नाटक ते चित्रपट, नाटक ते चित्रवाणी मालिका असा प्रवास अनेक जण करतात. पण विक्रम गोखले यांनी या प्रत्येक टप्प्यावर आपला अभिनय खुलवला..

पणजी दुर्गाबाई गोखले यांच्यापासून सुरू झालेली अभिनय क्षेत्रातील घरंदाज शैली तेवढय़ाच ताकदीने पेलणारे विक्रम गोखले यांनी नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी, अनुबोधपट यांसारख्या बहुतेक सर्वच क्षेत्रांत आपली वैशिष्टय़पूर्ण शैली चित्रांकित केली. हिंदी चित्रपटसृष्टीची राजधानी मुंबई असली, तरी तेथे मराठी नटांचे स्थान कधीच फारसे उंचावले गेले नाही. डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, नाना पाटेकर यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच अभिनेते तेथे टिकून राहिले, ते केवळ अंगच्या कलागुणांच्या ताकदीवर. एकीकडे घरात अभिनयाची पाठशाळा आणि त्याबरोबरच काका लालजी आणि छोटू गोखले हे देशातील नावाजलेले तबलजी. संगीत आणि अभिनय अशा दोन क्षेत्रांत या गोखले घराण्याने नाव कमावलेले. मराठी चित्रपट लावणीकडे वळण्यापूर्वीच्या काळापासून मध्यमवर्गीयांचे लाडके नट म्हणून चंद्रकांत गोखले यांनी मराठी चित्रसृष्टीत स्वत:चे स्थान कमावलेले होते. धोतर-कोट-टोपीतल्या चंद्रकांत यांना तेव्हाही प्रेक्षकांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयशैलीबद्दल शाबासकीची थाप मारलेली असताना, विक्रम गोखले यांनी वडिलांच्या आईच्या आणि पणजीच्याही पावलावर पाऊल टाकणे यात नवल नव्हते, पण त्या पूर्वसुरींच्या छायेत न राहता, त्यांच्या पुढे जाण्यासाठी परिसरातील कलासृष्टीतील बदलाचे भान ठेवून आपले स्थान निर्माण करणे, ही सोपी गोष्ट नव्हतीच. त्यामुळे विजया मेहता यांच्यासारख्या वेगळय़ा मुशीतील विचार मांडणाऱ्या कलावंताचे शिष्यत्व पत्करण्यात विक्रम गोखलेंना कमालीचा आनंद वाटत होता. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या ‘बॅरिस्टर’ या नाटकातील विक्रम गोखले यांची भूमिका त्यामुळेच स्मरणीय झाली. अभिनयाच्या या नव्या शैलीला आत्मसात करत स्वत:ला घडवण्यासाठी त्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही. त्यामुळेच केवळ मागणी तसा पुरवठा या सरधोपट मार्गावर विश्वास न ठेवता आपल्यातील कलागुणांना अभिजाततेच्या मखरात बसवण्याचा त्यांचा ध्यास कौतुकास्पद ठरला. काशिनाथ घाणेकर यांच्यानंतर मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेला नट म्हणून मिरवताना आपण वेगळी वाट चोखाळायला हवी, याची जाणीव विक्रम गोखले यांनी सतत ठेवली. ‘लोकप्रिय’ म्हणून बटबटीतपणाकडे झुकणाऱ्या अभिनेत्यापेक्षा आपला अभिनय वेगळय़ा वाटेने जायला हवा, त्यात घाणेकरही दिसायला नकोत आणि डॉ. लागूही; या जाणिवेच्या कक्षा रुंदावणारा नट म्हणून त्यांचे खरेखुरे कौतुक झाले.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

मराठी चित्रपटात त्यांच्या रूपाने देखणा, उमदा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. चित्रपट आणि नाटक या दोन्ही कलाप्रकारांमधील अभिनयाचा दर्जा समजून घेणे आणि त्या त्या कारणासाठी आपले वेगळेपण सिद्ध करणे ही सोपी गोष्ट नव्हेच. ज्या काळात नाटक ही महाराष्ट्राची अस्सल निवड होती, त्या काळात विक्रम गोखले यांनी नाटकात प्रवेश केला आणि प्रथेप्रमाणे आधी नाटक आणि नंतर चित्रपट असा प्रवास केला. नाटक आणि चित्रपट या दोन्ही कलाप्रकारांतील अभिनयाच्या सादरीकरणाची पद्धत निराळी. गोखले यांनी मात्र त्या दोन्हीवर ज़्‍ाबरदस्त पकड मिळवली. नाटकातील सहकलावंत बदलून वाटेल तेवढे प्रयोग करण्याचा मार्ग टाळणारा हा अभिनेता, चित्रपटांतही अभिनयाच्या अव्वलपणावर लक्ष पुरवत होता. कृष्णधवल चित्रपटांतही  त्यांचा नायक त्या वेळी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. राजा परांजपे, राजा गोसावी, सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासारख्या अभिनेत्यांच्या बरोबरीने विक्रम गोखले हे नाव जोडले जाऊ लागले. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ ते ‘कळत नकळत’ या चित्रपटांतून मध्यमवर्गीय चेहरा असणारा उमदा आणि देखणा नट अशी त्यांची ओळख बनली. ‘वजीर’, ‘मुक्ता’, ‘नटसम्राट’ यांसारख्या वेगळय़ा चित्रपटांबरोबरच ‘माहेरची साडी’ ते ‘दरोडेखोर’ अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. चित्रपट म्हणून ते सगळेच फार उच्च दर्जाचे नसले, तरीही त्यातील गोखलेंचा सहभाग लक्षात राहण्यासारखा ठरला. तरीही केवळ मराठी चित्रपटांपुरतीच आपली कारकीर्द सीमित राहू नये, याची काळजी घेत विक्रम गोखलेंनी आपला मोहरा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला. याचे कारण अभिनय ही त्यांच्यासाठी जगण्याची भूक होती. हाती जे काम येईल ते प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपला सारा कस पणाला लावण्याची जिद्द त्यांच्यापाशी होती, त्यामुळेच हिंदी चित्रपटांतील त्यांचे अस्तित्वही सहज पुसले जाणारे ठरले नाही. तिकीटबारीच्या पै पैचा हिशोब लावणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवणे ही भल्या भल्यांसाठी मोठी कसरत असते. अशा वेळी लागू, गोखले, पाटेकर यांसारखी मराठी नावे झळकणे आणि टिकणे ही बाब अधिक समाधानाची.

विक्रम गोखले यांनी आपल्या संयत आणि अभिजात अभिनयाने त्या क्षेत्रात आपले पाय पक्के रोवले, मात्र त्याच काळात नव्याने येऊ घातलेल्या मनोरंजन वाहिन्याही त्यांना खुणावू लागल्या होत्या. या नव्या मंचावरही त्यांनी केलेली कामगिरी लक्षणीय होती. मनोरंजनाच्या क्षेत्रातील सर्व मंचांवर चौफेर कर्तृत्व गाजवणारे अलीकडच्या काळातील ते महत्त्वाचे कलावंत ठरले. आक्रस्ताळा, बटबटीत, कसरतींनी लक्ष वेधून घेणारा आणि काहीही करून प्रेक्षकांना पकडून ठेवण्याचा हव्यास करणारा म्हणजेच चित्रवाणीवरला अभिनय, असे ठोकताळे त्या काळात नाटकातून चित्रवाणीवर आलेल्या अनेकांनी दूर ठेवले होतेच. पण ‘क्लोजअप’च्या या माध्यमाची ताकद ओळखून डोळे-चेहरा-ओठ यांची सूक्ष्म हालचाल,  हे विक्रम गोखले यांचे वेगळेपण इथे दिसले. त्यांची शैली यासाठी वेगळी ठरली आणि लोकप्रियही झाली. पिढीजात मिळालेला वारसा टिकवणे, ही अनेक वेळा अडचणीची बाब ठरते. आपल्या वाडवडिलांच्या कलेशी स्पर्धा करणे, हे पुढीलांसाठी अधिक त्रासदायकही ठरणारे असू शकते. पणजी दुर्गाबाई कामत आणि आजी कमलाबाई यांनी तर भारतातल्या पहिल्या मूकपटातच स्त्रीची भूमिका केलेली. ज्या काळात स्त्रियांना नाटक पाहण्याचीही संधी नव्हती, त्यामध्ये भूमिका करण्यास मज्जाव होता, त्या काळात आपला हा हक्क मिळवण्यासाठी या दोघींनी केलेले प्रयत्न कलांच्या सामाजिक इतिहासातील एक अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ठरले. एका अर्थाने समाजाभिमुख आणि दूरदृष्टी असलेले हे घराणे आजपर्यंत आपले वेगळेपण टिकवू शकले, कारण प्रत्येकाने त्याच्या पुढय़ात वाढून ठेवलेल्या संकटांशी आपल्या कलागुणांच्या आधारे सामना करीत त्यावर मात केली. आज मागे वळून पाहताना या गोष्टीचे आश्चर्य वाटण्याचे कारण, निदान महाराष्ट्रात झालेले वैचारिक आणि सामाजिक परिवर्तन घडून येण्यास अशा सगळय़ांनी प्राणपणाने आपले आयुष्य वेचले. याचा एक धागा विक्रम गोखले यांनी शेवटपर्यंत टिकवला. तो म्हणजे सैनिकांसाठी मदत करण्याचा. वडील चंद्रकांत यांनी आयुष्यभर कलेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांतून सैनिकांना मदत करण्याचा प्रघात ठेवला. ही सामाजिक बांधिलकी पाळताना, या हाताचे त्या हाताला कळता कामा नये, याची खबरदारी त्यांनी घेतली. हा वसा विक्रम यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. आपण कुणाचे उत्तरदायी आहोत याची ही जाणीव त्यांचे व्यक्तिमत्त्व संपन्न करणारी होती. वयोमानानुसार हालचालींवर बंधने आली, तरी ते शेवटपर्यंत अभिनयाचा हात सोडण्यास तयार नसत. मात्र मनोरंजनाच्या क्षेत्राची वाढती लोकप्रियता या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या तरुण आणि उत्सुक कलावंतांचे आकर्षण वाढवणारी असल्याने, त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळवून देण्यासाठी विक्रम गोखले यांनी प्रयत्न केले. आवाज साधनेबरोबरच अभिनयाच्या त्यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळांना सतत प्रतिसाद मिळत गेला, कारण त्यांनी स्वकर्तृत्वाने या क्षेत्रात निर्माण केलेले स्थान. मी जे केले, ते नव्या पिढीला समजावून सांगत, काय करता कामा नये याचे धडे या नव्या कलावंतांसाठी फार मोलाचे ठरले. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे कलांच्या क्षेत्रातील सुमारे पाच दशकांचा ऐवज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना ‘लोकसत्ता’ची आदरांजली.