शहरे चालवणार्यांच्या मनात त्या शहराविषयी काही भावना हव्यात आणि जबाबदारीची जाणीव हवी. तिचा पूर्ण अभाव आपल्या सर्वच शहरांत सर्रास दिसून येतो…
नवीन उत्तम काही उभारता येत नाही आणि जुने उत्तम राखता येत नाही या आधुनिक भारताच्या वास्तवाचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे मुंबईची ‘बेस्ट’ सेवा. ‘बॉम्बे इले्ट्रिरक सप्लाय ॲण्ड ट्रान्सपोर्ट’ ऊर्फ ‘बेस्ट’ ही केवळ मुंबई वा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातच गौरवली गेलेली पहिली आणि बराच काळ एकमेव राहिलेली शहर सार्वजनिक वाहतूक सेवा. तिच्या स्थापनेची शताब्दी बुधवारी- १५ जुलैस साजरी झाली. या शतकभराच्या काळात ‘बेस्ट’चा आलेख चढताच राहिला. त्याचे श्रेय अशी शहर सेवा सुरू करणार्या साहेबाच्या व्यापक नियोजकतेस जसे जाते तसेच त्या श्रेयाचा मोठा वाटा नियोजनाचा आदर करणार्या नागरिकांच्या मानसिकतेकडेही जातो. वास्तविक महानगराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी शंभर वर्षे म्हणजे एक स्वल्पविराम. या शंभर वर्षात जुन्यातील जे जे चांगले त्याची भर मुदलात घालून त्या चांगुलपणाच्या व्याजावर पुढच्या मार्गाची उभारणी करणे अपेक्षित असते. विकसित आणि कायमस्वरूपी विकसनशील यांच्यातील हाच तो फरक. तो लंडन ते वॉशिंग्टन अशा अनेक ठिकाणी पदोपदी अनुभवास येतो. लंडनमधील भुयारी मेट्रो सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा वर्षांत साहेबाने मुंबईत ट्राम सुरू केली आणि तिच्यासाठी वाडीबंदर येथे स्वतंत्रपणे वीजनिर्मिती केंद्रही उभारले. ही १८७३ सालची घटना. त्याआधी दहा वर्षे, म्हणजे १८६३ साली, सुरू झालेली लंडन मेट्रो आज ज्या रीतीने गौरवली जाते त्याचा काही अंश तरी शताब्दी साजरी करणार्या ‘बेस्ट’मध्ये आढळतो काय? या प्रश्नाच्या उत्तरात आपल्या नागर जीवनाची लक्तरे आहेत.
सुरुवातीच्या घोड्याकडून ओढल्या जाणार्या ट्राम कंपनीचे रूपांतर १९२६ साली यांत्रिक बस सेवेत झाले आणि आपला ‘बेस्ट’ लौकिक ही सेवा दिवसागणिक वाढवत गेली. वास्तविक मुंबई आणि अर्थातच भारतावर राज्य होते इंग्रजांचे. पण कापूस आदी घटकांच्या व्यापारात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या बॉम्बेत अशी सेवा सुरू करण्याची मूळ कल्पना अमेरिकी कंपनीची. त्या वेळचा इतिहास असा की अंतर्गत यादवीमुळे अमेरिकी अर्थव्यवस्था डबघाईस आली होती आणि बॉम्बे शहराकडे अमेरिकी व्यापारी हे मंदीकाळातील संधी म्हणून पाहात होते. अमेरिकी कंपनीस मुंबईत वाहतूक सेवा सुरू करावी असे वाटले ते त्यातूनच. या सेवेसाठी सदर कंपनीने ९०० घोड्यांची स्वतंत्र पागा राखली होती. या सेवेचे रूपांतर आधी ट्राममध्ये आणि नंतर यांत्रिक बस सेवेत झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या सेवेस मुंबईत वीजपुरवठ्याचा आणि त्याच वेळी सार्वजनिक वाहतूक सेवा चालवण्याचा सर्वाधिकार दिला गेला. ही सेवा आधी ट्रामच्या माध्यमातून चालवली गेली आणि १९२६ पासून तीत बस गाड्यांचा अंतर्भाव केला गेला. अशा बस सेवेचा शुभारंभ झाला १५ जुलै १९२६ या दिवशी. त्या वेळी ‘बेस्ट’च्या मालकीच्या २४ बस गाड्या होत्या. त्यात उत्तरोत्तर वाढच झाली. इतकी की साठच्या दशकात ‘बेस्ट’च्या स्वत:च्या मालकीच्या बस गाड्यांची संख्या हजाराहून पुढे गेली. तथापि आपल्या सेवेचा शतक महोत्सव साजरा करत असताना आजमितीस ‘बेस्ट’च्या ताब्यातील बस गाड्यांची संख्या किती? ती आहे फक्त २४९. यावरून मुंबईच्या नगरपित्यांच्या मानसिकतेतील बदल दिसून येतो आणि शतकोत्तर वाटचालीच्या उंबरठ्यावर नव्या झळाळीऐवजी ही सेवा अधिकाधिक काळवंडू लागल्याचे का दिसते याचाही अंदाज येतो.
या काळात ‘बेस्ट’ सेवा वाढल्या नाहीत असे नाही. त्यात वाढ झालीच. पण या वाढीसाठी ‘बेस्ट’ने स्वमालकीचे हात झटकले आणि सत्ताधार्यांस खिसे भरण्याची संधी देणार्या कंत्राटीकरणाचा मार्ग स्वीकारला. आज स्वत:च्या मालकीच्या फक्त २४९ बस गाड्या सांभाळणार्या ‘बेस्ट’च्या सेवेत त्याखेरीज २,५५१ इतक्या बस गाड्या आहेत. सर्व कंत्राटी. अन्य कोणाच्या मालकीच्या या बस गाड्या त्यांच्या सर्वांगास लाल रंग फासून ‘बेस्ट’ म्हणून चालवल्या जातात. या बस गाड्यांचे चालकही असेच. कंत्राटी. बस गाड्याही मालकीच्या नाहीत आणि ते चालवणारे चालकही सेवेत नाहीत. त्याच वेळी प्रवाशांसही सेवेविषयी ममत्व नाही. या नवप्रवाशांची पैसे फेकू वृत्ती ते ज्या रीतीने बस स्टँडवर उभे राहतात आणि झडप घातल्यासारखे बसमध्ये कसे चढतात यातून स्पष्ट दिसून येते. प्रवासी हे असे. आणि कंत्राटी बसचालकास बस स्टँडपर्यंतही आणण्याचे सौजन्य नाही. अलीकडे बस गाड्या त्यांच्यासाठी अधोरेखित जागेत उभ्या न राहता भर रस्त्यात ठाण मांडून उभ्या राहतात त्या या शहराच्या बदललेल्या संस्कृतीमुळे. अगदी अलीकडेपर्यंत ‘बस’ गाड्यांचा अपघात ही गोष्ट क्वचित कधी कानावर येत असे. आता परिस्थिती अशी की ‘बेस्ट’चा अपघात हा इतका दैनंदिन झालेला आहे की त्याचे काही कोणास वाटते असे मानणे हा भाबडेपणा ठरेल. गेल्या काही महिन्यांत किमान अर्धा डझन नागरिकांचे जीव ‘बेस्ट’ अपघातात गेले. या नव्या ‘बेस्ट’ने जे जे बेस्ट त्या सगळ्याचा त्याग केलेला आहे हे या आस्थापनाच्या कारभारावरूनच समजून यावे. नागरिकांत कोणत्याच सेवेविषयी आपलेपणाची भावना नाही आणि ती देणार्या कोणाच्याही मनात नागरिकांविषयी ममत्व नाही, असा हा समसमा संयोग.
त्यातून आपल्या नागर जीवनाचे स्खलन तेवढे दिसते. शहरे केवळ चकचकीत इमारती आणि रस्ते-पूल नव्हेत. त्यास शहरे चालवणार्यांच्या जबाबदार वर्तनाची साथ हवी. तर शहर चांगले की भिकार हे ठरते. शहरे चालवणार्यांच्या मनात त्या शहराविषयी काही भावना हव्यात आणि जबाबदारीची जाणीव हवी. तिचा पूर्ण अभाव आपल्या सर्वच शहरांत सर्रास दिसून येतो. एखाद्याचे पोट फुटेल की काय असे वाटेल इतके फुगावे तशी आपली शहरे फुगलेली आहेत. ना आकार ना उकार. बकालपणा सार्वत्रिक. ‘स्वच्छ भारत’ वगैरे कितीही घोषणांचा कंठशोष करा वा त्यांच्या यशाचे गोडवे गा. ते किती फोल आहेत याचे वास्तव आपल्या कोणत्याही शहरात वा गावात वा कोठेही दिसेल. शहरी जीवनाची म्हणून एक शिस्त असावी लागते. ती राखण्यासाठी कसलेच प्रयत्न झाले नसतील आणि उठवळ लोकांहाती आपले प्रशासन गेले असेल, बाकी सर्वत्र कंगालीकरण मोठ्या जोमाने होत असेल तर ‘बेस्ट’ सेवा बेस्ट कशी राहणार?
दु:ख हे की शहरांच्या हाती पैसा अधिक खेळू लागलेला असताना, आपली एकूणच सामाजिक सांपत्तिक स्थिती सुधारत असताना देशातील एकाही शहरात आपण ‘बेस्ट’ लौकिकाच्या जवळपास जाईल अशी सेवा सुरू करू शकलो नाही. दिल्लीतील बस सेवेविषयी न बोलणे बरे आणि मुंबईलगतच्या पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा आणि गुणवत्ता यांचा संबंध जन्मात कधी आलेला नाही. कोलकाता, चेन्नई, बेंगळूरु आदी शहरांतील सावर्जनिक वाहतूक म्हणजे मूर्तिमंत कल्लोळ. सुमारे दशकभरापूर्वी आपली शहरे ‘स्मार्ट’ होणार अशी आवई उठली होती. पण नव्या वसवल्या जाणार्या शहरांचा ‘स्मार्टनेस’ सोडा; आपली होती ती शहरे जगण्याचा होता नव्हता तोही दर्जा झपाट्याने घालवून बसली. शिवाय देशातील एकही ‘मेट्रो’ सेवा नफ्यात नाही. त्यातल्या त्यात गुंतवणुकीवर बरी कमाई आहे ती दिल्ली मेट्रोची. तरी प्रवाशांच्या तिकिटांतून दिल्ली मेट्रोला होणारी कमाई ४८ टक्केच. बाकीच्या शहरांतील मेट्रो म्हणजे शुभ्र पांढरे हत्ती. ‘बेस्ट’ची शताब्दी काय काय बेस्ट आपण मागे सोडले याची वेदना जागृत करते. तीवर फुंकर घालेल असे एखादेही शहर डोळ्यासमोर नाही.
