाल्यास आश्चर्य नाही. तसे झाल्यास आपलीही अर्थव्यवस्था अल्पसत्ताकांस आंदण दिल्यासारखे होईल.