प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न हे जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी एखादा चमचाभर पाणी घेऊन रमतगमत जाण्यासारखे आहेत…

महाराष्ट्रातल्या भीमा आणि उल्हास या दोन नद्यांच्या संदर्भात ‘एन्व्हार्यनमेंटल पोल्यूशन’ या संशोधनपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधातील निरीक्षणे गंभीर असली तरी धक्कादायक अजिबातच नाहीत. याचे कारण असे की एव्हाना कशाचेही धक्के बसण्यासाठीची संवेदनशीलता माणूसप्राण्याने आपल्या कर्तृत्वाने गमावली आहे.

एखाद्या गोष्टीचा धक्का बसण्यासाठी ती पहिल्यांदाच झालेली असते किंवा ती प्रचंड प्रमाणात झालेली असते. पण माणूस करत असलेल्या प्लास्टिकच्या सर्वव्यापी वापराचा दुष्परिणाम सगळ्या सजीव सृष्टीला गिळंकृत करत आहे, या समस्येला हे दोन्ही निकष आता लागू होत नाहीत, या टप्प्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. या शोधनिबंधातील निरीक्षणे खरेतर गेली काही वर्षे वेगवेगळ्या संदर्भात चहूबाजूंनी येऊन आपल्यावर आदळत आहेत. पण यावेळी त्यांची दखल घ्यायची ती यासाठी, की आता जे काही घडते आहे ते कुठे दूरवर नाही, तर थेट आपल्या अंगणात.

आपणच निर्माण केलेल्या प्लास्टिकच्या भस्मासुराने मानवी जीवनच नाही, तर नद्या, जंगले, समुद्र एवढेच नाही तर अंतराळ ही निसर्गसंपदाही कशी वेढली आहे, आणि माणसाच्या हव्यासाचा त्रास सगळ्याच पातळीवरच्या सजीवसृष्टीला कसा भोगावा लागत आहे, हे पाहून मनुष्यप्राण्याचे आता तरी डोळे उघडायला हवे आहेत. पण तसे होत नाही, हे आपल्या दारातल्या दोन नद्याच सांगताहेत. ते तरी ऐकायला हवे.

भीमा आणि उल्हास या पश्चिम महाराष्ट्रातील दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्या. काही संशोधकांच्या चमूने या नद्यांमधील वरडोळा नावाच्या (शास्त्रीय नाव – ग्लोसोगोबियस गिरीस) माशांवर केलेल्या संशोधनात या माशांच्या पचनसंस्थेत सूक्ष्म म्हणजेच मायक्रो प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. उल्हास नदीमधल्या ३५.७१ टक्के तर भीमा नदीमधल्या ६५ टक्के वरडोळा माशांच्या पचनसंस्थेत अशा पद्धतीने पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपलीन या प्रकारचे प्लास्टिककण मिळाले आहेत. हे सूक्ष्म प्लास्टिककण साधारणपणे एक नॅनोमीटर ते पाच मिमी एवढ्या आकाराचे असतात.

मानवी कचर्‍याच्या विघटनातून ते तयार होतात. त्यांचा त्या त्या सजीवाच्या एकूण पचनसंस्थेवर, चयापचयावर परिणाम होऊ शकतो. आपण आधीच नद्या, समुद्र, जंगले हे नैसर्गिक स्रोत कचरा फेकण्याची सोय समजून प्रदूषित केले आहेत. या मानवी कचर्‍यातील प्लास्टिक हा इतरांच्या तुलनेत दीर्घ काळाने विघटित होणारा घटक या समस्येमधला सगळ्यात मोठा खलनायक आहे. तोच सगळ्या सजीव सृष्टीच्या जीवावर उठला आहे. वरडोळा हा मासा पाण्याच्या तळाशी गाळात आपले अन्न शोधतो. तिथे जमा झालेले हे प्लास्टिककण त्याच्या खाद्यामार्फत त्याच्या शरीरात प्रवेश करतात आणि पुढे पचनसंस्थेत पोहोचवले जातात.

प्लास्टिकसारखा अत्यंत कृत्रिम घटक एखाद्या नदीमधल्या जेमतेम आकाराच्या आणि वजनाच्या माशाच्या पचनसंस्थेत आढळणे हे विकासाच्या मागे लागलेल्या माणसाच्या विविध उपद्व्यापांनी निसर्गाच्या व्यवस्थेत किती टोकाचा हस्तक्षेप केला आहे, याचे द्योतकच. संबंधित संशोधकांच्या मते अशा पद्धतीने माशांच्या पचनसंस्थेत प्लास्टिक आढळणे ही गोष्ट चिंताजनक आहे, कारण प्लास्टिकचे सूक्ष्म कण माशांच्या पचनसंस्थेत पोहोचतात, तेव्हा त्यांचे रूपांतर अतिसूक्ष्म प्लास्टिक कणांमध्ये झालेले असते. मासे हा माणसे, पक्षी यांच्या आहाराचा भाग असल्यामुळे अतिसूक्ष्म तेच प्लास्टिककण त्यांच्याही पचनसंस्थेत पोहोचतात. सगळी अन्नसाखळीच या पद्धतीने प्लास्टिकबाधित होऊ शकते.

खरेतर इथे ‘होऊ शकते’ असे म्हणण्याला तसा काही अर्थ नाही, कारण या आधी झालेल्या वेगवेगळ्या संशोधनांमधून वेगवेगळ्या प्राण्यांच्या पचनसंस्थेत प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले होतेच.  शेवटे, शिंपले किंवा बांगडा, मांदेली हे भारतीय मासे असोत की व्हेल, डॉल्फिन, पोर्पोईस आणि सील हे सागरी सस्तन प्राणी. स्थलांतरित पक्षी तसेच उंदीर, बेडूक आणि कुत्र्यामांजरांसारख्या पाळीव प्राण्याच्या शरीरात संशोधकांना प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले आहेत.  प्लास्टिक वेगवेगळ्या कारणांनी विघटित होत जाऊन त्याचे प्लास्टिकचे सूक्ष्म कण तयार होतात. ते माणूस जिथे जिथे वावरतो, तिथे तिथे-  अगदी हिमनद्यांपासून समुद्राच्या तळापर्यंत-  ते पसरतात. हवा, नद्या, जंगल, जमीन, समुद्र, अंतरीक्ष अशा सगळ्या ठिकाणी आजघडीला प्लास्टिकचे सूक्ष्म कण आहेत. हवा, धूळ, पाणी, अन्न यांच्यामार्फत ते सजीवाच्या शरीरात प्रवेश करतात.

संशोधकांना माणसाच्या शरीरात, गायीच्या तसेच इतर प्राण्याच्या दुधात प्लास्टिकचे सूक्ष्म कण सापडले आहेत. एका संशोधनानुसार मानवी शरीरात जवळपास सात ग्रॅम प्लास्टिक असल्याचे आढळले होते. आपल्या रोजच्या वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमधील सूक्ष्मातिसूक्ष्म कण या ना त्या पद्धतीने माणसाच्या शरीरात प्रवेश करतात, असे कारण त्यामागे सांगितले गेले. २०२० मध्ये २७ लाख टन सूक्ष्म प्लास्टिककण पर्यावरणात झिरपले, आणि २०४० पर्यंत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे, ही संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाची आकडेवारी हेच सांगते की माणूस आता प्लास्टिक अपरिहार्य समजतो आणि त्याच पद्धतीने ते वापरतो. तो या पद्धतीने थंड डोक्याने प्लास्टिक वापरत चालला असला तरी त्याचे परिणाम बाकी सगळ्या सजीवसृष्टीला भोगावे लागताना दिसतात. त्यामुळेच काही प्राण्यांच्या शरीरात जसे सूक्ष्म प्लास्टिककण सापडतात, तशाच गायीबैलांच्या पोटात चक्क प्लास्टिकच्या पिशव्याही सापडतात.

माणसांनी त्यांना नको असलेले खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या आवरणातून फेकून दिले की अन्नाच्या शोधात असलेले प्राणी ते खातात. त्यांना प्लास्टिक वेगळे करता येत नाही आणि ते वेगळे ओळखताही येत नाही. हेच समुद्री जीवांच्या बाबतीतही घडते. ‘द जर्नल फॉर नेचर’च्या एका अहवालानुसार उत्तराखंडमध्ये हत्तीच्या विष्ठेत प्लास्टिक सापडले होते. हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीमध्ये कोल्ह्याच्या विष्ठेत तर चेन्नईमधल्या गिडी अभयारण्यात हरणांच्या पोटात प्लास्टिक सापडले होते. प्लास्टिकची पाण्याची बाटली  घेऊन जात असलेल्या ताडोबाच्या जंगलातील वाघाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर मोठा गदारोळ माजला होता, पण ते तेवढेच. त्यानंतरही इतर जंगलांमधून प्राणी तिथे पडलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंशी खेळताना आढळून आले आहेत.

गायीम्हशींच्या पोटातून शस्त्रक्रिया करून ७०-७० किलो प्लास्टिक कचरा बाहेर काढल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. याशिवाय कासवे, मृत देवमासे, व्हेल मासे यांच्या पोटातही प्लास्टिकचा कचरा मिळतो. संयुक्त अरब अमिरातीमध्ये उंटांच्या एकूण मृत्यूपैकी निम्मे मृत्यू पोटात प्लास्टिक साठून राहिल्यामुळे होतात, असे एक अभ्यास सांगतो. वाळवंटात लोकांनी फेकून दिलेला प्लास्टिकचा कचरा उंट अन्न समजून खातात. तो न पचल्यामुळे पोटात तसाच राहतो. उंटांना त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यांचे खाणे कमी होते. यातून कुपोषण होऊन त्यांचा मृत्यू होतो, असे निरीक्षण आहे. हे रोखण्यासाठी तिथे सरकारी पातळीवर गेली १०-१२ वर्षे प्लास्टिक बंदी, प्लास्टिक वापरावर शुल्क, कलेच्या माध्यमातून जनजागृती असे वेगवेगळे उपाय योजले जात आहेत.

जगभरात इतरत्रही या प्रश्नाची जाणीव होऊन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण सध्या तरी ते जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी एखादा चमचाभर पाणी घेऊन रमतगमत जाण्यासारखे आहेत. पण जंगलाला खरेच आग लागलेली आहे आणि ती विझवण्यासाठी समुद्रभर पाणी घेऊन जीव खाऊन धावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भीमा आणि उल्हास या नद्यांच्या उदाहरणांनी हे संकट अधोरेखित केले असले तरी त्याची व्हायला हवी तेवढी जाणीव दिसत नाही. ‘माझे माहेर पंढरी’ या गीतामध्ये याच भीमेचा म्हणजे चंद्रभागेचा उल्लेख आहे आणि ती पापभंग करते असे म्हटले आहे. तिच्या उदरात आपण ढकललेल्या प्लास्टिकचा पापभंग करणे ही आता आपलीच जबाबदारी आहे.