मराठीजनांच्या सामूहिक कलाजाणिवेत मनन, अलवारपणाला फाटाच मिळतो. द. भा. धामणस्करांची कविता मात्र यापेक्षा वेगळी वाट निवडून सत्त्वतेज जपणारी…

मराठी साहित्यात एक काळ असा येऊन गेला की कोणाची ना कोणाची किंवा कोणत्या तरी रंगाची पताका खांद्यावर नसण्यास लेखक/ कवींस मज्जाव होता. गट, तट तयार झालेले, हा आपला, तो त्यांचा अशी वर्गवारी झालेली. ही ‘तट’बंदी केवळ सामाजिकच होती असे नव्हे. ती लिंगभेदाधारित आणि वर्गीयही होती. ‘सत्यकथा’वाले, ‘माणूस’वाले या दोन्ही ठिकाणी नसलेले ‘किर्लोस्करी’ किंवा ‘वाङ्मय शोभी’य, यांच्या जोडीला ‘पैंजण’वाल्या, ‘ललना’, ‘मेनका’ वेगळ्या; असे. पुढे सत्तरच्या दशकात ‘दलित पँथर’च्या उदयानंतर एका नवा पिंजारलेला वर्ग आला. त्यांच्या ‘गोलपिठा’ दर्शनाने सगळेच हादरले. हे सगळे असे काही अस्तित्वात होते हे या सर्वांस माहीत नव्हते असे अजिबातच नाही. पण जे फक्त कुजबुजीपुरतेच मर्यादित होते त्या सगळ्याचे साहित्यही होऊ शकते हे कळायलाच अनेकांस फार वेळ लागला. त्यामानाने ‘भाकरीचा चंद्र’ शीतल. तो सहज नव्हे तरी लवकर स्वीकारला गेला. हे सांस्कृतिक वर्गीकरण कमी म्हणून की काय नेमाडपंथीयांनी आपली वेगळी चूल मांडली. या सगळ्यांवर मराठी माध्यमांनी दुर्लक्षलेले पण इंग्रजीतील कौतुकामुळे ज्यांच्या विषयी अप्रूप तयार झाले ते कोलटकर वगैरे आपली ‘भिजकी वही’ घेऊन उतरल्यावर सगळे बावरले. हे लिहीत होते त्यांस साहित्य म्हणावे की न म्हणावे या प्रश्नाने साहित्य जगत गांगरले. अशा काळात मराठी मातीशी, मराठी भाव-भावनांशी असलेले आपले रक्ताचे नाते प्राणपणाने जागवत साहित्यिकांचा एक वर्ग निष्ठेने, नेमाने व्यक्त होत राहिला. यांतील माडगुळकर बंधू, शंकर रामाणी, इंदिरा संत वगैरे असे आपले नाते चिंतनशील वि. द. घाटे, आधुनिक पण जुन्या परंपरागत सा्त्विवक जाणिवा सुबोधतेने मांडणारे श्री. म. माटे, लोभस दि. बा. मोकाशी अशांशी सांगत राहिले. यांच्यातील शेवटचा दिवा द. भा. धामणस्करांच्या रूपाने परवापर्यंत तेवत होता. तो आता निमाला. त्यांचे जाणे तसे नैसर्गिकच. पिकले पान.

त्यांनीच म्हणून ठेवले आहे त्याप्रमाणे ‘उजाडण्यापूर्वीच या छोट्या बागेतील पिवळी पाने मला झाडून टाकली पाहिजेत. कालची शुष्क पाने पाहात झाडांनी परत पाने गाळू नयेत म्हणून’. त्याआधी ‘त्याला’ मृत्यू वगैरे येत असताना डॉक्टरांच्या जोडीने ‘त्याच्या वाटेवरच्या फुलांनी गच्च भरलेल्या झाडाला’ कळवायचे विसरू नका, हे त्यांनी आवर्जून सांगून ठेवले. त्यांच्या कवितांचे आश्चर्य हे की आयुष्य डोंबिवलीसारख्या काँक्रिटी जंगलात घालवावे लागले तरी त्यांच्या मनातील निसर्ग कायम डवरलेलाच राहिला. त्यांची चाकरीही रिझर्व्ह बँकेतील. त्या आकडेमोडीच्या शुष्क जगावर आपले जगणे बेतायचे, एकाचा उच्छ्वास दुसर्‍यास श्वास म्हणून घ्यावा लागतो अशा लोकल नावाच्या शरीर आणि मन पिळवटून टाकणार्‍या वाहन व्यवस्थेतून दररोज प्रवास करायचा आणि तरीही चैत्राच्या चाहुलीसाठी झाडांच्या कोवळिकेवर पंचांगापेक्षा अधिक विश्वास ठेवायचा हे सगळेच अद्भुत. ही खरी प्रामाणिक आध्यात्मिकता. ‘आधी प्रपंच करावा नेटका’ या संतांच्या शिकवणीशी नाते सांगणारी. ही चिरायू आध्यात्मिकता अंतरी वास करत असल्याने दभांना कधीही कसलीच घाई नव्हती. पहिली कविता प्रकाशित झाल्यानंतर संग्रहासाठी काळ लोटला आणि चांगले काही सुचत नाही तोपर्यंत थांबण्यात पंधरा वर्षे गेली तरी त्याची त्यांना खंत नव्हती. ईनमीनतीन संग्रह त्यांचे. पण त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मोतीच जणू. सत्त्वतेजाच्या शिंपल्यात तयार झाल्याने पाणीदार बनलेला. आपला स्वभावधर्म सार्वजनिक नाही आणि म्हणून आपली कविताही मंचीय नाही याची पुरती जाण त्यांना होती. ती होती म्हणून कवी म्हणून साहित्य काळावर आपले नाव कोरले जाण्यास वेळ लागणार हेही ते मनोमन ओळखून होते. तथापि हा आणि इतकाच त्यांचा मोठेपणा नाही. जे आपणास जमत नाही आणि इतरांस जमते ते दुय्यम ठरवण्याचा मानवी स्वभाव. दभा अजिबात तसे नव्हते. मंचीय कवितेस आणि कवींस त्यांनी कधीही कमी लेखले नाही. आपल्या कवितेचा स्वर त्या पट्टीचा नाही, इतकेच त्यांचे म्हणणे. तो ज्यांचा आहे त्याच्याविषयी कधीही कलावंतांची असूया त्यांच्याठायी नव्हती.

मराठी सारस्वताची पंचाईत ही की ‘ही पहा मी भूमिका घेतली’ असे शड्डू ठोकून सांगेपर्यंत कोणाकडे लक्षच दिले जात नाही. इंग्रजीत ‘सटलिटी’ या शब्दाने वर्णन करतात त्या अलवारपणाचा सांस्कृतिक अभाव. आणि दभा नेमके असे खोल तरीही तरल. त्यामुळे माध्यमकेंद्री जगास त्यांची दखल घेण्यास वेळ लागला. ‘मानवाचा निर्वंश तसा वाईट नाही हे/ त्याने दंडुक्याशिवायही पटवून दिले असते;/ प्रश्न परंतु पृथ्वीवरच्या इतर समजूतदार प्राण्यांचाही होता… त्यांचा विचार करताना त्याची/ दंडुक्यावरची पकड सैल झाली आणि एका दयाळू अनिवार्यतेने/ फक्त माणसांच्या विनाशाची/ नवीन शक्यता तो शोधू लागला…’ या त्यांच्या कवितेतील दाहक भूमिका कळून घेण्याचा पोक्तपणा वाचकांत नव्हता. ‘फुलता येत नाही म्हणून फुले तोडणारे लोकच/ उडता येत नाही म्हणून पाखरांना पिंजर्‍यात ठेवतात’ असे जेव्हा दभा लिहितात तेव्हा माणसांनी माणसांसाठी तयार केलेले अनेक पिंजरे पाहण्याची ‘नजर’ आपल्यात नाही, हे जाणवून खंत वाटते. हा दोष अर्थातच दभांचा नाही. आपले दुसरे सामूहिक अपंगत्व संवेदनेचे. टाळी घेईपर्यंत श्वास न सोडणार्‍या गायकांप्रमाणे ‘वाहवा’ची दाद मागून मागून घेणार्‍यांच्या दावणीस आपली सामूहिक कलाजाणीव बांधली गेलेली. सर्व काही उलगडून सांगण्याची गरज. जे गाण्याच्या, कवितेच्या बाबतीत तेच चित्रांबाबतही. दृश्य जाणिवेचा जनुकीय अभाव. त्यामुळे दभांची शब्दकळा, अनुभव शब्दांतून रंगवण्याची मातबरी अनेकांनी अनुभवली नाही. ‘तू केळीच्या पानासारखी आपले समग्र हिरवेपण घेऊन माझ्यासमोर उभी’ असे दभा लिहितात आणि ते वाचताना त्या दृश्यमानतेने आपण मोहरतो. ‘तुझ्या केसांत अनंताचे फूल आहे म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे’ असे समजण्याचा आनंद कोणाही कवीमनास होईलही. पण यावरून ‘नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात एक तरल संबंध रुजून आलेला’ पाहणे हे मात्र खास दभा असल्याखेरीज शक्य नाही. ही नाजूक तरलता केवळ निसर्ग वा सामजिकता यापुरतीच मर्यादित नाही.

मानवी नातेसंबंधांकडेही दभा ज्या नजरेने पहात त्या नजरेने पहायचा नुसता प्रयत्न जरी वाचकांनी केला तरी पुढची अक्षरे धूसर दिसू लागतात. ‘माझी मुलगी सकाळीच जागा शोधण्यासाठी घराबाहेर पडते’ आणि परतल्यावर तिचा ‘बराचसा विकल’ आवाज ऐकल्यावर, तिला ‘पराभूतशी पडलेली’ पाहिल्यावर ‘घर नावाच्या मृगजळा’ची भावना वाचकांच्या मनातही ते सहज जागवतात. कोणा पालकांच्या मनाविरुद्ध जोडीदार निवडला म्हणून आपल्या पोटच्या गोळ्याशी ‘कणखर होण्याचा’ सल्ला देणार्‍यांचे आभार दभांची कविता मानते आणि ‘आम्हास आता काहीच कणखर वगैरे होणे नाही’ कारण ‘आपले लेकरू संपूर्ण स्वतंत्र होताना’ आपण ‘अधिकाधिक अनावश्यक होत जाताना…’ पाहण्याइतका लिप्ततेचा ओलावा काव्यात्म अलिप्तपणाने व्यक्त होताना अनुभवल्यावर आपला ठाव घेतल्याखेरीज राहात नाही. स्वत:कडे असे स्वत:तून बाहेर येऊन पाहणे हा त्यांच्या कवितेचा मोठेपणा. त्यांच्या कवितेतील निसर्गप्रेमाचे नाते बालकवींशी. इंदिरा संतांशीही. निसर्गाशी त्यांच्या कवितेचे नाते बाप-लेकीसारखे. त्यामुळे बोरकरांचा साजश्ृंगार त्यांच्या कवितेत नाही. मानवी भावभावनांस ते स्पर्श करतात तेव्हा ते नाते कुसुमाग्रजांशी होते. त्यांची बहुतांश कविता मुक्त छंदातली. ती गद्य म्हणून वाचली तर त्यात माडगुळकर बंधू भेटतात.

त्यांच्यासारखेच असे व्रतस्थ श्रीनिवास विनायक गेल्यानंतर आठवडाभरात दभांनीही प्रस्थान ठेवावे हा ‘योगायोग’ही विलक्षण काव्यात्म. आसपासची चमचमत्या दिव्यांची माळ बंद झाली तर समस्तांस ते सहजी कळते. पण शांत तेवणारी पणती निमाली की प्रकाशावर अंधाराची एक धुरकट रेघ तेवढी उमटते. मराठी साहित्य जगात एका पाठोपाठ अशा एक दोन रेघा श्रीनिवास कुलकर्णी आणि दभा धामणस्कर यांच्या निधनाने एकाच आठवड्यात उमटल्या. दभांनीच सांगून ठेवले आहे त्याप्रमाणे ‘मरणाचे(ही) उत्सव मांडू नयेत; सरळ निघून जावे चुपचाप- लोकांनीच वाटल्यास म्हणावे ‘कुठे गेला…? आताआताच तर इथे होता…’’.

दत्तात्रेय भास्कर धामणस्कर या व्रतस्थ कवीच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.