एका पक्षाहाती राज्य दिले की ब्रिटिश मतदार त्या पक्षास दिवे लावण्यासाठी पुरेसा अवधी देतात! पण हे वास्तव ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना दिसत नसावे…

विरोधकांकडे काही कार्यक्रमच नाही, त्यांच्याकडे देशास पुढे नेण्याचा विचार नाही, त्यांना फक्त सत्तेत रस आहे आणि ते गोंधळलेले आहेत. सबब आमचा पराभव होणे देशास मागे नेणारे असेल, आमच्या पराभवाने देशाच्या प्रतिस्पर्ध्यास अधिक आनंद होईल आणि आम्हास बहुमत मिळाले नाही तर देश अराजकाच्या वाटेने जाईल इत्यादी विधाने सत्ताधारीच जेव्हा करू लागतात तेव्हा आपल्या पराभवाची चाहूल त्यांना लागलेली असते. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांस ती लागलेली असावी. अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सुनक यांच्या हुजूर पक्षाने दणकून मार खाल्ला. त्याच्या जोडीने लंडनसह काही महत्त्वाच्या शहरांच्या महापौरपदाच्या निवडणुकांतही सुनक यांच्या पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्या देशात महापौरपद हे आपल्यासारखे शोभेचे नसते. महापौर हा त्या त्या शहराचा मुख्यमंत्री असतो आणि स्थानिक पोलिसांसह सर्व यंत्रणांवर त्याचे नियंत्रण असते. त्यामुळे महापौरपद हे तिकडे फार महत्त्वाचे. इंग्लंडातील जवळपास सर्व महत्त्वाच्या शहरांचे महापौरपद या निवडणुकांत मजूर पक्षाकडे गेले. लंडनच्या महापौरपदावर २०१६ पासून मजूर पक्षच ठाण मांडून आहे. तेथील महापौरपदी स्वपक्षीय नेता बसवण्यात पंतप्रधान सुनक यांसदेखील यश आले नाही. तथापि इतका मार खाल्ल्यानंतर आपले काही चुकले असेल, आपल्या ध्येयधोरणांतही काही सुधारणांची गरज असेल हे मान्य करण्यास हे सुनक तयार नाहीत. त्यांचे म्हणणे एकच. ते ज्या पक्षाचे नेतृत्व करीत आहेत त्या पक्षास पुन्हा सत्ता मिळाली नाही तर पार्लमेण्ट त्रिशंकू राहील, आघाडीचे सरकार येईल आणि देशाची वाटचाल अस्थिरतेकडे सुरू होईल. सुनक यांचे हे दावे तपासून पाहिल्यास काय दिसते?

Loksatta editorial Controversy between Sanjeev Goenka and KL Rahul the owner of Lucknow Super Giants franchise in the Indian Premier League
अग्रलेख: मुजोर, मग्रूर, मध्ययुगीन..
China Becomes India Top Trade Partner
­­­­अग्रलेख : डोळे वटारता वटारता…
Loksatta editorial Sam Pitroda Congress made a controversial statement on diversity in India
अग्रलेख: उष्मा उसळला; कान झाका!
Loksatta editorial Court verdict in the case of the murder of Dr Narendra Dabholkar to eliminate superstition
अग्रलेख: श्रद्धा निर्मूलन!
loksatta editorial joe biden imposes heavy import tariffs on chinese imports
अग्रलेख : बाजार कुणाचा उठला…
Loksatta editorial Election Commission is impartial About the disturbance at the polling stations
अग्रलेख: कल्पनाशून्य कारभारी!
Mumbai Ghatkopar hoarding collapse incident
अग्रलेख : फलक-नायक फळफळले…
Tributes pour in for banker N Vaghul.
अग्रलेख : बँकर्सकार

ताज्या निवडणुकांत १०७ स्थानिक स्वराज्य संस्थांतील ४७८ नगरसेवक आदी पदे सुनक यांच्या हुजूर पक्षाने गमावली. त्याच वेळी मजूर पक्षाचे १८६, लिबरल डेमॉक्रॅट्सचे १०४ आणि पर्यावरणवादी ‘ग्रीन’ पक्षांचे ७४ नगरसेवक अधिक निवडून आले. तर ९३ जागांवर अपक्ष वा अन्य पक्षीय निवडून आले. तर मजूर पक्षाची मजल हजार जागांच्या पलीकडे गेली. ‘स्काय न्यूज’ वृत्तवाहिनीनुसार मजूर पक्षास या निवडणुकांत ३५ टक्के मते मिळाली तर सुनक यांच्या हुजूर पक्षाचा वाटा २६ टक्क्यांवरचा मर्यादित राहिला. लक्षणीय मते मिळवली ती लिबरल डेमॉक्रॅट्सनी. त्या पक्षाच्या पदरात १६ टक्के मते पडली. याचा अर्थ मतदारांचा कौल हा सत्ताधारी हुजूर पक्षाच्या विरोधात आहे, असे स्पष्ट दिसते. त्यातही जेव्हा ब्रिटिश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी होतात तेव्हा त्यातून वारे कोणत्या दिशेने वाहतात याचा अंदाज निश्चित बांधता येतो. याआधी त्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या २०२१ साली. त्या वेळी पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन होते आणि करोनाकाळातील बेकायदा पार्ट्या इत्यादी काही उजेडात आलेले नव्हते. त्या पार्ट्यांत जॉन्सन दोषी आढळले आणि नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याआधी झालेल्या स्थानिक निवडणुकांत त्यांच्या हुजूर पक्षास ३९ टक्के इतकी मते पडली होती आणि त्या वेळी मजूर पक्षास ३० टक्के मतदारांचा पाठिंबा होता. लिबरल डेमॉक्रॅट्सना जेमतेम १३ टक्के मते मिळाली होती. त्या तुलनेत आताची मत टक्केवारी पुरेशी बोलकी म्हणायला हवी. सत्ताधारी हुजूर पक्षाच्या अंगणातील जवळपास १३ टक्के मतांची धूप या निवडणुकांत झाल्याचे स्पष्ट दिसते.

पण हे मान्य करणे ऋषी सुनक यांस जड जात असावे. तसे होणे साहजिक. कोणत्याही शीर्षस्थ नेत्यास आपल्या सत्ताकाळात स्वपक्षाचा ऱ्हास झाला हे मान्य होणारे नाही. तेव्हा नाव जरी ऋषी असले तरी हे सुनक काही भौतिक विकारांपासून दूर गेले असतील असे समजण्याचे काहीही कारण नाही. पण म्हणून आपल्याखेरीज जो कोणी सत्तेवर येईल तो इंग्लंडास भिक्षेस लावेल असा सूर लावणे अयोग्य. त्या देशात २०१० सालापासून हुजूर पक्ष सत्तेवर आहे. टोनी ब्लेअर आणि नंतर त्यांचेच अर्थमंत्री होते ते गॉर्डन ब्राऊन यांचे सरकार गेल्यानंतर सलग हुजूर पक्षाकडे सत्ता राहिली. त्याआधी जवळपास तितकीच वर्षे मजूर पक्षाने राज्य केले. टोनी ब्लेअर यांचा कार्यकाल सुरू झाला १९९७ साली. ते सलग तीन वेळा निवडून आले आणि पंतप्रधान झाले. परंतु त्याच्याआधी जवळपास २० वर्षे हा पक्ष सत्तेबाहेर होता. हॅरॉल्ड विल्सन आणि मधेच पंतप्रधान झालेले जॅम्स कॅलॅघन हे मजूर पक्षाचे सरकार १९७९ साली सत्ताच्युत झाले. याचा अर्थ असा की त्या देशात एका पक्षाहाती राज्य दिले की तेथील मतदार त्या पक्षास दिवे लावण्यासाठी पुरेसा अवधी देतात. त्याप्रमाणे गेली १४ वर्षे हुजुरांहाती सत्ता राहिली. डेव्हिड कॅमेरून यांच्या विजयाने २०१० साली मजूर पक्षाच्या सत्ताकाळास खीळ बसली. आज त्यांच्याच हुजूर पक्षाचे उत्तराधिकारी असलेले ऋषी सुनक हे आघाडी सरकारच्या नावे भीती निर्माण करताना दिसतात. परंतु कॅमेरून यांस पहिल्यांदा आघाडीचेच सरकार स्थापन करावे लागले. पहिल्यांदा लिबरल डेमॉक्रॅट्सचे निक क्लेग यांनी पाठिंबा दिला म्हणून मजूर पक्षाची सत्ता जाऊन हुजूर सत्तेवर आले. हुजूर पक्षास स्वत:च्या जोरावर सत्ता मिळाली ती कॅमेरून यांच्या दुसऱ्या खेपेस. परंतु त्यांनी ब्रेग्झिटच्या मुद्द्यावर घोळ घातला आणि हुजूर पक्षाची नौका तेव्हापासून बागबुग करू लागली. पुढे हुजूर पक्षाच्या थेरेसा मे, बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस अशा एकापेक्षा एक नेत्यांनी दिवे लावल्यावर ऋषी सुनक यांच्या हाती सत्ता आली. तथापि नारायण-सुधा मूर्ती कन्या पत्नीच्या उत्पन्नापासून ते स्वत:च्या नागरिकत्वाच्या मुद्द्यापर्यंत सुनक यांना तेथील माध्यमे आणि जनता यांनी सुनावले. त्यात जॉन्सन यांच्यापासून गाळात गेलेली आणि आता कुठे वर येऊ लागलेली त्या देशाची अर्थव्यवस्था. ती सुधारण्यात अब्जाधीश सुनक यांस फार काही यश आले असे म्हणता येणार नाही. तेव्हा त्यांच्या हुजूर पक्षाचे तारू भरकटताना दिसत असेल तर यात काही फार अघटित घडते आहे असे नाही.

अघटित आहे ते आपल्या नंतर काय होणार याबाबतचे त्यांचे रडगाणे. आपल्याच देशातील राज्यकर्त्या पक्षांचा इतिहास पाहता हे असे होते, दोन दोन दशके सत्ता राबवल्यानंतर सत्ताबदल होतो आणि तो खिलाडूपणे घ्यावयाचा असतो, हे या सुनकांस कळावयास हवे. त्यांच्या विधानांवरून हे काही कळत असल्याची खात्री देता येत नाही. सुनक त्यामुळे तिसऱ्या जगातील एखाद्या देशाचे प्रमुख असावेत असे अरण्यरुदन करताना दिसतात. या जगांतल्या अनेक देशांतील नेत्यांस आपल्यानंतर अंधार असे वाटत असते. ‘‘पण समोर आहेच कोण’’, असा प्रश्न ते विचारतात. ब्रिटिश लोकशाहीस हे शोभणारे नाही. सुनक यांनी या रांगेत बसू नये. जगास स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण देणारी फ्रेंच राज्यक्रांती झाली त्याआधी त्या देशावर पंधराव्या लुई या राजाची सर्वंकष सत्ता होती. त्याची मजबूत पण क्रूर, स्थिर पण दिशाहीन अशी राजवट जेव्हा क्रांतीत उलथून पडणार हे स्पष्ट झाले तेव्हा त्याच्या तोंडातून उद्गार निघाले: ‘‘आफ्टर मी द डेल्यूज’’. म्हणजे मी गेलो तर देशाचे काही खरे नाही. आपणही या लुईचे पाईक आहोत हे सुनक यांनी दाखवून देऊ नये.