scorecardresearch

अग्रलेख : विनाशवेळेची वर्दी?

युद्ध टाळण्याचा आपला सल्ला धुडकावणाऱ्या पुतिन यांच्याविरोधात युक्रेनच्या मदतीत आता तरी आपणास खारीचा वाटा उचलण्यास हरकत नाही.

अग्रलेख : विनाशवेळेची वर्दी?
(संग्रहित छायाचित्र)

रशियन नागरिकांचाच युक्रेनयुद्ध वाढवण्यास विरोध दिसतो. तो योग्य. पण पुतिन यांना हे कोणी सांगण्याची शक्यता नाही. आत्ममग्न नेत्यास सल्ला देणार कोण?

काल्पनिक कटकारस्थानांचे आरोप हा कोणत्याही एकचालकानुवर्ती राजवटीचा आधार असतो. असे आरोप करायचे आणि त्याच्या पुष्टय़र्थ आपणास हवी ती दंडेली करायची, ही अशांची इतिहाससिद्ध कार्यशैली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अशा राजवटींचे वर्तमानातील मेरुमणी. युक्रेनविरोधात त्यांनी असाच आरोप केला आणि त्या देशावर एकतर्फी युद्ध लादले. त्यास आज २२ सप्टेंबरास सात महिने झाले. रशियाच्या समोर युक्रेन म्हणजे खरे तर हत्तीसमोर हरीण. समोरासमोर दोन हात झाल्यास यात पराभव नक्की कोणाचा हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही रशिया-युक्रेन युद्धात सात महिन्यांनंतरही विजय रशियाच्या दृष्टिपथात नाही. कारण एकतर हे युद्ध पुतिन यांस हवे होते तसे लढले गेले नाही. आणि दुसरे म्हणजे युक्रेनच्या ताकदीबाबतचा त्यांचा अंदाज साफ चुकला. रशियास हवी होती तशी समोरासमोरची लढाई न करता युक्रेनियनांनी शत्रूस आडवळणाने घेरले, त्याची रसद बंद केली आणि जमेल तेथे कोंडी करून जोरदार प्रतिहल्ला केला. परिणामी यश दूरच राहिले, पुतिन यांच्या बलाढय़ रशियाचा पराभव होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. हुकूमशाही वृत्तीच्या नेत्यांस पराभव झेपत नाही. त्याची शक्यता जरी निर्माण झाली तरी असे नेते अधिक आक्रमकता दाखवतात आणि अधिक मोठे आक्रमण करतात. पुतिन त्याच मार्गाने निघाले आहेत. गेल्या काही आठवडय़ांत युक्रेनने केलेल्या कोंडीस प्रत्यु्त्तर म्हणून संपूर्ण रशियात अर्ध-लष्करभरती (पार्शल मोबिलायझेशन) त्यांनी जाहीर केली असून पुढील काही महिन्यांत किमान तीन लाखांची फौज पुतिन युक्रेनवर सोडू इच्छितात. म्हणजे आणखी अनेक रशियनांच्या मरणाची हमी.

याचे कारण या अशा भरतीतील सैनिक पूर्णप्रशिक्षित, युद्धास सज्ज असे असतातच असे नाही. बऱ्याचदा तसे नसतात. अफगाणिस्तानात रशियाने हेच केले. अफगाण बंडखोर आणि मुजाहिदिनांकडून मोठा विरोध होत असल्याचे लक्षात आल्यावर अशाच अर्ध्याकच्च्या जवानांची भरती त्या देशाने केली. परिणामी अफगाणिस्तानात १५ हजारांहून अधिक रशियनांचे रक्त सांडले. तरी माघार घ्यावी लागलीच. आताही तसेच होण्याची शक्यता अधिक. युक्रेनच्या भूमीवर रशियाने मान्य केलेली अधिकृत बळींची संख्या ५९३७ इतकी आहे. ती अर्थातच खरी नसावी. तटस्थ युद्धनिरीक्षकांच्या मते रशियाने किमान २५ हजार सैनिक आतापर्यंत गमावले आहेत. युक्रेनच्या मते ही संख्या ५० हजार असावी. ती अतिशयोक्त आहे असे मानले तरी हे बळी पाच हजारांपेक्षा अधिक निश्चितच आहेत. यात रशियन लष्करातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी, हेरगिरी यंत्रणांतील बिनीचे शिलेदार आदींचा समावेश आहे. पुतिन यांच्यासाठी हे दुहेरी नुकसान. इतकासा युक्रेन एकतर रशियाच्या ‘अरे’ला दुप्पट आवाजात ‘का रे’ म्हणतो आणि वर रशियन सैनिक, अधिकारी इत्यादींचे इतके प्राण घेतो. ही सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था. त्यातून मार्ग काढण्यासाठी हे पुतिन आता अर्ध-लष्करभरती करू इच्छितात. रशियात पुरुषांसाठी लष्करी प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. असे जवळपास अडीच कोटी लष्कर-प्रशिक्षित युद्ध-सज्ज नागरिक त्या देशात आहेत. पण यातील सर्वच काही लष्करात सहभागी होत नाहीत. अशा प्रत्यक्ष सहभागींची संख्या आहे नऊ लाख. हे खडे सैन्यदल. त्या तुलनेत युक्रेनी सैन्यदलाचा आकार दोन लाखदेखील नाही. पण अमेरिकादी देशांकडून झालेला उत्तमोत्तम वेधक अस्त्रांचा पुरवठा, पाश्चात्त्य देशांचे सामरिक मार्गदर्शन आणि यापेक्षाही महत्त्वाचा घटक म्हणजे रशियास धडा शिकवण्याची सर्वसामान्य युक्रेनियनांची ऊर्मी यामुळे तुलनेने लहान सैन्य असूनही त्या देशाने रशियाची नाही म्हटले तरी पाचावर धारण बसवली.

खरे तर यातून योग्य तो बोध घेत किंवा हीच संधी साधत पुतिन यांनी शस्त्रसंधी करणे वा तत्सम काही पावले उचलणे शहाणपणाचे ठरले असते. रशियातही मोठय़ा प्रमाणावर हाच सूर उमटताना दिसतो. म्हणूनच पुतिन यांच्या या लष्करीकरण मोहिमेच्या विरोधात त्या देशात ठिकठिकाणी निदर्शने झाली. त्या देशातील बंदिस्त वातावरण लक्षात घेता त्यांची वाच्यता होणार नाही, हे स्वच्छ आहे. पण तरीही जे काही बाहेर आले त्यातून रशियन लोकांचाच या युद्धाची व्याप्ती यापेक्षा अधिक वाढवण्यास विरोध दिसतो. तो योग्य. पण पुतिन यांना हे कोणी सांगण्याची शक्यता नाही. आत्ममग्न नेत्यास सल्ला देणार कोण? त्यामुळे अर्ध्या-कच्च्या तरुणांना युद्धभारित युक्रेनियन फौजांसमोर धाडण्याचा त्यांचा इरादा असून यातून केवळ स्वकीयांच्या बळींचीच संख्या वाढेल असे रशियनांस वाटते. वर पुतिन हे तर केवळ ‘अर्ध-लष्करीकरण’ आहे असे म्हणत आपल्या कृतीचे समर्थन करताना दिसतात. त्यात गर्भित धमकी आहे ती पूर्ण लष्करीकरणाच्या धोक्याची. तसे करणे म्हणजे देशात आणीबाणीकालीन परिस्थिती जाहीर करून देशांतर्गत यंत्रणांचे सर्व नियमन लष्कराहाती सोपवणे. आपण युक्रेनमध्ये सैन्य घुसवणार नाही असे पुतिन यांचे आश्वासन होते. ते त्यांनी राजरोस मोडले. तीच बाब लष्करीकरणाच्या मोहिमेची. आपण असे काही करणार नाही, असे हा गृहस्थ आताच म्हणत असला तरी तो नेमके तेच करेल, याची खात्रीवजा भीती रशियनांस आहे. परिणामी देशत्याग करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मॉस्को आदीहून टर्की, आर्मेनिया इत्यादी देशांत जाणारी विमानांची तिकिटे पुढील काही आठवडय़ांसाठी पूर्णपणे विकली गेली आहेत. या देशांत जाण्यासाठी रशियनांना व्हिसा लागत नाही. त्यामुळे अनेक रशियन आपला युद्धजन्य देश सोडू इच्छितात. यातून कोणताही संदेश घेण्याची गरज पुतिन यांस वाटत नाही, हे खरे रशियाचे -आणि जगाचेही- दुर्दैव. उलट पुतिन हे अण्वस्त्र युद्धाची धमकी देतात. ही म्हणजे निर्लज्जपणाची कमाल ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सध्याचा काळ युद्धाचा नाही’ हा मोलाचा सल्लाही ते धुडकावताना दिसतात. वास्तविक युद्धासाठी कोणताच काळ योग्य नसतो. पण पुतिन यांस हे मान्य होण्याची शक्यता नाही. ते केवळ इतकेच करून थांबत नाहीत. तर युक्रेनच्या चार प्रांतांत आपल्या हस्तकांकरवी जनमत चाचणीचाही घाट घालू इच्छितात. या प्रांतांत रशिया-धार्जिण्यांचे प्राबल्य आहे. पुतिन यांच्या दूरगामी कारस्थानांस आलेले हे यश. या मंडळींना हाताशी धरून रशियात विलीन व्हायचे की युक्रेनमध्ये राहायचे यावर जनमताचा कौल घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून त्यांस हवा तसा कौल मिळाला की पाठोपाठ हे प्रांत युक्रेनने बळकावल्याचा आरोप करीत त्या प्रांतांत लष्करी कारवाई करण्यास पुतिन सज्ज. पण याची किंमत काय याचा कोणताही विचार ते करण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी काळात युक्रेनला अधिकाधिक मदत पुरवण्याची जबाबदारी मित्रदेशांवर वाढते. युक्रेनविरोधात अत्यंत शक्तिशाली आणि तब्बल ६ हजार किमी/प्रति तास इतक्या भयानक वेगाने जाणारी क्षेपणास्त्रे रशियाने वापरली. पण त्यांनाही निष्प्रभ करू शकणारी यंत्रणा अमेरिकेने पुरवलेली असल्याने पुतिन यांच्या या क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग झाला नाही. म्हणून आता ते अधिक ताकद, अधिक सैनिक युद्धात उतरवू इच्छितात. अशा वेळी युक्रेनचे हात अधिक बळकट करणे हाच मार्ग राहातो. युद्ध टाळण्याचा आपला सल्ला धुडकावणाऱ्या पुतिन यांच्याविरोधात युक्रेनच्या मदतीत आता तरी आपणास खारीचा वाटा उचलण्यास हरकत नाही. पुतिन यांची आगामी युद्धखोरी ही विनाशवेळेची वर्दी ठरण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करावे लागतील.

मराठीतील सर्व संपादकीय ( Editorial ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या