विधानसभाध्यक्षांचे ‘दुर्द मय’ मराठी आणि त्यानंतरची दिलगिरी, अन्य कुणा राजकारण्याची अर्वाच्य दमदाटी यांच्याशी मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा काही संबंध आहे का?

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी दिवंगत गायिका आशा भोसले यांच्याविषयीचा शोकप्रस्ताव वाचून दाखवताना केलेल्या चुका आणि चहूबाजूंनी नव्हे, पण सत्ताधारी वगळता तिन्ही बाजूंनी झालेली टीका हा विषय जणू आता संपून गेला आहे. चित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेर्‍यांसमोर गलिच्छ भाषेत बोलणार्‍या खासदारानेही आता माफी मागितली आहे. झाली चूक, केली दिलगिरी व्यक्त, संपला विषय असा साधा हिशेब त्यामागे आहे. हे कुणा सरन्यायाधीशांनी स्वत:वरील आरोपांतून स्वत:लाच मुक्त केल्यासारखे. पण विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान झालेल्या एखाद्या वक्तव्याबद्दल टीकाटिप्पणी किंवा सभागृहाच्या बाहेर उघडपणे चर्चा करण्याची दारे तेव्हाच बंद होतात, जेव्हा ते वक्तव्य कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकले जाते.

विधानसभेच्या सदस्यांची वक्तव्ये कामकाजातून वगळण्याचा निर्णय विविध अध्यक्षांनी अनेकदा घेतलेला आहे. पण खुद्द अध्यक्षांचे वक्तव्य काढून टाकण्याची वेळ येऊ शकते, याची कल्पनाच बहुधा विधिमंडळ कामकाजाचे नियम बनवणार्‍यांना नसावी. त्यामुळे अध्यक्षांचे बोल सदनाच्या नोंदीतून वगळण्याची तरतूदच नाही. बरे समजा ती असती तरी शोकप्रस्ताव कसा काय वगळणार? हा शोकप्रस्ताव म्हणजे, आशा भोसले यांना महाराष्ट्रभरातल्या लोकनियुक्त प्रतिनिधींतर्फे आदरांजली वाहण्यात आल्याची नोंद- एक प्रकारे ही अख्ख्या महाराष्ट्राने वाहिलेली आदरांजली. ती पुसून कशी टाकणार? त्यामुळे आशा भोसले यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ ऐवजी दीनदयाळ मंगेशकर असे ठेवणारा, ‘दुर्द मय’सारख्या नव्या शब्दांची देणगी मराठी भाषेला देणारा आणि अडखळत, चुकतमाकत वाचला गेलेला तो प्रस्ताव कामकाजात राहणारच.

‘वाचताना माझ्याकडून चूक घडली’ असे सांगताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘बारा शोकप्रस्ताव होते’ असा उल्लेख दोनदा केला आणि ते डझनभर शोकप्रस्ताव वाचून दाखवण्यातल्या अडचणींचा पाढाही वाचला. शेवटी, ‘जर’ कुणाच्या भावना दुखावल्या असतील ‘तर’ दिलगिरी व्यक्त करून त्यांनी विषय संपवला. हे जर- तरचे विधान फार महत्त्वाचे. कारण अध्यक्षांच्या त्या   ‘दुर्द मय’ मराठीमुळे आपापल्या भावना दुखावल्या होत्या की नाही, याची पडताळणी महाराष्ट्रातील प्रत्येकाला आता करावी लागेल.

ती प्रामाणिकपणे केल्यास, मराठीबद्दलच्या ‘भावना’ वगैरे कधीच मरून गेल्याचे लक्षात येईल. या भावना खंगत जाऊन आता मरणशय्येवर गेल्या, म्हणून तर मराठी शाळा मरणपंथाला लागल्या. या शाळांमध्ये ऐकू येणारे हरितद्रव्य, कर्बोदके, ग्रीवा, समांतरभुज चौकोन, प्रकाशाचे विकिरण, दग्धभू धोरण, भाववाचक नाम… यांसारखे शब्द आज किती घरांमध्ये माहिती असतील? किती जणांना या शब्दांचे अर्थ आज सांगता येतील? विज्ञान, गणित, इतिहास, व्याकरण या सर्व विषयांत संस्कृत शब्दांचा भरणा मराठी शाळांनी केला म्हणून मराठी शाळांचा दुस्वास करून थेट इंग्रजीत शिकायचे,  तर संस्कृतमधल्या ‘ग्रीवा’साठी लॅटिनमधला ‘स्व्हिहक्स’ हा शब्द किंवा ‘हरितद्रव्य’ऐवजी ‘क्लोरोफिल’ हा ग्रीक वळणाचा शब्द निमूटपणे स्वीकारावा लागतो. तेही आपण चालवून घेतो, कारण भावना मेल्या आहेत.

तथाकथित उच्चवर्णीय मराठीजनांनी भाषेबद्दलचे त्यांचे आग्रह लादले म्हणून ‘प्रमाणभाषा’ या संकल्पनेविरुद्धच दंड थोपटणारे मराठीजन काही दशकांपूर्वी होते. त्यांच्याऐवजी साधारण १९८० च्या दशकाअखेर नवीन पोपट आले आणि ते सारे मिठूमिठू याठिकाणी त्याठिकाणी बोलू लागले. हल्ली त्यांची वंशावळ अमेरिकन वळणाचे इंग्रजी बोलण्यासाठी धडपड करते. इंग्रजी वा हिंदीला शरण जाण्याची भावना ही मुळात मराठीचा पराजय झाल्याची खूण ठरते. मग ज्यांची सद्दी आहे, त्यांची भाषा स्वीकारताना मातृभाषेला पायदळी तुडवले तरी कुणालाच पर्वा नसते. उदाहरणार्थ मराठीतली चर्चा आता यांच्याशी किंवा त्यांच्याशी, कुणाशीही चर्चा होत नाही. चर्चा आता ‘यांच्याबरोबर’, ‘त्यांच्याबरोबर’ होते- कारण इंग्रजीतल्या ‘डिस्कशन विथ’चे ते अंधानुकरण असते! किंवा आता हिंदीची चलती आहे म्हणून पुरुष वक्तेसुद्धा भर मंचावरून ‘हे माझं सौभाग्य’ असे मराठीत म्हणू लागले आहेत. ही अशी उदाहरणे कित्येक. पण मुद्दा इतकाच की, मराठीबद्दलच्या भावना तितक्याशा जिवंत उरलेल्या नाहीत आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्ष किंवा अन्य कोणी काहीही, कसेही बोलले तरी भावना दुखावणारच नाहीत. 

तरीही नार्वेकर यांच्या त्या मराठीमुळे समाजमाध्यमांवर टीकेच्या सुरांचा कल्लोळ झाला, नार्वेकरांचे ते तेवढेच वाचनकर्म ‘व्हायरल’ झाले,  कारण त्यांच्या वाचनातला हास्यास्पदपणा. दीनानाथ मंगेशकरांना दीनदयाळ म्हणणार्‍या नार्वेकरांनी ज्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, त्या मूळ शोकसंदेशाच्या वाचनात समाजमाध्यमी ‘रील्स’ पाहायला सोकावलेल्या मराठीजनांची चार घटका करमणूक करणारे बरेच काही होते. नार्वेकरांची देहबोली, प्रत्येक शब्द जणू आयुष्यात पहिल्यांदाच वाचावा लागत असल्यासारखे त्यांचे उच्चार हे सारे लोकांनी पाहिले. नार्वेकरांच्या कुणा समर्थकांनी ‘यावरून राजकारण करू नका’ म्हणण्याआधीच राज ठाकरे आदींनी नार्वेकरांच्या त्या वाचनाचे वाभाडे काढले. यामुळे तर समाजमाध्यमांचे व्यसन लागलेल्या मराठीजनांचे अधिकच मनोरंजन झाले.

भाषेचा मुद्दा उचलावा तर राज ठाकरे यांनीच (म्हणजे आम्ही नाही त्यातले) अशी मनोमन दादही अनेकांनी दिली असेल! एवढे मनोरंजन आपल्यामुळे होणे राहुल नार्वेकरांना पसंत नसावे. त्यांनी ‘जर-तर’च्या भाषेत का होईना, दिलगिरी व्यक्त करून टाकली. तेवढ्यात कुणा संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना ‘आपल्या स्टाइलने’ दमात घेताना अर्वाच्य भाषा वापरली. तेही व्हायरल. वर्तमानपत्रांतूनही टीका. मग त्यांचीही दिलगिरी. याची आता महाराष्ट्राला सवय झाली आहे. कित्येक राजकीय नेत्यांनी गेल्या दशकभरात अशा दिलगिर्‍या व्यक्त केल्या आहेत.

आपल्या राजकारणाच्या भाषेचा प्रश्न फक्त मराठी उच्चारांतल्या चुकांपुरता नाही, तो फक्त मराठी भाषेचा प्रश्न नाही. कोणतीही भाषा अखेर संस्कृतीच्या पायावर उभी असते; पण संस्कृतीचा पाया पुन:पुन्हा घट्ट करण्याचे काम भाषेनेच भाषेसाठी करायचे असते, ते साहित्यातून होते! संस्कृतीची नाळ साहित्याशी जुळली असेल तर, केवळ संस़्कृती बदलली म्हणून भाषाच नाहीशी झाली असे होत नाही. उदाहरणार्थ करवसुलीची मुघल संस्कृतीतली पद्धत महाराष्ट्रात स्थिरावली, त्याबरोबर फारसी शब्दकळाही आली. पण त्याच काळातल्या संतकाव्याने चंद्रभागेच्या वाळवंटात समानतेचा खेळ मांडल्यामुळे मराठी भाषा बहरली, ती पुढे अनंत फंदी- सगनभाऊ- होनाजी बाळा यांच्या लावण्यांमधून केवळ पायांत चाळ बांधून नाचण्यासाठी नव्हे तर भेदिक सत्याच्या शोधासाठी सिद्ध झाली.

मुंबईला महानगर म्हणून ब्रिटिशांनी वसवले; पण पठ्ठे बापूरावांपासून अमर शेख आणि वामनदादा कर्डकांपर्यंतच्या शाहिरांनी ही मुंबई श्रमिकांची आहे, हे मराठी मनांवर ठसवले. यानंतरचा काळ मात्र भलत्याच सांस्कृतिक राजकारणाचा होता. हे राजकारण कधी बापट- पााडगावकर- करंदीकर यांच्यावर ‘ब्राह्मण’पणाचा शिक्का मार तर कधी चित्रे- कोलटकर- सारंग यांना ‘यांचे काही समजत नाही’ म्हणून फेकून दे, त्याहीनंतर ‘दलित साहित्या’साठी वेगळा कप्पा बनव… अशा कुडमुड्या कारस्थानांचे होते. याउलट स्वातंत्र्योत्तर, साठोत्तर काळात बंगाली, मल्याळम, कन्नड साहित्याने किंवा तमिळ सिनेमानेही त्या-त्या काळातले बदलते राजकारण आणि समाजकारणासह संस्कृतीला कवेत घेतले म्हणून त्या भाषा टिकल्या, वाढल्या आणि राजकारणावरही भाषेचा वचक राहिला. त्या सगळ्या भाषांमधले साहित्य चांगले आणि मराठी साहित्य मिळमिळीत, असे कोणीही समजू नये.

महाराष्ट्रात संस्कृतीचा साहित्याशी संबंध दूर लोटून मुजरे, हुजरे, तुतार्‍या, महोत्सव, मिरवणुका यांनाच मराठी संस्कृती मानण्याचे सर्वपक्षीय प्रयत्न झाले. ते आजही होत असताना समाज ‘रील्स’पाहण्यात आणि फक्त ‘व्हायरल’ विषयांनाच तेवढ्यापुरता प्रतिसाद देण्यात मग्न आहे. हे सुरू आहे तोवर कुणाही राजकारण्याने कसेही बोलावे- महाराष्ट्रात फक्त चार घटका करमणूक किंवा ‘आणखी एक प्रकरण’ म्हणूनच त्याकडे पाहिले जाईल. कारण एकंदरीत आपण आता भाषा-शोकाच्या पलीकडे गेलेला समाज झालो आहोत.