इराणवर हल्ला अटळ असल्याचे लक्षात येताच अमेरिकी संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या स्वीय गुंतवणूक सल्लागाराने युद्धसामग्री उत्पादक कंपन्यांत चाचपणी सुरू केली…
जैवसाखळीत एकाची विष्ठा हे जसे दुसर्याचे अन्न असू शकते तद्वत एकाच्या विध्वंसात दुसर्याचा विकास असू शकतो. हे कटू असले तरी सत्य आहे आणि जीवसृष्टीच्या उत्क्रांतीपासून असेच चालत आलेले आहे. जेव्हा साथीच्या आजारात माणसे मरत असतात तेव्हा मानवी आयुष्यावर आलेले संकट ही औषध कंपन्यांसाठीची संधी असते. अशा संधींचा लाभ घेण्याची संधी सर्व इच्छुकांस समान असत नाही, ही यातील आक्षेपार्ह बाब. जे सबल असतात, सधन असतात आणि व्यवस्था वाकवण्यास सक्षम असतात त्यांनाच या संधीचे सोने करणे शक्य होते. येथपर्यंत हे सर्व एक वेळ ठीक आणि त्यास मानवी व्यवहाराचा भाग असे म्हणता येईल. तथापि हाती उपायांचे सामर्थ्य आहे म्हणून जेव्हा बहुसंख्यांस अपाय करण्याचा घाट घातला जातो तेव्हा मात्र ते मानवतेवरील संकट असते. या अशा घृणास्पद कृत्यांस उघडे पाडणे हे माध्यमांचे कर्तव्य. अमेरिकी आणि इंग्लंडातील माध्यमे ते चोखपणे पार पाडताना दिसतात.
स्वत:स सर्वशक्तिमान मानणारा एकमेव जागतिक महासत्तेचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती प्रत्यक्षात किती वेडसर आहे त्याचे यथासांग दर्शन या माध्यमांतून नित्यनेमाने घडवले जाते आहेच; पण त्याचबरोबर या अध्यक्षाच्या संतापास काडीचीही भीक न घालता त्याचे युद्धातील आर्थिक हितसंबंध चव्हाट्यावर आणण्याचे ऐतिहासिक कर्तव्यही ही माध्यमे पार पाडत आहेत. लंडनमधून प्रकाशित होणार्या ‘द फायनान्शियल टाइम्स’चा ताजा वृत्तान्त याच मालिकेतील. ‘एफटी’ हे एक नेमस्त वर्तमानपत्र. छछोर सनसनाटीसाठी त्याचा लौकिक कधीच नव्हता. त्याचमुळे या वर्तमानपत्राचा हा शोध-वृत्तान्त युद्धखोरांची रक्तपिपासू मानसिकता उघडी पाडतो. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्याबाबतचा हा वृत्तान्त लष्करी सामग्री उत्पादक आणि बाजारपेठ यांच्यातील कुटिल नाते दाखवून देणारा असल्याने त्यावर भाष्य करणे आवश्यक.
देश कोणताही असो; देशप्रेमाच्या गणवेशातील लष्कर आणि संबंधित यंत्रणा भ्रष्टाचाराचे मूर्तिमंत नमुने असू शकतात. या भ्रष्टाचारावर राष्ट्रप्रेमाचे आवरण असल्याने तो तितक्या सहजपणे उघडकीस येत नाही; इतकेच. इराणवरील युद्धाच्या निमित्ताने अमेरिकेत हेच होताना दिसते. हे युद्ध ही अमेरिकेपेक्षाही अधिक इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारक नेतान्याहू यांची गरज होती हे आता सर्वच मान्य करतात. ही गरज पूर्ण करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कूट चलनातील गुंतवणूक, भांडवली बाजार सुरू-बंद होण्याच्या वेळेनुसार त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या घोषणा आणि बाजारातील चढउताराचा उपयोग स्वत:च्या गुंतवणुकीसाठी करणे इत्यादी बाबींची चर्चा अमेरिकी माध्यमांत उघडपणे सुरू झालीच आहे. त्याच वेळी त्यांचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांचे प्रतापही तितकेच आक्षेपार्ह आहेत.
इराणवर हल्ले होणार याचा पहिला सुगावा अर्थातच संरक्षणमंत्री हेगसेथ यांना लागला. किंबहुना त्यांनीच ट्रम्प यांच्याकडे यासाठी आग्रह धरला. पुढे ट्रम्प यास अनुकूल आहेत असे जाणवल्यावर आणि हे हल्ले अपरिहार्य हे स्पष्ट झाल्यावर हेगसेथ यांच्या गुंतवणूक सल्लागाराने संरक्षण सामग्री उत्पादक कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी चाचपणी सुरू केली. मॉर्गन स्टॅन्ले या बलाढ्य बँकेतील हेगसेथ यांच्या गुंतवणूक सल्लागाराने या संदर्भात जगातील सर्वात मोठ्या असलेल्या ‘ब्लॅकरॉक’ या गुंतवणूक कंपनीकडे या संदर्भात विचारणा केली आणि संरक्षण साहित्य कंपनीत गुंतवणुकीची तयारी केली, असे वृत्त ‘एफटी’ पुराव्यानिशी देते. तथापि अशा संरक्षण निधीत गुंतवणूक करण्याची सोय मॉर्गन स्टॅन्लेच्या ग्राहकांस नसल्याने हेगसेथ यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
एके काळी ‘फॉक्स न्यूज’सारख्या सत्ताधारीधार्जिण्या वृत्तवाहिनीत ४० लाख डॉलर वेतनावर काम करणार्या हेगसेथ यांनी अलीकडेच दोन पुस्तकांच्या स्वामित्व धनापोटी पाच लाख डॉलर आणि भाषणांतून नऊ लाख डॉलरची कमाई केली. विविध २९ कंपन्यांतील समभाग विकूनही या संरक्षणमंत्र्याने मोठी धन केली. युद्ध सुरू झाल्यावर भांडवली बाजार कोसळणार याची खात्री असल्यानेच या मंत्र्याने आपले समभाग विकून बक्कळ नफा कमावला.
तथापि हे असले मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे उद्योग राजरोसपणे करणारे हेगसेथ हे पहिले नाहीत. याआधी धाकट्या जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांचे संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी असेच उद्योग केले होते. त्यांनी संरक्षण उत्पादन कंपन्यांतून कमाई केली नाही. त्यांना संरक्षणाखालोखाल दुसर्या क्रमांकाचे भ्रष्ट क्षेत्र मानल्या जाणार्या औषध कंपन्यांनी ‘हात दिला’. रम्सफेल्ड यांची जिलाद लाइफ सायन्सेस या कंपनीत मोठी मालकी होती. ही औषध कंपनी त्या वेळी एकच एक औषध बनवत असे. योगायोग असा की त्या वेळचे अध्यक्ष बुश यांस या कंपनीच्या औषधाची मागणी वाढेल अशा जागतिक साथीचा अंदाज आधीच आला आणि अमेरिकी अध्यक्षांच्या इच्छेबरहुकूम ही साथ खरोखरच आली.
‘बर्ड फ्लू’ ही ती साथ. या आजारावर ‘जिलाद’चे ‘टॅमी फ्लू’ हे एकमेव औषध हा उतारा होता. त्यामुळे जगातील सर्व देश, सरकारे- यात महाराष्ट्र सरकारही आले- यांनी टॅमी फ्लूच्या गोळ्यांची घाऊक खरेदी केली आणि नागरिकांस हे तुलनेने अनावश्यक औषध मोफत उपलब्ध करून दिले. या औषधाची मागणी या काळात अर्थातच प्रचंड प्रमाणावर वाढली आणि त्याचा परिणाम म्हणून त्याआधी फारशी मागणी नसलेला या कंपनीचा समभाग त्यामुळे चांगलाच तेजीत आला. अन्य बड्या औषध कंपन्यांचीही नजर त्यामुळे या तुलनेने नवख्या औषध कंपनीवर पडली. हीच नेमकी वेळ साधून रम्सफेल्ड यांनी आपल्या मालकीचे या कंपनीचे समभाग विकून गडगंज कमाई केली. पुढचा योगायोग म्हणजे या कंपनीचे समभाग रम्सफेल्ड यांनी विकले आणि नंतर ही कंपनी दुसर्या स्वीस औषध कंपनीने विकत घेतली.
यास ‘इनसायडर ट्रेडिंग’ असे म्हणतात. म्हणजे एखाद्यास त्याचे पद, अधिकार यांमुळे जी विशेष माहिती मिळते त्याआधारे त्याने भांडवली बाजारात स्वत:चा फायदा करून घेणे. ही माहिती सर्वसामान्य गुंतवणूकदारांस नसते. त्यामुळे ते अनभिज्ञ असतात. आता इराणवर हल्ला होणार याची माहिती संरक्षणमंत्री या नात्याने हेगसेथ यांना होती आणि त्यांच्याच पक्षाचे पूर्वसुरी रम्सफेल्ड यांनाही संभाव्य साथ, तीवरील औषध आणि ते बनवणारी कंपनी या सगळ्यांची आगाऊ माहिती होती. हे अन्य गुंतवणूकदारांस ठाऊक असणे अशक्य. असे होणे हा त्यांच्यावर अन्याय.
उच्चपदस्थ राजकारणी, खासगी आस्थापनांचे प्रमुख आदींस आपल्या पदामुळे ही माहिती मिळते ती त्यांनी खासगी व्यवहारार्थ वापरणे हा नियमाधारित भांडवलशाहीत गंभीर गुन्हा मानला जातो. याच गुन्ह्यासाठी ‘मॅकेन्झी’ या जागतिक सल्लागार कंपनीचे रजत गुप्ता यांस तुरुंगवास भोगावा लागला हा ताजा इतिहास. कंपनीच्या सल्लागार पदी असल्याने मिळालेली माहिती त्यांनी गुंतवणूक सल्लागार राज राजरत्नम यांस पुरवली आणि उभयतांनी मोठी कमाई केल्याचे हे प्रकरण. हेगसेथ यांनी जे काही केले त्यामुळे अमेरिकी माध्यमांत पुन्हा एकदा इनसायडर ट्रेडिंग या विषयाची चर्चा होऊ लागली असून खुद्द अध्यक्ष ट्रम्प, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी हे पाप केल्याचे स्पष्ट आरोप तेथील माध्यमांत होऊ लागले आहेत. हेगसेथ यांनी अर्थातच ते नाकारले. परंतु तेथील माध्यमांकडून याचा पाठपुरावा होईलच होईल. अश्रापांच्या विध्वंसात स्वत:चा विकास साधणार्यांस शासन करणे ही सुसंस्कृततेची किमान गरज. ती तेथे तरी पूर्ण होईल ही आशा.
