विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला काही मिळाले नाही ही बाब कशाहीपेक्षा अधिक महत्त्वाची मानण्याचा आनंद नागपूरने मात्र हिरावून घेतला…
जत्रेत एखाद्या लहानशा रिंगणाचे जे महत्त्व ते आणि तितकेच आपल्या लोकशाही नामे निवडणूक जत्रेत विधान परिषद निवडणुकांचे स्थान. ज्यांची सोय विधानसभेत करता येत नाही वा जे विधानसभेत उतरवण्यास योग्य (की लायक?) नसतात आणि तरीही ज्यांना शांत करण्याची गरज असते अशा व्यक्तींची सोय लावण्याचे स्थळ म्हणजे हे सभागृह. त्या सदनाचे एकंदर स्थानही तसे दुय्यम. अशा विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकांचे महत्त्व ते काय! त्या निवडणुकांचा परीघही लहान आणि त्यांचे परिणामक्षेत्रही मर्यादित. परत मतदार संख्या अगदीच मोजकी.
अशा सर्व कारणांमुळे परिषद निवडणुका हा बहुश: एक उपचार असतो. त्यांच्या निकालात ना कोणता कल असतो ना कसली चाहूल. तथापि ग्रामपंचायतीची असो अथवा लोकसभेची; प्रत्येक निवडणूक जिवाच्या आकांताने लढण्याचा नवाच पायंडा भाजपने पाडलेला असल्याने आताच्या निवडणुका आणि मुख्य म्हणजे त्यांचे निकाल चर्चेत आले. त्यात साक्षात पंतप्रधान, गृहमंत्री आदी महारथींनी या निकालांवर समाजमाध्यमी भाष्य केल्याने तेथील उतावीळ अर्धवटरावांसही चेव चढला.
वास्तविक देशास महासत्ता बनवण्यासाठी दिवसाचे वीस-वीस तास काम करणार्या आपल्या शीर्षस्थांनी या फुटकळ निवडणुकांवर भाष्य करण्याची गरज होती का, असा प्रश्न काही शहाणे विचारतील. पण सद्य:स्थितीत शहाणपण हे दुर्लक्षाची हमखास हमी देत असल्याने या शहाण्यांच्या प्रतिक्रियांस वळसा घालून या निवडणूक निकालांवर भाष्य करणे योग्य. ते दोन टप्प्यांत करता येईल. देशभरातील निकाल आणि महाराष्ट्राचे चित्र असे हे दोन भाग.
यातील देशाची दखल घेताना माननीय पंतप्रधानांनी काँग्रेसला डिवचले ते अगदी योग्य. एक म्हणजे एकाही ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला नाही. इतकेच काय कर्नाटकात त्या पक्षाची एकहाती सत्ता असताना तेथेही बेंगळूरुसारख्या ठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. यावरून त्या पक्षनेतृत्वास डिवचून पंतप्रधानांनी त्यांची जागा दाखवून दिली. तथापि तसे करताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या यशाविषयी एखादा कौतुकाचा शब्द काढला असता तर बरे दिसले असते. तसेच त्यामुळे काँग्रेस आणि ‘सप’ यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी ते कौतुक कामी आले असते.
शेवटी या पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यांस पद्मविभूषण देण्याचे औदार्य विद्यमान पंतप्रधानांनीच दाखवले होते, हे कसे विसरणार? त्याआधी भले भाजपच्या काही अल्पबुद्धी नेत्यांनी मुलायमसिंह यांच्या मागे ‘मुल्ला’ ही उपाधी लावण्याचा हुच्चपणा केला असेल. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना पद्मविभूषण देण्यास मोठेच औदार्य लागते. ते विद्यमान सत्ताधीशांनी दाखवले. त्यामुळेही असेल कदाचित पण ‘सप’चा विजय भाजप नेत्यांस तितका टोचला नसणार.
उत्तर प्रदेशातील ११ पैकी सहा जागा भाजपने जिंकल्या तर पद्मविभूषण मुलायमसिंह यांचे चिरंजीव अखिलेश नेतृत्व करत असलेल्या समाजवादी पक्षास पाच ठिकाणी यश मिळाले. ज्या उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या राज्यातील मुख्य आव्हानवीर ‘सप’ने भाजपच्या इतक्या जवळ येणे यात जनसामान्यांस धोका वाटेलही. पण हा पक्ष पद्मविभूषण-प्राप्त मुलायमसिंह-स्थापित असल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वास त्या पक्षाच्या यशाविषयी इतकी असूया वाटली नसणार. त्यापेक्षा काँग्रेसला त्या राज्यात एकही जागा मिळाली नाही, ही बाब जास्त महत्त्वाची.
अर्थात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशी शून्यतेचा आनंद साजरा करताना भ्रष्ट, देशद्रोही इत्यादींचा हा पक्ष पद्मविभूषणमंडित मुलायमसिंह यांच्या ‘सप’चा मित्रपक्ष आहे आणि आगामी निवडणुकांत या दोघांत आघाडी होण्याची शक्यता आहे हा मुद्दा अलाहिदा. काँग्रेसचे शून्यत्व महत्त्वाचे. ते इतके महत्त्वाचे की पुण्यनगरी वाराणसी या साक्षात पंतप्रधानांच्या मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला, ही बाबही दुर्लक्ष करावी अशीच. लोकसभेत आधी अयोध्या गेले; विधान परिषदेने वाराणसी नेले यास अजिबात महत्त्व नाही. काँग्रेसला काही मिळाले नाही ही बाब यापेक्षाही अधिक महत्त्वाची.
उत्तर प्रदेशखालोखाल दुसरे महत्त्वाचे राज्य बिहार. माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांस भाजपने राज्यसभेवर धाडल्यापासून सत्ताधार्यांची आघाडी जरा डळमळीतच दिसते. अलीकडे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात प्रशांत किशोर यांच्या पक्षाने बलदंड भाजपस धूळ चारली. आणि आता विधान परिषदेतही त्या पक्षाने चांगली कामगिरी नोंदवली. सत्ताधारी संयुक्त जनता दलास मोजका विजय मिळाला. तोही कसाबसा. त्या राज्यातील आठपैकी तीन जागा भाजपला मिळाल्या आणि जनता दल, जनसुराज, लालूंचा राजद या सर्वांस एक तर अपक्षांस दोन ठिकाणी विजय मिळाला.
या राज्यातही काँग्रेसचा भोपळा हा सत्ताधार्यांच्या बेतास बात कामगिरीपेक्षाही अधिक महत्त्वाचा. पण खरा आनंदीआनंद आहे तो कर्नाटकात. त्या राज्यातील चारपैकी एकही जागा काँग्रेसला मिळवता आली नाही. उलट त्यांची एक जागा देवेगौडांच्या जनता दलाने खेचून आणली. भाजपने तीन ठिकाणी विजय मिळवला. त्या राज्यातही काँग्रेसचे शून्य अत्याधिक आनंददायी. हा विजय म्हणजे कर्नाटकी जनतेने काँग्रेसला नाकारल्याचे चिन्ह असल्याचे भाजपने म्हटले आहे. ते खरेच.
परंतु हा आनंद महाराष्ट्राने भाजपस दिला नाही, ही सत्ताधार्यांसाठी मोठी खेदाची गोष्ट असेल. या राज्यातील पाचपैकी विरोधी पक्षीय महाविकास आघाडीने तीन जागा पटकावल्या तर सत्ताधार्यांस दोन जागांवर समाधान मानावे लागले. किती केंद्रीय यंत्रणा मागे ला(व/)गल्या, फोडाफोडी घड(व)ली, जिल्हा बँका ते साखर कारखाने अशा प्रत्येक ठिकाणी नम(/व)ले तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एक नव्हे तर दोन ठिकाणी विजय मिळवला ही बाब स्थानिक नेतृत्वासाठी फारच क्लेशकारक म्हणायची. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वास शरद पवार यांच्या विजयाचा इतका खेद होणार नाही.
कारण मुलायमसिंह यांच्याप्रमाणे शरद पवार यांनाही पद्मविभूषणने गौरवण्याचे औदार्य सत्ताधार्यांनी दर्शवलेले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा विजय काही सत्ताधार्यांस सलणार नाही. त्यांना वेदना असेल ती काँग्रेसच्या शून्यावस्थेस महाराष्ट्राने तडा दिला; ही. तोही परत नागपूरसारख्या ठिकाणी. हे म्हणजे जखमेवर केवळ मीठच नव्हे तर तिखट चोळून वरून गरम तेल ओतण्यासारखे.
मुख्यमंत्री नागपूरचे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नागपूरचे आणि यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या विचार विद्यापीठाचे मुख्य केंद्र आणि कुलपतींचे वास्तव्य नागपुरात. तरीही या शहरातील निवडणुकीत काँग्रेसचा विजय होतो ही बाब किती वेदनादायी! देशभर अन्यत्र काँग्रेस शून्यावस्थेत असताना त्या पक्षाचा हा शून्यभंग नागपुरात व्हावा हे काही योग्य नव्हे.
अयोध्येत पराभव सहन करायचा. वाराणसीत पराभव पचवायचा आणि वर नागपुरातही पराभव चाखायचा हे दु:ख किती हे समाजमाध्यमी भाष्य पुसून टाकायची वेळ आलेल्यांनाच कळेल! त्यातल्या त्यात समाधानाची बाब हीच की ज्यांना पद्मविभूषणने गौरवले गेले त्यांच्या पक्षाचे तरी भले झाले. असो. बाकी या विधान परिषद निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी ‘एक- शून्य शून्य’ असेच म्हणायचे. महाराष्ट्राने- त्यातही नागपूरने- हात दिला. अन्यथा शून्यच.
