आर्थिक स्थितीस गती देण्याचा प्रयत्न म्हणून पर्यटन क्षेत्राकडे बोट दाखवले जाते. पण पर्यावरणाचे पोट फाडून बाहेर येणारे पर्यटन अंतिमत: विनाशकारीच ठरते.
नेपाळमध्ये जे घडले ते महाभयानक आहे. हॉलीवूडच्या कोणा विज्ञानपटात जगबुडी दर्शवण्यासाठी जे काही दाखवले जाते ते प्रत्यक्षात आल्यावर काय होईल ते नेपाळमधील निसर्गप्रकोप पाहिल्यावर जाणवते. मजबूत, स्थिर, दणकट, आश्वासक इत्यादी कसे काही नसते याची सर्व मानवी अस्तित्वालाच क्षणभंगुर ठरवणारी जाणीव नेपाळमधील घटना करून देतात. सिमेंट काँक्रीटच्या इमारती, पिढ्यानपिढ्यांचा भार सहन केलेले पोलादी पूल, मोठमोठी अवजड वाहने… काही म्हणून टिकले नाही. कागदाचा एखादा चिटोरा वार्याच्या एखाद्या झुळुकीने हवेत उडवून द्यावा त्याप्रमाणे संपूर्ण मानवी अस्तित्वच या घटनेने अनिश्चिततेच्या गर्तेत भिरकावले गेले. अशी वेळ कोणावरही येऊ नये. ती आल्यावर आणि निसर्गाचा प्रकोप सहन करावा लागल्यामुळे जे गेले ते सुटले म्हणायचे. ज्यांना कोणास निसर्गाचा हा बेफाम नंगा विध्वंस स्वत:च्या डोळ्याने पहावा लागला त्या सर्वांस नंतर त्याचे स्मरणदेखील मरणयातना देणारे असेल. त्या विनाशाची जी काही दृश्ये समोर येत आहेत, ती दूरचित्रवाणीवरून पाहतानाही काहींची दातखीळ बसेल इतकी ती भयानक आहेत. त्या देशातील हा भौतिक विनाश आज ना उद्या भरून काढला जाईलही. पण मानव-निसर्ग या नात्यातील विश्वासार्हतेस यामुळे बसलेला धक्का भरून निघणे संबंधित व्यक्तींच्या हयातीत शक्य होणार नाही.
निसर्गाचा हा विध्वंसावतार सहन करण्याची वेळ आली, असा नेपाळ हा एकटा देश नाही. अलीकडे आपल्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी राज्यांनीही असेच काही अनुभवले. जोशीमठ परिसरात भूकंपाशिवाय जमिनींस तडे जाणे, इतर ठिकाणी भूकंप, ढगफुटी, भूस्खलन, डोंगराचे कडेच्या कडे सुटून खाली येणे, हिमनद्या आटणे आणि वितळणे या घटना घडल्या आहेत. हे केवळ हिमालयाच्या परिसरातच झाले असेही नाही. दक्षिणेस केरळसारख्या राज्यानेही निसर्गाचा हा प्रकोप सहन केला. या राज्यात जे काही झाले आणि तिकडे नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल आदी देशांत/राज्यांत जे घडते आहे, त्यात विनाशाच्या जोडीने एक मुद्दा समान आहे. तो म्हणजे डोंगराचा, पर्वताचा प्रकोप. भारताच्या दक्षिण भागात तो सहन करावा लागतो कारण पश्चिम घाटाकडे होत असलेले/केले जात असलेले अक्षम्य दुर्लक्ष. किंबहुना हेळसांड. आदरणीय पर्यावरण अभ्यासक माधवराव गाडगीळ यांनी आपल्या अहवालातून याबाबतचे गांभीर्य आपल्या नजरेस आणून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण आपण त्याकडे दुर्लक्षच केले. हिमालयाबाबत असेच इशारे अनेकांनी आतापर्यंत दिले आहेत. आपण त्याकडेही दुर्लक्षच केले आहे.
देवभूमी म्हणत ज्यास कुरवाळले जाते, त्या उत्तराखंडादी राज्यात जवळपास ३०-३५ बोगदे पर्वतराजीच्या पोटात खणले जात आहेत. खरे तर हिमालयासंदर्भात १९७६ साली या संदर्भात पहिला व्यापक पाहणी-आधारित अहवाल दिला गेला होता आणि या परिसराची संवेदनशीलता जगासमोर आणली गेली होती. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिमालयात जे भूकंप झाले, जे भूस्खलन झाले ते स्थिर होऊन त्याचे पठारात रूपांतर झाले आणि पुढे ती वस्तीस्थाने बनली. त्यातील एक म्हणजे जोशीमठ. तेथे तीन वर्षांपूर्वी जे झाले ते भविष्यात काय होऊ शकते याची चुणूक ठरले. अशी चुणूक नेपाळास मिळाली होती किंवा काय ते ठाऊक नाही. पण नेपाळ काय वा आपण काय, पर्यावरण नुकसान सातत्याबाबत एकमेकांचे शेजारी शोभतो. अशा परिसरातील आर्थिक स्थितीस गती देण्याचा प्रयत्न म्हणून पर्यटन क्षेत्राकडे बोट दाखवले जाते. ते खरे. पण पर्यावरणाचे पोट फाडून बाहेर येणारे पर्यटन अंतिमत: विनाशकारीच ठरते. रोजगार मिळावा, टिकावा म्हणून वाटेल तशी, वाटेल त्या दर्जाची हॉटेले काढण्यास वाटेल तशा परवानग्या देणे, चार पैसे अधिक मिळवण्याच्या नादात स्थानिकांनी कसलाही मागचा-पुढचा विचार न करता या वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे आणि अंतिमत: निसर्गाचा हा असा फटका खाणे हे आशिया खंडात सगळीकडे सारखेच. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड काय नि नेपाळ काय!
आताही ज्यामुळे ताजा विध्वंस घडून आला त्यामागील कारण पाहा. नेपाळमधील लांगटांग लिरुंग शिखराच्या परिसरातील हिमनदीचा सुमारे दोन हजार फूट लांब-रुंद असा अगडबंब बर्फाचा तुकडा नदीपासून वेगळा होत चार हजार फूट खाली कोसळला. बर्फ आणि खडक कोसळल्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा इतकी प्रचंड होती की, त्यामुळे ५.२ तीव्रतेच्या भूकंपासारखे धक्के जाणवले. या अजस्राने जमिनीवर लोळण घेताना आसपास जे होते ते आपल्यासमवेत ओढून घेतले. त्यातून पाणी उचंबळले आणि अगदी २५० फुटाची महाप्रचंड, महाकाय लाट तयार झाली. ती त्या तलावात मावेना. परिणामी गुरुत्वाकर्षणास शरणागत होत ही प्रचंड जलभिंत बांध सोडून धावली आणि वाटेत जे उभे होते ते आडवे करत गेली. प्रचंड वस्तुमानास लहानशी जरी गती मिळाली तरी त्याचा विध्वंसक परिणाम होतो हे साधे भौतिकशास्त्र. त्याचा वस्तुपाठ नेपाळच्या पर्वतराजीत पाहावयास मिळाला. ही २५० फुटी लांब-रुंद जलभिंत स्थानिक उतारामुळे ४०-४५ किमी प्रति तास अशा वेगाने खाली झेपावत गेली. तिच्या अजस्रतेमुळे तिला मिळालेली गती महाविध्वंसक ठरली. यामुळे जे काही व्हायचे ते झाले.
हा सगळा परिसर मंदिरांचा. त्यामुळे रग्गड यात्रा आणि यात्रेकरू. त्यातील अनेक यांत अडकलेले दिसतात. भारतातील कोणा सद्गुरूचे अनुयायीही यात मोठ्या संख्येने असल्याचे वृत्त आहे. आपल्या दुसर्या एका सद्गुरूने पर्यावरणास खुंटीवर टांगत नदीपात्रात आपल्यातील दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार भगतगणांस घडवला. तथापि त्या आध्यात्मिक गुरूमुळे काही पर्यावरण र्हास झाला नसल्याचा निर्वाळा संबंधितांनी दिला. दुसर्या एका सद्गुरूचे भक्तगण या नेपाळच्या दुर्घटनेत अडकल्याचे कळते. आपल्या अध्यात्मिक ताकदीने हे सद्गुरू त्यांची निश्चित सुटका करतील. खरे तर गुरूच्या ठायीच ब्रह्मा, गुरू म्हणजेच विष्णु इत्यादी असताना या सद्गुरूंच्या भक्तांस नेपाळात वणवण करण्याची गरज नव्हती. असो. या संकटातून सर्व सुखरूप परत येवोत ही भावना सर्वांचीच असेल.
पण त्याच वेळी आमच्या राज्यातील डझनभर औष्णिक वीज निर्मिती केंद्रांचा फेरविचार करा अशी मागणी करावी असे या घटनेनंतर सिक्कीममधील काहींस वाटले आणि तशी त्यांनी केली, ही त्यातल्या त्यात आशादायक बाब. संपूर्ण हिमालय पर्वतरांग ही भूवैज्ञानिकदृष्ट्या अद्यापही स्थिर झालेली नाही. हिमालय हा तुलनेत तरुण पर्वत आहे आणि साहजिकच तारुण्यातील चंचलतेच्या खुणा तो वारंवार प्रदर्शित करतो. अशा वेळी या तरुण, अस्थिर पर्वतराजीच्या खांद्यावर विकासाचा किती भार टाकायचा याचा विचार संबंधितांस करावाच लागेल. गेल्या काही वर्षांत या सगळ्या पर्वतराजीत इतक्या अशा घटना घडताना दिसतात, इतका विध्वंस होताना दिसतो आहे तरीही आपण शहाणपण शिकणार नसू तर कोणताही सद्गुरूच काय साक्षात परमेश्वर जरी आला तरी तो स्थानिकांस वाचवू शकणार नाही.
कारण हा विनाश स्वनिर्मित आहे. ज्याप्रमाणे आत्मघातकी दहशतवाद्यास कोणीही वाचवू शकत नाही, कारण तो मरण्याच्या मोहिमेवरच निघालेला असतो, त्याप्रमाणे आत्मघातकी पर्यावरणविनाशापासून मानवजातीस वाचवता येणारे नाही. दरवर्षी वेगाने वाढत जाणारा उन्हाळा हिमनद्यांना वितळवणार आणि त्यांच्या लाटा अशाच रोरावत मिळेल ते उद्ध्वस्त करत जाणार. ‘‘बर्फाचे तट पेटूनि उठले सदन शिवाचे कोसळले’’ असे कुसुमाग्रजांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिले. ते प्रतीकात्मक होते. परंतु पर्यावरणाच्या र्हासाने हे बर्फाचे तट खरेच वितळू लागले आहेत. हे शिवाच्या सदनाचे कोसळणे प्रतीकात्मक नाही, हे उत्तरेतील या घटना दाखवून देतात. आपण त्यापासून काही शिकणार असू तर ठीक. अन्यथा…
