आणखी दोन दशकभरात महासत्तापदाचे स्वप्न पाहणारा हा देश प्रत्यक्षात ‘राहणीमान निर्देशांका’त दिवसेंदिवस घसरू लागलेला आहे हे वास्तव आपण पाहणार की नाही?
केवळ कंत्राटांतील मलिद्यावर डोळा ठेवून कामे काढणारे राजकारणी, शहर नियोजन कशाशी खातात याची काडीचीही जाण नसलेले सत्ताधीश आणि या अशा राज्यकर्त्यांमुळे आपल्या कर्तव्यांबाबत कमालीचे बेफिकीर अधिकारी एकत्र आले की काय होते त्याचे भयानक दर्शन म्हणजे सध्याचा महाराष्ट्र. या राज्याच्या राजधानी मुंबईतून बाहेर पडण्याच्या मार्गावर बुधवारी रात्री तब्बल पाच तास वाहतूक ठप्प होती हे एकच एक कारण या निष्कर्षामागे नाही. अलीकडे पुणे-मुंबई घाटातील अपघातानंतर अशीच स्थिती उद्भवलेली होती. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतून शहरात येणे आणि रात्री घरी परतणे हे अतिमागास आफ्रिका खंडातील वा सत्ताधीशांस प्रिय गोपट्ट्यातील राज्याइतकेच हलाखीचे. मुंबईहून उपराजधानी नागपूरला जोडणार्या समृद्धी महामार्ग निर्मितीचे सरकारला कोण कौतुक. पण मुंबईतून या समृद्धी महामार्गाच्या तोंडापर्यंत पोहोचणे हेच मोठे दिव्य. ते पार केल्यानंतर मग कथित समृद्धी महामार्गाचा वाळवंटी प्रवास. मुंबईत मेट्रोचे जाळे उभारणीचे श्रेय घेताना २० मिनिटांच्या मेट्रो प्रवासाआधी आणि नंतर अर्धा-अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते त्याचे काय, याचे उत्तर नाही. एकीकडे जुन्याजाणत्या विश्वसनीय अशा ‘बेस्ट’ बस सेवेची हेळसांड करायची आणि नव्या कंत्राटी उद्योगांचा पाठपुरावा करायचा हा या सत्ताधीशांचा विकास (?). आता नवे काय तर ‘पॉड टॅक्सी’. जुन्या ‘स्काय वॉक’चा खुराक संपला. ते मोडूनही खाल्ले. आता नवे पूल. पुण्यात आणि आसपासच्या रस्त्यांवर खास शहर बस सेवेसाठी उभारलेल्या विशेष मार्गिकेच्या कलेवरांवरून दुचाक्यांपासून ते मालगाड्यांपर्यंत सर्व गाड्या सर्रास जातात. तो प्रकल्प असाच बोंबलला. त्याचा आणि अशा अन्य प्रकल्पांचा खर्च पाण्यात. आणि विचार फक्त जनतेच्या पैशातून नवनवी कंत्राटे कशी देता येतील आणि त्यात किती हात मारता येईल, याचा. या असल्या बेजबाबदार सत्ताकारणामुळे आपण विकसित सोडा, पण काही अंशी बर्या अवस्थेतून भिकारावस्थेकडे जोमाने मार्गक्रम करत आहोत याची जाणीव राज्यकर्त्यांस नसेल; पण आपणास तरी आहे?
याचे प्रामाणिक उत्तर अतिविकासाच्या वजनाखाली गुदमरून चाललेली शहरे आणि किमान विकासाअभावी सुकत चाललेली खेडी या दोन्हींपैकी एकाचा तरी अनुभव घेणे नशिबी आलेल्याने द्यावे. जेमतेम १५ मिनिटांच्या अंतरासाठी पाच-सहा तासांच्या कोंडीत जेव्हा अडकावे लागते तेव्हा अन्न-पाण्याच्या अभावामुळे मुलाबाळांचे होणारे हाल आणि बायाबापड्यांची स्वच्छतागृहाअभावी होणारी कुचंबणा याची जाणीव आपल्या विकासपुरुषांस असणे शक्य नाही. या विकासपुरुष आणि विकासपुरंध्य्रांचे सरकारी गाड्यांचे काफिले अशा वाहतूक कोंडीतही निर्लज्जपणे सर्व नियम तोडून उलट दिशेने सुखाने मार्गक्रमण करू शकतात. हा सत्तेचा माज मिरवणे बंद करण्यासाठी वाहनांवरील लाल दिवे आम्ही कसे काढून टाकले असे आपणास सांगितले गेले आणि बावळट समाजाने ‘कित्ती महत्त्वाचा निर्णय हो…’ असे म्हणत या साधेपणाचा आव आणणार्या निर्णयाचे कोण कौतुक केले. लाल दिवे गेले असतीलही. पण या मंत्र्यांसंत्र्यांच्या पुढच्या मागच्या गाड्यांची संख्या वाढली. घटनेनुसार जे पद अस्तित्वातच नाही त्या पदावरील व्यक्तीच्या ताफ्यात २५-२५ मोटारी असतात आणि नागरिकांच्या नाकावर टिच्चून रोंरावत जाताना या मंडळींस जनाची लाज नसते आणि मनाची असण्याचा प्रश्नच नसतो. हा झाला आहे इतका विकास कमी म्हणून की काय आता अरुंद गल्ल्यांतही गगनचुंबी इमारतींस परवानगी देण्याचा निर्णय आपल्या विकासाभिमुख सरकारने अलीकडेच घेतला. गरज पडल्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना तिथे पोहोचता आले नाही तरी चालेल, नागरिकांस येण्याजाण्यास पुरेसे मार्ग नसले तरी चालतील, वाहनांस रस्त्यांवर उभे करावे लागत असेल तरीही हरकत नाही; पण ‘विकास’ हवा. विकास असला की विकासक येतात, त्यांचे वाढते चटई क्षेत्र येते, पाणथळ जागा बुजवण्याची संधी येते, मिठागरे बुजवून इमारती बांधण्याची गरज निर्माण होते. कोणा एका बड्या सरकारस्नेही उद्योगपतीस अनेक झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची कंत्राटे देता येतात आणि हे सगळे होत राहिले तर(च) निवडणुकीस हवा तितका निधी मिळत राहतो. तेव्हा विकास हवाच हवा. या विकासाच्या विशेषणांवर हिंदू-मुस्लीम इत्यादी धर्मभावनांचे अनुस्वार पखरले, पुढे-मागे वीररसपूर्ण उद्गारचिन्हे पसरली की झाले. खुळचट जनता खूश. हे आपले वास्तव. आज १ मेच्या महाराष्ट्र दिन मुहूर्तावर पुणे-मुंबईस जोडणारी एक नवी मार्गिका खुली होईल. तिच्या फायद्या-तोट्याचे मूल्यमापन राहिले दूर; पण हिशेबाची शाईही वाळली नसेल तर लगेच चर्चा कसली सुरू? तर या मार्गावर आणखी अर्धा डझनभर बोगदे कसे करता येतील. अधिक कामे म्हणजे अधिक कंत्राटे, म्हणजे ती देणार्यांची अधिक कमाई.
हे आपले आजचे वास्तव. जनतेस गरज असो वा नसो; कामे काढत राहायची हे आपल्या सत्ताधीशांचे ब्रीद. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्याचा प्रत्यय येतो. ‘बीबीसी’ने अलीकडेच या भारतीय विकासकामांवर विस्तृत वृत्तांत प्रकाशित केला. त्यानुसार अलीकडे वर्षाला जवळपास दहा हजार कोटी डॉलर्स- सुमारे नऊ लाख ५० हजार कोटी रुपये- आपल्याकडे विमानतळ, मेट्रो आदींवर खर्च होत आहेत. पण ‘‘प्रवासी/ वापरकर्ते आहेत कुठे’’, असा प्रश्न हा वृत्तांत विचारतो. प्रचंड गवगवा झालेली मुंबई मेट्रो अपेक्षेपेक्षा निम्म्या प्रवाशांनाही वागवत नाही आणि उत्तर प्रदेशादी राज्यांतील अनेक विमानतळांवर विमाने सोडून सर्व काही आहे. सर्वाधिक परतावा मिळतो दिल्ली मेट्रोतून. तरीही तो ४८ टक्के इतकाच. परिस्थिती इतकी गंभीर की संसदेच्या समितीसही या सगळ्या वास्तवावर आपल्या अहवालात भाष्य करावे असे वाटले. या सगळ्यामुळे शहरांतील जीवनमान सुधारते आहे म्हणावे तर त्या आघाडीवरही ठणठणाट. इतके दिवस दिल्लीतील हवा श्वसनयोग्य नव्हती. आता मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांचीही त्यात भर पडलेली आहे. अन्यत्र असे काही मोजण्याची सोय नाही. त्यामुळे तेथील परिस्थिती बरी असेल असे मानायचे. आपल्या शहरांतील रस्त्याच्या दर्जाविषयी न बोललेच बरे. आणखी दोन दशकभरात महासत्तापदाचे स्वप्न पाहणारा हा देश प्रत्यक्षात ‘राहणीमान निर्देशांका’त दिवसेंदिवस घसरू लागलेला आहे हे वास्तव आपण पाहणार की नाही? त्याकडे आतासारखे दुर्लक्षच करत राहिलो तर विकास होईल, अगदी १०० मजली इमारती येतील, चकचकीत मेट्रो तयार होतील, बुलेट ट्रेन सुसाट धावेल. पण तरी सामान्यांचे जगणे होते त्यापेक्षा अधिक वाईट होत राहील.
मुंबईत बुधवारी जे झाले ते या आगामी वास्तवाचे भयसूचक निदर्शक. तेही पाहावयाचे नसेल तर या कथित पायाभूत सुविधांच्या उभारणीतील अपघातात प्राण गेलेल्यांच्या कुटुंबीयांशी या विचारांधांनी जरूर संपर्क साधावा. अलीकडे एखादी क्रेन उलटून, पुलावरील बांधकाम साहित्य कोसळून, सळया/ तुळया तुटून/ आपटून गेलेल्यांची संख्या पाहा. हे वास्तव जाणवेल. ताज्या वाहतूक वास्तवात तर रस्त्यावरची क्रेन उलटून एका पोलिसाचा जीव गेला. पोलिसाचे प्राण गेलेले, ऐन उकाड्यात पाच-सहा तासांचा वाहतूक खोळंबा आणि वाहतूक पोलीस, महापौर आदी यंत्रणांना त्याचा पत्ताही नाही. हे आपले सध्याचे चित्र. माणसे उपासमारीने, आजाराने, दारिद्र्याने संकटग्रस्त होतात. पण भारतातील जनता सद्य:स्थितीत अशी विकासग्रस्त आहे. ही विकासग्रस्तता अनुभवणार्यांनाच या विदारक वास्तवाची जाणीव नसेल तर त्यांची वाताहत अशीच होत राहणार, हे निश्चित. आजच्या महाराष्ट्रदिनी इतकी जाणीव ठेवली तरी पुरे.
