मतदार याद्यांत नावनोंदणीसाठीच्या अर्जातील बदल आम्ही मंजूर केलेले नाहीत, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केले. मग हे केले कोणी?
भले आपण स्वत:स ‘लोकशाहीची जननी’ म्हणवून घेत असू. पण भारताची गणना पूर्ण, निरोगी सच्च्या लोकशाही देशांत अजूनही केली जात नाही, हे नाकारता न येणारे सत्य. आपल्या लोकशाहीचे पान इंडोनेशिया, मलेशिया, मंगोलिया आदी देशांच्या पंगतीत मांडले जाते. त्या देशांत आपल्याप्रमाणे लोकशाही व्यवस्था आहे. पण ती ‘सदोष’ (फ्लॉड) आहे. आपल्यासाठी त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे आपल्या मांडीस मांडी लावून आता अमेरिकेचेही या गटात उतरणे. याचे श्रेय निर्विवाद ज्यांच्या फेरनिवडीसाठी ‘‘अगली बार…’’ अशी आपण जाहीर हाळी दिली त्या विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे. त्यांच्या सत्तापदाच्या काळात अमेरिकेच्या लोकशाहीचा पोत घसरला आणि तिचा अंतर्भाव ‘सदोष’ गटात करण्यापर्यंत वेळ आली. अमेरिकेचे काय व्हायचे ते होईल. पण आपल्या लोकशाहीचा गेली काही वर्षे सातत्याने घसरत चाललेला दर्जा ही बाब मात्र निश्चितच काळजी वाढवणारी ठरते. ही काळजी किती खरी आहे याची जाणीव दोन न्यायमूर्तींच्या दोन स्वतंत्र पण ताज्या भाषणांतून होते. हे दोघेही न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील. त्यातील एक रोहिंग्टन नरिमन हे निवृत्त न्यायाधीश तर दुसरे उज्जल भुयान हे अजूनही सेवेत असलेले. हे दोघेही निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या ‘मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी’ (एसआयआर) मोहिमेसंदर्भात बोलले. दोघांनीही या मोहिमेच्या वैधतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून त्याकडे दुर्लक्ष केवळ मतलबी करू शकतील. अन्यांस या दोघांच्या भाषणांची दखल घ्यावी लागेल.
मतदान करण्याचा हक्क हा लोकशाही व्यवस्थेत एक प्रकारे सदर व्यक्तीच्या अस्तित्वास अर्थ देतो. ज्या देशात-प्रदेशात आपण राहतो त्याचे भवितव्य घडवण्यात आपलाही काही वाटा आहे अशी एक भावना या एका मतदानाच्या अधिकारामुळे नागरिकांच्या मनांत तयार झालेली असते. परंतु निवडणूक आयोगाची सध्याची ही कथित सखोल मतदार फेरतपासणी मोहीम नागरिकांच्या राज्य/ देशाविषयी असलेल्या आपलेपणाच्या भावनेलाच मूठमाती देते. न्या. भुयान आणि न्या. नरिमन हे उघडपणे बोलून दाखवतात. काहीही कारणाने नागरिकांचा असा मताधिकार काढून घेणे हे कृत्य या उभयतांस घटनेची पायमल्ली करणारे वाटते. मुद्दा तितकाच नाही. ही ‘राज्यघटना पायदळी’ तुडवणारी कृती ज्या यंत्रणेकडून केली जाते त्या यंत्रणेची रचना हा मुद्दादेखील सद्य:स्थितीत चर्चेचा विषय बनलेला आहे. न्यायाधीशांच्या भाषणांत त्याचीही दखल घेतली गेली. विद्यमान सरकार सत्तेवर येईपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड करणार्या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि देशाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असे. हे तिघेही लोकशाहीच्या भिन्न घटकांचे प्रतिनिधी. त्यामुळे अशा समितीतील निवडीस काहीएक राजमान्यता होती.
ती विद्यमान सरकारने आपल्या निर्णयाने काढून घेतली. या निवड समितीतील सरन्यायाधीशांस काढून त्या जागी केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री बसवला गेला. परिणामी या निवडीतील पारदर्शकता जशी गेली तशीच ही निवड समिती अधिक सरकारधार्जिणीही झाली. हाच मुद्दा अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. न्या. दीपंकर दत्ता यांनी मुख्य निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेस आव्हान देणार्या याचिकेवरील सुनावणीत ‘‘निवडणूक आयोग केवळ निष्पक्ष असून चालणारे नाही, तो तसा निष्पक्ष आहे हे सर्वांस दिसावे लागेल’’, असे मत व्यक्त केले. त्यांच्या मताचा स्पष्ट अर्थ असा की सद्य:स्थितीत निवडणूक आयोग निष्पक्ष नाही. त्यामुळे तो तसा दिसणे दूरच. न्या. भुयान आणि न्या. नरिमन नेमके हेच मत व्यक्त करतात. भारतीय घटनेनुसार सर्व नागरिक समान आहेत. म्हणजे काहींस विशिष्ट अधिकार आहेत आणि काहींस ते नाहीत अशी त्यांची वर्गवारी होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने आरंभलेली मतदार याद्यांची ही कथित साफसफाई नागरिकांची दोन गटांत वर्गवारी करते. मतदान हक्क असलेले आणि तो हक्क गमावलेले, हे ते दोन वर्ग. ‘‘भारतीय घटनेस नागरिकांचे असे दोन वर्ग अभिप्रेत नाहीत,’’ असे न्या. भुयान म्हणतात ते याचमुळे. त्यांच्या या विधानाचा सरळ अर्थ निवडणूक आयोगाने जे केले ते करण्याचा अधिकार त्यांस नाही; असाच होतो. न्या. नरिमन हेदेखील हीच भावना व्यक्त करतात. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तोंडावर लाखो नागरिकांचा मतदानाचा हक्क आयोगाने काढून घेतला. त्यास आव्हान दिले गेल्यावर त्यातील जवळपास ९३ टक्के मतदारांचे आव्हान ग्राह्य आणि न्याय्य ठरल्याने त्यांचा तो अधिकार त्यांना बहाल केला गेला. पण तोपर्यंत निवडणुका होऊन गेलेल्या असल्याने त्यांच्या मतास कवडीचीही किंमत राहिली नाही. हे नागरिक मतदान करू शकले नाहीत. ‘‘(आपला) निवडणूक आयोग इतका चुकार (मालफंक्शन) असून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांच्या (नेमणुकीचा) मुद्दा लवकरात लवकर निकालात काढावा’’, अशा अर्थाचे विधान न्या. नरिमन यांनी केले.
या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-तीन न्यायाधीश निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी इतकी नि:संदिग्ध मते/ निरीक्षणे नोंदवत असताना या अशा निवडणूक आयोगाचा बचाव केंद्र सरकार कोणत्या तोंडाने करणार? अलीकडे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने जेव्हा आयोगाचे पितळ उघडे पाडले तेव्हा सत्ताधारी भाजपतील अनेक राघू वटवट करत आयोगाच्या बचावार्थ पुढे आले होते. आता त्या सगळ्यांचा आवाज बंद झालेला दिसतो. आज या विषयावर ना भाजपचे हे बोलके राघू काही बोलतात; ना कोणी मंत्री. सगळ्यांची एकाच वेळी बसलेली दातखीळ जे काही झाले त्यामागे नक्की कोणाचा हात असू शकतो हे ध्वनित करणारच नाही, असे नाही. या मुद्द्यावर आता सरकारी यंत्रणा गप्प आणि विरोधकांस चेव अशी स्थिती निर्माण होणे सरकारला भूषणावह नाही. ‘एक्स्प्रेस’च्या वृत्तानंतर राजधानी दिल्लीत आणि नंतर काही प्रमाणात मुंबई वा अन्यत्र निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने झाली वा अजूनही होत आहेत. मुंबईतील सर्वपक्षीय निदर्शनांत जवळपास सर्वच सहभागींनी ही मतदार याद्या सफाईची मोहीम मागे घेण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयातील इतक्या ज्येष्ठ न्यायाधीशांनी आयोगाबाबत जी मते व्यक्त केली ती पाहता या मागणीस आता अधिकच जोर चढेल यात शंका नाही. सर्वोच्च न्यायालयातही सोमवारी या विषयावर सुनावणी झाली आणि मतदार याद्यांत नावनोंदणीसाठीच्या अर्जातील बदल आम्ही मंजूर केलेले नाहीत, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केले. मग हे केले कोणी? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे दोन सहकारी सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनाही हे बदल मान्य असल्याचे स्पष्ट झालेले नाही. तसेच ज्या रीतीने हे बदल केले गेले त्या बदलाच्या प्रक्रियेस या दोन निवडणूक आयुक्तांची मंजुरी होती किंवा काय, याबाबतही अनभिज्ञता आहे. असे असताना या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांस सरकार किती काळ झाकणार?
एरवी आपल्या अंगणातील कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवणे थांबवता येईल असा भ्रम काही आत्ममग्नांस होऊ शकतो. या प्रकरणात ती शक्यता नाही. कारण निवडणूक आयोगाच्या उद्योगांचा ‘सूर्य’ उगवलेला आहे. आता कोंबडे झाकण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही. तसे केल्यास तो करणारेच उघडे पडतील. तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांस उघडे पडू द्यायचे की ते रोखण्याचा प्रयत्न करून स्वत: उघडे पडायचे इतकाच काय तो पर्याय सरकारकडे असेल.
