झाडे खूप सहनशील असतात. त्यांचे जगणे असह्य झाल्याखेरीज आपले जमिनीशी असलेले नाते ती तोडत नाहीत. मुळाच्या एखाद्या का असेना धाग्याच्या, पारंबीच्या आधाराच्या साहाय्याने होता होईल तितके आपले उन्मळून पडणे झाडे लांबवतात. झाडे मरण लांबवतात याचे कारण त्यांना जगण्याचा सोस असतो म्हणून नव्हे. पण आपल्यावर शेकडो पक्ष्यांचे संसार, पांथस्थाची सावली अवलंबून आहे आणि पृथ्वीच्या गर्भातील जीवनरस आकाशातील ढगांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची त्यांना जाणीव असते म्हणून. पण जेव्हा सगळेच हाताबाहेर जाते तेव्हा झाडे आपला लढा संपवतात. एखाद्या ऋषीमुनीप्रमाणे झाडे प्रायोपवेशन करतात आणि मृत्यूस सामोरे जातात. गेल्या चार दिवसांच्या पावसात एकट्या महानगरी मुंबईत शेकड्यांनी झाडे धारातीर्थी पडली. हा पाऊस झाडांना नवा नाही, त्याच्या सोबतीने येणारा वाराही जुनाच आणि या सगळ्यांच्या एकत्र बरसण्याचा काळही नेहमीचाच. तरीही शेकडो झाडांनी जमिनीशी आपली वर्षानुवर्षांची साथ सोडली आणि यांत्रिकी करवतींहाती शवविच्छेदनार्थ आपला देह सुपूर्द केला. एकेका झाडाबरोबर मानवी संस्कृतीचा अंश मातीमोल होत असतो. झाडांचे पडणे आसपासच्या निराशाजनक परिस्थितीवरचे त्यांचे भाष्य असते. म्हणून एका झाडाच्या मरणाची दखल शहाणे गांभीर्याने घेतात.
ते भाग्य येथील झाडांच्या नशिबी नाही. या मातीत झाडांना गांभीर्याने घेणार्या शहाण्यांची वानवा आहे. परत या मातीतील झाडांचा शाप दुहेरी. एका बाजूने पायाभूत प्रकल्पांसाठी म्हणून सरकार हवी तितकी झाडे नष्ट करण्यास परवानगी देते आणि दुसर्या बाजूने कोणा ‘अ’द्योगपतीच्या कारखान्यात तयार होणार्या सिमेंटला अक्षय्य मागणी राहावी या हेतूने संपूर्ण देशभर काँक्रीटीकरण हाती घेते. पहिल्या शापाने येणारे मरण थेट. दुसरा शाप हळूहळू भिनणार्या विषासारखा. मुळे आकसू लागतात. सिमेंट काँक्रीटने त्यांच्या विस्ताराचा मार्ग रोखलेला असतो आणि ‘खाली’ जावे अशीही परिस्थिती नसते. परिणामी जमिनीशी असलेली त्यांची नाळ हळूहळू सुटत जाते. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाने निर्विकार नजरेने मरणाकडे डोळे लावून बसावे तशी मग झाडे आपल्या उन्मळण्याची वाट पाहू लागतात. त्यांचे ते मरणाकडे डोळे लावून वाट पाहणे अखेर वार्याला पाहावत नाही. व्हेंटिलेटरची नळी काढण्याची सूचना जवळचे नातलगच डॉक्टरला देतात त्याप्रमाणे झाडांचा सांगाती असलेला वारा, झाडांना जीवन देणार्या पावसाच्या साक्षीनेच त्यांना निर्णायक धक्का देतो आणि झाडेही ‘मरणाने केली सुटका; जगण्याने छळले होते’ असे म्हणत आपले आयुष्य संपवतात. गेल्या तीन-चार दिवसांत पृथ्वीशी असलेले आपले नाते संपवणार्या सर्वच झाडांची ही कर्मकहाणी. परंतु ती ऐकून वा वाचून आता कोणालाच तसे काही वाटत नाही. कथित पायाभूत सुविधांच्या उभारणीत ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दीवाना’प्रमाणे उगाचच आनंद बाळगणारे मूढ सामान्यजन एकीकडे आणि दुसरीकडे माध्यमांवर नियंत्रण असणारे सरकारी लाभार्थी ‘अ’द्योगपती यांच्यात हा समाज विभागलेला. त्यामुळे झाडांच्या मरणावर दु:ख व्यक्त करणार तरी कोण? आणि केले तरी ते सांगणार कोण कोणास हा प्रश्न. त्यात झाडे ना मते देतात, ना मोच्र्याला येतात, ना एखाद्या प्रार्थनास्थळाच्या उभारणीचा आनंद ती साजरा करतात. परत झाडे ‘आपली’ आणि ‘त्यांची’ अशी विभागणीही करू देत नाहीत. थोडक्यात आपल्या देशास महासत्ता बनवण्यासाठी झाडे तशी निरुपयोगीच. आणि तसेही देशाची भगवी पताका फडकवायची म्हणजे ‘हिरव्यास’ आडवे करणे ओघाने आले. झाडे ही हिरवी. म्हणून तोडली तर तोडली, पाडली तर पाडली आणि मेली तर मेली. त्यांचे काय इतके सोयर-सुतक बाळगायाचे? करोनाच्या काळात लाखोंच्या दडवलेल्या मरणाचे आरोप पचवणारा हा समाज मूक झाडांच्या मरणाने थोडाच हलणार? तेव्हा झाडांचे जे काय व्हायचे ते होईल. त्यांच्या असण्या-नसण्याचा विचार सोडून आपण पायाभूतावर भर देणे योग्य.
पण त्यातही आपला दाम खोटा. इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले. स्वदेशीचा मळवट भरून त्या साहेबाच्या खुणा आपण पुसू पाहातो. पण त्या पुसता पुसल्या जात नाहीत. हे बोरघाटाचेच पाहा. कोणतेही तंत्रज्ञान नाही, खणण्या-बांधण्याची यंत्रसामग्री नाही आणि समोर एखादे प्रारूपही नाही. तरीही साहेबाने १८३० च्या आसपास मुंबई-पुण्यास बोरघाटातील आडवाटेने जोडले. त्यानंतर ३० वर्षांनी या मार्गावर रेल्वेही चालवून दाखवली. त्यास आता २०० वर्षे होतील. पण त्या मार्गाचा एक टवकाही अजून उडालेला नाही. स्वातंत्र्याची पहाट उगवण्यास सात वर्षे असताना फक्त मुंबईतील नव्हे तर देशातही कौतुकाचा विषय ठरलेला ‘राणीचा कंठहार’ (मरिन ड्राइव्ह) साहेबाने बांधला. जोपर्यंत त्यास नेटिव्हांचा हात लागलेला नव्हता, तोपर्यंत, म्हणजे अगदी अलीकडेपर्यंत, हा रस्ता पूर्वीइतकाच गुळगुळीत होता. त्याच्या काँक्रीटीकरणाचे डोहाळे नेटिव्हास लागले आणि कोणा ‘अ’द्योगपतीचे सिमेंट खपावे म्हणून देशभर काँक्रीटीकरणाची लाटच आली. काँक्रीटीकरणाने रस्त्यांस खड्डे पडत नाहीत, असा या मंडळींचा दावा. तो खरा असूच शकत नाही. कारण रस्त्यांस खड्डे पडले नाहीत, ते बुजवण्याची कंत्राटे वारंवार देता आली नाहीत तर सत्ताधार्यांची दुकाने चालणार कशी? चांगले रस्ते हे कंत्राटदार आणि सत्ताधीश यांच्यासाठी वाईट(च) असतात. तेव्हा रस्ते बांधताना ते चांगले राहणार नाहीत याची पुरेशी तजवीज केली जाते. त्यानुसार घडते आणि नवनवी कंत्राटे देत सत्ताधीश सौख्यभरे अनंतकाळ नांदू शकतात.
याचा अर्थ आपली समस्या दुहेरी आहे. पहिला भाग आहे तो प्रकल्पाच्या वाढत्या खर्चांचा. कंत्राटदार संघटनेनेच केलेल्या आरोपानुसार प्रकल्प खर्चापेक्षा कित्येक पट अधिक रकमेच्या निविदा त्यांना भराव्या लागतात. ‘वरची’ रक्कम अनेकांचे हात टेबलाखालून ओले करण्यात खर्च होते. ते ओले केल्यावर कंत्राटदारांची बिले मंजूर होतातच असे नाही; त्यासाठीही त्यांना काही देवाण-घेवाण करावी लागते. हे जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा ‘आम्हाला मंत्रालयात पैसे पोचवावे लागतात’, अशी जाहीर आरोळी ठोकण्याची गरज कंत्राटदारांस वाटू लागते. त्यामुळे ‘चोरीचा मामला, हळूहळू बोंबला’ असा उभयतांत इतके दिवस राजरोसपणे पाळला जात असलेला करार मोडून जाहीर रडगाणे गाण्याची वेळ त्यांच्यावर आली. समस्येचा दुसरा भाग हा. प्रकल्पाचा खर्च अधिक आणि दर्जाही सुमार. संबंधितांच्या दृष्टीची झेप पाच वर्षांपलीकडे जात नाही. जे काही करायचे, कमवायचे ते या पाच वर्षांत. त्यामुळे मिळेल त्यावर हात मारणे इतकेच काय ते लक्ष्य. त्याची पूर्तता करताना दर्जा माणसांचे जीव जातील इतका हीन असला तरी फिकीर कोणाला? कोणत्या भ्रष्टाचारावरून आपल्याकडे कधी कोणास शासन झाले आहे की विद्यमान संबंधितांनी शिक्षेच्या भीतीपोटी कमाई थांबवावी? आणि एकदा का मतदारांस आपण ‘त्यांचे’ आहोत हा विश्वास दिला की झाले! नागरिक उदार अंत:करणाने दर्जा वगैरेकडे काणाडोळा करतात. मग ते बांधकाम ‘मिसिंग लिंक’चे असो किंवा एखाद्या ऐतिहासिक धर्मस्थळाचे! भ्रष्टाचार हा दोन्हींचा गाभा!
सबब माणसे झाडे पडून, उघड्या गटारांत पडून, पूल वाहून गेल्यामुळे, दरडी कोसळल्यामुळे, निकृष्ट कामामुळे… अशा कशानेही मरोत. कशाने काही फरक पडणार नाही. कारण ‘मिसिंग’ फक्त लिंक नाही, बरेच काही आहे.
