‘गोपनीय’ कागदपत्रे ट्रम्प यांनी दडवली आणि बायडेन यांच्याकडे ‘राहून गेली’ असतील, तरी त्याची चौकशी होणार आणि त्यावरून राजकारणही तापवले जाणारच..

अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाची अवस्था भारतातील काँग्रेसप्रमाणे झाली की काय, असा प्रश्न गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे पडू शकतो. त्या पक्षात आधी मुळात खणखणीत नेतृत्व समोर येत नाही, जे आहे ते लेपळेपणाने वागते आणि विरोधकांहाती आयते कोलीत देते, एवढे करूनही सत्ता मिळाली तर राखणे अवघड, साध्या निवडणुका लढवायच्या म्हटले तरी हातचा उमेदवार मांजराप्रमाणे निसटून विरोधी कळपात जातो असे सारे घडते. अमेरिकेतील मतदार सुजाण हाच काय तो यांतील फरक. दांडगटपणा आणि बेमुर्वतखोरीस धडाडी आणि कर्तृत्व असे न मानता मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्या हाती अध्यक्षपद सोपवले खरे. पण बऱ्याच दिवसांच्या अशक्तपणानंतर चालू लागलेला प्रत्येक पायरीवर ठेचाळावा त्याप्रमाणे बायडेनबाबू गडबडताना दिसतात. ताजे प्रकरण आहे बायडेनबाबूंच्या विविध घरे आणि कार्यालयांत ते उपाध्यक्षपदी असतानाची काही कथित ‘गोपनीय’ कागदपत्रे सापडल्याचे. असाच प्रकार माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्याबाबतही घडलेला असल्याने आणि त्याचीही चौकशी सुरू असल्याने ट्रम्प कंपूने बायडेनबाबूंस ‘सेम सेम’ म्हणत वाकुल्या दाखवणे सुरू केले असून त्यामुळे बायडेन आणि त्यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षावर ओशाळे होण्याची वेळ आली. आता बायडेनबाबूंकडे सापडलेल्या कागदपत्रांचीही चौकशी जाहीर करण्यात आली असून त्यामुळे उभय पक्षांत एक नवीच स्पर्धा सुरू झाल्याचे दिसते. राजकारण इथून-तिथून साधारण सारखेच असल्याने त्याची दखल घ्यायला हवी.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

अमेरिकी प्रथेनुसार अध्यक्ष वा उपाध्यक्ष यांनी प्रत्यक्ष नजरेखालून घातलेला प्रत्येक कागद हा सरकारी दप्तरांत रवाना होणे अपेक्षित असते. यासाठी एक वेगळी व्यवस्था असते आणि अध्यक्ष-उपाध्यक्षाने स्पर्श केलेल्या प्रत्येक कागदपत्राची नंतर चोख विल्हेवाट लावली जाते. यातील प्रत्येक दस्तावेज ‘गोपनीय’ (क्लासिफाइड) मानला जातो. प्रत्यक्षात त्यात आक्षेपार्ह वा गुपित राखावे असे काही असो वा नसो. त्यानुसार उपाध्यक्षपदी असताना बायडेन यांनी न्याहाळलेल्या दस्तावेजांची रवानगी ही सरकारी दप्तरात होणे अपेक्षित होते. बायडेन २०१७ साली उपाध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्याआधी दोन दशकांहून अधिक काळ ते काही ना काही पदावर सत्तेवर होते. बायडेन कोणत्याही पदावर नाहीत अशी स्थिती २०१७ सालानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच निर्माण झाली. त्यात त्यांचे उपाध्यक्षपदावरचे शेवटचे काही दिवस अत्यंत गोंधळाचे गेले. युक्रेनचा दौरा, पाठोपाठ दावोस येथील चर्चेत सहभाग, अन्य आंतरराष्ट्रीय भेटीगाठी असे बरेच काही शेवटच्या दिवसांत घडले. परिणामी सरकारी निवासस्थान रिकामे करताना त्यावर त्यांची प्रत्यक्ष देखरेख काही झाली नाही. व्हाइट हाऊसमधल्या संबंधित कर्मचाऱ्यांनीच बायडेन यांचेही निवासस्थान रिकामे केले. आता त्यांच्यापैकी कोणाकडून हा कागदपत्रांचा प्रमाद घडला किंवा काय, याचीही तपासणी करण्यात येत असून या कामांची जबाबदारी असलेल्या अधीक्षक महिलेची चौकशी सुरू झाली आहे. यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे बायडेन यांच्या निवासस्थानी सापडलेली सदरहू कागदपत्रे ‘गोपनीय’, ‘लष्करी’ आदी होती किंवा काय याची खातरजमा झालेलीच नाही. ती नंतर होईल. तूर्त मुद्दा या कागदपत्रांस वाट फुटलीच कशी, हा.

त्यातही धक्कादायक बाब म्हणजे बायडेन यांच्या डेलावेअर येथील घराच्या वाहनकक्षात नोव्हेंबरातील पहिल्या आठवडय़ात एक-दोन ‘गोपनीय’ कागद आढळले. ही बाब तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष बायडेन यांच्या नजरेस आणली. त्यानंतर त्यांच्या विविध निवासस्थानी पाहणी केली गेली. बायडेन यांनी उपाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर न्यू यॉर्क येथे एक आंतरराष्ट्रीय विचारमंडळ (थिंक टँक) स्थापन केले आहे. त्या कार्यालयाचीही तपासणी झाली. या सर्व ठिकाणी लहानमोठे कागदपत्रांचे गठ्ठे सापडत गेल्याने एकच खळबळ उडाली. त्या खळबळीचे दोन भाग आहेत. एक म्हणजे ‘बायडेन असे कसे काय करू शकतात’ अशी एक. आणि दुसरी म्हणजे ‘बायडेनदेखील असेच का’, अशी. दोन्ही प्रतिक्रिया तितक्याच खऱ्या आणि प्रामाणिक. या प्रकरणानंतर माध्यमांनी कागदपत्रांच्या घबाडांचा गहजब सुरू केल्याने – आणि ते योग्यच – या प्रकरणाचे गांभीर्य आणखीच वाढले आणि बघता बघता हा मुद्दा राजकीय बनला. त्यामुळे अखेर स्वतंत्र न्यायाधिकारी नेमून या प्रकरणाचीही चौकशी करण्याची घोषणा विधि विभागाने केली. त्यानुसार जॉन लॉश यांस याकामी नियुक्त करण्यात आले असून आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ असे त्यांनी म्हटले आहे. हे लॉश यापूर्वी ट्रम्प यांचे वकील होते. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय रंगत अधिकच वाढू लागल्याचे दिसते. अगदी दोन दिवसांपूर्वीही, शनिवारी, आणखी काही अशी कागदपत्रे सापडल्याने ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर स्वत:च्या नव्या ‘ट्रूथ सोशल’ या प्रति-ट्विटरी माध्यमातून जोरदार शरसंधान सुरू केले. ‘आता बायडेन यांचे काय करणार’ हा ट्रम्प यांचा प्रश्न.

त्याच्या उत्तरात महत्त्वाचे तथ्य असे की ही कागदपत्रे खुद्द बायडेन यांच्या वतीनेच विधि खात्यास दिली गेली. म्हणजे आपल्या निवासस्थानी असे काही आढळल्याचे त्यांनी स्वत:च मान्य केले आणि कारवाईस सुरुवात झाली. ट्रम्प यांच्याबाबत असे नाही. त्यांच्या ‘मार-आ-लागो’ या आलिशान निवासस्थानी विधि खात्याने घातलेल्या छाप्यांमध्ये अशी कागदपत्रे दडवल्याचे समोर आले. नंतरही बराच काळ ट्रम्प ही बाब नाकारत राहिले. म्हणजे बायडेन यांच्याकडे कथित गोपनीय कागदपत्रे सापडणे आणि ट्रम्प यांनी अशी काही कागदपत्रे दडवल्याचे आढळणे यात मूलभूत फरक आहे. पण उचलेगिरी करताना पकडला गेलेला भोकाड पसरून ‘इतरांनीपण तसे केले’ असे म्हणत स्वत:च्या बचावाचा प्रयत्न करतो. ट्रम्प यांचे असे झाले आहे. पण त्यात त्यांना दोष देता येणार नाही. कारण बायडेन यांनी स्वत:हून अशी संधी आपल्या विरोधकांस उपलब्ध करून दिली. दुसरे असे की पहिल्यांदा असे काही घडल्याचे उघडकीस आले नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी बायडेन प्रशासनाने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. ते ठीक. पण मुळात मधे दोन महिन्यांचा काळ का दवडला हा मुद्दा उरतोच. हे प्रकरण उघडकीस आले ते माध्यमांमुळे. वर्तमानपत्रांत पहिली बातमी आली आणि मग त्यास वाचा फुटली. त्याच वेळी बायडेन यांनी वा त्यांच्या वतीने संबंधितांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली असती तर त्याचा बभ्रा इतका न होता. अर्थात हे प्रकरण ‘दाबण्याचा’ वा कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने केला गेला नाही, ही बाबदेखील तशी कौतुकास्पदच म्हणायची.

तरीही असे काही घडले नसते तर त्या पक्षाच्या आणि बायडेन यांच्या प्रतिष्ठेस साजेसे ठरले असते. त्यातही ताज्या निवडणुकांनतर प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत झाले असताना आणि नॅन्सी पलोसी यांच्यासारखी आक्रमक समर्थक सभापतीपदी नसताना बायडेन आणि त्यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षासाठी ही काही काळ तरी डोकेदुखी ठरणार हे निश्चित. एका बाजूला असहिष्णूंचे अनुदार, आक्रमक राजकारण यशस्वी ठरत असताना उदारमतवाद्यांचा अजागळपणा समाजास मागे नेणारा ठरतो. मग तो देश-प्रदेश कोणताही का असेना!