तांत्रिकतेचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांनी बट्ट्याबोळ झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाचे प्रमुख भीमनवार यांस वाचवण्याचा प्रयत्न करू नये…

अलीकडच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके कमीच. शालेय, महाविद्यालयीन अभ्यासकविषयक आणि अन्यही हालअपेष्टा सहन करायच्या, पालकांचे हट्ट पुरवायचे आणि तरीही वर आंदोलने वगैरे करण्याचा उत्साह कायम राखायचा हे, सोपे नव्हे. ही सारी अवघड कृत्ये आजच्या विद्यार्थ्यांस सहजी जमतात. पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग-नामे बट्ट्याबोळ झालेल्या यंत्रणेविरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून या गुणांची प्रचीती येईल. या राज्यात ज्यांचे पूर्ण वाटोळे झालेले आहे, अशा सरकारी यंत्रणांत या लोकसेवा आयोगास मानाचे स्थान निश्चित मिळेल. तेव्हा विद्यार्थ्यांचा या यंत्रणेविरोधातील रोष पूर्णपणे न्याय्य ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणतात. त्याचमुळे त्यांनी या कथित लोकसेवा आयोगात सुधारणा सुचवण्यासाठी प्रशासन विभागाच्या सचिव व्ही. राधा यांच्याकडे संबंधित समितीचे नेतृत्व दिले. ‘फडणवीसांचा ‘राव’क्षण’ या संपादकीयात (१६ सप्टेंबर) त्यावर भाष्य करताना ‘लोकसत्ता’ने लोकसेवा आयोगातील सुधारणांची निकड अधोरेखित केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकारीच या सुधारणांच्या आड येऊ शकतात, अशी शंका त्या संपादकीयात व्यक्त करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता ही भीती खरी ठरते की काय असा, प्रश्न पडतो. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे लोकसेवा आयोगाचे प्रमुख विवेक भीमनवार यांना जणू अभय आहे, असे वाटावे असे सरकारचे वर्तन. त्याचा समाचार घ्यायला हवा.

तसे करताना भीमनवार या सद्गृहस्थांची कार्यकर्तृत्वगाथा आजच्या ‘लोकसत्ता’त अन्यत्र वाचावयास मिळेल. या भीमनवार यांचा राजीनामा ही आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. वास्तविक एखाद्या सरकारी विभागाच्या शीर्षस्थ नेत्याच्या पदत्यागाने त्या विषयीचे सर्व प्रमुख प्रश्न मिटतात,असे अजिबातच नाही. पण तरीही हे असे राजीनामे घेणे आवश्यक असते. कारण या अशा प्रतीकात्मकतेतून सदरहू यंत्रणेच्या साफसफाईचा सरकारचा इरादा नेक आहे, असा संदेश जातो. अन्यथा सरकार म्हणजे केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. तीदेखील शिळी झालेली. ओरपून ओरपून तिच्यावर ताव तरी किती मारणार, असा प्रश्न. तो लोकसेवा आयोगाबाबत पडणे अधिक रास्त. याचे कारण या आयोगाचे सचिव, सद्गृहस्थ भीमनवार यांचे कनिष्ठ महेंद्र हरपाळकर यांची पदावरून उचलबांगडी करण्याची त्वरा मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच दाखवली; ती का? आयोगाचा सचिव दोषी असल्याचे सुचवत त्याची बदली करायची आणि आयोग प्रमुखास अभय द्यायचे; ते का? आपल्या देशाच्या राजकीय संस्कृतीत कोणत्याही गैरप्रकारासाठी लहानांस शासन करण्याची आणि मोठ्यांकडे दुर्लक्ष करण्याची ‘उदात्त’ परंपरा खोलवर रुजलेली आहे. अनेक प्रकरणांतून हे सत्य समोर येते. लोकसेवा आयोगाच्या सचिवास दूर करण्याच्या शासकीय निर्णयातून याच सत्याचा प्रत्यय येतो. तेव्हा ज्या यंत्रणेचा सचिव राजीनामा-योग्य असतो, त्यावेळी त्या यंत्रणेचा प्रमुख हा त्यापेक्षा अधिक राजीनामा-लायक असतो, हे सत्य. म्हणून ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ या नात्याने भीमनवार यांची गच्छंतीही अत्यावश्यक ठरते. अशा वेळी तांत्रिकतेचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांनी बट्ट्याबोळ झालेल्या शासकीय यंत्रणेच्या प्रमुखास वाचवण्याचा प्रयत्न करू नये.

लोकसेवा आयोगाच्या प्रमुखाचे स्थान ही ती तांत्रिकता. स्वायत्त आणि अर्धसांविधानिक असे हे पद असल्याने त्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार आपणास नाही, असा पवित्रा मुख्यमंत्री घेतात. तो तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य असेलही. पण ज्यावेळी एखाद्या सरकारी यंत्रणेबाबत इतके मूलभूत प्रश्न निर्माण होतात, या सरकारी यंत्रणेचा कारभार सर्वमान्य वादग्रस्त ठरतो, त्यावेळी त्या यंत्रणा प्रमुखांच्या बचावार्थ तांत्रिकतेचा आधार घेणे हे भ्रष्ट वा वादग्रस्त व्यक्तीस पाठीशी घालण्यासारखे असते. असे आणखी एक पाप फडणवीसांनी करण्याची गरज नाही. आधीच त्यांचे सरकार अनेक गणंगांना पोसत असल्याचा आरोप होतो. त्यात आणखी एकाची भर घालण्यात कसले आहे शहाणपण? आणि दुसरे असे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुखास पदावरून काढता येत नाही, हे त्यांचे विधान अर्धसत्य ठरते. याआधी शशिकांत कर्णिक यांच्यावर कारवाई झाली होती. लोकसेवा आयोगात १९९९ साली पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला. ते प्रकरण इतके गंभीर होते की कर्णिक यांच्या समवेत तत्कालीन मंत्र्यांच्या सचिवासह अन्य पाच जणांस तुरुंगवास भोगावा लागला. त्या वेळच्या भरती प्रक्रियेत ३९८ उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत फेरबदल केल्याचा आरोप या सर्वांवर होता. त्यातून पुढे अनेकांस शासनही झाले. इतकेच नव्हे तर नंतर लोकसेवा आयोगाच्या सदस्या सायली जोशी यांनाही पदावरून दूर करण्याचा निर्णय राज्य शासनास घ्यावा लागला होता, हा या राज्याचा इतिहास. दुसरे उदाहरण शेजारील कर्नाटक राज्याचे. तेथील लोकसेवा आयोगाच्या प्रमुखास राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पदावरून दूर केले, ही गेल्या महिन्यातील घटना. म्हणजे आयोग प्रमुखास काढून टाकण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांस आहे. त्यासाठी करावयाचे ते इतकेच. संपूर्ण मंत्रिपरिषदेची बैठक बोलावून तीत आयोगाच्या प्रमुखास पदावरून दूर करण्याचा ठराव मंजूर करवून राज्यपालांकडे पाठवायचा. याचा अर्थ असा की आताही भीमनवार यांस दूर करण्याची सोय फडणवीस यांना आहे. तेव्हा प्रश्न आहे तो तशी इच्छा ते दाखवतात किंवा काय. तसे त्यांनी केल्यास त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही सदस्य अशा ठरावाच्या आड येण्याची शक्यता नाही. तेवढे राजकीय धैर्य प्रस्थापित सरकारात कोणाहीकडे नाही, हे वास्तव. ते लक्षात घेऊन या भीमनवारांस नारळ देणे उत्तम.

कारण त्याखेरीज लोकसेवा आयोगात आमूलाग्र सुधारणा करण्याची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक कृती आपण करू शकतो असा, संदेश फडणवीस देऊ शकतील का? प्रत्यक्ष कृतीअभावी सुधारणांच्या केवळ इच्छेस विचारतो कोण? विचारले तरी त्याचा उपयोग काय? यातील दुसरे कारण असे की लोकसेवा आयोगाच्या अधोगतीस सुरुवात झाली ती भाजप-शिवसेना यांच्या पहिल्या-वहिल्या सरकार काळात. त्या वेळी मुख्यमंत्रीपदी होते शिवसेनेचे मनोहर जोशी आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्रीपद सांभाळत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वत: आपल्याहाती सरकारचा रिमोट असल्याचे त्या वेळी सांगत. त्यांच्याच नियंत्रणाखालील सरकारात लोकसेवा आयोगाचा हा पहिला घोटाळा नोंदला गेला. ते ऐतिहासिक पाप पुसून टाकण्याची संधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर चालून आलेली आहे. शिवसेना फोडण्यात त्यांना ‘यश’ आलेले आहे, निवडणूक आयोगाच्या सौजन्याने आपणच खरी शिवसेना असे म्हणणार्‍या गटाचे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने त्या वेळी घडलेल्या घोटाळ्याची पुनरावृत्ती राज्य लोकसेवा आयोगात घडून येत आहे. अशा वेळी लोकसेवा आयोगाच्या प्रमुखास पदावरून दूर करण्यासाठी तेव्हा जे सरकारने केले तेच फडणवीस आता करू शकतात आणि आयोग प्रमुख भीमनवार यांस दूर करू शकतात. त्यासाठी उगाच राज्यपालांकडे चौकशी समितीची मागणी करणे, कोणा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडे ती जबाबदारी सोपवणे इत्यादी उपचारांची काहीही गरज नाही. हा सारा देखावा.

ज्यास काहीही करावयाचे नसते, त्यास नि्क्रिरय राहण्याची सरकारमान्य सोय म्हणजे हे असले चौकशी समितीचे देखावे. आयोगाची साफसफाई मुख्यमंत्री फडणवीस हे मनापासून करू इच्छित असतील, तर त्यांनी त्याची सुरुवात आयोग प्रमुख भीमनवार यांच्यापासून करावी. त्यासाठी हा योग्य काळ आहे आणि वेळही तर आलेलीच आहे. हा मुहूर्त फडणवीस यांनी दवडू नये.