लोकशाहीत सत्ताधारीच जेव्हा रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागतात तेव्हा त्याचे फक्त दोन अर्थ निघतात. एक अर्थ प्रहसन दर्शवतो. तर दुसरा शोकांतिका. कोणत्याही अर्थाने पाहिले तरी सत्ताधारी पक्षाची निदर्शने बरा संदेश देत नाहीत. कारण सर्व सांविधानिक, प्रशासकीय अधिकार दिमतीला असताना अधिकारस्थांनाच निदर्शने करावी लागत असतील तर हाती असलेल्या अधिकारांचा सुविहित आणि सुनियोजित वापर करण्यात आपणास अपयश येत असल्याचीच ती अप्रत्यक्ष कबुली असते. हाच निकष काँग्रेसच्या दिल्ली येथील जनआंदोलनांस प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपनेही ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आंदोलनांस लावावा किंवा काय, हा प्रश्न. त्याच्या उत्तरार्थ या संपूर्ण घटनाक्रमाचे विश्लेषण गरजेचे ठरते.
काँग्रेसची निदर्शने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित गैरकृत्यांविषयी होती. या संदर्भात आवश्यक पुरावे/ तपशील उघड झालेला आहे आणि त्यावर जनजागृती करण्याचा अधिकार सर्वच विरोधी पक्षीयांस आपली राज्यघटना देते. त्याचाच वापर करून काँग्रेसने या निदर्शनांचा घाट घातला. त्यात अजिबात काहीही गैर नाही. विरोधी पक्षीयांचे ते कर्तव्यच. निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाले किंवा काय या प्रश्नाचे अंतिम उत्तर अद्याप मिळालेले नाही. ते मिळेपर्यंत अधिक प्रश्न विचारणे चुकीचे कसे? आणि विरोधी पक्षीयांची टीका निवडणूक आयोगावर आहे. सत्ताधारी भाजपने या सार्वभौम, स्वायत्त इत्यादी यंत्रणेचा पत्कर घेण्याचे काहीच कारण नाही. स्वत:वरील आरोपांचे निराकरण करण्याइतका आयोग समर्थ आहे. तरीही गरज नसताना या आयोगाची वकिली करून भाजप त्या यंत्रणेच्या सक्षमतेबाबत शंका निर्माण करतो. हे आयोगाच्या प्रतिमेस अधिक मारक. तेव्हा खरे तर आयोगाने सत्ताधार्यांस ‘तुम्ही आमची वकिली करण्याची गरज नाही’, असे सांगून आपली सक्षमता सिद्ध करावी. तसे होत नसल्याने विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणार्या मुद्द्यांवर रविवारच्या मोर्चा आणि सभेस तुडुंब प्रतिसाद मिळाला.
या मोर्चाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले. उघड्या जीपमधून ते सभास्थळी येत असता प्रमुख विरोधी नेते त्यांच्या समवेत होते. राहुल गांधी पहिल्या रांगेत आणि अन्य नेते त्यांच्या मागे असे हे चित्र त्यांच्या नेतृत्वाबाबतचा प्रश्न निकालात काढते. सर्व प्रमुख विरोधी पक्षीयांनी काँग्रेसचे आणि म्हणून राहुल गांधी यांचे ज्येष्ठत्व यातून मान्य केल्याचे स्पष्ट होते. ही बाब आगामी राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची. गेले काही महिने राहुल गांधी ज्या पद्धतीने लढत आहेत ते पाहता विरोधी गटाचे नेतृत्व त्यांच्या पक्षाकडे आणि त्यांच्याकडे आपसूक येते. रविवारच्या मोर्चाने ही बाब ठसठशीतपणे स्पष्ट केली. ही स्पष्टता रामलीला मैदानावरील सभेस मिळालेल्या प्रतिसादावरूनही दिसते. हा इतका प्रतिसाद विरोधी पक्षीयांस आतापर्यंत कधीही मिळालेला नव्हता. याची तुलना अण्णा हजारे, अर्थ-योगगुरू बाबा रामदेव आदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारविरोधात केलेल्या निदर्शनांशी होईल. पण तसे करणे पूर्णांशाने योग्य नाही. कारण अण्णा हजारे आणि प्रभृतींस कोणा सांस्कृतिक म्हणवून घेणार्या संघटनेचा छुपा पाठिंबा होता. या वेळी अशी कोणतीही संघटना विरोधकांच्या मदतीस नाही. तरीही या मेळाव्याला दणदणीत प्रतिसाद मिळाला. तेव्हा हे यश विरोधकांचे. ते नाकारण्यात हशील नाही. आता त्याचा प्रतिवाद सरकारने कसा केला, त्याबाबत.
विरोधकांच्या या निदर्शनांच्या आसपास सत्ताधार्यांनीही मेळावे, पदयात्रा काढल्या आणि काँग्रेसला लक्ष्य केले. हे केवळ राजकीयदृष्ट्या झाले असते तर त्यात कोणास आक्षेप असण्याचे कारण नाही. एकाच्या आरोपास दुसर्याने उत्तर देणे आणि त्याच्या प्रतिआरोपाचा पहिल्याने प्रतिवाद करणे हे ओघाने आलेच. तथापि सत्ताधार्यांनी जनआंदोलनासाठी हाक दिली ती ‘लोकशाही वाचवण्या’ची. केंद्रात, देशभरातील दीड डझनाहून अधिक राज्यांत जर भाजपची निरंकुश सत्ता असेल तर लोकशाहीस धोका निर्माण होतोच कसा? बरे, जेथे जेथे बिगर-भाजप सरकारे आहेत तेथे लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हटले गेले असते तरी ते क्षम्य ठरले असते. पण भाजपचे म्हणणे तसे नाही. संपूर्ण देशातच लोकशाहीसमोर संकट असल्याचे त्या पक्षास वाटते. असे म्हणावयाचे असेल तर त्यासाठी केंद्रीय गृह खाते लोकशाहीच्या रक्षणात कमी पडले असे म्हणावे लागेल. ते भाजपस मान्य आहे काय? त्यामुळे त्यांचे ‘लोकशाही वाचवा’ हे आवाहन तर्काच्या कसोटीवर टिकत नाही. लोकशाही वाचवायलाच हवी याबाबत तिळमात्र शंका नाही. पण ती कोणापासून? आणि तीस विरोधकांपासून वाचवायचे म्हणजे ते कसे? विरोधकांकडे लोकशाहीरक्षणार्थ अधिकार कोणते असतात? त्यातील कोणत्या अधिकारांचा दुरुपयोग करून ते लोकशाहीच्या अस्तित्वास नख लावतात हेही केंद्रीय सत्ताधारी पक्षाने स्पष्ट केले असते तर नागरिकांस लोकशाही वाचवायचे म्हणजे नक्की करायचे काय, याचे आकलन होणे सोपे गेले असते.
असाच दुसरा मुद्दा अराजकाचा. केंद्रात लोकशाहीच्या जननीचा खमका रक्षणकर्ता, निश्चयी, वज्रकठोर, दहशतवाद-नक्षलवाद इत्यादींचा काळ असा पक्ष सत्तेत असेल तर अराजक निर्माण होईलच कसे? त्याऐवजी मौनीबाबा म्हणावेत असे, भ्रष्टाचार्यांचे रक्षणकर्ते वगैरे कोणी सत्तेत असते तर हा अराजकाचा धोका होता. तो २०१४ सालच्या निवडणूक निकालाने टळला. त्या निकालांवर २०१९ साली आणि पाठोपाठ २०२४ सालीही नागरिकांनी शिक्कामोर्तब केले. अशा परिस्थितीत देशास अराजकाकडे नेण्याची हिंमत कोणाची होईलच कशी? अराजकाच्या बरोबरीने ‘घुसपैठियां’चा मुद्दाही निकालात काढावयास हवा. देशात इतके घुसखोर आहेत असे वारंवार म्हणणे याचा अर्थ देशाच्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी असणार्यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही, असा होतो. तेव्हा अराजक, घुसपैठिंया इत्यादी भीती केंद्रीय सत्ताधार्यांनी नागरिकांस घालणे योग्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात आणखी एका मुद्द्याची भर घातली. विरोधकांस चीनकडून रसद पुरवठा होतो, असे त्यांचे म्हणणे. इतके दिवस ही जबाबदारी जॉर्ज सोरोस यांची होती, असे मानले जात होते. आता त्यात चिनी भर पडली. म्हणजे सोरोस आणि चीनचे क्षी जिनपिंग मिळून विरोधकांस ‘पाकिटे’ पुरवतात, असा त्याचा अर्थ. तो खरा असेल तर मग केंद्रीय अर्थ मंत्रालय, आर्थिक गुन्हे विभाग, गृह मंत्रालय काय करते, हा गंभीर प्रश्न. हा पैसा रोख येत असेल तर तो आणणारे ‘अंगडिये’ कोण व अन्य मार्गांनी येत असेल तर त्याचे इलेक्ट्रॉनिक वाहक, कोणत्या बँकेत ते येतात इत्यादी तपशीलही पुढे यायला हवा. त्यापाठोपाठ भारतातील चिनी गुंतवणुकीवरही बंदी घालायला हवी. म्हणजे त्या गुंतवणुकीस पाय फुटणार नाहीत.
वास्तव हे की यातील काहीही होणार नाही कारण काही व्हावे असे त्यात काहीही नाही. हे सर्व सुज्ञ भारतीय जनता जाणते. तरीही हे बोलले जाईल. कारण रामलल्लावरून सुरू झालेले राजकारण आता रामलीलावर येऊन ठेपलेले आहे. सत्ताधारी कोणीही असो. रामलीलावर इतक्या मोठ्या संख्येने विरोधकांचे समर्थक जमणे हे तत्कालीन सत्ताधार्यांची चिंता वाढवणारे असते. विद्यमान सत्ताधीशांस तसे वाटत असेल तर ते साहजिक. पण त्यांनी त्या चिंतेचे खापर लोकशाहीचे अस्तित्व आणि अराजकाची भीती यावर फोडू नये. आपल्या लोकशाहीच्या रक्षणार्थ नागरिक समर्थ आहेत.
