बेंगळूरुतील चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांच्या आप्तेष्टांविषयी सहवेदना व्यक्त करून, अशा उन्मादी उत्सवांमागील वास्तव नोंदवणेही आवश्यक…
ऐहिक यशापासून फार काळ दूर राहावे लागलेला समाज कसा बुभुक्षित होतो आणि हाती लागेल ते ‘यश’(?) साजरे करण्याच्या उन्मादात किती वाहत जातो याचे आणखी एक उत्तम, परंतु दुर्दैवी, उदाहरण म्हणजे बेंगळूरुतील चेंगराचेंगरी. जे काही झाले त्याचा समाचार घेण्याआधी हे असे का होते याचे समाजशास्त्रीय विश्लेषण गरजेचे. व्यक्ती असो वा व्यक्तींचा समाज. जगण्याच्या प्रेरणेसाठी मिरवता येईल असे ऐहिक यश उभयतांस गरजेचे असते. देशाची अर्थव्यवस्था, तीत आपली होणारी प्रगती, दैनंदिन संघर्ष कमी करणाऱ्या सुखसोयी हे ऐहिक यशाचे काही नमुने. अशा यशाची कमतरता असेल तर ती मान्य करण्याचा समंजसपणा व्यक्ती वा समाज यांच्या ठायी असतोच असे नाही. बऱ्याचदा नसतोच. त्यातही परत आपल्यासारख्या समाजात अपयश, न्यून मान्य करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे आपले कसे सर्व काही उत्तम(च) सुरू आहे असे दाखवण्याकडेच सर्वांचा कल. हे उत्तम चाललेले आहे ते उच्चरवात इतरांस सांगितल्याखेरीज कळणार कसे? म्हणून मग तलवारीने भर चौकात केक कापून साजरे होणारे वाढदिवस आणि ऋण काढून ‘दणक्या’त साजरे होणारे उत्सव वा लग्न सोहळे! आयुष्यात साजरे करावे असे इतर शून्य. म्हणून मग असल्या तात्कालिक कारणांचा सोहळा करावयाचा आणि वास्तवाचा विसर पडेल इतक्या उन्मादात तो साजरा करायचा. असले उन्माद हे उपेक्षित आणि वंचित समाजाचे लक्षण. या समाजाचे पुढारीही अशा समाजाचेच प्रतिनिधित्व करणारे. तेही या असल्या कचकडी यशोत्सवात सामील होतात आणि आयत्याच मिळालेल्या गर्दीत प्रसिद्धीचा झोत आपल्यावर पाडून घेतात. एरवी अभिमानाने मिरवावे, पुढील पिढीस सांगावे अशा कोणत्या संचिताची नोंद या पुढाऱ्यांच्या खात्यावर असते? ज्यांच्या असते ते या उन्मादात सामील होत नाहीत आणि ज्यांच्या नसते त्यांचे पान या अशा उन्मादांशिवाय हलू शकत नाही. म्हणून आपल्यासारख्या तिसऱ्या जगातील देशात या अशा कृत्रिम उत्साहाच्या उन्मादी उत्सवी लाटा वारंवार निर्माण होतील याची खबरदारी घेतली जाते आणि तसे योजनाबरहुकूम सर्व काही घडते. अत्यंत दरिद्री अशा अर्जेंटिनासारख्या देशातही जे यजमानपद भूषवून झाले त्या फिरत्या चषकाप्रमाणे मिळणाऱ्या यजमानपदाचा उत्सव, कंगाल देशाशी संघर्षात त्यास जायबंदी केले त्याचा उत्सव, ठरावीक कालाने नियमितपणे येणाऱ्या धार्मिक दिनविशेषांचा उत्सव इत्यादी साजरे केले जाते, त्यामागील कारण हे. बेंगळूरुत ज्या ११ जणांनी हकनाक प्राण गमावले तो उत्सव याच मालिकेतील.
त्या शहरातील ‘रॉयल चॅलेंजर्स’ संघाने टिनपाट ‘आयपीएल’ स्पर्धा जिंकली हे केवळ निमित्त. त्याऐवजी ही स्पर्धा अन्य कोणत्या संघाने जिंकली असती तर हा उत्सव तेथे साजरा झाला असता. गेल्या वर्षी अशीच अनियंत्रित गर्दी टीट्वेंटी विश्वचषकाच्या विजयानंतरच्या मिरवणुकीसाठी मुंबईत जमली होती. जीवघेणी चेंगराचेंगरी त्या वेळी झाली नाही, इतकेच. पण दर्जा हाच. वास्तविक बुधवार हा आठवड्याचा कामाचा दिवस. त्या दिवशी लाखो जण हातातील कामधाम सोडून या असल्या थिल्लरतम कारणासाठी जमा होत असतील तर आपल्या कार्यसंस्कृतीविषयी त्यातून काय अर्थ निघतो? गतसाली मुंबईतही कामाच्या दिवशी असेच घडले. तेव्हाही ती स्पर्धा जिंकणाऱ्यांचा पाहुणचार विधानसभेने केला आणि आताही बेंगळूरुत तेच झाले. यातून सर्वच राजकीय पक्षांची बौद्धिक दिवाळखोरी तेवढी दिसते. या स्पर्धेचे मोल काय? मुळात ही स्पर्धा तरी आहे काय? क्रीडानैपुण्यास आवश्यक सर्व घटक वजा करून हाती जे काही उरेल त्यास आयपीएल म्हणतात. पूर्वी आपल्याकडे राजे, महाराजे आपल्या पदरी कोंबड्या, बकरे इत्यादी प्राणी पाळत आणि मनोरंजनार्थ त्यांच्या झुंजी लावत. ते पाहण्यास गाव लोटत असे. अलीकडे राजकीय राजेमहाराजे नसतील. पण बिझनेस महाराजे/ महाराण्या आहेत आणि त्यांची वृत्तीही तीच आहे. ते आता क्रीडापटू पदरी बाळगतात आणि दरवर्षी त्यांच्या झुंजी लावतात. आयपीएल ही त्यातील एक. त्यात जे काही सुरू असते त्यामुळे त्यास क्रीडाप्रकार ठरवणे हे ‘टीआरपी’साठी मारकुट्या सासूसुनांच्या अतिभुक्कड मालिकांस अभिजात वाङ्मय म्हणणे. ‘लोकसत्ता’ तरी तो प्रमाद करू इच्छित नाही. या स्पर्धा म्हणजे काही प्रत्येक चार वर्षांनी येणारे, वैयक्तिक कौशल्याचा कस पाहणारे ऑलिम्पिक नाही की दर चार वर्षांनी होणारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नाही. या दोहोंतील विजयास काही एक अर्थ असतो आणि एक उंचीही असते. कारण हे यश आपल्या नावे नोंदवण्याची संधी दर चार वर्षांनी येते. त्यामुळे त्यातील यशाचे उत्सवी साजरीकरण केवळ क्षम्यच नव्हे; तर समर्थनीयही ठरते.
या तुलनेत ‘आयपीएल’ या बाजारू जत्रेची औकात काय? नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे ही स्पर्धा (?) भरते आणि एखाद्या बिझनेस महाराजा वा महाराणींचा संघ ती जिंकतो. कधी हा तर कधी तो. या बिझनेस महाराजांची आपल्या पदरी राखलेल्या क्रिकेटपटूंशी वागणूक पाहिली तरी अशा कोणाच्या पदरी राहावे लागणे किती कमीपणाचे आहे हे लक्षात येईल. पण कंत्राटी कार्यक्रम करणाऱ्या कलावंत/ कलावंतिणीस ज्याप्रमाणे यजमानासमोर मुजरा करावाच लागे त्याप्रमाणे लिलावात दाम मोजून विकल्या गेलेल्या क्रिकेटपटूंसही हे अपमान गोड मानून घ्यावे लागतात. विकसित देशांतील फुटबॉल लीगच्या धर्तीवर हे आपले ‘आयपीएल’ प्रारूप बेतले गेले. म्हणजे याही बाबत पाश्चात्त्यांचे अनुकरण. ते एक वेळ ठीक. मग ते करताना पाश्चात्त्यांची व्यावसायिकता, पारदर्शकता आणि काही एक किमान सभ्यता आदी गुण तरी घ्यायचे. पण ते नाही. बळवंतरावांचा कित्ता घेणे अंमळ अवघड, म्हणून अडकित्ता घ्यावा तसे हे आपले सांस्कृतिक दारिद्र्य. पाश्चात्त्य देशांतील अशा स्पर्धा आयोजकांस त्या त्या देशाचे आर्थिक नियम लागू होतात आणि त्यांना आपले स्पर्धांचे आर्थिक ताळेबंदही जाहीर करावे लागतात. आपली ‘आयपीएल’ मात्र बिझनेस महाराजा/महाराण्यांच्या खासगी दौलतीवर चालते. असे असताना तीवर अधिकाधिक कर लावून सरकारने अधिकाधिक उत्पन्न आपल्या तिजोरीत कसे जमा होईल हे पाहायला हवे. पण आपले सगळेच उफराटे. आपल्या राज्यकर्त्यांत स्पर्धा असते ती ‘आयपीएल’वर सवलतींचा वर्षाव तुझा अधिक की माझा, अशी. अशा वेळी या स्पर्धा विजेत्यांस विधानसभेत निमंत्रण देण्याचे कारणच काय? असे कोणते दिवे या क्रिकेटपटूंनी लावले की ज्यांचा सत्कार, गौरव, कौतुक जनतेच्या पैशावर जनतेच्या लोकप्रतिनिधींनी करावे? पण इतरांच्या लोकप्रियतेच्या परावर्ती प्रकाशात चमकण्यात धन्यता मानायची, मिरवायची सवय लागली की खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये जाण्यात अथवा लष्करी पेहरावात मिरवण्यात कोणालाच काही गैर वाटत नाही.
या अशा समाजातील जनता यापेक्षाही दिव्य. इतक्या हिणकस, पुरुषी, प्रसंगी हिंस्र होणाऱ्या जमावात मुळात सामील व्हावे असे शहाण्यासुरत्यांस वाटतेच कसे? ‘खातेऱ्यात दगड टाकला की घाण आपल्याच अंगावर उडणार’, हे ग्रामीण मराठीतील शहाणपण अशाच ग्रामीण भागांतून शहरवासीय झालेल्यांस नसावे हे आश्चर्य. या चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांच्या आप्तेष्टांविषयी सहवेदना व्यक्त करून, मृतांस श्रद्धांजली वाहून त्यामागील वास्तव नोंदवणे आवश्यक. हे असे उन्मादी रिकामटेकड्यांत रमणे शहाण्यांनी आणि हे ‘रमणे’ आयोजन राजकारण्यांनी टाळायला हवे. नपेक्षा गेल्या वर्षी मुंबईत जे होता होता टळले, जे या वर्षी बेंगळूरुत झाले तेच उद्या अन्य शहरांत होईल.